Skip to main content

बालक पालक........"काय गं वैदही, आई काय करतीय?"मी बहीणीच्या घरात पाऊल ठेवताच विचारले. "ती काय आत प्रोजेक्ट

"काय गं वैदही, आई काय करतीय?"मी बहीणीच्या घरात पाऊल ठेवताच विचारले. "ती काय आत प्रोजेक्ट करतीय" वैदूने मोबाईल वर तो टॉकिंग टॉमचा गेम खेळताना मान वर न करताच उत्तर दिले. आतल्या खोलीत जाऊन बघतो तर काय, सायलीताई हे सगळा पसारा मांडून बसलेली फेविकॉल , कलर पेपर, चित्र, कार्डबोर्ड वगैरे वगैरे. म्हणलं काय गं बाई हे? " काही विचारु नकोस अजय, अरे वैदू मैडमची उद्या प्रोजेक्ट सबमिशनची लास्ट डेट आहे शाळेत"
प्रोजेक्ट, आजकाल केजी ते पीजी पर्यंतच्या मुलांचा पर्वणीचा शब्द. आमच्या वेळेस हा शब्द इंजिनिअरींग कॉलेजला गेल्यावर ऐकला. मराठी शाळांत पण "प्रोजेक्ट" हाच शब्द वापरतात. "प्रकल्प" असं म्हंटलं तर उगाच भाक्रानांगल, कोयना पासून ते पार एन्रॉन, नाणार अशी नावं डोळ्यासमोर येतात, म्हणून प्रोजेक्टच.
मुलं निवांत आणि पालकांनाच टेन्शन. पाल्यांच्या आयांमध्ये तर कॉंपिटिशनच असते ह्या प्रोजेक्टवरुन. "मागच्या वेळी फळभाजी प्रोजेक्ट त्या आर्यन चे सिलेक्ट झालं ना, ती त्याची आई सांगत होती बढाया मारत. तीला काय होतय घरीच असते ती, आमच्या सारखं नाही ऑफिस करून सगळं संभाळायचं." हया वेळी आमच्या सईचं नाही ना सिलेक्ट झालं तर बघ, असला भारी करते ना मी अंडरवॉटर सी वर्ल्ड. तिकडं सई निवांतपणे आर्यनला कॉंग्रँट्स करते आणि दोघं पोकेमैन कार्डचा खेळ खेळतात.
हे म्हणजे "चाय से जादा किटली च गरम है ना भाऊ"
"बाबा, डोकं दुखतंय हो खुप"... "अरे काही होत नाही थोडा बाम चोळ बरं वाटेल. तुझा होमवर्क राहीलाय अजुन." "बाबा, प्लीज आपण माझा संध्याकाळ चा एखादा क्लास बंद करायचा का?"
"नाही हं सुमेध, असलं काही चालणार नाही. अरे सध्या शाळेच्या अभ्यासाबरोबर एक्स्ट्रा करीक्युलर एक्टिवीटी पाहिजेच. म्हणजे कुठं पुढे दहावीला दहा मार्क वाढवून मिळतील"
"बाबा, प्लीज ना!"....." बरं ते जाऊ दे, तु छानपैकी होमवर्क कर, झोपायच्या आधी. आपण ह्या संडे ला एवेंजर मुव्ही पाहू आणि मग सगळे मैकडोनाल्ड ला जाऊ. खुश!"
सध्याचे पालक (अर्थात मी पण त्यातला एक आहे) एक्स्ट्रा करीक्युलर च्या नादात एक स्पोर्ट्स क्लास, एखादा कलाछंद वर्ग, एक टैलेंट स्कॉलरशिप क्लास, अबैकस आणि बरेच क्लास वगैरे लावतात. ह्या ही वर मेन अभ्यासक्रमासाठी ट्युशन पण. असं काही त्या पाल्याला पैक केलेलं असतं, जणु मोबाईल कंपनीच्या सिमकार्ड ऑफरच. १००रुपायात डाटा, फ्रि कॉल्स, एसमेस, रोमिंग, फ्रीबीज..फुल पैकेजच.
खरंच कुठं घेऊन जाणार आहोत आपण ह्या पिढीला. आमची पिढी पन्नाशीला च रिटायर्ड व्हायचे म्हणतीय, मग हि नवी पिढी तर पस्तीशीलाच होईल बहुतेक बिचारी.
पालक, पाल्य आणि दोघांचं बाल्य.
सकाळी संध्याकाळी क्लासेस, ट्युशन, दिवसभर सात तास शाळा, व्हेन असेल तर दहा तास. काही मुलं तर आख्खं पुणं रोज फिरतात म्हणे. शाळेत जाता येता दफ्तर ओझं किमान दहा किलो. घरी आल्यावर किमान चार विषयांचा होमवर्क, वर्कबुक, आणि एक्स्ट्रा अभ्यास वगैरे.
अहो आमच्या वेळी असं नव्हतं, आम्ही साधी दफ्तर घेऊन शाळेत चालत जायचो. घरी आल्यावर आई हाक मारेस्तोवर खेळायचो मग थोडाफार अभ्यास. कधी शाळा केली पास झालो कळालेच नाही... वगैरे वगैरे अश्या गप्पा जोरात मारणारे आम्ही. परंतु स्वतः चं मुल फुल पैक. पैकेज डील जणू.
"मला खुप तबल्याची आवड होती, मला लॉंग टेनिस आवडायचं, पण परीस्थिती मुळे जमलं नाही" म्हणून पाल्याला तबला टेनिस ला घालायचं. आणि त्याला जमत नाही आवड नाही म्हणून त्याला "तुम्हाला सगळं मिळतयं ना लेको, म्हणून किंमत नाही" असं ऐकवायचं. अहो तुमची राहून गेलेली इच्छा त्याची आवड कशी असेल.
प्रधानमंत्री म्हणतात "बच्चोंको खुब खेलना चाहिए, बहुत पसीना आना चाहिए.." पण साहेब खेळून शारीरिक घाम यायच्या आधी, मुलांना हे शैक्षणिक दैनंदिन रूटीन करतांनाच दमछाक होतीय इतकी की त्यांना बौद्धिक घामच जास्त येतोय. शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदलाची क्रांती ची गरज आहे जशी हरीत क्रांती, गुजरातची दुग्ध क्रांती. पण इथं कोणाचंच लक्ष नाही. सर्वत्र नवीन आयआयटी नवीन आयआयम उघडून काय होणारे. तिथे पोहचे पर्यंतच बौद्धिक दमवणूक झालेली असेल. मग काय पुढे घडणार.
आपण पाश्चात्य देशातील प्रैक्टिकल ओरींएटेड शिकवण पध्दती अवलंबण्याचा प्रयत्न करतोय. आपली पारंपरिक थेरॉटिकल पद्धती पण सोडत नाही. ह्या धेडगुजरीपणामुळे मुलांचा मात्र डोमकावळा होतोय. रोज सात विषयांची वह्या, पुस्तके, वर्कबुक आणि इतर साहित्य असलेल्या त्या मणभर दफ्तर ओझ्यातून त्यांना बाहेर काढतच नाही. दफ्तराचे ओझं कमी आहे की काय तर पालकांचे करीअर ओरिंएटेड चे ओझे डोक्याला आहेच. स्ट्रेस, प्रेशर असे शब्दोच्चार हल्ली के.जी. पासून ची मुलं च्यायला मायला सारखा वापरतात.
प्रत्येक नवीन शिक्षण मंत्री आल्यावर लाऊडस्पीकर लावून सांगतो की, आम्ही आता मुलांच्या दफ्तराचं "ओझं" कमी करणार. मग काही महीन्यातच त्याच्यावर कोणतं "ओझं" पडतं की पुढे काहीच होत नाही. जैसै थे।
हा विषय राजकारण, समाजकारण अभ्यास पध्दती ह्या च्या थोडा पलीकडे जाऊन पाहिला पाहिजे. आपणच आपला पाल्य त्यांच्या जीवनात ती टिपिकल एखादी सर्व ठिकाणं दोन दिवसात दाखवणारी फुल पैक पैकेज टुर न होता, अवघड पण सुंदर ट्रेक, किंवा नेचर ट्रेल, विलोभनीय सायकल टुर होईल का पहावं....त्याच्या आवडत्या एखाद्या विषयात कसा रममाण होईल, आनंद घेईल हे बघणं महत्त्वाचं.
शेवटी काय हो गद्दे पंचवीशीनंतर गाडा तर ओढायचाच आहे, तो कुणाला कधी चुकलाय का?
आधीचे रंगबिरंगी फुलपाखरू दिवस जगू देत त्यांना..।
--मिलिंद सहस्त्रबुद्धे ©
ता.क. अस्मादिक पण पालकच..

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय मधेच उभे आ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी