Sunday, March 29, 2020

शिर्षक मुद्दामच शेवटी लिहलयं...
वाचतांना तुम्हाला सुचतयं का बघा.. आणि सांगा.


              जाग आली अन् बघते तर काय सहा वाजून गेलेले. पटापट आवराआवरी केली आणि किचनमध्ये आले.  चहा टाकला पटकन. बाहेरचं वातावरण बघून कळतच नव्हतं सकाळ झाली का संध्याकाळ. सध्या रात्र काय दिवस काय आणि पहाट काय आणि संध्याकाळ काय. सगळं सारखंच वाटतंय कारण पक्षी दोन्ही वेळेस ओरडतात आणि कुत्री कायमची भुंकणं बंद झाली आहेत. 
जरा शुद्धीवर आल्यासारखी झाल्यावर कळले की संध्याकाळ झाली आहे. दुपारचे जेवण झाल्यावर ओटा आवरला. नंतर त्या व्हाट्सअप फेसबुक बघण्याच्या नादात कधी डोळा लागला कळलेच नाही. सध्या रोजच रविवार. भरगच्च नाश्ता तोसुद्धा वैविध्यपूर्ण आणि दुपारचं जेवण उशिरा तेसुद्धा चारीठाव.  दुसरा उद्योगच नाही. मग काय "पन्नास रुपये अनलिमिटेड थाळी" च्या पाटी सारखी मेस झालंय आमचं किचन.

ह्यांना चहा दिला. ह्यांना म्हणजे एरवी सुहासला मी अरे-तुरेच करते पण तुमच्या समोर म्हणून ह्ययांना बरं का.  तर सुहासला चहा दिला आणि बेडरूममध्ये अदिती खेळत होती एकटीच. अर्थातच एकटी नव्हती तिचा तो पण होता ना! लाडका जीवश्चकंठश्च प्राणप्रिय असा....मोबाईल

सुहास बाहेर हॉलमध्ये एबीपी माझावर कोरोना पेशंटचा आकडा किती वाढतोय हे बघत होता आणि त्याच्याकडे त्याचे लक्ष होतं. मला मात्र मेलीला चहा पिता पिता त्याच्याकडे बघताना असं वाटलं बसल्याबसल्या पोट किती वाढतयं ते बघ आधी. पण शेवटी मनातल्या मनात असा विचार करतच मी चहा पीत परत किचन मध्ये आले. सहज बघते तर काय भांडी घासून ठेवलेली आणि परत वाळत घातलेली. मी बुचकळ्यात पडले म्हणजे आश्चर्यचकित झाले. काय झालं, मला एक तर ती दुपारची झोपेची तार इतकी भारी झाली होती की खरंच काहीच आठवत नव्हतं. मग वाटलं आपणच आओट आवरतांना  घासून ठेवली असतील भांडी बहुतेक. असा विचार केला आणि मग संध्याकाळचा नाश्ता काय करायचा याचा विचार करू लागले.

सध्या दोन वेळचा नाष्टा, दोन वेळचं जेवण, अधून-मधून मिळून पाच ते सहा वेळा चहा-कॉफी झालं तर फलआहार असा भक्कम भटारखाना सतत चालू असतो.  च्यायला सॉरी हां पण असच बोलावसंवाटतंय म्हणून.  च्यायला साला तीन महिन्याचं अन्नधान्य, गॅस फळभाज्या तीन आठवड्यातच संपतील की काय असं वाटतंय. तीन आठवडे म्हणजे एकवीस दिवस. बहुतेक म्हणूनच सरकारने पण तीन आठवड्यासाठी तीन महिन्याचा शिधा गोरगरिबांना द्यायला सुरुवात केली असेल.
सध्याच्या मिसेस मुख्यमंत्री गायिका नाहीयेत पण तर पत्रकार आहेत अर्थातच संपादक.  त्यांना नक्कीच याची जाणीव असणार म्हणूनच आपल्या सरकारने या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं मातोश्री होऊन हा निर्णय घेतला असावा.

आज मस्त ब्रेड पॅटीस करूया असं म्हणत मी बाहेर आले तर सुहास खूष झाला. म्हणाला "त्यावर मस्त शेव , कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा टाक, त्या आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये टाकतात ना अगदी तसाच." मी जरा सुहासकडे चिडून बघत म्हणलं "हो टाकते ना!  ते तर टाकतेच आणि हा लॉकडाउन संपला की तू घरी बस आणि मी एक हॉटेल टाकते" मी जरा चिडलेच होते. तेवढ्यात अदिती बाहेर आली, "आई भुक.. आज काय आहे मम्मा evening ला, प्लीज मला पास्ता कर ना! परवा सारखा"
झालं मी म्हणाले ना खरंच होटेलच टाकते बघाच आता सगळ्यांनी.  "आदिती, ती भांडी घेऊ नकोस की मी दुपारीच वाळत टाकली आहेत. दुसरी घे  कोणतीतरी ट्रॉलीतून." असे म्हणाल्यावर आदिती पटकन म्हणाली "मम्मा तू कुठे धुतललीयेस भांडी आज?"  मी जरा तिच्याकडे आश्चर्यचकित ह़ोऊन म्हणाले "म्हणजे? मग मीच तर दुपारी ओटा आवरला तेव्हा धुतली ना!" अदितीच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ती म्हणाली " छे..आज बाबा ने धुतली सगळी भांडी आणि मग ओटा, गॅस पण पुसून घेतला त्यानी. मी त्याला पाणी टाकायला मदत केली.."
"अय्या!  हो का ! अगोबाई, तरीच म्हणलं की सगळी भांडी एकावर एक, ताटं आडवी आणि त्यावर पातेली . अशी वेडीवाकडी भांडी मी कशी वाळत घालेन?" पण खरंच सुहासनी धुतली आज भांडी. अरे वा किती छान. मला मनात जो काही आनंद झाला ना आदिती जवळ होती म्हणून नाही तर मी त्याला मिठीच मारली असती.  तेवढ्यात सुहास सॉरी हां 'आमचे अहो'  आत आले. आता 'अहो' अगदी मनापासून म्हणते बरं का!

मी सुहासला म्हणलं "सुहास आज सगळी भांडी तु घासलीस,  किती छान खूप खूप थँक्यू तुला". त्यावर सुहास जरा कॉलर ताठ करूनच म्हणाला "हो, म्हटलं, तू एवढं सगळं करतेस. दिवसभर आमचं खाणं-पिणं, कपडे धुणं, भांडी केरवारे. सध्या कुठल्याच मावश्या पण येत नाहीत आपल्याकडे. म्हणलं आपण पण थोडीशी मदत करावी तुला. ते व्हाट्सअप वर आलाच आहे ना सध्या आपण सगळे ' Maid for Each Other' म्हणलं तसंच जरा"

हे सगळं ऐकल्यावर मला जो काही हुरूप आला आहे. काय काय वाटलं म्हणून सांगू आणि सुहास साठी काय करू न काय नको असं झालं. असा नवरा सगळ्यांना मिळो गं आंबाबाई असा शंभर वेळा मनात विचार आला.  खरंच गो कोरोना गो.
मग मी ब्रेड पॅटीस छान बटर लावून तळले. सुहासला आवडते तशी पुदिना आणि चिंचेची चटणी केली. ते ब्रेड पॅटीस मधोमध कापून त्यावर शेव, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा, हिरवी ब्राऊन चटणी सजवून दिलं. खुश झाला सुहास.  आदितीला पण पटकन छान पास्ता बनवून दिला. माझं काय नेहमीप्रमाणे दोन्ही खाल्लं थोडं थोडं.

थोड्यावेळाने मग मस्त चहा केला. सुहासला बाहेर नेऊन दिला आणि मग मी डायनिंग टेबलवर बसले तेच नेहमीचं व्हाट्सअप फेसबुक काहीतरी वाचत.
सुहास बाहेर हॉलमध्ये बसला होता तेवढ्यात त्याला योगेश चा म्हणजे त्याच्या मित्राचा फोन आला आणि मग त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला कोरोनाचे पेशंटचा आकडा कसा वाढतोय, मग सध्या पंतप्रधान काय म्हणतायेत मुख्यमंत्री काय उपाय करतायत. ट्रंप  कसं इकॉनोमी बद्दलच बोलतोय. असे सगळे विषय करत करत त्यांच्या गप्पांची गाडी बॉलीवूडवर आली. बॉलीवूड च्या गप्पा चालू असतानाच सुहास एकदम जोरात म्हणाला "अरे योग्या, तो 'कतरिनाचा'  चा व्हिडिओ पाहिलास ना. अरे काय साला काटा दिसते रे भांडी घासतांना पण.  एवढी कंडा दिसते ना काय सांगू. मी तो व्हिडीओ परत परत पाहिला आणि मग काय म्हणलं 'कतरिना' जर घरी भांडे असू शकते तर आपण का नाही घासू शकत. तिचा तो व्हिडिओ बघत बघत दुपारी घरची सगळी भांडी घासून टाकली. साला व्हिडिओ बघताबघता भांडी कधी घासून झाली कळलंच नाही." "आणि हो परत आमच्या मॅडम पण भांडी घासली म्हणून खूष झाल्या"  अशा त्यांच्या गप्पा रंगल्या आणि मग स्टॉक एक्सचेंज आणि स्टॉक मार्केट कडे वळल्या

मला मात्र एवढं ऐकल्यावर जाम संताप आला. मी जाम तडकलेच. म्हटलं अच्छा म्हणजे हे 'गो कोरोना गो नाहीतर ओ कतरिना ओहो असं प्रकरण आहे तर.  बाहेर जाऊन सुहासचा चांगला समाचार घ्यावासा वाटला पण म्हटलं जाऊ दे 'त्यानिमित्ताने तरी त्यांनी घर काम केलं ना, थोडा तरी चार प्रेमाचे शब्द बोलला ना, थोडं तरी कळालं त्याला की दिवसभर काय काय काम असतं ते.  उलट त्यानंतर मनात कतरिनाला दुवा देत मी म्हटलं अगोबाई असं तु 'करीना' आणि 'रवीना' ला पण सांग गं बाई भांडी घासायला, कपडे धुवायला आणि आठवणीने त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करायला. म्हणजे मग त्यांचे पण जे विविध सुहास असतील ते घरात मदतीचा हात पुढे करतील. हो की नाही.....

शेवटी गो कोरोना गो नाही तर आता थँक्यू कतरीना थँक्यू...


शिर्षक....."मी, कतरिना आणि लॉकडाउन"

© मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ, पुणे ३०
खिचडी..

नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो कुलूप उघडले. सैक टाकली आणि टीव्ही लावला, ऑस्ट्रेलिया- इंग्लंड क्रिकेट मैच चालू होती. पाटीवरचा निरोप वाचला "खिचडी केली आहे, गरम करून घ्या छान". संध्याकाळचे साधारण सात साडेसात वाजलेले, मनात म्हटलं छान आटपू आणि गरमागरम डाळ तांदूळ खिचडी दूध-तूप घालून, बाजूला लिंबाचं लोणचं टॉक्, जमलं तर एखादा पापड भाजू गैसवर...
मस्त फ्रेश झालो आणि ओट्यापाशी आलो. पातेल्याचे झाकण उघडलं आणि बघतो तर काय? च्यायला.. दूध खिचडीला विरजण लागलं ना.
खिचडी म्हणजे साबूदाण्याची खिचडी केली होती. फुल पोपट झाला. मग लक्षात आलं अरे हा! आज संकष्टी चतुर्थी होती ना... म्हणून सकाळचा उरलेल्या साबुदाणा बाईसाहेबांनी "तुम्हाला आवडते ना" या नावाखाली (सरकवलेला) शिजवलेला दिसतोय.

'छान' 'सुंदर' 'अय्या किती गोड' असे शब्द हिने वापरले ना! की का कुणास ठाऊक उगाच मनात शंका चुकचुकतेच. आत्ता ही तसचं झालं "गरम करून घ्या छान"

कसं आहे बघा, काही पदार्थ हे ज्या त्या वेळीच खाण्यात जी मजा आणि रंगत येते ना, ती इतर वेळी नाही. साबुदाणा खिचडी म्हणजे शनिवार, गुरुवार किंवा रविवार सकाळच. रविवारी बिन उपवास वाले स्पेशल. साधारण साडे आठ नऊची वेळ, तूप जिरे फोडणीचा खमंग वास, मिरची चा ठसका, परतलेल्या दाण्याचं कूट घालून मऊ लुसलुशीत शिजवलेला तो टपोरा पांढरा साबुदाणा. त्याला जो काही वास येतो ना त्या वासानेच जिभेची वासना निर्माण व्हायला लागते. जणू ती त्या खिचडीची वाटच बघू लागते

मस्त वाफावळलेली, माझ्या आईच्या भाषेत पहिल्या वाफेची.  ती लोभस थोडी ब्राऊन थोडीशी पांढरी खिचडी प्लेटमध्ये वाढली जाते. ती प्लेट सुद्धा टिपिकल साधारण हातात मावेल आणि तळहातापेक्षा थोडीशी मोठी. स्टीलची बरं का! उगाच microwave safe वाली नाही. त्यावर मग ताज खोवलेलं पांढरेशुभ्र नारळाचे खोबरे. ते कधी कधी मला शिसपेन्सिलीला टोक केल्यावर जे टोक यंत्रातून कातरकाम बाहेर येतं तसं दिसतं. म्हणजे दिसताना जरी पांढरेशुभ्र असलं तरी कुठे कुठे खोबऱ्याच्या पाठीच्या काळ्या विटकरी कडा दिसत असतात.
त्यावर जणू छम छम आवाजच करत येते अशी हिरवीगार कोथिंबीर. बारीक चिरलेली कोथिंबीर जेव्हा भुरभुरलेली असते, तेव्हा उगाच बालकवींची हिरवे हिरवे गार गालीचे कवितेची आठवण होते.  मिरची चे एखाद दोन कापलेले तुकडे खरंतर काढून टाकण्यासाठी च असतात पण ते पाहिजेतच कारण दिसले नाहीत तर गोडीळ तर नाही ना अशी शंका नको. साईडला अगदी बरोबर चतकोर काटेकोर कापलेली लिंबाची रसरशीत पिवळी धमक फोड. त्या फोडीत एक अर्धवट बी असलीच पाहिजे नाहीतर मग लिंबू पिळायच्या आधी झटकायची मजा कशी येणार. साईडला  छोटा चमचा स्टीलचाच.

अशी ही "खिचडी" नावाची अप्सरा सर्व बाजूंनी नटली की मग तो वाफा येणारा, जिभेला थोडा चटका बसणारा, किंचीत आंबट झालेला आणि अविस्मरणीय चवीचा पहिला घास तोंडात गेल्यावर जे काही स्वर्गसुख किंवा बहुतेक त्याहीपेक्षा वरचा आनंद मिळतो तो ज्याचा त्यालाच कळतो.

अगदी पहिल्या घासापासून ते शेवटच्या घासापर्यंत मउ लुसलुशीत साबुदाणा चावतांना,  अर्थातच तो कितपत पूर्ण चावला जातो माहित नाही पण जे काही चर्वण होते त्यातून पोटाचा अग्नी कमी आणि जिव्हेची क्षुधा शांत जास्त होते.

तशी ही खिचडी पित्तकारक असते असे म्हणतात. परंतु जेव्हा ही अप्सरा आपल्यापुढे नटून-थटून प्लेटमध्ये येते आणि मग घरच्या मंडळीं पैकी आजी, मावशी,काकू किंवा आपलीच आई असं कोणी म्हणतं "खा रे ...एका डिशनी काही होत नाही"  तेव्हा मात्र जे पित्त खवळते ते फक्त ती खिचडीच शांत करू शकते.

शेवटी ती "छान" साबुदाणा खिचडी मी मग माइक्रोवेव मधे गरम करून खाल्ली. बाहेर हॉल मधे येऊन क्रिकेट मैच बघत बसलो. अचानक मनात आलं...

क्रिकेटच्या वर्ल्ड कपची फायनल मैच लॉर्डस ग्राउंडवर बघण्यात जी मजा आहे ती कितीही लश ग्रीन केलेलं असलं तरी  कोलकत्याच्या इडन गार्डन वर नाही. तसंच काहीसं, सकाळी साडे आठ नऊ वाजता गरम खिचडी खाण्यात जी मजा आहे ती संध्याकाळी सात आठ वाजता खिचडी गरम करून खाण्यात नाही.

---© मिलिंद सहस्रबुद्धे (एकशुन्यशुन्यशुन्यबुध्दे)

Saturday, March 7, 2020

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?"

इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही.

उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ शहर, स्वच्छ शहर असे फ्लेक्स लावून आपणच आपले शहर विद्रूप करतोय. याकडे मात्र कुणाचं लक्ष नाही. आम्ही स्वच्छ आहोत असं म्हणून होत नाही तर ते असावं आणि दिसावं लागतं. चेहरा कितीही मेकअप करुन सुंदर केला आकर्षक केला तरी जवळ आल्यावर जर कानातलं मळ दिसत असेल तर कळतं की  हे सौंदर्य म्हणजे मुखवटा आहे.

आपल्या देशात शेकडो वर्षापासून खराटा अन् झाडू हातात घेऊन स्वच्छतेचे धडे दिले जातात. अगदी संत महाराज गाडगेबाबां पासून ते सध्याचे उत्साही पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत व्हाया महात्मा गांधी आणि विनोबा भावे. तरीही आमच्यात सुधारणा होत नाही.  रस्त्यावर मनसोक्त गलिच्छपणे थुंकणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी करणारच असे वावरणारे कित्येक लोकमान्य आपण दररोज बघतोय. बऱ्याच वेळेस राग येतो आणि मग या सगळ्याच गोष्टी अंगवळणी पडतात.. पडल्यात म्हणा ना.

हागणदारी सारखी समस्या देश स्वतंत्र झाल्यापासून 70 वर्षानंतर आत्ता कुठे आपण म्हणू की हद्दपार होतीय.  ती सुद्धा गेल्या दहा-पंधरा वर्षातच खूप फरक पडलाय. शिक्षण आणि त्याबद्दलची जागरूकता आलीय.  सोशल मीडिया आणि हिंदी चित्रपटातून या विषयावर भाष्य केल्यानंतर आपण आत्ता कुठे हळूहळू मुक्त होत आहोत. मी वर म्हटल्याप्रमाणे इंग्रजांचं आपण बरंच काही घेतलं पण परत इंग्रजांचं टॉयलेट आपण काही घेतला नाही.

आम्ही अजुनही रस्त्याच्या कडेला कुठेही उभे राहून शु करण्यात धन्यता मानतो. तो मोठा पराक्रम पुरुषार्थ मानतो. कित्येक जण अमेरिका युरोप सिंगापूर अशा प्रदेश वाऱ्या करतात. परदेशातून भारतात दिल्ली अथवा मुंबईला उतरल्यावर एअरपोर्ट वरून घरी जाताना वाटेत रस्त्यावर थांबून रस्त्याच्याकडेला बिनधास्त लघु शंकेची इच्छा भागवून घेतात. म्हणजे बाहेरच्या देशात गेल्यावर आपण ज्या गोष्टी करायला सर्रास लाजतो किंवा घाबरतो त्या इथं आपण इथं बिंदास करतो आणि त्याची आपल्याला आपल्याच देशात लाज वाटत नाही.

गावाकडचं तर सोडाच पण खरं सांगायचं तर स्वच्छतेचा खरा प्रश्न निमशहरी उपनगर आणि मोठ्या शहरातच आहे. कारण इथला प्रत्येक जण नोकरी-धंदा करीता इथे आलेला. त्यामुळे "मी टॅक्स भरतो" हया टॅगलाईन खाली स्वैर वावरत असतो आणि त्या ठिकाणच्या प्रशासनाला, व्यवस्थापनाला शिव्या देत असतो. कारण शिव्या दिल्या की आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त झालो.  स्वतःच्या घरात जी स्वच्छता आपण ठेवतो त्यातली किमान 50% स्वच्छता जरी प्रत्येकाने रस्त्यावर सार्वजनिक जीवनात ठेवायचा प्रयत्न केला तरी भारत हा अस्वच्छता मुक्त देश , स्वच्छता कडे जाणारा देश म्हणून प्रस्थापित होईल.

भारतात पुढील काही वर्षात पाणी, वीज, रस्ते या वर्षानुवर्ष असलेल्या समस्यांवर निवडणुका लढणं बंद होऊन फक्त कचरा स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन स्वच्छ शहर स्वच्छ विभाग याच्यावर निवडणुका लढल्या जातील. इतकी ही समस्या भीषण होत चालली आहे. काही वर्षांनी पाणी आणि वीज टंचाई ऐवजी स्वच्छता टंचाईमुळे लोक शहर सोडतील अशी परिस्थिती आली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

आम्हाला स्वतःला बदलायचे नाहीये स्वतःला वेगळे सोपे असलेले कष्ट घ्यायचे नाहीयेत स्वतःला प्रार्थमिक आरोग्याची शिस्त लावायची नाहीये जे काय करायचंय ते प्रशासनाने आणि व्यवस्थेने. आम्ही आहोत असेच आहोत असेच राहणार घेऊ वाटले घ्या नाहीतर दुसरे तयारच आहेत मतपेट्यांचं वाडगं घेऊन. हे माहिती असल्यामुळे कदाचित ही दुरावस्था किंवा याविषयीच अनस्था आपल्या समाजात आहे

भारतात हिंदुस्तान लिव्हर आणि आय टी सी सारख्या कंपन्या फक्त अंगाला लावण्याचे विविध साबण आणि हात धुवायचे हँडवॉश यांच्यावर गब्बर झाले आहेत. देशाच्या जाहिरात क्षेत्रातील आर्थिक उलाढालीत साबण या उत्पादनाचं अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झालेलं आहे.एवढ्या साबणाच्या जाहिराती जगात कुठल्याही देशात नसतील एवढ्या भारतात किंवा भारताच्या जाहिरात क्षेत्रात आहेत. आणि हो आमच्या चित्रपटातील आदर्श अभिनेत्री सौंदर्यवती आणि अभिनेते त्यावर आपले करिअर घडवत आहेत ही बाब आनंदाची का दुःखाची हे आपणच ठरवलं पाहिजे. गम्मत बघा एक छोटं उदाहरण, संतूर साबणाचा २०१९ चा सहामही खप २००० करोड होता, ज्याचा बाजारात हिस्सा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मुळात आमच्या मनातल्या स्वच्छतेचा, शिस्तीच्या साबणाचा अभाव असल्याने हया अशा बाह्य साधनांचा भडीमारा हा आमच्यावर होत असतो.

भारतात तुम्ही कुठल्याही भागात जा प्रत्येक कोपरा प्रत्येक फुटपाथ मागच्या बाजूला या छोट्या-छोट्या कचराकुंड्या बनलेल्या असतात प्रशासकीय कर्मचारी दिवसातून दोन वेळा तीन वेळा झाडतात तरी त्या तेवढ्याच जोमाने आणि वेगाने भरतात जणू स्पर्धाच आहे की काय. तुम्ही किती स्वच्छ करता बघू आणि आम्ही किती त्याची विल्हेवाट लावतो अशी.
गेल्या काही वर्षात नवीन पिढीतील जागरूकता वाढते आहे पण तेसुद्धा अगदी शुल्लक प्रमाणात. नुसतं सर्व शिक्षण अभियान राबवून उपयोग नाही तर त्या शिक्षणातून शिस्त आणि स्वच्छतेचे धडे गिरवलेली नवीन पिढी निर्माण होणे गरजेचे आहे.

प्लास्टिक निर्मूलन आणि उच्चाटन करण्याच्या बाबतीत मात्र खरोखरच आपण गेल्या काही वर्षात भरीव कामगिरी केली आहे. त्याचं कौतुक करावंच लागेल. तरीही मी म्हणेन की या विषयात जास्त कौतुक सरकारी यंत्रणेचं आणि नाममात्र कौतुक नागरिकांचं. कारण आपल्याकडे नियम कडक केले आणि अंमलात आणले तरच सुधारणा होते हे हया निर्मूलनाने सिद्ध केलं आहे.

स्वच्छता एक धर्म तर स्वच्छता म्हणजे देवभक्ती, देशभक्ती असं आपल्या देशात सर्वसामान्यपणे मानतात.  केरसुणी किंवा झाडूला आपण लक्ष्मीचं रूप देतो त्याचे पूजन करतो. इथं दैनिक लोकसत्ता मध्ये वाचलेलं एक वाक्य तंतोतंत लागू होतं ते असं 'आपल्याकडे एखाद्या गोष्टीला देवत्व प्राप्त झालं की आपण त्याची हिरीरीने वाट कशी लावता येईल ते बघत असतो'. जेव्हापासून स्वच्छता अभियान आले तेव्हापासून किमान पुणे शहरातलले सर्वच कचरा कंटेनर काढून घेण्यात आले. मग काय पर्वणीच, लोक कुठेही कचरा टाकायला लागले.  कारण कचरा टाकण्याची ठराविक जागा आणि त्याचं व्यवस्थापनच नाही त्यामुळे प्रत्येकजण लोकमान्य. मिळेल तो कोपरा कचरापेटी बनली आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या सर्वेक्षण क्रमवारीत, जगातील 180 देशात शेवटच्या पाच नंबर मध्ये भारत "विजेता" ठरला आहे. हे एवढं माहिती झालं तरी तुम्हाला अंदाज येईल की आपल्या ह्या क्षेत्रात अलिबागच्या समुद्र सपाटीपासून एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंत जायचे आहे.

 नुसतेच टॉयलेट बांधले म्हणजे काही होत नाही. कागदावर 'शेर आया शेर' पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र ढेर अशी आपली अवस्था आहे. टॉयलेट बांधले पण त्याला लागणारी पाणी आणि मलनिस्सारण व्यवस्था त्याचं काय. असे बरेच प्रश्न अनुत्तरित आणि सामान्यांना न कळणाऱे आहेत. सामान्यांना फक्त एवढेच दिसतं की मागच्या दोन चार वर्षात एवढांले टॉयलेटस बांधले. पण टॉयलेट बांधले म्हणजे स्वच्छता आली असा अर्थ होत नाही. कारण आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार असं आहे आपल्या देशात. सार्वजनिक स्वच्छता आणि शिस्त आमच्या रक्तातच नाही. तर मग कितीही बाह्य नियोजन, शिक्षण आणि योजना आणल्या तरी ते आचरणात कसे येणार त्याचा तर मुळात अभाव आहे.

फक्त टॉयलेट हीच सार्वजनिक अस्वच्छतेचे समस्या नाही तर ओला सुका कचरा, कचरा वर्गीकरण, कचरा टाकण्याची व्यवस्था, विल्हेवाटीची व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विषयातली नागरिकांची जागरूकता अशा बऱ्याच इतर समस्या आहेत की ज्यांनी आमचं सार्वजनिक आरोग्य धोक्यात आहे. तुम्ही पहा शहरातील प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक रस्त्यावरील शहरात कडेला तुम्हाला मिनी कचराकुंड्या झालेल्या दिसतील. मोबाईल प्रीपेड कार्डची जाहिरात असते ना छोटा पॅक बडा रिचार्ज तसं छोटी कचराकुंडी मोठी आरोग्य समस्या. थेंबे थेंबे तळे साचे.. त्यामुळे या छोट्या-छोट्या कचरा कुंडातून अस्वच्छतेचं भलमोठं तळंच नाही तर समुद्र निर्माण होतोय.

 काही वर्षांपूर्वी कोणत्यातरी साबणाची जाहिरात खूप प्रसिद्ध झाली होती. ती मुलगी हात धुवत असलेल्या त्या छोट्या मुलाला म्हणते "बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" स्वच्छतेचे
ची जागरूकता आणि आपल्या प्रॉडक्टचे इफेक्टिव्ह मार्केटिंग कंपनीने उत्कृष्टरित्या साधले होते. आपल्याकडे तशी एक गावरान म्हण आहे ना की "नाही निर्मळ मन, तर काय करेल साबण".  खरोखर तसंच आहे साबणाची आवश्यकताच भासू नये असे आपले प्रयत्न असायला हवेत.

 मग परत परत ती जाहिरात आठवते आणि त्या बंटीच्या रूपात भारत देश दिसतो. "बंटी तुम्हारा साबुन स्लो है क्या?" हो खरंच भारताचा जागतिक स्तरावर स्वच्छतेच्या बाबतीतला साबुन स्लोच आहे. 70 वर्षांपासून स्वतंत्र होऊन सुद्धा आम्ही अजूनही स्वच्छतेच्या परीसाला स्पर्श करुन आमच्या वेगवान प्रगती करणार्या खणखणीत नाण्याचं सोनं करू शकलेलो नाही.

© मिलिंद सहस्रबुद्धे
०५/०३/२०२०

तळटीप:-
हा विषय आणि या विषयावर लिहिण्यासारखे खूप आहे. एवढं लिहून किंवा अजुन लिहून काय साध्य होणार हे तुम्हाला आणि मला दोघांनाही माहिती आहे.  पण बरेच दिवस मनात अस्वच्छते बद्दलची तळमळ, तिडीक होती ती कागदावर उतरवून माझं मन स्वच्छ करण्याचा प्रयत्न. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याविषयी खूप काही वाटत असेल, हे वाचल्यावर तेवढे थोडं बरं ही वाटेल. तुम्हाला पण या विषयावर लिहावसं वाटेल इतरांना काही सांगावेसे वाटेल. म्हणून ही सुरुवात...like #hashtag challenge

महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने वरील लेख आणि आपले विचार, संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवुया आणि जनमानसात स्वच्छता आणि शिस्तीची जागरुकता आणूया...

© मिलिंद सहस्रबुद्धे
फोटो सौजन्य.. महाराष्ट्र टाईम्स पुणे

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...