Wednesday, July 22, 2020

बारा दुणे बावीस??

बारा दुणे बावीस??

काही योगायोग जुळून आले तर "सोने पे सुहागा" असं आपण म्हणतो. असे योग जुळून यावेत असं आपल्याला वाटत असतंच असं नाही. पण समजा आलेच चुकून जूळून तर नक्कीच काहीतरी महत्वाकांशी घडेल याची जाणीव अथवा खात्री मात्र आपल्याला असते.

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन तुल्यबळ व्यक्तिमत्त्वांच्या जोड्या आणि योगायोग असा की त्यांच्या जन्मदिवसाच्या तारखा सारख्याच. एक सर्वश्रुत असलेली तारीख म्हणजे १२.
बारा म्हटलं की आठवते किंवा डोळ्यासमोर येते ते पुणे (MH-12), बारामती आणि १२डिसेंबर.
हो बरोबर ओळखलंत! १२ डिसेंबर; अर्थातच माननीय शरद पवार साहेबांचा वाढदिवस. तेवढेच वलय लाभलेला, जनमानसात तळागाळात रुजलेला आणि पक्षात नावाजलेला दुसरा माणूस अर्थातच स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे. त्यांची पण जन्म तारीख १२ डिसेंबर.  निव्वळ योगायोग म्हणावा लागेल कि हि दोन्ही व्यक्तिमत्व आपापल्या पक्षात, राज्यस्तरीय राजकारणात अव्वल स्थानावर आणि राजकीय हाडवैरी. पण जन्मतारीख मात्र एकच १२ डिसेंबर. विचारसरणी, कार्यपद्धती, समाजकारण आणि राजकारण करण्याच्या शैलीत भिन्नता असूनही साम्य एकच १२ डिसेंबर.

कदाचित ही दोन व्यक्तिमत्व त्याकाळी एकत्र आली असती आणि सरकार स्थापन केलं असतं तर महाराष्ट्र आज जीथं आहे त्याच्यापेक्षा पुढच्या टप्प्यातल्या प्रगतीपथावर असता. पवार साहेबांचे बेरजेचे राजकारण, दूरदृष्टी आणि आपत्ती (कोणतीही) व्यवस्थापन कौशल्य, तर मुंडे साहेबांचे बेधडक काम करण्याची कार्यशैली आणि प्रशासनावर असलेली घट्ट पकड. यांनी नक्कीच एक वेगळा इतिहास घडवला असता. असा इतिहास जो प्रत्येक समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया ठरला असता.  एकाने मुख्यमंत्री म्हणून यशस्वी कारकीर्द महाराष्ट्र दाखवली होती तर दुसऱ्याने उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद भूषवून त्या पदांचं सार्थक केलं होतं. कामाचा दांडगा उत्साह आणि अनुभव. तळागाळातल्या जनप्रतिनिधीं पासून ते अगदी दिल्ली दरबारी असलेली दोघांची उठबस. ह्या सर्वाचा फायदा नक्कीच महाराष्ट्राला झाला असता.

 हे सगळं म्हणत असतांना, अर्थातच पक्ष आणि विचारसरणीच्या पलीकडे जाऊन आपण पाहतोय, हे महत्त्वाचं सुत्र लक्षात ठेवावे लागेल.

असाच काहीसा, किंबहूना इतिहासाची पुनरावृत्तीच म्हणा जणू, अजून एक योगायोग महाराष्ट्रात पुन्हा घडला. तो म्हणजे 22 जुलै. तशीच दोन तुल्यबळ व्यक्तिमत्व, तेच दोन वेगळे पक्ष आणि विभिन्न विचारसरणी. अर्थातच...
देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार.

८० तासांपूर्ता का होईना तो "सोने पे सुहागा" वाला योग जुळून आला होता. महाराष्ट्राने पहाटेच्या शुद्ध ब्राह्म मुहूर्तावर विविध टीव्ही चॅनल्स वर तो अनुभवला. तो जसा धूमकेतू सारखा अचानक उगवला तितक्याच वेगाने मावळला सुद्धा. अर्थात तो टिकला नाही किंवा मी म्हणेन हा दुग्धशर्करा योग नासलाच.

परंतु बघा ना! पुन्हा तेच, फक्त पक्ष बदल असतील. म्हणजे परत एक यशस्वी मुख्यमंत्री आणि एक तडफदार यशस्वी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री. देवेंद्रजींच बेरीज-वजाबाकी गुणाकार-भागाकार याचे राजकारण तर अजितदादांची बेधडक कार्यशैली, पोटात व ओठात नसलेलं अंतर, आणि प्रशासनावर करडी नजर. एकदा का एखादं काम हातात घेतलं की पूर्ण करणारच हा दोघांचाही आत्मविश्वास. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या प्रगतीपुस्तकावर अभुतपुर्व जोडीचं नाव उमटता उमटता राहीले.

ह्या जोड्या म्हणजे अशा आहेत की हिंदी चित्रपट रसिकांना जसं वाटतं शाहरुख खान आणि आमीर खान यांचा एकत्र असलेला चित्रपट प्रदर्शित व्हावा. एकाची जबरदस्त स्टाईल आणि एकाची मेथड एक्टिंग एकत्र बघता यावी.
तर टेनिसमध्ये आंद्रे आगासी आणि पीट सैम्प्रस नी एकत्र डबल्स खेळून जिंकाव. कारण दोघेही परस्परांच्या पुरक. एक बॅकहॅन्डचा बादशहा तर दुसरा सर्विसचा किंग.
आपल्या लाडक्या क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर, सुनील गावस्कर आणि व्हिव रिचर्ड्स पिचवर खेळतायत. मग साला समोर बॉलर्सची जरी world eleven असली तरी स्कोर बोर्ड फाटलाच समजा.

ह्या जश्या ड्रीम जोड्या आहेत जगभराच्या विविध चाहत्यांसाठी, तशाच महाराष्ट्राच्या राजकारणात समस्त कार्यकर्ते आणि जनमानसाच्या ड्रीम जोड्या (स्वप्नातलं सरकार) आहेत. त्या म्हणजे "पवार-मुंडे" किंवा मग आता "देवेंद्र-अजित". 
नियतीच्या मनात सुद्धा काय असेल ना! पवार आणि मुंडे साहेबांच्या वयात साधारण अंतर दहा वर्षाचं . गंमत म्हणजे, देवेंद्रजी आणि अजित पवारांमध्ये सुद्धा साधारण दहा वर्षांचंच अंतर आहे. खरंच कमाल आहे की १२ आणि २२ मध्ये सुध्दा दहाचंच अंतर आहे.

आज 22 जुलै च्या निमित्ताने देवेंद्रजी आणि अजित दादांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत..... महाराष्ट्राच्या यशस्वी उज्वल प्रगतीसाठी श्री चरणी अशी प्रार्थना करतो की  "कदाचित २०१२ ला १२ डिसेंबर एकत्र येऊ शकले नाहीत पण आता २०२२ ला २२ जुलै एकत्र येऊन इतिहास घडावा"

माझ्या या दोन्ही आवडत्या नेतांना मनापासून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!

© मिलिंद सहस्रबुद्धे
२२/०७/२०२०

"आणि सज्ञान होतांना.."

"आणि सज्ञान होतांना.."

पहिली एक दोन वर्ष सगळंच छान, गुडी गुडी असतं. नवीन असतं सगळंच. आजुबाजुचं वातावरण समजून घेणं, काही कळालं नाही तर विचारणं, मिळालं नाही तर हट्ट करणं. हट्ट पुरवणं आणि पुरवून घेणं. कसं छान निरगास असतं. थोडंसं काही झालं तरी लगेच रडू येणे, जराशी समजूत काढली की विसरून जाणं....

पुढे तिसर्या ते पाचव्या वर्षात बोलायला यायला लागतं.  एकमेकांचे शब्द समजतात.  मग एकमेकाशी बोलणं आणि एकमेकाला बोलणं दोन्ही सूरू होतं. थोडाफार अट्टाहास वाढतो. मी म्हणेन तेच खरं असं वागायला सुरुवात होते.

बघा ना जसं मुल जन्माला आल्यापासून त्याची वाढ होत असते तसंच काहीसं वैवाहिक जीवनाची सुरुवात आणि वाढ होत असते.

सहाव्या वर्षा नंतर मग ह्या दांपत्य जीवनाची
शाळा सुरु होते. दरवर्षी नवीन इयत्ता, नवीन निर्मिति, नवीन अनुभव, नवीन शिक्षण आणि असं बरंच काही. एकमेकांचे अभ्यास करत, रोज एक नवीन परीक्षा देत. ती कधी पास
तर कधी नापस होत पुढच्या वर्गात जाणं चालू असतं.

असं करत करत दहा बारा वर्ष सरतात आणि Thirteen मधलं Teen Age  (किशोर वय) येतं. जरा स्थिर स्थावर झालेलं, एकमेकाला बर्यापैकी समजलेलं आणि समजुन घेतेललं असतं. इथं पुन्हा नव्याने एक आपुलकी (affection) निर्माण होते. मुलांचं सांगोपन करता-करता एकमेकाशी संवाद पुन्हा नव्याने सुरु होतो. अशी कमी जादा संवादातून पुढची तीन वर्षे सरतात. 

मग येतो ह्या लग्नाचा १६वा वर्धापन दिन. (साधारण चाळीशीत) तेव्हा तर जणू वयात आल्या प्रमाणे नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडायला होतं. अर्थात हे प्रेमसुध्दा त्या 'सोळावं वरीस धोक्याचं' सारखंच असतं बरं का. कारण मागील पंधरा वर्षातलं सगळं काही विसरू शकत नाही ना माणूस. तसंच हे प्रेम सुद्धा काही काळापुरता त्या आळवा वरच्या पाण्यासारखंच असलं तरी, होतं मात्र नक्की.

असं हे वैवाहिक जीवनरुपी मुल जेव्हा १८ व्या वर्षात पदार्पण करतं तेव्हा सज्ञान झालेलं असतं. छोटी मोठी भांडणं, वाद सोडवले जात नाहीत तर ते आपोआप विरुन जातात आणि तात्काळ विसरले पण जातात.  एकमेकाला अजून स्पेस दिली जाते ... मागील  सतरा वर्षातल्या अनुभवांमुळे, कितीहि नवीन प्रसंग आले तरी शांततेने मार्ग काढले जातात.

महत्वाचं म्हणजे आता ह्या पुढे आपलं आपल्यालाच (एकमेकांना) सांभाळायचंय  ह्याची जाणीव होते.  इथूनच मग एकत्र ध्येयाने गध्देपंचवीशीकडे यशस्वी वाटचाल सुरू होते...

जशी आमची सुरु झालीय.....😀

© सहज'मित (मिलिंद सहस्रबुद्धे)
०७/०७/२०२०

 आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद.
आपल्या सर्वांच्या भरघोस शुभेच्छांनी आणि आशीर्वादानी आमची फेसबुक भिंत काल भरुन गेली. 🙏🙏
with Tanmaya Sahasrabudhe
काल आमच्या लग्नाचा १७वा वर्धापनदिन साजरा झाला आणि आम्ही उभयतांनी १८व्या वर्षात पदार्पण केले. सज्ञान झालो. त्यानिमित्ताने नेहमी प्रमाणे सहज सुचलंच #सहज'मित..

"वपुर्वाई"

"वपुर्वाई"
            काल व.पु. काळेंची पुण्यतिथी होती. तशी ती दरवर्षीच येते. मग आजच का लिहिलं? एवढ्या वर्षात का नाही लिहिलं? किंवा मग पुढच्या वर्षी पण लिहणार का? वगैरे प्रश्न कोणाला जर पडले असतील तर त्याची उत्तरं त्यांनी माझ्या सदाशिव पेठेतल्या घरी येऊन घ्यावीत.  वपुंच्या भाषेत सांगायचं तर "लोक काय म्हणतील? याची पर्वा करायची नाही. म्हणजे माणसाला सुख लागतं" तसंच आज सुचलं, आज लिहिलं आणि आज तुमच्या समोर मांडतोय बस इतकंच.

"गोली मार भेजे मे, भेजा शोर करता है.." हे सत्या मधलं गाणं मला नेहमी आठवतं. वपु समजायला आणि वाचायला हा भेजा कधीच कमी येत नाही. काळजात पोचणार असं हया माणसाचं लिखाण आहे म्हणून मग गोली मार भेजे मे असं म्हणून काळजातूनच ते वाचण्यात मजा आहे.

जीवनात, तारुण्यात वपु येणे (पुस्तकंरुपी) हे कोणत्याही व्यक्तीच्या भाग्यात असावं लागतं. ते मखमली गवतांवरचे फुलपाखरा सारखे, विविध फुलांवर उडण्याचे दिवस आणि सोबतीला वपुंचे एखादं पुस्तक. तुम्ही एकीकडे वाचत आहात आणि रोजचं उडणं चालू आहे.  अगदी कोणताही कथासंग्रह आणि त्यातली कथा घ्या, तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींच वपु सांगत आहेत असं वाटत राहतं. त्यांच्या प्रत्येक कथेतलं पात्रं जेव्हा वपुंचे विचार मांडतं ना, तेव्हा आपल्याला वाटतं 'अरे हयाला (हयांना) कसं काय कळलं असेल' की अगदी सेम असंच वाटलं होतं मला किंवा वाटतयं मला सध्या. फक्त इतक्या गहिर्या शब्दात मांडता येत नाही आलं नाही. मग वपुंची महती कळायला लागते की प्रत्येक भावना, येणारा प्रत्येक विचार हा गहीर्या शब्दात मांडून सुद्धा तो सोपा वाटतो. डायरेक्ट म्हणजे अगदी डायरेक्ट मनाला भिडतो. काळजात घर करतो अगदी घुसतो म्हणां ना.

वपु, खरंच आपल्या सगळ्यांचं सगळं जीवन जगले असतील की काय असं वाटत राहतं. आपल्याला तारुण्यात सापडलेले वपुं, मध्यम वयात सुद्धा आपलेसे वाटतात आणि मग कदाचित वार्धक्यात सुद्धा आठवणींच्या रुपात साठून राहतात. "आठवणी मुंग्यांच्या वारुळा प्रमाणे असतात. वारूळ पाहून आत मध्ये किती मुंग्या असतील याचा अंदाज घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचे तसंच आहे".. हे वपुंचेच वाक्य त्यांच्या लिखाणाला तंतोतंत लागू पडते. त्यांच्या कथासंग्रहाच्या पुस्तकांचे नुसते कव्हर पेज आणि बॅक पेज वाचून, आत काय आहे याचा अंदाज कधीच लावता येत नाही. परंतु एकदा का प्रस्तावने नंतरची चार पान वाचायला सुरुवात केली की जीवन रूपी वारुळातील अनुभव असंख्य चपखल वाक्यातून मुंग्या सारखे प्रगट होऊन जातात. आणि मग शेवटचं पान वाचल्यावरच पुस्तक खाली ठेवले जातं. खरोखरच किमयागार होता हा माणूस.

विविध विषयांना आपल्या हास्यविनोदच्या, तर भावनिक, तर कधी उत्कंठावर्धक कथांनी त्यांनी स्पर्श केला. ती प्रत्येक कथा, प्रत्येक कादंबरी, प्रत्येक कथा संग्रह अजरामर करून ठेवला.

वपुंची कथा म्हणजे दे धक्का. जसजसं तुम्ही वपुंच्या विविध कथा, कादंबऱ्या वाचायला लागता, तसतशा तुम्हाला ह्या धक्कातंत्राची सवय होत जाते. मग काय कथा वाचायला सुरुवात केल्यावर त्या सीआयडी मधील शिवाजी साटम सारखा सतत मनात येतं "कुछ तो गडबड हे दया". परंतु वपुंच वैशिष्ट्य असं की धक्का काय आहे किंवा काय असेल याचे फक्त आपल्याला अंदाज बांधता येतात. कारण धक्का आहे हे जरी माहिती असलं तरी कथेच्या शेवटी जो खरा धक्का बसतो तो कधीच मनात आलेला नसतो. हेच तर त्यांचे वैशिष्ट्य आणि मग त्या "कुछ तो गडबड है दया" वाल्याची म्हणजे स्वतःचीच दया येते.

मी मुद्दामच त्याच्या कथासंग्रहं, कादंबरी किंवा कथेचं नाव इथं घेण्याचे टाळतोय कारण मग उगाचच ती एक टिपिकल अनुक्रमाणिका असते तस होईल. मला वपुं बद्दल मांडायचे आहे, त्यांच्या कथासंग्रहाची यादी सादर करायची नाहीये.

मानवी भावनांची एवढी गुंतागुंत कशी काय समजली असेल बुवा या माणसाला. खरंच हा प्रश्न सतत अगदी सतत भेडसावत असतो. मानसशास्त्रातील विविध पुस्तके किंवा पीएचडीचे ग्रंथ सुध्दा फिके पडतील इतकं साधं, सरळ आणि समजायला, पचायला सोपं लिहून ठेवलंय ह्या माणासानं.

एखादवेळेस सध्याच्या पीढीने, अगदीच सगळ्या कथा वाचल्या नसतील तरी  एफबी आणि व्हाट्सअप वरचे फॉरवर्ड केलेले वपुंचे विचार  जरी वाचले तरी सतत वाटतं "काय माणूस आहे हा यार". त्याचं फक्त वपुर्झा  आणि आपण सारे अर्जुन ही दोन पुस्तकं जरी एखाद्याच्या वाचनात आली, तरी ती व्यक्ती आजन्म वपुं चा फॅन क्लब join करेल.

कथाकथन मराठीत जर कोणी  ग्लॅमरस केलं असेल तर ते म्हणजे व पु.  मुळात प्रत्येक कथाच ग्लॅमरस. त्यात त्यांचा तो मधाळ आणि थोडा लाघवी आवाज. कथेतील पात्र जर स्त्री असेल,तर नक्कीच आपल्या समोर प्रतिमा उभी राहील इतके तंतोतंत भावनाप्रधान वर्णन. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या भावनाप्रधान कथांमध्ये एखादा विनोदाचा शिडकावा असतांना सुद्धा आपल्याला कथेतील पात्राचं दुःख किंवा सल जाणवत राहणं ही त्यांच्या कथाकथनाची खासियत. अर्थातच जीवनातील विविध नाती, विविध भावना, विविध प्रसंग आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवून टाकण्याची ताकद त्यांच्या लिखाणात आणि भाषाशैलीत होती. व पु कदाचित पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अथवा लीडरशिप गुरू म्हणून ओळखले गेले नसतीलही. परंतु त्यांच्या कथाकथनाच्या कॅसेट सीडी ऐकल्यावर नक्कीच Emotional bank balance, Empathy, Emotional quotient यांसारखे हाय फंडा वर्ड्स सोपे होऊन कळायला लागतात.

स्त्रीप्रधान कथा हा तर वपुं चा हातखंडा. स्वतः पुरुष असूनही, स्त्रीमन एवढ्या जवळून, आतून आणि बाहेरून समजणारा आणि उलगडून दाखवणारा अजून पर्यंत कोणी लेखक मला तरी सापडला नाही. ते सुद्धा उगाच सामाजिक आशयाच्या समाजवादी कथा न लिहिता. दुसरी खासियत म्हणजे प्रेम आणि मैत्री. मैत्री ह्याया शब्दाची व्याख्या किंवा भावना त्यांनी पार्टनर या एका कादंबरीतून बदलूनच टाकली.
तर प्रेम हया भावनेला फुंकर कधी घालावी आणि फुंकणी कधी फुंकावी हे फक्त वपु च जाणे.  प्रेमाचे पदर हे तसे नाजूक आणि तलम. प्रत्येक पदर हळुवारपणे उलगडत, एका पदराचा दुसऱ्याला स्पर्श होऊ न देता सावरत आपल्यापुढे मांडताना वपुंनी कधीही त्या भावनेची मर्यादा ओलांडली नाही. त्याची निर्मळता, निर्गुणता कायम जपली.  त्यामुळे नेहमी वाटतं प्रेम मांडव तर वपुंनीच.
 बघा ना त्यांचंच एक वाक्य सादर करतो "प्रेम म्हणजे काय? याची व्याख्या काय...एकमेकांना जखडून ठेवणारं Pleasing Pain किंवा मग Painful Pleasure"..दोन वाक्यात सगळं काही सामावलं बघा.

बाकी मग त्यांच्या विविध कथांमधील अगदी टॅक्सीवाला पासून ते आप्पासाहेब देशमुखां सारखा उद्योजक पण जीवनाचं सार सांगून जातो.  चाळीत राहणाऱ्या पात्राला "त्याची वहिदा" भेटते किंवा पार्टनर सारखा सोबती आयुष्यभर कृष्णासारखा सखा बनून साथ देतो.

 वपुं चे वैयक्तिक वाचनाचं वेड तर विचारूच नका आणि त्या वाचनातून वाचकाला सकस साहित्य देण्याची कला ही कालातीतच आहे. ज्ञानेश्वरी किंवा गीतेतील अध्याय पासून ते पार अगदी रजनीश ओशो पर्यंत बहुआयामी विषयांवर त्यांनी लिहिलंय आणि त्यांचा प्रत्येक लेख प्रसिद्ध झालाय. वाचकांनी भरभरून वाचला आहे परत परत पुन्हा पुन्हा.

असे हे व. पु. काळे...
नावाप्रमाणे सदैव वाचकांच्या मनात आणि जीवनात "वसंत" फुलवणारा हा "पुरुषोत्तम" ..कधीही "का(ळे)ळाच्या" पडद्याआड जाणार नाही. कारण त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे आषाढात धो धो बरसणार्‍या पावसाच्या थेंबा प्रमाणे आहे, जमिनीवर पडल्यावर समुद्राला जरी मिळत असला तरी बाष्पीभवन होऊन परत परत बरसतच राहील.

मनापासून धन्यवाद व.पु.
तुम्ही हया शतकात जन्माला आलात. कदाचित आमची पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून आमच्या जीवनात तुम्ही पुस्तक रूपात येऊन आम्हाला "प्रकाशित" केलंत.

Love you sooo much..😊😊

© मिलिंद सहस्रबुद्धे
२७/०६/२०२०

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...