Wednesday, February 13, 2019

वेड....."अरे अभिजीत, खाली ये, जरा बघ देशपांडेकाका आलेत. बराच वेळ झाला."

वेड
11/02/2019

"अरे अभिजीत, खाली ये, जरा बघ देशपांडेकाका आलेत. बराच वेळ झाला." "काय ना! या अभिजीतचं वेड काय विचारू नका. सुट्टी असली ना! की हा असाच तासनतास वरच्या खोलीत जाऊन बसलेला असतो." "किती वाचन करावे म्हणते मी.  वेड लागलय वाचनाचं नुसतं. जे नवीन जुनं पुस्तक मिळेल ते तो वाचतो आणि दोन दोन तीन तीन दिवसात संपून टाकतो."
"अहो घारे काकू, असू दे. त्याच्या वाचनाचं आणि एखादा विषय स्पष्ट उलगडून सांगण्याच्या स्टाईल मुळे तर तो कॉलेजमध्ये आम्हा मित्रांमध्ये आणि शिक्षकांमध्ये फेमस आहे"
असे कित्येक अभिजीत सध्या कमी होत आहेत.
"चांगले बोलू शकतात पण त्यात सकसपणा नाही आणि चांगले लिहू शकतात पण त्यात स्निग्धता नाही" अशी अवस्था आहे.

गेल्या दहा बारा वर्षात आणि नव्वदच्या दशकानंतर जन्मलेल्या सर्वच मुला-मुलींच्या पिढीमध्ये वाचन संस्कृती लोप पावते आहे.  प्रसिद्ध लेखकांच्या कादंबऱ्या नाटके कथा संग्रह आत्मचरित्र किंवा प्रवासवर्णनांची छोटी छोटी पुस्तकं वगैरे तर सोडाच पण साधा वर्तमानपत्रसुद्धा वाचत नाही. एक वेळ अशी होती की भेळपुरी च्या राहिलेल्या कागदावरच्या बातम्या पण वाचायची ही वेडी लोकं. आणि सध्या काय 599 रुपये वर्षाला वाल्या व्रुत्तपत्रांमुळे, घरात कदाचित दोन-तीन वर्तमानपत्र येतच असतील पण त्या वर्तमानपत्राची साधी घडी देखील मोडलेली नसते अशी रोजची अवस्था.

व पु काळे पु ल देशपांडे किंवा गुलजार किंवा कुसुमाग्रज यांच्या सारख्यांच्या कथासंग्रहातील कवितासंग्रहातील आठ दहा ओळी सर्वत्र व्हायरल होतात पण त्यांच्या एखाद्या चांगल्या पुस्तकाचा चार किंवा त्याच्यात असलेले एखादी कथा किंवा समीक्षण व्हायरल होत नाही की जेणेकरुन इतरांना पुस्तक घेऊन वाचावासा वाटेल.
 वपु पुलं विंदा विसं असे अनेक थोर लेखक कवी सध्या व्हॉटस्अप आणि फेसबुकवर कागदाच्या चिठ्ठ्या चिटोरे लिहिलेल्या अक्षरांत सापडतात.  त्यांची संपूर्ण एखादी कथा एखादी कविता एखादा नाटकातला अंक किंवा एखादा आत्मचरित्रातला एक भाग असं लेखन जे आहे ते कोणी वाचतच नाही.  हे म्हणजे असं की आईस्क्रीमच्या मिठाईच्या मोठ्या दुकानात जायचं त्या दुकानदाराकडून सर्व प्रकारची मिठाई त्या लाकडी चमच्यावर छोटी-छोटी चव घ्यायची आणि मुळ पदार्थ संपूर्ण न खाता फुशारक्या मारायच्या हो मी खाल्ले अमुक-तमुक आईस्क्रीम किंवा काय होती विरघळणारे मिठाई काय भारी असतं हो वगैरे वगैरे.

नवीन मेसेज, फॉरवर्ड वगैरे पद्धतीने बैठकीच्या वाचनसंस्कृतीला खीळ बसली आहे.  मग कोणी अमकातमका सामाजिक,राजकीय, शैक्षणिक किंवा भावनिक पोस्ट पाठवतो आणि आम्ही ते साहित्य म्हणून समाधान मानतो. मग त्यात जुन्या बालपणीचा त्याच ठरलेल्या आठवणी, कोणतं डाऐट भारी, स्त्रीवर एखादी भावनिक किंवा क्रांतिकारी कविता वगैरे वगैरे. सर्व चांगलेच आहे पण शेवटी ते वाचून व्हाट्सएपच्या "clear chat" सारखं काही दिवसांनी निघून जातं. आत पर्यंत पोहोचत नाही किंवा परत परत विचार करायला लावत नाही.

 बाजीराव रोडवरील "अक्षरधारा" किंवा  फिरती ग्रंथालय, विविध नगर वाचनालय यांसारखे अनेक जण आपापल्या परीने वाचन संस्कृती टिकवण्याचा जोपासण्याचा आणि पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायेत.  त्यात ते काही प्रमाणात यशस्वी सुद्धा होतायत.
 तरीही आज घराघरात स्वतः मम्मी-पप्पा मोबाईल टॅब यांच्यावर वरवरच्या वाचन संस्कृतीचे भाग बनत चालले आहेत त्यामुळे पूर्ण पुस्तक वाचण्याची संस्कृती पुढे नेणं अवघड बनत चाललंय. अहो वेळ कुठे असतो, आम्ही फार बिझी आहोत यासारख्या कोरड्या सबबी पुढे केल्या जातात.

पुण्या-मुंबई सारख्या आणि इतर निमशहरी भागात गल्लोगल्ली अभ्यासिका भरपूर झाल्या आहेत, पण ग्रंथालय अर्थातच "लायब्ररी" बोटांवर मोजण्याइतक्याच राहिल्या आहेत कदाचित हेच द्योतक आहे "विद्यार्थी परीक्षार्थी झाल्याचं."

 सावरकर, नेहरू-गांधी, आंबेडकर, रतन टाटा, अब्दुल कलाम अशी कित्येक थोरामोठ्यांची चरित्रे किंवा शिवाजी महाराजांचे शिवचरित्र, पेशवाईचा इतिहास वगैरे किती वाचली जातात माहित नाही. व्हॉट्सॲप आणि फेसबुक वर कोणीतरी काहीतरी संदर्भहीन माहिती छापतो आणि सर्वसाधारण माणूस तीच माहिती खरी खोटी मानतो. आणि त्या व्यक्तीच्या बद्दलचे स्वतःची मतं बनवतो. जे काही प्रमाणात नक्कीच घातक आहे.
 पुढच्या पिढीला इतिहास व्हाट्सअप फेसबुक मधूनच कळतोय. हि परिस्थिती नक्कीच विचार करायला लावणारी आहे. खरा इतिहास वाचायला आणि समजून घ्यायला कोणाला वेळच नाही.

 पूर्वी घरांमध्ये एखाद्या रविवारी खास इंग्रजी पेपर आणण्याची सवय होती. इंग्रजी सुधारावे, इंग्रजी शब्दकोश सुधारावा हा हेतू. त्यातून वाचन घडत होते.  वाचतांना आपोआप तीनही इंद्रिये सहभागी होत होती. तोंड, डोळे आणि कान, त्यामुळे आपोआपच एकदा वाचलेली माहिती किंवा गोष्ट कायमस्वरूपी मेंदूत साठवून ठेवली जात होती आणि त्याचा वैयक्तिक जीवनात त्याचा उपयोग होत होता.
 आता काय त्या गुगलच्या बाईनं आणि लाडक्या अलेक्सानं डिक्शनरी, अटलास, माहितीकोष वगैरे कालबाह्य करून टाकली आहेत.
 ASTONISH हा शब्द त्याचा अर्थ समजण्यासाठी कपाटातील डिक्शनरी काढा, A..S...T..अशा पद्धतीने तो शब्द डिक्शनरी त्या त्या ठरावीक पानावर शोधा आणि मग त्याचा अर्थ, समानार्थी विरुद्धार्थी समजून घ्या. हे सर्व करताना एक उत्सुकता होती आणि एवढे सगळं शोधल्यावर तो शब्द नक्की लक्षात राहत होता. कारण परत डिक्शनरी बघण्याचा द्राविडी प्रणाम कोण करेल.
पण आता काय आहे डायरेक्ट गुगल कभी भी कही भी।

संपूर्ण कथासंग्रह, दिवाळी अंक, कादंबरी गेलाबाजार वर्तमानपत्र ह्या वाचनात एक बैठक होती. ज्यांनी बुद्धी मन आणि शरीर यांना एकता, स्थिरता मिळत होती. एकाग्रता आणि संयम या गुणवैशिष्ट्यांची आपोआपच निर्मिती व्हायची. मुळात वाचन बैठकच हरवल्यामुळे हल्लीच्या पिढीतील एकाग्रता आणि संयम यांचा पूर्ण अभाव निर्माण झाला आहे.  मग आपसूकच विद्यार्थी हा परीक्षार्थी बनत चालला आहे.

"पुस्तकी वाचन आणि मोबाईल बघत वाचून लागलेला चष्मा यात जमीन अस्मानाचा फरक आहे. मोबाईल मुळे लागलेला चष्मा हे वैयक्तिक व्यंग निर्माण करतो, तर पुस्तक वाचनातून लागलेला चष्मा हा समाजातील व्यंग बघायला शिकवतो."

 वाचन संस्कृतीची जोपासना घराघरात करणे ही सध्याच्या मधल्या म्हणजेच आमच्या पिढीची गरज आहे. आपल्या आधीच्या पिढीने जो वाचनाचा वारसा, संस्कृती दिली आहे ते आपण आपल्या कृतीतून पुढच्या पिढीला देण्याचे कर्तव्य आहे. विविध खाद्यजत्रा, शॉपिंग फेस्टिवल, विकेंड ट्रीप अथवा वन डे मॉल विजीट याचबरोबर मुलांना एखाद्या पुस्तक प्रदर्शनाला किंवा ग्रंथालयाला किंवा पुस्तकांच्या दुकानात महिन्या-दोन महिन्यातून एकदा घेऊन जाऊ या. त्यानिमित्ताने त्यांनाही कळेल की पुस्तकं, ग्रंथ, कादंबरी, कथासंग्रह दिवाळी अंक, मासिकं असही काहीतरी असतं जे खोलवर ज्ञान देत.
"शब्द आणि ज्ञानकोश म्हणजे फक्त गुगल किंवा विकी नव्हे तर त्यांचे मायबाप कोण आहेत ते पण दाखवा त्यांना "


ता.क.
मी देखील या विषयात शिकाऊ उमेदवारच किंवा पालक आहे आणि हा टिपिकल पुणेरी सल्ला आहे (जो फक्त दुसर्यांनाच दिला जातो) असे मानू नये.

धन्यवाद
---©मिलिंद सहस्त्रबुद्धे
९९22१८26३२

आणि सुबोध भावे......"पारू ग पारू वेसावची पारू" गाण्यावर आमच्या सातवीच्या गॅदरिंग मध्ये डान्स चालू

"पारू ग पारू वेसावची पारू" गाण्यावर आमच्या सातवीच्या गॅदरिंग मध्ये डान्स चालू होता. मी जोरात ओरडलो 'जोश्या ही पारू कोण आहे रे स्टेजवर? च्यायला काय दिसतेय यार! शेजारच्या मुलींच्या हुजूरपागा शाळेतून कोणाला बोलावलयं का खास या डान्स साठी.?"
"अरे बुध्द् या नाही रे...तो आपल्या वरच्या वर्गातला भावे आहे."
सुबोधचा कदाचित रंगमंचावरचा हा तो पहिलाच परफॉर्मन्स असेल. तो त्या पारूच्या वेशात इतका सुंदर दिसत होता की आता खात्री पटते की बालगंधर्व त्याच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकलं नसतं. अगदी आपले बनवाबनवी वाले महागुरु सुद्धा नाही.
पुण्याच्या पेठी वातावरणात आणि एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला आमचा नूमविय सुबोध, आज मराठी रंग-चित्रसृष्टी वर एक हाती राज्य करतोय. आमचा हा आनंद फक्त अस्सल
पुणेरी नुमवियंनाच कळू शकतो.
तेव्हा नाही पण आता सुबोधला जवळून ओळखणारे पुण्यात अचानकच "खूप" झालेत. एक काळ असा होता की तो भरतच्या बाहेर (भरत नाट्यगृह, पुण्यातील लोकांना भरत म्हंटलं की रामायण नाही आणि मस्तानी म्हंटलं तर बाजीराव नाही...तर सदाशिव पेठ हे कळते. ) टपरीवर त्याचं ते टिपिकल जीन्स जॅकेट घातलेला, पायात कोल्हापुरी चपला आणि टाईमपास करत उभा असायचा;पुरुषोत्तम, फिरोदिया आणि इतर एकांकिका स्पर्धांसाठी.
तो सुबोध आठवला की वाटतं जिद्द, परिश्रम आणि खंडोबा वरची अढळ श्रद्धा त्याला कुठच्या कुठे घेऊन गेली. घरच्या खंडोबाच्या नवरात्रात अजूनही हा दरवर्षी सहा दिवस पूर्णवेळ एखादा सामान्य भक्ता प्रमाणे कार्यरत असतो. अगदी सामानाची पोती उचलण्यापासून ते आलेल्या भक्तांना स्वतः जातीने पंगत वाढण्यापर्यंत. कोणतेही स्टारडम आणि हाय सोसायटीचे हिल्स बूट न घालता हा जमिनीवर पाऊल ठेवून चालण्याचा भावेरुपी संस्कार त्यांनी अजून जपला आहे. सुबोध अजूनही गणपती मध्ये बायको मुलांबरोबर रुमाल बांधून साधेपणाने स्कूटरवर गणपती बघायला जातो आणि इन्स्टॉवर त्याचा फोटो अपलोड करतो हे पाहून मला नेहमी आश्चर्य वाटतं.
आपल्याकडे स्ट्रगल या शब्दाला गरिबीतून वर आलेला, चाळीत राहायलाय, दुकानात काम करत होता, एनएसडीमध्ये खूप वर्षे काम करून वर आलाय, कोणाचातरी असिस्टंट होता वगैरे सारखी बिरुदावली लावली की फार मोठे काहीतरी आहे असं निर्माण होतं किंवा कधी कधी केलं जातं. परंतु पुण्यातून मुंबईत येणे आणि मराठी रंगभूमी अथवा चित्रपटसृष्टीत नाव निर्माण करणे याच्यासारखा स्ट्रगल हा एखादा सुबोध सारखा पक्का पुणेकर अभिनेताच जाणू शकतो.
स्वतःच्या या खडतर स्ट्रगलला किंवा विविध चांगल्या वाईट अनुभवांना उगाच परिस्थितीची दुःखाची किनार न देता जेव्हा तो घेई छंद सारखे एक पुस्तक लिहितो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते. या पुस्तकात त्यांनी त्याला आलेले विविध अनुभव, त्यानी घेतलेले परिश्रम आणि लोकमान्य टिळक, बालगंधर्व, कट्यार काळजात यासारख्या चित्रपटांची निर्मिती करताना त्यांनी मनात ठेवलेला अखंड आत्मविश्वास हा त्याच्या कसा कामी आला आणि तो त्यात यशस्वी कसा होत गेला याचं शब्द चित्रण उत्तम केले आहे.
कुठल्याही प्रथितयश निर्माता-दिग्दर्शकाच्या घरचा "पाणक्या" होऊन त्याच्याच प्रत्येक चित्रपटात भूमिका मिळवायची, पार्ट१,२ काढायचे आणि स्वतःची हवा निर्माण करायची. असली तद्दन प्रसिद्धी न मिळवता,
स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कर्तुत्वावर आणि वैविध्यपूर्ण अभिनय करण्याच्या ताकदीवर सुबोध विविध चित्रपट करतोय. हे चित्रपट तिकीट बारीवर यशस्वी तर होतातच आहेत पण प्रेक्षकांच्या मनात सुद्धा कायमस्वरूपी घर करून राहतात.
तसं पाहिलं गेलं तर मराठी चित्रपट आणि रंगभूमी सृष्टीत औरंगाबाद ग्रुप, सोलापुर ग्रुप, नाशिक ग्रुप, ठाणे ग्रुप असे विविध ग्रुप आहेत आणि त्या ग्रुपमध्ये त्या त्या ठरावीक कलाकार त्या त्या ग्रुपच्या पिक्चर मध्ये काम करत असतात. पण इथं पुणे ग्रुप तुम्हाला शोधूनही सापडणार नाही कारण पुणेकर ग्रुप मध्ये सुद्धा स्वतःचाच एकट्याचा त्याचा एक ग्रुप करून असतो.
सुबोध पक्का पुणेकर असल्यामुळे जन्मताच स्वावलंबीपणा नसात भरलेला त्यामुळे स्वतःच्या कष्टावर आणि आत्मविश्वासावर हा मराठी चित्रपट सृष्टीत खंबीरपणे उभा आहे.
हिंदीत जसा अक्षय कुमार सेल्फ मेडमॅन म्हणून ओळखला जातो, तसा सुबोध हा मराठीतला सध्याचा सेल्फ मेडमॅनच (अक्टर)आहे.
जुन्या नाटकांचे सुद्धा उत्तम कलाकृती असलेले आणि तिकीटबारी वर प्रचंड यश मिळवून देणारे कटार काळजात आणि सविता दामोदर परांजपे सारखे चित्रपट सुबोधनी एक हाती यशस्वी करून दाखवले.
त्याच्या नवीन डॉक्टर काशिनाथ घाणेकर मधल्या डायलॉग प्रमाणे म्हणायचं झालं तर ... "मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा संगीत नाटकाच्या तिकीट बारीवर खेचून आणलं या नव्या सदाशिवनी"
लोकमान्य टिळक, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली आणि डॉक्टर काशिनाथ सारखे चित्रपट आणि त्यातली भूमिका सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत लीलया वठवणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्याचा प्रकार आहे.
सतत नवीन करण्याचा ध्यास आणि पक्का नुमविय असल्यामुळे "हाती घ्याल ते तडीस नेण्याचे" बाळकडू शाळेत मिळालेले त्यामुळे प्रत्येक भूमिका अव्वलच ठरेल याची त्याला आणि इतरांना खात्री असतेच.
आता सध्याचेच उदाहरण घ्या ना "विक्रांत सरंजामे". तुला पाहते रे ही मालिका अल्पवधीत हायेस्ट टीआरपी मिळवणारी पहिली मराठी मालिका ठरली आहे. यात सुबोधने जी मनातील चलबिचल चेहऱ्यावर तंतोतंत उतरवली आहे त्याला खरंच तोड नाही. अहो पांढऱ्या केसांचा आणि चाळीशीतला हिरो सुद्धा सिरीयल मधून एवढा हिट होऊ शकतो, दिल की धडकन होउ शकतो.. हे फक्त सुबोधच करू जाणे.
सध्या पंचविशीतल्या मुलींपासून ते पन्नाशीतल्या बायकांपर्यंत सर्वत्र सबकुछ सुबोध अशी परिस्थितीच निर्माण झाली. त्यांच्यासाठी सध्या एकच वाक्य आहे ते म्हणजे "मनोभावे...सुबोध भावे."
आणि हो हल्ली आमच्यासारख्या चाळीशी नंतर च्या पुरुषांना सुद्धा एक नवीन पालवी फुटली आहे बरं त्याच्या या भूमिकेमुळे. धन्यवाद सुबोध.
लिहिण्यासारखे बरेच आहे शब्द, अक्षर, कागद कमी पडतील. त्याच्या वादळवाट मधल्या आवडत्या जयसिंगच्या भूमिकेपासून, हापूस मधला टिपिकल कोकणातला अजित, सनई चौघडे मधला प्रोफेशनल बोरगावकर, तुला कळणार नाहीतला सध्याच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा राहुल, हृदयांतर मधला गंभीर शेखर जोशी ते आता परवापर्यंतचा सविता दामोदर मधला शरद अभ्यंकर आणि पुष्पक मधला मुंबईचा मिशीवाला नातु विलास.
टिपिकल पाट्या टाकत त्याच त्याच हा हु कॉमेडी किंवा माकड चाळे करत हिरो स्टाइलच्या भूमिका न करता, प्रत्येक भूमिका वेगळी, विषय वेगळा आणि बाज ही वेगळाच.. हीच सुबोध ची खासियत आहे.
म्हणून आता शेवटी एवढेच म्हणतो "आपलं हे नाणं एकदम खणखणीत वाजतंयsss... पिक्चर एकदssम टॉप एकदम कडSSSक..."
----मिलिंद सहस्रबुद्धे ©
ता.क.
यापुढे कदाचित मराठी चित्रपटांच्या टायटल्स मध्ये एक नवीन प्रथा सुरू होईल हिरोच नाव .."आणि" सुबोध भावे लावण्याची.

"चिमटा" (काल्पनिक विडंबन)....काल रात्री पाटबंधारे खात्याची फाइल वाचता वाचता कधी झोप लागली

काल रात्री पाटबंधारे खात्याची फाइल वाचता वाचता कधी झोप लागली कळालेच नाही. पुढच्या आठवड्यात अधिवेशनात सभागृहात त्या विषयावर चर्चा आहे. त्यामुळे गेला आठवडा पासून त्या ५००-६०० फाइलींचा स्टडी करतोय.
अचानक जाग आली तेव्हा चांगलं उजाडलं होतं, फ्रेश होउन बाहेर आलो, बघतो तर सौ. गाण्याच्या रेकॉर्डिंग ला आणि मुलगी शाळेला गेलेली. म्हणजे नक्कीच खूप उशीर झालेला उठायला. नेहमीप्रमाणे आंघोळ पुजा आटपली आणि ब्रेकफास्ट टेबलावर बसलो. आज आवडीचे "तर्री पोहा" होते नाष्ट्याला. खात असतानाच प्रवीण (आमचा पी ए) आला, दिवसभराचे शेड्युल अपडेट करायला.
"साहेब, आज ह्या दोन महामंडळाचे कार्यक्रम आहेत, मग ही तीन ठिकाणी उद्घाटने, पक्ष कार्यकर्ते बरोबर बैठक आणि संध्याकाळी पाटील साहेबांकडे पुजेच्या तीर्थ प्रसादाला जायचे आहे."
आम्ही अक्षरशः आ वासून बघतच राहिलो त्याच्याकडे, तोंडात पोह्यांचा घास तसाच. प्रवीण घाबरून म्हणाला"साहेब, काय झालं, काही होतयं का?"
"अरे, काय झालं, काहीच झालं नाही का? आज एवढेच बाकी काही नाही? कोणता मोर्चा नाही? आंदोलकांबरोबर चर्चा नाही; दूध भाजीपाला वगैरे रस्त्यावर ओतले नाही: रास्ता रोको नाही; कुठल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप नाही? काहीच नाही?" " बघ जरा नीट एखादी दुर्घटना तरी असेल, आम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल" त्याला पण थोडे हसू आलं, "खरंच काही च नाही साहेब"... मात्र मले काइ चैन पडेना.
मग काय कधी नव्हे ते आमच्या डाएटिशिन मैडमचे नियम धाब्यावर बसवून आम्ही चांगले दोन प्लेट "तर्री पोहा" खाल्ले. वर परत "आलू बोंडा" बनवायला सांगून ते खाल्ले. काय जीवात जीव आलाय म्हणून सांगू. अहो मनसोक्त खाण्याची मजा काही औरच असते ना.
असो, चैनल सर्फिंग केले, "उघडा डोळे नीट बघून" हेडलाइन पाहिल्या, म्हटले कुणाले चुटकीसरशी मुख्यमंत्री होउन पटापट सह्या करायचे आहेत का बघावं पण काहीच नाही आणि हो कैलेंडर पाहिले तर एक एप्रिल पण नव्हता.
एवढ्यात आमचे लाडके "नाथ" संप्रदायाचे भक्त खानदेशी 'गिरीश"भाऊ आले. " साहेब, चला ताडोबा ला जाउ. वाटेत संत्राबर्फी खाऊ. सकाळी चार्टर्ड नी जाऊ, दुपारची जंगल सफारी करू आणि रात्री परत. नवीन बछडे झालेत वाघीणीला फोटोग्राफीला मजा येईल". गिरीश ला एक वाईल्ड लाइफ, शिकार असली खुप आवड. आमच्याच वयाचा आहे पण फीट आणि फाइन, हेवा वाटतो. डैशिंग आहे गडी. कधी कधी वाटतं त्यालाच देउन टाकावं ग्रुहखातं, पण मग विचार येतो, नको हा कधी कोणाची अचानक शिकार करेल सांगता येत नाही.
त्याले म्हटलं " अरे बाबा नको, ताडोबा, व्याघ्र दर्शन आणि फोटो हि "भवना" वरच्या "युवराजांची" मक्तेदारी. परत आम्ही तिथेही अव्वल ठरलो तर खरे खुरे नाही पण "कागदी वाघ" आमाले खाउन टाकतील."
श्या काहीच न्युज नाही. त्याला म्हटलं लाव रे जरा शिवाजी पार्कच्या "क्रुष्णाला" फोन, म्हणाव वाजव तुझं नेहमीच सुमधुर मराठी गाणं बासरी वर, तेवढाच जरा पुढील दोन दिवस मिडिया वर टाइमपास. (ओह..सॉरी बासरी म्हटलं का मी, मले पिपाणी म्हणायचे होतं)
वर्तमानपत्रात पण काही नाही ना. मात्र योग, योगा आणि योगी झळकत होते मथळ्याखाली. मनात खट्टू झालं "मोटा भाईंना" कर्तृत्व दाखवायला आज काहीच नाही. आम्हा १५-१६ राज्यांच्या नेतृत्व करणार्यामधे कायम स्पर्धा चालू असते कोण कीती जास्त संघर्ष करतोय, टीकतोय आणि वर येतोय. कॉर्पोरेट कल्चर यु नो.
आमच्याकडे आता "संघर्षातून" वर येणार्याला फार महत्त्व प्राप्त झालंय, पुर्वी सारखं "संघटनेतून" वर येणार्याला नव्हे. जेवढे रोज जास्त संघर्ष तेवढे वरच्या दरबारी वजन वाढते.
आज "सामना"वीरांनी सुध्दा आमच्या स्टैंडकडे चौकार षटकार न मारता, डायरेक्ट "बारा" नंबरच्या स्टैंड वर फटकेबाजी करत शतक ठोकलेले वाचून उर भरून आला. वाटलं चेंबर मधे जाऊन जादू कि "झप्पी" द्यावी. सध्या झप्पी ची फैशन आहे म्हणे.
मग कधी नव्हे ते"कुबेर"धन वाचले, हुशार आहे माणूस.
विचार आला जाणत्या राजांनी आमच्या वर काही स्तुतीसुमनं उधळली असतील पण कसले काय काही नाही. त्यांचं एक बरंय, ते सतत टोपीची आदलाबदली करत वातावरण तापवत असतात. पण आम्ही बी "विदर्भाचे" आहो ना उच्च तापमानात काम करण्याची सवय आहे आमाले.
आम्ही मात्र एकच टोपी घालतो आणि ती सुध्दा फक्त विजयादशमीलाच बरे.
खरं सांगू तुमाले , आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाची ५६ इंची छातीची चर्चा... इथं विविध लोकांना आश्वासनं देउन, ती सगळी पोटात ठेवून, आमच्या पोटाचा घेर ५६ इंच व्हायची वेळ आलीय.
अचानक संध्याकाळ झाली, कशी? काय माहीत!... पाटील साहेबांकडे तीर्थ प्रसादाला जायचे आठवले. आमचे परम मित्र "साईभक्त पाटील" साहेब, सध्या विरोधात बसायला लागल्यापासून त्यांची कवी प्रतिभा दिवसागणिक फुलत चालली आहे. आम्ही पण मग कधीतरी र ला र आणि ट ला ट जुळवून ठोकून देतो एखादी कविता. तसे "रामदसां"चे मनाचे श्लोक ऐकतो ना सभाग्रुहात.
बरं तिकडे पुजेला जायला तयार झालो इतक्यात सौ आणि मुलगी घरी आल्या. लगेचच मुलीने हट्टच धरला, "बाबा , राणीच्या बागेत पेंग्विन बघायला जाउ ना" ऐकायला च तयार नाही. विचार केला तीचा बालहट्ट पुरवावाच. पेंग्विन आणण्याचा जर ते पुरवत असतील तर आम्ही बघायचा का नाही पुरवायचा!
मग विथ फैमिली राणीच्या बागेत गेलो, आणि विविध प्राणी पक्षी बघून, मले मनात मजेशीर कंपेरीझन चालू झाली...... तेवढ्यात पायाले काहीतरी चावले आणि आम्ही जोरात "नमो नमो शहाय..!" ओरडतच जागे झालो.
सकाळी सकाळी आमच्या सौ. नी पायाले जोरात "चिमटा" काढला होता, तेव्हा कुठे खरी जाग आली. सौ म्हणल्या " हुं उठा लवकर, उशीर झालाय, खाली दादा आणि गिरीश भाऊ वाट पाहतायत कधीची. आज तुमची विविध समन्वयकां बरोबर मिटींग आहे ना !..."
हुश्श, म्हणजे ते आधीचे सगळे स्वप्न होते तर...मले वाटले "एक उनाड दिवस" आपले नशिबी आला की काय ?...
----मिलिंद सहस्रबुद्धे

ओह माय लॉर्ड(स्).......इंग्लंड तिसऱ्या दिवशी सकाळी दोन तास खेळणार आणि मग डिक्लिअर करुन आपली खोल

इंग्लंड तिसऱ्या दिवशी सकाळी दोन तास खेळणार आणि मग डिक्लिअर करुन आपली खोलणार..हे साधं आदल्या दिवशी शेंबड्या पोराला सुद्धा कळलं होतं. मग का नाही रात्र भरात काही स्ट्रेटेजी प्लान केली. आणि जर केली तर मग दिसली का नाही. एखादी बैटींग ओर्डर चेंज करुन इंग्लंड च्या बौलरसना गाफिल करता आले असते.
एकतर टीम सिलेक्शन करतांना मिडिया चे प्रेशर घेऊन एडिशनल स्पीनर घेतला, बरं पीचचा अंदाज आल्यावर फास्ट बौलरसना जास्तीचा स्पेल देता आला असता. उन्हामुळे आपल्याला तोटा झाला, पण इतका त्यांनी चारशे पर्यंत जावे आपल्या चौपट.
आपण फलंदाजी मधे सारखं विराट विराट कीती करणार, हे म्हणजे अमिताभ चा डबल रोल आहे म्हणून सेटमैक्सच्या सुर्यवंशमला नैशनल आवॉर्ड देण्यासारखे आहे. आमच्या लहानपणी एक फटाका होता चमनचीडी, ती जशी पेटवल्यावर कशीही कुठेही जायची, तसे त्या अंडरसनचे आणि व्होकस्चे बौल घुसत होते आणि आमची कागदी वाघ शिकार होत होते.
आपण प्रैक्टिस मैचेस कुठे खेळलो तर आयरलंड मधे, दमट वातावरणात. आणि त्यांच्या जोरावर इंग्लंड मधे डायरेक्ट उतरलो. राज्य नाट्य स्पर्धेसाठी सिरीयल मधे काम करण्याचा प्रकार आहे हा.
आयपीएल आणि टिट्वेंटी च्या परफॉर्मन्स वर आपण टेस्ट मैच संघ निवडत गेलो तर भारताचे परदेशातील ट्रेक रेकॉर्ड खालावतच जाणार. हिमेश सुपरहिट गाणी देतो म्हणून श्रीनिवास जोशी त्याची सवाई ला महफिल लावत नाहीत. इंग्लंड मधे टेस्ट ला खेळताना बैठक पाहिजे, पेशन्स पाहीजे तीथे टीटिट्वेंटी सारखं फास्ट रनची घाई योग्य नाही. गावसकर शीव्या खायचा पण साला त्या बावीस यार्ड वर भेदक मार्यासमोर टीचून टिकून दिवसभर उभा रहायचा. द्रविड, लक्ष्मण भले चौकार षटकार, शंभर चे रेकॉर्ड करत नसतील पण एकदा पीच वर बैट घेऊन उभे राहिले की अंबुजा सिमेंट ना भाऊ.
आपले बैट्समन इतके टि ट्वेंटी मय झालेत की टैस्ट मैच मधे सुध्दा सगळे जण मिळून २० ओव्हर च्या वर मैदानावर थांबत नाहीत.
तो व्होक्स एक मैच येतो, विकेट्स काढतो, परत जवळपास दिडशे रन ठोकतो, कसं काय जमतं बुवा!
आपले शहाणे रहाणे, ज्याच्या नावातच फक्त विजय आहे, पहिल्या इनिंग ला विराटने खाल्ला अशी सहानुभूती मिळाल्यावर किमान दुसर्या इनिंग ला खेळेल असा पुजारा..कोणीच खेळत नाही. पांड्या आणि अश्विन किमान तीशी चाळीशी पर्यंत तरी पोहोचले, बाकी सर्व महारथी षोडश वयातच धारातीर्थी पडले.
नुसतं एग्रेशन आणि शुsssक ची एक्टींग करून चालत नाही, तर मैच जिंकून द्यावी लागते. "है कोई माई का लाल । जो विजय को हाथ लगा सके। " असा डायलॉग बच्चन नी कुली मधे मारायचा आणि स्वतः च मार खायचा कसं वाटेल.
तरी बरं सध्या कॉमेंट्री उपदेशकच प्रशिक्षक आहेत. जीथं त्यांच्या अदील रशीदला बौल हातातसुध्दा मिळाला नाही तीथं आम्ही दोन दोन स्पीनर घेऊन खेळलो.
आपण काही शिकणार आहोत की नाही. का एक रूपाया वाल्या लौटरीच्या दुकानात सत्तर रुपायची लौटरी लागल्यावर घरी सण साजरा करतात तसे आयपीएल आणि टि ट्वेंटी च्या तुटपुंज्या यशाचे सोहळे भरवणार.
सचिन जरी अर्जुनाला क्रिकेट चे सल्ले देणार नाही असं म्हणाला तरी कदाचित परवाची मैच बघता, त्यानीच अर्जुनाला असली मैच बघण्यापेक्षा झोप काढ म्हणून सांगितले असेल.
असो...पुढच्या मैचला शास्त्रीजी आणि शिष्य, काही तरी विराट चमत्कार करतील ही अपेक्षा.
आपलाच..
(उंदीर मारणाच्या विभागात काम करणारा सामान्य कर्मचारी..इति पुलं)
पुणे ३०.

फादर्स डे निमित्त.. मी...बाबा आणि बाईक (काल्पनिक) ......आज आकाश च्या बाईक वर बसले आणि आकाश नी गाडी सिंहगड रोडवर

आज आकाश च्या बाईक वर बसले आणि आकाश नी गाडी सिंहगड रोडवर सुसाट चालवायला सुरुवात केली.
का कुणास ठाउक, अचानक बाबाची आठवण आली. तो सुद्धा रस्ता मोकळा असला की असाच पळवायचा त्याची लाडकी यामहा 100. काय ते प्रेम त्या काळ्या ठेंगण्या ठुसक्या यामहावर. स्वतः च्या मुलीप्रमाणे जपायचा तीला. माझी धाकटी बहीणच जणू.
पुण्यात आल्यावर बाबांनी पहिली घेतलेली आणि शेवटपर्यंत तीच वापरली. काळापरत्वे आमच्या कडे दोन टु व्हीलर आणि एक मोठी फोर व्हीलर आली पण बाबाची यामहा कायम चालू कंडिशनमधे.तो वापरायचा आठवड्यात किमान दोन तीन वेळा.
मला, रोहीत आणि आईला यामहावर लांब लांब घेऊन जायचं त्याला फार आवडायचं. त्यात त्याला शान वाटायची. कोकणातील नागमोडी वाटा, महाबळेश्वर पसरणी घाट, भर पावसात आम्हाला भिजत फर्स्ट सेकंड टाकत सिंहगडावर नेलेलं अजुनही मनात घट्ट आहे.
तो कोणालाही ती वापरायला द्यायचा नाही, मला आठवतंय ते फक्त बाबाचा बेस्ट फ्रेंड सुहास काका कधीतरी चालवायचा.
दर रविवारी यामहा स्वच्छ धुवायची, आयलींग ग्रीसींग करायचं. आधी काही वर्ष साध्या आईल नी पुसुन चकाचक करायचा. पुढे मग त्याला बाइक शायनिंग क्रिम मिळाले. त्यांच्या परदेशातील मित्रांकडून खास मागवले होते. दसरा दिवाळी ला तर तीची ऐट काही औरच होती. जणू दरवर्षी ती नव्याने जन्म घ्यायची, फक्त नंबर प्लेट सोडून.
रविवारी जेव्हा तो तीच्या वर फिरायला बाहेर पडायचा. काळे कट शुज, पोलो टी शर्ट, जीन्स, त्या वेळी पैसे साठवून घेतलेला रे बैन गॉगल आणि चकाचक केलेली यामहा.. खरंच हीरो दिसायचा, होताच तो माझा पहिला हीरो.
सफाई दार चालवण्यात माहीर होता तो, कधीच गचके नाहीत आणि त्यांच्या मागे बसलं की गाडीच्या वेगाची नशा चढायची. आईकडून त्यांच्या लग्नाआधीचे बाईकचे किस्से ऐकून आम्ही खूप हसायचे रडायचो.
कालांतराने मग रोहित ची नव्या स्टाइलची १५०सीसी घरी आली, पण बाबाला ती फारशी भावलीच नाही. तो कायम त्या RX100 च्या गप्पांतच रंगला.
बाबाची एक खास स्टाईल होती. यामहावर तो मुड मधे असला की "मै जिंदगी का साथ निभाता चला गया" हे गाणं हमखास गुणगुणारच किंवा मग किशोर चं "छोटासा घर होगा बादलो की छांव मै।"
असाच एक दिवस अचानक न सांगता त्या बादलांच्या घरात रहायला गेला ती काळी ठेंगणी यामहा मागे ठेवून...
--***--
---मिलिंद स$बुध्दे

१६ ऑगस्ट २०१८..........."अटलजी गेले". सर्वत्र बातमीचा महापुर, न्युज चैनल प्रथम कारण बिचारी प्रिंट मिडिया दुसऱ्या दिवशी

"अटलजी गेले". सर्वत्र बातमीचा महापुर, न्युज चैनल प्रथम कारण बिचारी प्रिंट मिडिया दुसऱ्या दिवशी. व्हाट्सएप वर, फेसबुकवर, सगळीकडे पब्लिक चं स्टेटस, फोटो, RIP, आदरांजली च्या भावना मुसळधार वाहत होत्या. इतक्या की सध्या केरळ मधे पडणारा पाऊस पण क्षणभर थबकला. अगदी साठ वर्षाच्या आजोबांपासून ते नुकतंच मिसुरडं फुटलेल्या नातवापर्यंत सगळेच हळहळले. खरोखर कालातीतच नेता होते अटलजी.
अंतयात्रेला प्रचंड जनसागर ओसंडून पसरला होता अगदी पोलीस एसपीजी कमांडोचा कडेकोट बंदोबस्तात. परंतु त्याचवेळेस सवासौ करोड भारतीयांच्या मनात जो मुक भवसागर उसळला होता तो कोणीच थांबवू शकणारं नव्हतं. तो चिरंतन राहील आणि भविष्यात विविध प्रसंगी तो डोळ्यातून झिरपेलच. काल कश्मीर ते कन्याकुमारी आणि कोलकता ते जामनगर पहिल्यांदाच गदगदलं.
स्वातंत्र्योत्तर काळात पक्षांच्या पलिकडे जाणारे जे नेते झाले त्यात अटलजी अव्वल नंबरात होते. त्याच्या वाटेला आलेल्या सत्तेचा विरोधकांनी नेहमी "तेरावा" घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्यातल्या अलगद मनाच्या कवीने त्या गोष्टी मनावर न घेता कायमच माणुसकीचा राजधर्म पाळला.
एक व्यक्ती अनेक पैलू, कोहिनूरला सुद्धा एवढे नसतील इतके. संघर्षातून सत्तेकडे हे वाक्य तंतोतंत जगणारे अटलजी.
साधारण ९२-९४ साली कॉलेज वयात अटलजी टिव्ही च्या माध्यमातून अधिक समजू लागले. लोकसभा राज्यसभा चे डिडि चैनल्स ह्यावरुन ऐकायला बघायला मिळू लागले. प्रमोद महाजन, बाळासाहेब अश्या राज्यातल्या आमोघ राजकारणी वक्त्यांमुळे ऐकण्याचा ओढा वाढला. आणि मग राष्ट्रीय पातळीवर अटलजींच्या भाषणांची गोडी वाटू लागली. १९९८ साली ते जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा पासुन तर त्याची भाषणं चुकवणं म्हणजे कायदेशीर गुन्हाच वाटू लागला. खुप काही कळत नव्हतं, जनसंघ, श्यामाप्रसाद, जयप्रकाश, हेडगेवार, पण एवढं मात्र नक्की समजत होते की हा त्याच्या पंक्तीत ला नेता आहे. अटलजी.
लोकमान्य, महात्मा, स्वातंत्र्यवीर, पंडीतजी, आम्ही पाहिले नाहीत, अनुभवले नाहीत. पण अटलजी, आडवाणीजी, इंदिराजी आणि बाळासाहेबांसारखी नेतृत्व ऐकायला, बघायला, वाचायला मिळाली हे आमचं भाग्यच. पुढची पीढी बहुतेक कमनशीबी.
बाळासाहेब आणि अटलजी दोन टोकाची व्यक्तीमत्व पण विचार, ध्यास धर्म एकच "हिंदुत्व".जणू टिळक आणि आगरकरच.
एकाने शुन्यातून संघटना काढली आणि एक संघटनेतून नंबर एकवर आला.
"तिरंगा" चा अभिमान हा विविध कलरची जैकेटस, झब्बे आणि पगड्या घालून मिरवायचा नसतो तर तो सदैव आपल्या दोन डोळ्यांच्या बाहुल्या मधे चमकवत ठेवायचा असतो हे कित्येक प्रसंगातून सिद्ध करणारे अटलजी.
एका पीढीने त्यांना घडतांना पाहिले, आमच्या पीढीने त्यांना इतरांना घडवतांना पाहिले आणि पुढच्या पीढीने त्यांनी घडवलेली माणसं पाहीली. त्यामुळे ह्या तीनही पीढ्यात तुमच्या बद्दल आदर आणि प्रेम दिसून आले.
सत्ताकारणासाठी नाही तर समाजकारणासाठी राजकारण करणारा शेवटचा नेता भारताने गमावला.
अटलजींचा बोलताना येणारा तो पॉझ फारच अश्वासक होता. तो पॉझ म्हणजे सध्या Leadership Skills मधे शिकवल जाणारं (Stefan Covey) don't React , do Respond चं उत्तम उदाहरणच.
पहिला बिगर कॉंग्रेसी, स्वबळावर आलेला पंतप्रधान हि भरारी फार मोठी होती. हयाचं महत्त्व तेच लोक जाणतात ज्यानी १९५० ते १९९० पर्यंत चा काळ आणिबाणी सकट अनुभवला आहे.
दोन खासदारांपासून ते संसदेच्या उच्च पदावर पोहचण्याचा तुमचा संघर्षमय प्रवास, हा राजकारणात समाजकारण करणाऱ्या कार्यकर्ता्यासाठी कुराण, बायबल आणि भगवद्गीता च आहे.
तुम्ही शरीराने जरी प्रुथ्वीतलावर आता नसलात तरी आमच्या मनात कायम जिवंत आहात अटलजी
भावनाऐ तो बहुत उभर कर आइ हैं।
लेकीन शब्दोंमे उसे जाया नहीं करूंगा।।
आपका विचार आपकी सोच,आदर्श से
देशभक्ती का जजबा मै अटल रखुंगा ।।
मै अटल रखुंगा ।।
-- मिलिंद सहस्त्रबुद्धे ©

पुण्यात "दिक्षित Diet".......सकाळी सकाळी पक्या गैरज वर आला. नेहमीप्रमाणे माठातलं ग्लासभर पाणी घेतलं आणि तोंडातल्या माव्याची

सकाळी सकाळी पक्या गैरज वर आला. नेहमीप्रमाणे माठातलं ग्लासभर पाणी घेतलं आणि तोंडातल्या माव्याची यथेच्छ चुळ भरली दुकानासमोर. एकदम जोरात सुरुच झाला.. "धक धक करने लगा। ओ मोरा जियारा डरने लगा । संज्या, अन्या छोड ना तू दीक्षित की माधुरी बोल ना..."
अरे पक्या काय बे हे नवीन खुळ..
विक्या तु वाचलं का..भावा पुण्यात माधुरी उभी रहणार २०१९ ला...
च्यायला विकी हे म्हणजे दुधात रम घालून प्यायलेल्या त्या घाणेकर पेग सारखं रे... एकदम कडडेक...
परत कोणी विचारलं तर मानेला झटका दिला आणि म्हटलं "उस्मे क्या है" कि झालं.
मला आत्ताच कसं कसं होतं लेका. ती प्रचारासाठी पुण्यात सभा घेणार. प्रभात फेऱ्या सांज फेऱ्या दुपार फेऱ्या मारणार वेगवेगळ्या प्रचारफेऱ्या मारणार. साला जिची एक झलक मिळावी यासाठी आपण कित्येक मुंबई ट्रिप मारल्या. ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर तीच्या पिक्चरच्या गप्पांवर वील्सची पाकिटं संपवली. गुडलकच्या त्या कासिमशेटच्या चहाच्या उधार्या केल्या आणि जिंदगीभर झुरलो ती. ती माधुरी साक्षात आपल्याच शहरात आपल्याला जवळून दिसणार.
मानलं भावा आपण ह्या दाढीवाल्या जोडीला. काय खेळी केलीय.. चित भी मेरी पट भी मेरी.
आता हया मॅडम उभा राहिल्यावर खुद्द विरोधी पक्षाचा उमेदवार पण माधुरी म्हणलं की स्वतः तिलाच मतदान करणार मग कार्यकर्त्यांचा काय घेऊन बसलाय.
नदी किनारा मेट्रो कामामुळे जो गचाळ झाला आहे तो एकदम नवतरुण आणि नवीन पालवी फुटल्यासारखा तिच्या सभेने भरुन जाणार. बहुतेक आत्तापर्यंतच्या पुण्यातल्या सभांचे सर्व रेकॉर्ड मोडणार आहाहा...
तसंही आपल्या देशात माणूस आणि कामं बघून कोण मतदान करतो. तसं असतं तर कित्येक जण कायम कार्यकर्तेच राहिले असते. मागच्या वेळी नाही का त्या ओम नमामिच्या सुनामी लाटेमध्ये कित्येक लोकांनी आंघोळ करून घेतली.
तीच नक्की निवडून येणार बघ तु.
आपला चीची गोविंदा जर (श्री)रामाला मुंबईमध्ये धारातीर्थी करू शकतो तर..ही तर साक्षात अप्सरा "मेनका" तिच्यापुढे भलेभले "विश्वामित्र" गळून पडतील. आणि तसंही तिच्याजवळ स्वतःचे हक्काचे "श्रीराम" आहेतच आशीर्वाद द्यायला.
अजून एक बरं का होइल ती आली तर, शहरातल्या विविध फ्लेक्सवर तिचे सुंदर फोटो फ्लेक्सवर पुढील पाच वर्षे झळकतील आणि आपल्याला रोज नव्याने बघायला मिळतील. अधून मधून आपल्या रोजच्या पुणे वर्तमान पेपरमधे तिच्या बातम्या, येथील विविध उद्घाटनं, संमेलनं, जाहीर कार्यक्रम यानिमित्ताने तिला सारखं पुण्यात बघायला मिळेल.
नाही तरीही नेहमीच्या "तर तराट" चेहर्यापेक्षा ही अस्सल साजुक वाइन बरी नाही का?
परत दीक्षित असल्यामुळे पुणेरी पुणेकरांची मान दोन इंच अजुन वर जाईल. एक ते चार ऐवजी बारा ते पाच दुकान बंद ठेवतील हे पुणेकर.
त्या जगन्नाथ दिक्षिताचं नाही पण हे दीक्षित डायट्स पुण्याच्या पुणेकरांना नक्कीच वेड लागेल बघ.
हा आता काही लोकांना थोडा त्रास होईल आत्तापासूनच. मिसळवाले बापट यांना दीक्षित डायटनं आपला व्यवसाय बंद पडणार की काय ही भीती सतावायला लागलीय. तर तिकडे कार्तिकातल्या "काकड" आरत्या मध्ये भाकरी वरचे लोणी नाहीसं झालं म्हणे. आणि हो डेक्कनवर विविध हॉटेल्स रेस्टॉरंट्स बंद पडणार की काय यामुळे मालक चिंतेत आहेत, की आपलं दुकान चालू राहणार की पुढच्या खेपेला बंद पडणार.
गावठाणात मात्र "घड्याळावर" विविध "हातांनी" जोरदार गजर लावायला सुरुवात केली म्हणे. त्यातले तर प्रत्येक जण शाहरुख होण्याचा तयारीत आहेत. कारण हरणार हे नक्की. पण मग "हारकर भी जितने वाले को बाजीगर कहते है" हा डायलॉग म्हणायला मोकळे.
हाहाहा...जाम खुष आहे बघ आज मी. आज बबनला म्हणाव कटींगच्या ऐवजी दोन कडक कॉफी.. आणि हो..आज की कॉफी अपनी तरफसे बिडू.....
कॉफी पितांना विक्या म्हणाला..."पक्या
शेवटी आपल्याला काय फरक पडतो रे भाड्या. सिंहासन मधल्या त्या डायलॉग सारखे दाभाडे आले काय किंवा शिंदे आपली हजामत का सुटणारे. आपल्या जीवनात काही फरक पडणार आहे का"
"तसंच दीक्षित आले काय किंवा आणखी कोणी, पीएमटी थोडीच सुधारणा रे, ना हे ट्राफिक कमी होणार आहे आणि पाण्याचा प्रश्न सुटणार आहे का ? रस्ते चांगले होणार आहेत का, की फुटपाथ मोकळा श्वास घेणार आहेत...सर्व जैसे थे च राहील.."
"तेव्हा ह्या दिक्षीत डाएटनी पुण्याचा डाएबेटीस काही बरा होणार नाही लेका..."
-----मिलिंद सहस्रबुद्धे ©

‎नटसम्राट.......ना ना करते प्यार तुम्हींसे कर बैठे..। असं गुणगुणत आपण ह्याच्या प्रेमात पडतोच. असाच

ना ना करते प्यार तुम्हींसे कर बैठे..। असं गुणगुणत आपण ह्याच्या प्रेमात पडतोच. असाच अजब माणूस आहे हा. राकट, रखरखीत, तडक अंगावर येणारा, अचानक भावनिक, दिसायला सर्वसामान्य. तरीपण एकदा का भेटला, बोलला, अनुभव ला का अगदी आपलासा वाटणारा. सच्चा, खरा..जितका पोटात तितकाच ओठात असणारा, भीड न बाळगणारा. शेतकरी कष्टकरी वर्गाची कणव असणारा "नाना". विश्वनाथ (पाळण्यातले नाव) उर्फ नाना पाटेकर.
रंगभूमी ची ताकद काय असु शकते ह्याची कलास्रुष्टीत जी काही उत्तुंग उदाहरणं आहेत त्यात एकदम वरच्या नंबरात नानाचा नंबर लागतो. नाटकांच्या बेकस्टेजचे सेट लावणाचे काम करण्यापासून ते अगदी आत्ता Welcome मधल्या मल्लिका शेरावतचा on screen लव्हर कंट्रोल उदय म्हणणारा उदय शेट्टी पर्यंत चा त्याच्या प्रवास एक अलिखित रोमांचक आत्मचरित्रच आहे.
विजयाबाईं मेहतांच्या मुशीत आणि समांतर प्रायोगिक रंगभूमीच्या कुशीत रुजलेलं हे खडकावरचं बीज पुढे जाउन इतका मोठा वटवृक्ष होइल, असं कदाचित तेव्हाच्या त्यांच्या समकालीन कलाकारांनाही वाटलं नसेल.
सिंहासन मधला तो बेलबोटम पैंट घातलेला किडकिडीत शरीर यष्टीतला चिरकुट स्मगलर आणि फक्त फटके खाण्याचाच रोल असणारा नाना, परींदा मधे डोक्यावर हात मारत आपल्या अंगावर येतो आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवतो. कष्ट, जिद्द आणि पोटाची खळगी भरतांना माणूस कीती दूरपर्यंत एखादी कला शिकतो ह्याची जाणीव होते. मराठी रंगभूमीची ही किमया औरच आहे.
ह्या संपूर्ण प्रवासात त्यानं विविध प्रकारच्या भुमिका रंगवल्या आहेत आणि यशस्वी हिट केल्या आहेत. तरीपण तो कधीही सो कॉल्ड सुपरस्टार झाला नाही की स्टारडम त्यांच्या लेंग्याला चिकटले नाही. तो कायमच लेंगा झब्ब्यातला साधा नानाच राहिला.
रंगभूमी तो जेवलाय, प्यायलाय, उठलाय, बसलाय, झोपलाय अक्षरशः जगलाय. कधीकधी तर तो नाटकाच्या प्रयोगानंतर त्या रंगमंचावर आईच्या कुशीत झोपावं तसा झोपलासुध्दा असेल, इतका तो रंगभूमीशी एकरूप होता. जेवढी तो नाटकात भुमिका प्रयोग बर प्रयोग जीवंत करायचा, तितकीच तीन तासाच्या सिनेमात रंगभूमी असल्यासारखा जीवंत अभिनय बांधयचा.
नाना पाण्यासारखा आहे; चव, रंग, आकार नसलेला. तुम्ही ज्या भुमिकेत त्याला टाकाल, त्या भुमिकेची चव, रंग, आकार घेणारा. अब तक छप्पन पाहिल्यावर त्याच्यात आपल्याला दया नायक आपसूकच दिसतो; खामोशी बघतांना बधिर मुक बाप आपण जवळून समजू शकतो; आणि अग्नीसाक्षीतला तो विक्षिप्त नवरा कसा विसरु; तर अंगार मधला स्वतःच्या मतिमंद मुलाला विषाचे इंजेक्शन थंड चेहर्याने कैडबरीतून देणारा बिल्डर बाप आणि अश्या बर्याच भुमिका.
पु लं नी जशी व्यक्ती आणि वल्ली मधून विविध पात्रे लेखणीतून जीवंत केली तशी नाना ने त्याच्या वजूद सिनेमात विविध भुमिका जीवंत केल्यात. वजूद मधे तो माधुरी ला एक, दोन, तीन..म्हणत दहा म्हटल्यावर जे डोळे भरून पाणी आणून दाखवतो, तेव्हा तो हॉलीवूड च्या अल् पचीनो च्या च पंक्तीत जाउन बसतो.
कदाचित त्या अभिनयामुळे माधुरीला खर्या "एक दो तीन" चा अर्थ तेव्हा कळाला असेल.
सई परांजपेंच्या "दिशा" सिनेमात ला तो टिपिकल टोपीवाला मुंबईतला गिरणी कामगार. तो जेव्हा मुंबई मार्केट मधे आपल्या गावाकडच्या बायको साठी ब्रा खरेदी करायला जातो तेव्हा नानाने जे भाव चेहऱ्यावर उमटवले आहेत ते लाजवाब. तेव्हढाच अभिनय बघण्यासाठी तो सिनेमा पहावा इतका नैसर्गिक.
बॉलिवूड मधल्या प्रत्येक सुपरस्टार बरोबर ह्या "सुपर एक्टर" नी पिक्चर केलाय. जानी..राजकुमार पासून ते खिलाडी अक्षयकुमार पर्यंत. सगळी "खान"मंडळी, दिग्गज बिग बी आणि सावली ज्युनिअर बी बरोबर सुध्दा. प्रत्येक पिक्चर मधे तोडीसतोड अभिनय. उगाच स्वतः प्रत्येक फ्रेम मधे आपणच दिसणार असा अट्टाहास न करता. तो रागीट आहे, विक्षिप्त आहे अशी हवा असतांना सुध्दा; कलास्रुष्टीतला प्रत्येकजण त्याच्या बरोबर पिक्चर करण्यास उत्सुक असायचा. मग नवीन पिक्चर प्रदर्शनाचे वेळी पत्रकारांचा ठरलेला बकवास प्रश्न "नाना बरोबर काम करतांना तुमचा काय अनुभव होता?" ...अरे नाना म्हणजे काय डायनासोर आहे का...
अर्धवट वाढलेल्या दाढी वरुन हात फिरवल्यावर जो फील येतो तसा त्याचा तो खरखरीत स्वभाव, तरीही सर्वांना हवाहवासा वाटतो. जसं जिव्हाळी लागली की नखाला सारखा हात लावावसा वाटतो आणि ते हलकं दुखःपण वेगळा आनंद देतं तसा. प्रत्येक हिंदी-मराठी हीरोईन त्याच्या ह्या मराठमोळ्या रांगडेपणावर फिदा होती आणि आहे.
तो कधीच कुठल्या कैम्पमधे अडकला नाही, कधीच मी मराठीत परतणार, आता मी पुन्हा नाटक करणार किंवा मला सिरीयल करायला आवडेल असले फार्सिकल प्रयोग त्याने केले नाहीत. जे करावसं वाटलं ते बिनधास्त केलं आणि नाही वाटलं ते पण केलं. बिनदिक्कतपणे पैश्यासाठी केलं म्हणणारा एकमेव एक्टर.
घरच्या गणपतीची फुलांची आरास सजवतांना तो निस्सीम श्रध्दाळू देवभक्त वाटतो. मग पुढच्याच काही मिनिटात बाहेरच्या खोलीत येवून जेव्हा "का रे भडव्या, मागच्या वर्षी आला नाहीस?" असं बशीतून चहा पितांना खेकसतो तेव्हा उगाच कट्टर समाजवादी असणार अशी खोटी खोटी खात्री पटते.
त्याची नक्कल करणारे खुप आहेत इंडस्ट्रीत. ती कदाचित अवघड असून सोपी वाटेल इतकं अवघड आयुष्य तो जगलाय. नाकाच्या शेंड्याला आरसा टेकवल्यावर डोळे जितके आत खोलवर दिसतात, तेवढी जवळून त्याने गरीबी पाहिलीय आणि अनुभवलीयसुध्दा. त्याच्या प्रत्येक भुमिकेत त्या अनुभवांची झलक आपल्याला पाह्यला मिळते.
तो इतका सच्चा वाटतो की तुम्ही स्वतःच्या मतांवर कितीही ठाम असलात तरीही त्याची प्रत्येक विषयावरची मतं, भुमिका योग्य वाटू लागते. अगदी राजकारणतल्या ठाकरें पासून ते समाजकारणातल्या शेतकरी आदिवासी ठाकरां पर्यंत.
मेथड एक्टर, भुमिकेत शिरणे, काही दिवस त्या व्यक्तीरेखेसाठी विशिष्ट वस्तीत जाउन राहणे, भाषेचे क्लास लावणे, वजन वाढवणे-परत कमी करणे, क्रुत्रीम फैन फोलोइंग निर्माण करणे, सोशल मिडिया वर एक्टिव असणे....असल्या कीती खर्या कीती खोट्या मेहनती कसरती त्यानं घेतल्याचे कधीच ऐकीवात नाही. सिनेमा ची कथा आवडली, पिक्चर स्विकारलं बास शुटींग सुरु. नाना तुमची एन्काऊंटर स्पेशालिस्ट ची भुमिका आहे ईंनस्पेक्टर साधू आगाशे.. हातात पिस्तूल घेतलं नाना सुरु. पुढचा पिक्चर अपहरण नाना पाटेकर जी आप इसमे यु पी बिहार के टिपिकल राजनेता हो..पांढरा शर्ट पैंट घालून हात जोडून चालायला सुरवात हुबेहूब...तरबेज आलम शुटिंग सुरु. नाना आता तुम्ही प्रकाश आमटे बरं का! झालं बनियन हाफ चड्डी घातली बास एवढीच तयारी शुटिंग सुरु पिक्चर हीट....
अहो इतकं ट्रान्सफारमेशन तर तो रंग बदलणारा सरडा सुध्दा करु शकत नसेल. खरंच नाना प्रत्येक भुमिकेत इतका केमोफ्लैज होउन जातो कि तो नाना आहे का प्रत्यक्षात ते जीवंत पात्रच...
To Be Or Not To Be...नाना,
हो तुच आहेस तो अंकुश चा रवी, क्रांतीवीरचा प्रताप, थोडासा रुमानीचा बारीशकर, परींदा चा आण्णा, तिरंगा चा मराठा, प्रहार चा मेजर चौहान आणि वेलकमचा उदय शेट्टी...
तूच आहेस खरा नटसम्राट.
---मिलिंद सहस्रबुद्धे ©

"आम्ही चालवू हा पुढे वारसा" (काल्पनिक विडंबन).........टण टणटण....आश्रमशाळेची संध्याकाळ ची घंटा वाजली. आज दिवाळीच्या सुट्टी च्या

टण टणटण....आश्रमशाळेची संध्याकाळ ची घंटा वाजली. आज दिवाळीच्या सुट्टी च्या आधी चा शेवटचा दिवस. आता पंधरा दिवस सुट्टी. फटाके किल्ला लाडू चिवडा जोरदार धमाल मुलं खुष होती. आश्रमशाळा असल्यामुळे सुट्टी असलीतरी मुलं तिथंच रहात होती. आज मास्तर नेहमीप्रमाणे घोषणा करणार म्हणून सगळ्यांना उत्सुकता होती काय होणार आज.
मागच्या वर्षी इरसाल आणि दांडगट असलेल्या "दादानं" कुठंही पाणी मिळालं नाही म्हणून दुसरेच कसलं तरी पाणी किल्ल्यावर शिंपडले अशी अफवा पसरली होती, त्यामुळे मास्तर जाम चिडले होते. त्यांनी वर्गात आल्यावर घोषणा केली कि ह्या वर्षी पहिल्या बाकावर बसणारा, सरळ रेषेत भांग पाडलेला आपला वर्ग मॉनिटर "देवेश" ह्या वर्षी किल्ला करण्याचा मुख्य असेल.
झालं दुसर्या दिवशी पासुन देवेश आणि त्याच्या ग्रुपने मग तो जुनाच किल्ला आपल्या पध्दतीने नवनवीन कल्पना लढवत बांधायला सुरवात केली. पण माती तीच आणि तेच दगडही तेच होते. किल्ला अगदी चकाचक तरी दिसत होता.
पण एक दिवस दादा आणि देवेश मध्ये चांगलेच शाब्दिक जुंपली. त्याचं झालं असं की दादानी त्या जुन्या किल्ल्यावर
छोटा पूल बांधलेला होता त्याला देवेश नी आपणच तो पूर्ण केला असं म्हटल्यावर दादाची जोरदार सटकली..
दादा: त्याच्या नेहमीच्या कपाळावर आठ्या आणून..देवेश हे बरोबर नाय या ठिकाणी तुम्ही लोकांनी जो चमकोगिरी चा घाट घातला आहे तो तुम्हाला शाळा परत सुरू झाल्यावर चांगलाच नडंल.
देवेश: आम्ही शब्द दिला होता की चकाचक किल्ला बांधू आणि आम्ही तो पूर्ण करत आहोत. या किल्ल्याला मी दत्तक घेतलंय आणि आम्हीच आता किल्लेदार
दादा: अरे काय चकाचक, साल्या हो आम्ही डांबराचे रस्ते बांधून काळा पैसा पचवला तुम्ही बी तेच करताय की सगळीकडे सिमेंटचे रस्ते आणि स्मार्ट किल्ला नावाखाली हे भले मोठे सिमेंटचे फूटपाथ बांधून तुम्ही तर पांढरा पैसा बी पचवताय. आमच्या शेजारच्या खोलीतील सुरेश नी मागच्या वर्षी इथं या किल्ल्याच्या रस्त्याच्या मध्यभागी बस चालवून दाखवली होती तर तुम्ही बोलले हा मास्तरांनी दिलेला पैसा चोरतो आणि या बसमुळे किल्ला विद्रूप दिसतोय
तुम्ही तर कुरघोडीत केली जमिनीवर तर खातातच आहात आता नव्या स्टाईलची काय तर म्हणे मेट्रो रेल ची प्रतिकृती उभी करून दाखवतो म्हणून हवेत बी खाता..कसं रे गड्या कसं व्हायचं
देवेश : तुम्ही काहीही म्हणा आम्ही वेगवेगळ्या कल्पना मांडून किल्ला नव्या रूपात निर्माण करतोय. आम्ही नवीन कल्पना आणलीय नारळाच्या करवंटी त्याच्या वाट्या वापरून आम्ही जलयुक्त विहिरी बनवल्यात किल्ल्यावर आणि आजूबाजूला. तुम्हाला साधे पाणी पण वापरता आलं नाही मागच्या वर्षी आणि शेवटी करंगळीवरचं वापरण्याची भाषा तुमची.
दादा: बरोबर ना पण या नारळाच्या करवंट्याची खालची भोक तुम्ही बुजवले नाही जाणून बुजून. पाणी कुठं जातयं ते कळतय हळूहळू सगळ्यांना आता.
तेवढ्यात तिसऱ्या बेंचवर बसणारा राम आला. रामची खासियत म्हणजे रामदासांचे जसे दोन चार ओळीत मनाचे श्लोक असतात तसा हा राम्या दोन दोन ओळी च्या कविता अगदी झटपट करतो. तो डबा खायला आला की मुलं पळून जातात त्याच्यापासून. नेहमीप्रमाणे तोंड मधेच घालत कविता केलीच त्यांनी
"देवेशने बनवला समृद्धीचा किल्ला आणि भरवली जत्रा।
दादा गैंगची फसली बोल हल्ला यात्रा ।"
दादा : (चिडून म्हणाला) ए राम्या मागच्या वर्षी आमच्या बरोबर होता ना रे तू आता तिकडे गेला का किती वेळा थुंकी इकडची तिकडे करशील..सुकली ना तर कुठे जाता येणार नाही
हे सगळं चालू असताना शाळेचा फेवरेट चष्मिस फोटोग्राफर आणि त्याची दांडगट टीम देवेश बरोबर वरून किल्ल्याचे फोटो काढत होती. त्यांना त्या फोटोंचं प्रदर्शन नाताळच्या सुट्टीत शाळेत भरवायचं होते. पण फोटो काढून झाल्यावर त्यांचे पण काहीतरी बिनसले. त्यांनी आणलेलं वाघाचे चित्र खालच्या गुहेत ठेवलं होतं. ते पाहून संतापले ते मग म्हणायला लागले आमचा वाघ ह्या गुहेत येवढ्या खाली शक्यच नाही त्याला डायरेक्ट वर सिंहासनाच्या शेजारी ठेवा नाहीतर आम्ही किल्लाच पाडून टाकतो आत्ताच्या आत्ता.
त्यांच्या म्होरक्या चष्मिस दादूला काहीच कळत नव्हतं एकदा त्याला वाटत होतं पाडून टाकू किल्ला जर आपल्या वाघाला वर नाही ठेवला तर आणि एकदा वाटत होतं च्यायला किल्ला पाडला तर कोणत्या किल्ल्याचे फोटो काढले ते प्रदर्शनात कसं सांगणार. त्यामुळे ती गॅंग नुसतीच जोरजोरात ओरडत होती किल्ला पाडू किल्ला पाडू.
देवेश मात्र स्तब्ध आणि शांत होता आपल्याच चप्प भागावर हात फिरवत. त्याला या किल्ल्या पाडूच्या सर्व किल्ल्या माहिती होत्या
दादा: या ठिकाणी आमच्या खोलीतली काही पोरं तुम्ही किल्ला करायला दिल्यामुळे तुमच्यात आली आहेत पण ध्यानात ठेवा ती पोरं लई बेनी आहेत कधी तुमच्या किल्ल्याला आतून फटाका लावतील सांगता येणार नाही
देवेश: आम्ही एक पारदर्शी पद्धतीने तुमच्या समोर किल्ला बनवला आहे आता तो कसा बनवला कुठल्या मातीचा ती माती कुठून आणली ते दगड कोणाचे ते मात्र विचारू नका
ही भांडणं जरा जास्तच विकोपाला जात आहेत असं जाणवल्यावर देवेश नी दादाला जरा बौद्धिक दिलं आणि म्हणाला "हे बघ दादा, कसं ए, गेली कित्येक वर्ष तुम्ही किल्ला बांधत आहे आम्हाला याच वर्षी किल्ला बांधायचा चान्स मिळालाय. बांधु दे आम्हाला आमच्या पद्धतीने आम्हाला पण घेऊ दे ना मजा मास्तर एवढे पैसे देतात त्याची.
शेवटी कसा आहे दादा, हा तुमच्याकडूनच आलेला वारसा आहे तो आम्ही पुढे चालवणारच की. शेवटी आपल्या सर्वांचे *गुरु साहेब* एकच, त्याचंच तर बोट धरुन आमचे सीनिअरस आणि आम्ही ह्या शाळेत आलो. आपल्याला मिळालेला हा वारसा कोणी कशा पद्धतीने चालवायचा त्याचं तो ठरवेल. आणि हो नाराज होऊ नका मास्तरांनी विचारलंच तर मग आम्ही सांगू की, ते मागच्या वर्षी जे पाणी शिंपडलं होतं, ते गोमूत्र होतं म्हणून! काय बरोबर की नाही" मग सर्वत्र हास्याचा गडगडाट झाला.
दुसरे दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मुलं चार रांगा करून उभी होती आणि आश्रम शाळेची प्रार्थना सुरू झाली
"गुरुने दिला दानरुपी (₹) वसा...
आम्ही(पण) चालवू हा पुढे वारसा..."
----मिलिंद सहस्रबुद्धे ©

ग्राउंड झीरो........मागच्या वर्षी अमेरिकेत होतो, तेव्हा न्युयार्क शहरातील "ग्राउंड झीरो" ला भेट दिली. एखादी


मागच्या वर्षी अमेरिकेत होतो, तेव्हा न्युयार्क शहरातील "ग्राउंड झीरो" ला भेट दिली. एखादी वास्तु दुर्घटनेत जमीनदोस्त झाल्यावर त्याच वास्तुचं तेवढच अथवा त्याहीपेक्षा भव्यदिव्य स्मारक उभं केलयं. तेही जमीनीवर जमीनीला समांतर. म्हणजे ते ट्वीन टॉवर्स जेवढे उंच असतील तेवढंच आडवं हे स्मारक आहे जणू. ते पाहून वाटतं ह्या विचारांचा पल्ला गाठणं आपल्या देशाला कधी जमणारच नाही बहुतेक. ते एखादी उत्तुंग कमर्शियल इमारत बांधू शकले असते परंतु त्यांनी त्यांची उत्तुंगता , विशालता विचारात दाखवून दिली.
काल बर्याच दिवसांनी मुलाला घेउन आमच्या कॉलेजच्या ग्राउंडवर बैट बॉल खेळायला गेलो होतो.
आत जिमखान्या पर्यंत गेलो आणि ते द्रुश्य पाहून डोळ्यात पाणीच आले. आमच्या त्या खो खो चे ग्राउंड खणलेले आणि आजुबाजुने ते टिपिकल निळे पत्रे ठोकलेले. त्या सगळ्या जागेवर कसलंतरी नवीन बांधकाम सुरु झालयं असं कळाले. मुलाला समोरच्या बाजुला खेळायला सोडलं आणि मी त्या पत्र्यांच्या समोरच्या कठड्यावर बसलो. झरकन वीस पंचवीस वर्षे फ्लॅशबैक मध्येच गेलो.
ते दोन पांढरे खांब, झारीने किंवा बादलीने संपुर्ण ग्राउंडवर मारलेलं पाणी. इतकं मापात की माती ओलीतर झाली पाहिजे पण चिखल नाही. ती मस्त वास येणारी लाल काळी माती. साला काय भारी वाटायचं. स्वतः च्या हाताने पांढऱ्या फक्किनं मारलेली बॉंड्री. मग खाकी किंवा काळी हाफ चड्डी आणि बनियनवर दोन तीन तास अगदी अंधार पडे पर्यंत खेळायचो. शाळेत असताना आणि पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर पण रोज संध्याकाळी ग्राउंडवर हजेरी. घामाने चिंब ओला आणि खो खो म्हणत मारलेल्या डाईवज मुळे मातीने भरलेला तो बनियन. तोच भिजलेला बनियन पिळून पुन्हा घालायचा आणि खेळायचं. खेळून झाल्यावर बर्याचवेळ तिथेच पडीक, मारलेल्या गप्पा, टिंगलटवाळी, कॉंट्री काढून खाल्लेला वडापाव. काय काय नाही केलं इथं, काय विचारु नका.
बाजुलाच कबड्डी चालायची, आणि हो शेजारचे बास्केटबॉल चे ते दोन उंच पोल.
संध्याकाळी ही जागा मुलामुलींनी भरून जायची. त्यावेळी मोबाईल वेडी मुलं नव्हती, पण आमच्यातले काही बाईल (मुली) वेडे होते हे मात्र नक्की. बास्केटबॉल च्या ग्राउंडवर हाफ चड्डीत खेळणार्या मुली पाहून, आमचे काही खो खो पटू खो दिला की सरळ रेषेतच पळत डाएरेक्ट त्या बास्केटबॉल च्या पोल पाशीच पळायचे. मग जोशी सर असं काही ओरडायचे, फटके द्याचे. च्यायला काय मजा होती ती.
कित्येक राज्य स्तरीय ते आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू ह्याच ग्राउंडने घडविले. जे काही घडलो थोडंफार आटोक्यात बिघडलो ते ह्याच ग्राउंडमुळे.
त्यावेळी दणकून खेळल्यामुळे आज चाळीशी नंतरही पोट सुटलेलं नाही ना तब्येतीची तक्रार नाही. हे केवढं मोठं वरदान ह्या ग्राउंड नी दिलयं.
एकाच वेळेस शेकड्यांनी मुलं समोरच्या मोठ्या जागेवर क्रिकेट खेळत असायची. पण कधी चुकनही दुसऱ्या मैचचा बॉल तिसर्या नेच आडवलाय असं ऐकिवात नाही. अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळाच दिसायचा तशी एवढ्या सगळ्या आजुबाजुच्या मैचेस मधून आपल्याच मैचमधला कैच अचूक पकडायची कला असलेले "आम्ही सारे अर्जुनच".
"ए अमित, अहो काकू आम्या आहे का?" "अरे तो ग्राउंड वर गेलाय" हे संवाद तेव्हा घरोघरी ठरेलेले. शाळेच्या आधी आणि नंतर आम्ही सगळे ग्राउंड वरच पडीक. अगदी गोट्या, आट्यपाट्या, रुमालपाणी पासून ते खो खो, कबड्डी, फुटबॉल आणि "द क्रिकेट" पर्यंत सगळं इथंच शिकलो. इथं कधीच एकटं वाटायचं नाही. एकटं जरी अचानक आलो तरी कोणीतरी भेटायचंच.
त्या "रंग दे बसंती" मधील डिज्जे आमिर खान म्हणतो तसं " काके, मुझे ना..यही रहना है युनिव्हर्सिटी मै। क्यु की बाहर की दुनिया मै ये डिज्जे कहा खो जाएगा मालुम नहीं। और उसकी उधर कुछ व्हैलू नहीं।" अगदी तसंच त्यावेळी ग्राउंड हेच आमचं विश्व होतं आणि आम्ही तिथले डीज्जे. त्यातून ह्या विश्वात यायला भीती वाटायची.
खेळतांना खरचटलं, लागलं तर ती लाल काळी माती लावायची. अश्या कित्येक जखमा त्या मातीने बरं केल्यात. पण आज झालेली ही जखम कधीच भरून येणार नाही, कारण आता ते ग्राउंड पण नाही आणि ती माती पण.
आता ते ग्राउंडच नसणारे ह्या भावनेने डोळे भरून आले, पाणी थांबतच नव्हते. अशी कित्येक ग्राउंड आपण बांधकाम क्षेत्राला देणग्या म्हणून देत आहोत. आता अशी ही ग्राउंडस् हळूहळू कमीच होत जाणार. आमची मुलं, पुढची पीढी मग मोबाईलवरच खो खो कबड्डी वगैरे खेळणार. बातम्यामधे आपण बघतो, वाचतो की अमक्या तमक्या जागेवरचं पार्क चं, जिमखान्या चं किंवा मैदानाचं आरक्षण उठवलं. तिथं आता कार्यालय, रेसिडेन्शियल कॉंप्लेक्स होणार. आपल्याला पटकन काही वाटत नाही, पण काल मात्र मला बरंच काही वाटून गेलं. खरी जाणीव झाली, की त्या जागेवर खेळणार्या मुलांची काय अवस्था होत असेल. अगदी एकाच हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी ग्राउंड राहीली आहेत आता विविध शहरांमधे. पुढील दशकात ती पण बहुतेक शोधून सापडवावी लागतील. ती Artificial हिरवीगार नायलॉन ची गवतं टाकलेली ग्राउंड तुम्हाला जमीनीशी नातं जोडून देत नाहीत. आपल्या देशात कायमस्वरूपी ह्या विषयातले डेव्हलपमेंट नॉर्मस् फिक्स केले पाहिजेत, तरच मग जी काही उरली आहेत ती तरी संपणार नाहीत.
आपल्या सगळ्यांच असं एक मनात जपलेलं ग्राउंड असतं. कुणाचं शाळेचं, कुणाचं सोसायटीचं, गावाकडचं तर कुणाचं डोंगरावरचं. त्या ग्राउंडवर खेळलेल्या मैचेस जिंकलेल्या आणि हारलेल्यापण, शिकलेली सायकल, केलेल्या मारामाऱ्या आणि असं बरंच काही.
मग मला सतत अमेरिकेतली ती "ग्राउंड झीरो" वास्तु आठवली. तिथं त्यांनी ग्राउंड झीरो नावानी भव्य वास्तु बांधली आहे आणि इथं आपण प्रत्यक्षात शब्दशः "ग्राउंड झीरो" ही मोहीम राबवत आहोत........
© मिलिंद सहस्रबुद्धे

खूब भालो दादा.......त्याची मुलगी मागच्या महिन्यात त्याला म्हणाली "बाबा, तु लॉर्डस वर तेव्हा जर्सी(टी शर्ट) काढून

त्याची मुलगी मागच्या महिन्यात त्याला म्हणाली "बाबा, तु लॉर्डस वर तेव्हा जर्सी(टी शर्ट) काढून फिरवलास ते मला काही आवडलं नाही", "इट्स नॉट इथिकल" वगैरे वगैरे. ह्या नवीन पिढीला काय कळणार त्या जर्सी काढून फिरवण्या मागची भावना. ती दिडशे वर्षे हेटाळलेली आणि तुंबलेली उपेक्षा. इंग्रजांना त्यांच्याच जमीनीवर हरवण्याचा आनंद आणि हो माजपण.
तो जिद्दीने ओढून आणलेला विजय, ती यशाची भावना.
बस्स आम्ही त्यादिवशी तुझे बेहद्द फैन झालो. जिंकलस भावा, तोडलस मित्रा अश्या शब्द प्रयोगांना चपखल बसेल अशी ती तुझी लॉर्डस वर ची प्रतिक्रिया.
अझरउद्दिन नंतर भारतीय क्रिकेट ला एक सातत्याने यश देणारा कैप्टन गवसतच नव्हता. बीसीसीआयचे ट्रायल एंड एरर पध्दत चालूच होती आणि एक दिवस तुझ्यात तो सूर गवसला. अर्थातच हा सूर 'निरागस' नक्कीच नव्हता तर तो 'खर्ज्यातला सा' होता. भारतीय क्रिकेट मधल्या त्या सुवर्ण काळातला तु एक हुकुमाचा एक्का होतास. तुझ्यातली नेतृत्व कसब हि खरंच काही औरच होती. रसगुल्ला सारखा थिबथिबीत गोडीळ नसून चमचमीत चटपटी बंगाली मछली होतास तू.
तुझ्या बाबतीत एक किस्सा नेहमी चर्चेला गेला तो म्हणजे, तू एक्सट्रा मधे असताना मैदानावर र्डींक्स पाणी नेण्यास नकार दिला होतास म्हणे. स्वाभाविकच आहे कोलकत्ता चा प्रिंस तु, तुझ्या बुटाची लेस बांधायला सुध्दा लहानपणापासून तुझ्या कडे माणसं असतील तर तू का बरं पाणक्या होशील.
करीअरच्या सुरवातीला ४-५ स्थानावर बैटींग ला येणे आणि मग एकदम "द सचिन" बरोबर ओपनिंग ला सुरवात केलीस. त्यावेळी तुम्ही दोघं जेव्हा बैटींग ला मैदानात उतरायचात तेव्हा सचिन मैदानाला नमस्कार करणार आणि तू तुझ्या स्टाईल ने डोळे मोठे करत मिचकावत मागे सुर्याकडे पहाणार हे ठरलेलच समीकरण. आमची उत्सुकता ओपनिंग कोण करणार ह्या कडे, कारण तुला तसे बाऊंन्सर बॉल नकोसे असायचे.
तुमची ती "लेफ्टी-राईटीची' जोडी म्हणजे "सुवासिनीच्या कपाळावरचं हळदी-कुंकू" च जणू. मग तुमच्या धुवाधार ओपनिंग पार्टनरशिपने आपली इनिंग "सौभाग्यवती" व्हायची.
इंप्रोव्हाजनचा तु बादशाह होतास. पहिल्या बारा पंधरा ओव्हर नंतर फिल्डर मैदानात पांगले की स्पीनर्स ला क्रीजच्या चार फुट पुढे येउन लॉंग ऑन लॉंग ऑफ ला मारलेले चौके छकडे अजूनही डोळ्यासमोर आहेत.
जेफ्री बॉयकॉटचा तु लाडका, त्यानेच तुझं प्रिंस ऑफ कोलकाता नाव ठेवून दुसरं बारसं केलं.
सचिन, सौरव, लक्ष्मण आणि द्रविड. अशोक स्तंभाप्रमाणे तुम्ही भारतीय क्रिकेटचे चार सिंह होतात त्या सुवर्णकाळात. चार जणांची चार दिशेला तोंडे जशी.. कारण प्रत्येकाची एक वेगळी शैली आणि प्रत्येकाचं वेगळं प्रभुत्व.
तुझं एग्रेशन, इंप्रोव्हाजेशन आणि नेतृत्व गुण इतरांपेक्षा "उजवे" होते जरी तु "डावा" असलास तरीही.
बाबू श्रीनाथ आणि मंगळ्या* प्रसाद सारख्या सो कॉल्ड फास्ट बौलर घेऊन मैचेस काढून देणं म्हणजे खायची गोष्ट नाही. (* मंगळ्या- कारण तो चौकोनी चेहऱ्याचा आणि उगाच परग्रहावरुन आल्या सारखा दिसायचा)
खरं एक वेगळंच नेतृत्व होतं तुझ्यात. त्या नेतृत्वाखाली सचिन पासून युवी पर्यंत आणि श्रीनाथ पासून ईरफान पर्यंत खेळाडू बहरले. कपिलदेव नंतर लाभलेलं हे दुसरं कणखर नेतृत्व.
खरंच, नावाप्रमाणे दादा होतास तू वागायला बोलायला आणि जणू नात्यानेपण वीरुचा, युवीचा, कैफचा, नेहराचा दादा. ह्या सगळ्यांना बोट धरुन क्रिकेट विश्वात प्रसिद्ध केलंस.
फील्डींग हे डिपार्टमेंट आपलं नाही हे नक्की उमजल्यामुळे तिथं उगाच ओढून ताणून प्रयत्न नाही केलेस कधी. प्रिंस ना बाबा तू. म्हणे ती नगमा सारखी सौंदर्यवती तुझ्या प्रेमात पडली पण ह्या *फील्डींग*ला काही पटवू शकला नाहीस.
तसा तू सध्याच्या विराट नंतर अथवा आधीचा मोस्ट कॉट्रोव्हरशल कैप्टन राहिला आहेस मैदानावर आणि मैदानाबाहेरपण. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्याच्याच भ, भा, भे च्या भाषेत उत्तर देण्याची धमक दाखवणारा एकमेव कैप्टन फक्त तूच.
तु येईस पर्यंत भारतीय क्रिकेटला फक्त अरबी समुद्रातच मोती असतात असे वाटायचे. पण तुझ्या येण्याने बंगालच्या उपसागरात फक्त मच्छि नाय तर मौल्यवान मोती देखील मिळतात हे समजले.
आहेसच तू अस्सल शुभ्र मोती भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण अलंकारांमधला.
©मिलिंद सहस्त्रबुद्धे
तळ टीप--
हा लेख "ज्याने मला क्रिकेट बघायला वाचायला आणि कॉमेंट्री मधून ऐकायला शिकवले त्या मित्र अर्चिस पाटणकरला" समर्पित.

बालक पालक........"काय गं वैदही, आई काय करतीय?"मी बहीणीच्या घरात पाऊल ठेवताच विचारले. "ती काय आत प्रोजेक्ट

"काय गं वैदही, आई काय करतीय?"मी बहीणीच्या घरात पाऊल ठेवताच विचारले. "ती काय आत प्रोजेक्ट करतीय" वैदूने मोबाईल वर तो टॉकिंग टॉमचा गेम खेळताना मान वर न करताच उत्तर दिले. आतल्या खोलीत जाऊन बघतो तर काय, सायलीताई हे सगळा पसारा मांडून बसलेली फेविकॉल , कलर पेपर, चित्र, कार्डबोर्ड वगैरे वगैरे. म्हणलं काय गं बाई हे? " काही विचारु नकोस अजय, अरे वैदू मैडमची उद्या प्रोजेक्ट सबमिशनची लास्ट डेट आहे शाळेत"
प्रोजेक्ट, आजकाल केजी ते पीजी पर्यंतच्या मुलांचा पर्वणीचा शब्द. आमच्या वेळेस हा शब्द इंजिनिअरींग कॉलेजला गेल्यावर ऐकला. मराठी शाळांत पण "प्रोजेक्ट" हाच शब्द वापरतात. "प्रकल्प" असं म्हंटलं तर उगाच भाक्रानांगल, कोयना पासून ते पार एन्रॉन, नाणार अशी नावं डोळ्यासमोर येतात, म्हणून प्रोजेक्टच.
मुलं निवांत आणि पालकांनाच टेन्शन. पाल्यांच्या आयांमध्ये तर कॉंपिटिशनच असते ह्या प्रोजेक्टवरुन. "मागच्या वेळी फळभाजी प्रोजेक्ट त्या आर्यन चे सिलेक्ट झालं ना, ती त्याची आई सांगत होती बढाया मारत. तीला काय होतय घरीच असते ती, आमच्या सारखं नाही ऑफिस करून सगळं संभाळायचं." हया वेळी आमच्या सईचं नाही ना सिलेक्ट झालं तर बघ, असला भारी करते ना मी अंडरवॉटर सी वर्ल्ड. तिकडं सई निवांतपणे आर्यनला कॉंग्रँट्स करते आणि दोघं पोकेमैन कार्डचा खेळ खेळतात.
हे म्हणजे "चाय से जादा किटली च गरम है ना भाऊ"
"बाबा, डोकं दुखतंय हो खुप"... "अरे काही होत नाही थोडा बाम चोळ बरं वाटेल. तुझा होमवर्क राहीलाय अजुन." "बाबा, प्लीज आपण माझा संध्याकाळ चा एखादा क्लास बंद करायचा का?"
"नाही हं सुमेध, असलं काही चालणार नाही. अरे सध्या शाळेच्या अभ्यासाबरोबर एक्स्ट्रा करीक्युलर एक्टिवीटी पाहिजेच. म्हणजे कुठं पुढे दहावीला दहा मार्क वाढवून मिळतील"
"बाबा, प्लीज ना!"....." बरं ते जाऊ दे, तु छानपैकी होमवर्क कर, झोपायच्या आधी. आपण ह्या संडे ला एवेंजर मुव्ही पाहू आणि मग सगळे मैकडोनाल्ड ला जाऊ. खुश!"
सध्याचे पालक (अर्थात मी पण त्यातला एक आहे) एक्स्ट्रा करीक्युलर च्या नादात एक स्पोर्ट्स क्लास, एखादा कलाछंद वर्ग, एक टैलेंट स्कॉलरशिप क्लास, अबैकस आणि बरेच क्लास वगैरे लावतात. ह्या ही वर मेन अभ्यासक्रमासाठी ट्युशन पण. असं काही त्या पाल्याला पैक केलेलं असतं, जणु मोबाईल कंपनीच्या सिमकार्ड ऑफरच. १००रुपायात डाटा, फ्रि कॉल्स, एसमेस, रोमिंग, फ्रीबीज..फुल पैकेजच.
खरंच कुठं घेऊन जाणार आहोत आपण ह्या पिढीला. आमची पिढी पन्नाशीला च रिटायर्ड व्हायचे म्हणतीय, मग हि नवी पिढी तर पस्तीशीलाच होईल बहुतेक बिचारी.
पालक, पाल्य आणि दोघांचं बाल्य.
सकाळी संध्याकाळी क्लासेस, ट्युशन, दिवसभर सात तास शाळा, व्हेन असेल तर दहा तास. काही मुलं तर आख्खं पुणं रोज फिरतात म्हणे. शाळेत जाता येता दफ्तर ओझं किमान दहा किलो. घरी आल्यावर किमान चार विषयांचा होमवर्क, वर्कबुक, आणि एक्स्ट्रा अभ्यास वगैरे.
अहो आमच्या वेळी असं नव्हतं, आम्ही साधी दफ्तर घेऊन शाळेत चालत जायचो. घरी आल्यावर आई हाक मारेस्तोवर खेळायचो मग थोडाफार अभ्यास. कधी शाळा केली पास झालो कळालेच नाही... वगैरे वगैरे अश्या गप्पा जोरात मारणारे आम्ही. परंतु स्वतः चं मुल फुल पैक. पैकेज डील जणू.
"मला खुप तबल्याची आवड होती, मला लॉंग टेनिस आवडायचं, पण परीस्थिती मुळे जमलं नाही" म्हणून पाल्याला तबला टेनिस ला घालायचं. आणि त्याला जमत नाही आवड नाही म्हणून त्याला "तुम्हाला सगळं मिळतयं ना लेको, म्हणून किंमत नाही" असं ऐकवायचं. अहो तुमची राहून गेलेली इच्छा त्याची आवड कशी असेल.
प्रधानमंत्री म्हणतात "बच्चोंको खुब खेलना चाहिए, बहुत पसीना आना चाहिए.." पण साहेब खेळून शारीरिक घाम यायच्या आधी, मुलांना हे शैक्षणिक दैनंदिन रूटीन करतांनाच दमछाक होतीय इतकी की त्यांना बौद्धिक घामच जास्त येतोय. शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदलाची क्रांती ची गरज आहे जशी हरीत क्रांती, गुजरातची दुग्ध क्रांती. पण इथं कोणाचंच लक्ष नाही. सर्वत्र नवीन आयआयटी नवीन आयआयम उघडून काय होणारे. तिथे पोहचे पर्यंतच बौद्धिक दमवणूक झालेली असेल. मग काय पुढे घडणार.
आपण पाश्चात्य देशातील प्रैक्टिकल ओरींएटेड शिकवण पध्दती अवलंबण्याचा प्रयत्न करतोय. आपली पारंपरिक थेरॉटिकल पद्धती पण सोडत नाही. ह्या धेडगुजरीपणामुळे मुलांचा मात्र डोमकावळा होतोय. रोज सात विषयांची वह्या, पुस्तके, वर्कबुक आणि इतर साहित्य असलेल्या त्या मणभर दफ्तर ओझ्यातून त्यांना बाहेर काढतच नाही. दफ्तराचे ओझं कमी आहे की काय तर पालकांचे करीअर ओरिंएटेड चे ओझे डोक्याला आहेच. स्ट्रेस, प्रेशर असे शब्दोच्चार हल्ली के.जी. पासून ची मुलं च्यायला मायला सारखा वापरतात.
प्रत्येक नवीन शिक्षण मंत्री आल्यावर लाऊडस्पीकर लावून सांगतो की, आम्ही आता मुलांच्या दफ्तराचं "ओझं" कमी करणार. मग काही महीन्यातच त्याच्यावर कोणतं "ओझं" पडतं की पुढे काहीच होत नाही. जैसै थे।
हा विषय राजकारण, समाजकारण अभ्यास पध्दती ह्या च्या थोडा पलीकडे जाऊन पाहिला पाहिजे. आपणच आपला पाल्य त्यांच्या जीवनात ती टिपिकल एखादी सर्व ठिकाणं दोन दिवसात दाखवणारी फुल पैक पैकेज टुर न होता, अवघड पण सुंदर ट्रेक, किंवा नेचर ट्रेल, विलोभनीय सायकल टुर होईल का पहावं....त्याच्या आवडत्या एखाद्या विषयात कसा रममाण होईल, आनंद घेईल हे बघणं महत्त्वाचं.
शेवटी काय हो गद्दे पंचवीशीनंतर गाडा तर ओढायचाच आहे, तो कुणाला कधी चुकलाय का?
आधीचे रंगबिरंगी फुलपाखरू दिवस जगू देत त्यांना..।
--मिलिंद सहस्त्रबुद्धे ©
ता.क. अस्मादिक पण पालकच..

शिदोरी...............काय गं ऋचा काय झालं? "आई, मी बाबावर खुप चिडलीय, असा कसा वागू शकतो तो? How he .....

काय गं ऋचा काय झालं? "आई, मी बाबावर खुप चिडलीय, असा कसा वागू शकतो तो? How he dare to touch my phone? माझा मोबाईल चेक करायला लहान का आहे मी आता." असं म्हणत नेहमीप्रमाणे ती आपल्या रुममध्ये जाऊन दार लावून झोपली. आमची ऋचा एकदम पटकन चिडते आणि गेल्या वर्षी कॉलेज ला जायला लागल्यापासून तर जरा जास्तच. चिक्कार मित्रमैत्रिणी, सतत पार्टी, ट्रिप्स, पिक्चर्स चालू असतं. आम्ही पण जास्त डिवचत नाही. कारण अर्थातच बाईसाहेब अभ्यासात हूशार. मुळात बुध्दीमत्ता आहे वडिलांसारखी. त्यामुळे घोकंपट्टी नाही, एकदा का कॉन्सेप्ट समजली की झालं. कायम डिस्टींक्शन असते. तशी शाळेपासून च नीटनेटकी, हुशार, बर्याच वेळा वर्गाची मॉनिटर आणि पहिल्या पाचात होती ऋचा. बारावीमध्ये ९४% होते, पण micro physics मधे रिसर्च करायचा म्हणून BSc ला ऐडमिशन घेतली. अश्या ह्या आमच्या ऋचाबाई.
संध्याकाळी अभय ऑफिसमधून आला, नेहमीप्रमाणे चहा खाणं झाल्यावर "अनिता......ऋचा कुठाय गं? का आजपण मैत्रीणीकडे अभ्यासाला हां?"...त्याचा तो नेहमीचा मिश्कील खोडकर स्वर मला जाणवला. मग मीच पुढे होउन म्हंटलं "नाही रे, आत्ताच झोपलीय जरा रूममध्ये" ...
लगेच अभयचा स्वर पाघळला "का काय झालं?".. तीच्याबाबतीत क्षणार्धात तो इतका बदलतो की काही विचारु नका.
"अरे, काही नाही, चिडलीय तुझ्यावर आणि मग नेहमीचा फुगा करून झोपली. म्हणे तू तीचा मोबाईल तीला न विचारता बघीतलास".
" ओह! हं..असं, ठिके बघू उठल्यावर".
काही वेळातच ऋचा बाहेर आली, अभय लीव्हींग मधे टिव्ही बघत होता. "आई.....कॉफी आणि please हं strong कर जरा". अभयच्या हातातून रीमोट घेऊन तीने टिव्ही बंद केला.
" बाबाss मी चिडलीय तुझ्यावर, का पाहीलास माझा फोन तू?"
अभय शांत. त्याच्या नेहमीच्या स्टाईल मधे मान थोडी खाली करत चष्म्याच्या वरच्या बाजूने तीच्याकडे बघून म्हणाला
"ये बस जरा इथे. का नाही पहायचा? मी फोन पाहिल्यावर तुला काही विचारले, बोललो काही नाही ना?"
"नाही तरीपण का?" ऋचा.
तेवढ्यात मी कॉफी आणली आम्हा तिघांना. अभय बोलतच होता.
"बेटा, तुला आठवतंय, तू साधारण पाचवी सहावी त असशील, तेव्हापासून तू माझा मोबाईल खेळतीयस. सुरवातीला गेम्स, मग युट्यूब, मग माझ्या व्हाट्सएपवरचे जोक्स. नववी दहावी नंतर तुझा स्वतः चा इमेल आय डी, त्याच्यवरच्या इमेल. अकरावी त फेसबुक इंनस्टाग्राम अकाउंटस. मागच्या वर्षी पासुन तुझा स्वतः चा मोबाईल आणि तुझी स्वतः ची Privacy Settings.
जो पर्यंत तू माझ्या मोबाईल मधून सगळं ओपरेट करत होतीस ना तो पर्यंत मी निश्चिंत होतो बेटा. कारण हे गैजेट असं आहे की त्याची नशा ही सिगारेट, दारू आणि अगदी ड्रग्स पेक्षा ही भयंकर आहे. त्याची झिंग एकदा चढली की मग कधीच उतरत नाही. त्याच्यात एवढं काही साठलं आहे की तुम्ही कीतीही म्हणालात तरी बाहेर पडू शकत नाही. सिगारेट दारू तुमचं शरीर खाऊन टाकतात, पण हे गैजेट मुळे तुमच्या मनालाच कैन्सर होऊ शकतो. ज्याचा उपचार त्या विधात्याकडे सुध्दा नाही.
"आता तुझा स्वतः चा फोन, त्यामुळे माझा कंट्रोल शुन्य. थोडं जड जातं बेटा हे. मुलं जेव्हा मोठी होत जातात, आमच्या हातून चिउकाउचे घास न जेवता, स्वतः ची स्वतः जेवतात, तेव्हा मनातून खुप आनंद होतो. पण तेवढंच हलकं दुःख होतं की आता ती independent होणार, उडून जाणार. मग सर्वच बाबतीत वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर हा आनंद आणि हलकं दुःख साथ देत राहतं."
"तुला स्वतः शाळेत सोडण्याचा, बाय बाय करण्याचा एक आनंद होता. तू जेव्हा स्कुटीवर एकटी लांब कॉलेज ला जायला लागलीस तेव्हा तो आनंद अभिमानात रुपांतरीत झाला. आज आमच्या बरोबर राहते आहेस, उद्या मास्टर्स करायला परदेशात जाशील तेव्हाचा आनंद अभिमान काही वेगळाच असेल. अर्थात मग त्यात काळजी ह्या गुणधर्माची भर पडेल."
"बघ ना, कसं असतं मुलगी जन्माला येते, तीचं बालपण बघतांना आनंद होतो, पुढं तीचं कर्तृत्व बघतांना अभिमान वाटतो आणि मग सासरी गेली की काळजी"
अभयनी औंढा गिळला.
" बेटा, हा प्रवासच काही और आहे. आई ह्या नात्यासाठी तो नवीन नसतो कारण ते नातंच ह्या प्रवासातून जन्म घेतं. पण बापासाठी हा नवीन प्रवास कायम कठीण, खडतर असतो."
अभय आज एकदम वेगळाच दिसत होता. त्याचा तो मिश्कील स्वभाव कुठच्या कुठे निघून गेला होता. गेल्या पंचवीस वर्षात मी त्याला पहिल्यांदाच एवढं भावनिक झालेले पहात होते. नाहीतर एरवी तो practical आणि rational विचार मांडतो.
अभय नी ती गार झालेली कॉफी एका घोटात संपवली. जशी तो रेस्तराँ मधे Scotch bottoms up करतो तशी. मग ऋचाच्या जवळ जाऊन बसला.
"ऋचा, तुला सांगतो पुरुष आतून फार नाजुक असतो दगडात फुललेल्या दगडफुलासारखा..
नवरा आणि बाप ही दोन नाती त्याला अंतरबाहय बदलून टाकतात. तो एकाकी होउन बसतो. आता त्याला डोकं ठेवायला खांदा नसतो आणि डोळां पाणी टीपयला कपडा. अतरंगातली काळजी त्याला उसन्या कणखरतेने मांडावी लागते. जबाबदारी ही त्यांच्या प्रत्येक श्वासात जगू लागते. कारण जेव्हा श्वास थांबतील तेव्हाच त्यातून मुक्ती. रोजचा एक तरी घास अडखळूनच पुढे जातो. आणि फुकाच्या काळजीनं एकदा तरी ठोका चुकतो. शिवधनुष्यापेक्षाही अवजड आणि कवचकुंडलापेक्षाही अजरामर असे हे नातं आहे"
माझ्या कडे बघून पुढे म्हणाला "पुढचा जन्म तुम्हाला बाईचाच मिळाला पाहीजे म्हणणारी ती. तीला काय सांगणार, नवीन जीवाला पोटातून जन्म न देता सुध्दा जगणार्या पुुरुषाच्या ह्या प्रसुतीवेदना"
"आमच्या वेळेस साधी माला डी ची जाहिरात जरी टीव्ही वर लागली तरी आम्हाला पाणी आणयला किचन मधे पाठवायचे. आज पैडमैन सारखा पिक्चर आपण एकत्र पाहिला. नक्कीच ही सामाजिक सुधारणा कौतुकास्पद आहे. आजपर्यंत मी तुला कधीही टोकरले नाही, तुझ्यावर कायम इतरांपेक्षा जास्त विश्वास ठेवला आणि तुझ्या हो त हो मिसळत गेलो"
"पण ऋची, आता पुढील आयुष्य हे जरा वेगळ्या वळणावरचं आहे. तिथं तुझी तुलाच काळजी घ्यायचीय. रस्त्यावरच्या गाड्यांवर तळलेल्या बटाटा वड्यांचा खमंग वास आपल्याला नक्कीच त्या गाडीकडे ओढून घेऊन जातो, पण तो वडा कीती हायजेनिक आहे हे बघणं महत्त्वाचे असते. आपल्याला ररस्त्यावरचा तो बटाटा वडा खायचाय का चांगल्या रेस्तराँ मधील थ्री कोर्स डीनर हे ठरवण्याचं तुझं वय आहे."
"तुझ्या आईचं आणि माझं लव्ह अफेअर होतं मग आम्ही लग्न केलं पण आमचे संबंध आम्ही कधी माजघरात जाऊ दिले नाहीत. मैत्री ही कितीही जानी, घट्ट असली तरी त्यालाही काही लक्ष्मणरेषा आखायच्या असतात. कारण साधूच्या वेषातील रावण ही तर रामायणापासूनची परंपरा आहे."
"बेटा, तु जीवनात सगळं ट्राय कर मजा कर. मी तुझ्या पाठीशी आहे पण मला आधी सांगून कर. बीअर पी, सिगरेट ओढ पार्टी कर, पण हे सगळं करतांना कायम आपल्या घरची देवापाशी तेवणारी समई आठव. ती तेजोमय आहे पण एवढी ही भडक नाही की तीचा डोळ्यांना त्रास होईल."
"स्त्रीचा शील हा असा दागिना हे की जो तीचा तीनेच घडवायचा आणि जपायचा असतो. हा दागिना जपण्यासाठी एकच लॉकर तो म्हणजे संस्कार. जीच्यापाशी हा लॉकर, तीचा दागिना कायम सुरक्षित"
आणि मग अभयच्या डोळ्यातून पहिल्यांदा मी घळाघळा पाणी येतांना पाहिले. रुचा तर आधीपासूनच रडत होती. मी परत पटकन गरम कॉफी करून आणली.
ऋचाने अभयचा हात घट्ट पकडला होता.. "बाबा, मी सॉरी म्हणणार नाही, मला माहितेय तुला सॉरी, थँक्स मी म्हटलेलं आवडत नाही" थोडी हसली..
"तुझ्या लाडक्या मैने प्यार किया मधला डायलॉग आहे ना ..दोस्ती मै नो सॉरी नो थँक्स, आणि तु माझा पहिला मित्र आहेस ना बाबा."
"काळजी करू नकोस रे. तु आणि आईनं आमच्या पुढे कायमच संस्काराचं भरलेलं ताट न सांगता वाढलं आहेत, जसं नैवेद्याचं असतं तसं. अगदी डाव्याबाजूच्या चटणी कोशिंबीरीपासून ते उजव्या बाजूच्या खीरी पर्यंत. तु कायमच माझ्यावर विश्वास ठेवला आहेस, मी कधी कधी चुकले असेन पण तु माझ्या पाठीशी उभा राहिला आहेस. अगदी स्वामी समर्थ च्या वचनासारखा.
ह्याच विश्वासाची आणि संस्काराची "शिदोरी" सदैव पाठीवर बांधून मी हा पुढचा प्रवास करीन. आणि हो आभिमान हा काळजी पेक्षा श्रेष्ठ असतो हे मी सिध्द करीन"
ऋचाचं हे बोलणं ऐकून मला आमच्या कॉलेजडेज मधला माझा अभय परत आठवला....
--मिलिंद सहस्त्रबुद्धे ©

आधुनिक काठी..............."बाळ जातो दुरदेशी मन गेले वेडावून आज सकाळपासून" ही कविता आमच्या लहानपणी आई

"बाळ जातो दुरदेशी मन गेले वेडावून आज सकाळपासून" ही कविता आमच्या लहानपणी आई म्हणायची तेव्हा गळा भरुन यायचा आणि दोन तीन वेळा औंढा गिळायचो. बाळं दुरदेशी असलेली आज माझ्या सारखी मंडळी प्रत्येक दुसर्या मध्यमवर्गीय घरात आहेत. आम्ही आई वडील इथंच स्वदेशी सोकॉल्ड आनंदात आहोत.
मुलं परदेशी जातांनाचे ते आनंद, अभिमान,काळजी हळूहळू 'पानगळतीसारखी सरु लागते आणि मग एकांतात राह्याण्याचा ग्रीष्म वयोमानानुसार चटका द्यायला सुरवात करतो.'
सध्या आधुनिक तंत्रज्ञान आणि सुखसोयी मुळे पुर्वी इतकी तोशीश करावी लागत नाही. घरकामाला पण बर्यापैकी पैशात माणसं मिळतात. या इंटरनेट च्या युगात तर अगदी जवळ बसून बोलतोय, पहातोय असा आभासी अनुभव निर्माण होतो. मुलांपासून आपण एकटे लांब राहतोय अश्या भावना मुखवट्यावर तरी उमटत नाहीत.
प्रत्यक्ष चेहर्याचे काय हो, तो चेहरा आपण कधी बघतो का? आयुष्यात मुखवट्यावर तर जगतो आपण, काय बरोबर ना.
मी प्रकाश आणि माझी बायको वासंती. आमची पहिली मुलगी मुग्धा पाच वर्षाची झाल्यावरच माझ्या आईची टकळी सुरु झाली. " प्रकाश, आता पुढची तयारी करा रे. घराला दिवा हवा, मुलगा हा आपल्या आडनावाला, घराण्याला पुढे नेणारा असतो, तो हवाच. तोच म्हातारपणाची काठी रे बाबा, जसा तु आहेस मला."
"तु आणि वासंती वाटलं तर डॉक्टर कडे जाउन या पण मुलासाठी प्रयत्न करा आता." "माझे डोळे मिटायच्या आत मला नातवांचं तोंड पाह्यचंय."
आईची हि वाक्य खटकायची आणि तीच्या भुमिकेतून पटायचीसुध्दा. तो काळच तसा होता. बहुतेक काहीप्रमाणात अजूनही तो तसाच असेल फक्त आता बंद दरवाज्यांमागे लपून बसला असेल. पुर्वी नातेवाईक, मित्रमंडळी खुले आम मुलगा, पेढा, दिवा वंशज अशी बिरुदावली लावून चेष्टा करत, सुप्त इच्छा प्रगट करायचे. आता मात्र तसे राहिले नाही, थोडा बदल दिसतो.
वासंती च्या घरच्यांकडून पण बरीच घे पाठ झाल्यावर, मग मात्र आम्ही थोड्याफार कबुलीने दुसरा चान्स घेतलाच. आम्हाला मुलगा "वेदांत" झाला. सगळी कडे आनंदी आनंद. तेव्हा मुग्धा (आमची मुलगी) आठ वर्षाची होती.
पुढे सुखदुःखात वर्षे सरली मुलं मोठी झाली. आठ वर्षाचे अंतर असल्यामुळे साहजिकच मुग्धाचं आधी लग्न झालं आणि ती बंगलोर ला सासरी गेली. वेदांतनी यशस्वी पणे इंजीनियरींग आणि एमबीए पुर्ण केलं. आणि तो नोकरीच्या निमित्ताने परदेशात जायला निघाला. त्यादिवशी मला माझ्या आईची आणि तीच्या त्या कवितेची खुप आठवण झाली. तीचं दिव्याचं, नातवांचं स्वप्न पुर्ण झालं होतं.
आमचे चिरंजीव परदेशात गेले, पोहचले आणि सेटल्ड पण झाले. आमच्या पण दोन तीन परदेशवारी झाल्या.
हळूहळू एकटं राहयची सवय मला आणि वासंतीला होत होती. पण तरीही मन आतून खातच होतं. वेदांत बरोबर असता, किमान इथंच रहात असता तर दररोज नाही तर गेला बाजार आठ पंधरा दिवसांनी दिसला असता भेटला असता. त्याचा आणि ईशाचा(त्याची बायको) संसार फुलतांना जवळून पाहिला असता. पण खंत मनात ठेवून मुखवटे धारण करत आधी फोन कॉल व्हिडीओ चाट आता व्हाट्सएपच्या चाट वैगेरे आम्ही करत होतो आणि अजूनही करतो.
साधारण चार वर्षापुर्वी वासंतीला कैन्सर डिटेक्ट झाला आणि आमचं आयुष्यच बदलून गेलं. ज्या दिवशी हे कळलं, त्या दिवशी आभाळ कोसळणं म्हणजे काय ह्याची प्रचीतीच आली. त्यादिवशी डॉक्टरांकडून घरी आलो, पण घर एकदम भकास वाटू लागलं. काय बोलणार, कोणाला सांगणार काय झालंय? दारांना, खिडक्यांना, भांड्यांना कि छताला कोणाला...काहीच कळेनासं झालं होतं.
त्यादिवशी मी त्या नटसम्राट मधील म्हातार्या सारखं न राहवून जोरात ओरडलो " कुणी मुलं देता का मुलं? आम्हाला संभाळणारी, आमचं ऐकणारी, आमच्याशी बोलणारी, आमच्यावर रागावणारी, बरं वेळ आलीच तर अगदी घराबाहेर काढणारी पण चालतील..पण कुणी, कुणी मुलं देता का मुलं?"
मुग्धा फोन केल्यावर दुसर्या दिवशी सकाळी हजर. तीने डॉक्टरांना भेटून सर्व माहिती घेतली आणि मग ट्रिटमेंट सुरु झाली.
तीची दोन मुलं अमित आणि सुमित एक ३रीत दुसरा ५वीत. पुढे आईच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी पहिले वर्ष मुग्धाने पुणे-बंगलोर महिन्यातून एकदोनदा येऊन जाऊन केले, पण पुढे पुढे तिला ते जमेनासं व्हायला लागल्यावर आमचे जावई केदारराव त्यांच्याशी बोलून ती आमच्याकडेच रहायला आली. मुलांच्या शाळादेखील तिने ट्रान्सफर करून घेतल्या.
वेदांतला कळल्यावर महिनाभरातच तो भारतात आला आठ-पंधरा दिवस इथे राहीला, इशापण आली होती. आमची काळजी सेवाशुश्रूषा केली आणि मग आमची परवानगी घेऊनच परत त्यांच्या परदेशात गेला. खर्चाची काळजी करू नका मी आहे हा खंबीर विश्वास मागे ठेवून गेला.
पहिल्या एक-दोन वर्षात दर चार-सहा महिन्यांनी वेदांत इथं भारतात येत होता आईची काळजी त्याला तिथं स्वस्थ बसून देत नव्हती. पण पुढे पुढे हळूहळू त्याचे येणं कमी झालं. त्याचे वाढलेला व्याप, प्रमोशनस, त्याचा संसार, त्याची वाढलेली कामं यामुळे त्याचे इथं येणं हळूहळू एकदम कमी झालं. ट्रीटमेंट च्या खर्चाचा खंबीर विश्वास मात्र त्यानी कायम ठेवला.
या चार वर्षात मात्र मुग्धा तिचा स्वतःचा संसार विसरलीच जणु. एखाद्या ब्युरोतल्या नर्स प्रमाणे तिने पूर्णपणे आईला वाहून घेतलं पूर्णपणे आईला सांभाळलं. आईची केमोथेरपी सीटींगस, औषधं, तिचा आहार , व्यायाम..सर्व काही मुग्धाच करत होती आणि अजूनही करते. अजून काय सांगू. बरं अमित सुमित चा अभ्यास, त्यांच्या शाळा, त्यांचे क्लासेस वगैरे आहेतच की. केदाररावां बरोबर वेळ देणं, त्यांचं काही दुखलंखुपलं किंवा त्यांना बंगलोर ला जाऊन काही काम असेल तर साथ देणं असं पण एकीकडे तिचं चालूच असतं. ती हे सगळे इतके लिलया आहे संभाळते की मला आश्चर्यच वाटते की हीच का ती आपली छोटी मुग्धा.
मला आठवतात ते दिवस, जेव्हा वेदांत झाल्यावर मुग्धा कडे काही वर्ष आमचं दुर्लक्ष झालं होतं. तेव्हा ती म्हणायची "बाबा, तुमचा आणि आईचा वेदुच जास्त लाडका आहे. पण बघा मी एक दिवस त्या उंदीर सिंहाच्या गोष्टीतल्या उंदरासारखी तुमच्या कामी येईन."
तिचे ते उंदीर असणं.. हे आज सिंहाच्या बरोबरीचा आहे. कारण वेदांतनी ट्रीटमेंटच्या खर्चाचा खंबीर विश्वास देऊन बाकीचे सगळेच हात नकळत झटकलेले आहेत. आम्हाला पण कधीकधी ते योग्यच वाटतं.आज आम्ही आहोत आणि उद्या नाही, त्याचं पूर्ण उमेदीचं आयुष्य, त्याचं करिअर, त्याचा संसार तिथे परदेशात त्याची वाट बघतोय. मग "आम्ही गळतीला लागलेल्या पानांनी कशाला त्याच्या जीवनाची जाळी करायची" असा कायम विचार आमच्या मनात येतो.
पण मग मुग्धा, तीचं काय? आज ती पण तीचं सगळं सोडुन आमच्यासाठी धावून आलीय, येतीय. मनापासून सर्व करतीय नकळत मुलगा असल्यासारखी आपली जबाबदारी पार पाडतीय ना..
माझ्या मनातली ही वादळं कधी संपतच नाहीत. समुद्राच्या भरती ओहटी सारखी दिवसातून एकदा येतातच. मुलगी म्हणजे परक्याचं धन, ती एकदा का सासरी गेली की त्यांचीच, तीच्या घरचं पाणी पण व्यर्ज...अश्या काळात वाढलेलो आम्ही. आज मात्र त्याच मुलीच्या खंबीर आधारावर आणि भक्कम खांद्यावर डोकं ठेवून आनंदाने जगत आहोत.
वासंतीच्या कॅन्सर 70 टक्के बरा झाला आहे आणि डॉक्टर म्हणताहेत पुढील एक वर्षात तो पूर्णपणे बरा होईल कदाचित.
ह्या पूर्ण मागच्या पाच वर्षात मी प्रामुख्याने अनुभवलेली आणि जाणवलेली गोष्ट म्हणजे "दिवा कितीही चांदीचा वा सोन्याचा असला तरी प्रकाश देते ती ज्योतच."
आज आई असती तर तिला मी अभिमानाने म्हणालो असतो "अगं म्हातारपणाची काठी बरोबर आहे, पण चुकून तिला तू पुल्लिंगी समजलीस, खरी काठी ही स्त्रीलिंगीच असते."
चिरंजीवी आहे जगती कन्या मानवाची.
---- मिलिंद सहस्त्रबुद्धे ©

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...