Wednesday, February 13, 2019

ग्राउंड झीरो........मागच्या वर्षी अमेरिकेत होतो, तेव्हा न्युयार्क शहरातील "ग्राउंड झीरो" ला भेट दिली. एखादी


मागच्या वर्षी अमेरिकेत होतो, तेव्हा न्युयार्क शहरातील "ग्राउंड झीरो" ला भेट दिली. एखादी वास्तु दुर्घटनेत जमीनदोस्त झाल्यावर त्याच वास्तुचं तेवढच अथवा त्याहीपेक्षा भव्यदिव्य स्मारक उभं केलयं. तेही जमीनीवर जमीनीला समांतर. म्हणजे ते ट्वीन टॉवर्स जेवढे उंच असतील तेवढंच आडवं हे स्मारक आहे जणू. ते पाहून वाटतं ह्या विचारांचा पल्ला गाठणं आपल्या देशाला कधी जमणारच नाही बहुतेक. ते एखादी उत्तुंग कमर्शियल इमारत बांधू शकले असते परंतु त्यांनी त्यांची उत्तुंगता , विशालता विचारात दाखवून दिली.
काल बर्याच दिवसांनी मुलाला घेउन आमच्या कॉलेजच्या ग्राउंडवर बैट बॉल खेळायला गेलो होतो.
आत जिमखान्या पर्यंत गेलो आणि ते द्रुश्य पाहून डोळ्यात पाणीच आले. आमच्या त्या खो खो चे ग्राउंड खणलेले आणि आजुबाजुने ते टिपिकल निळे पत्रे ठोकलेले. त्या सगळ्या जागेवर कसलंतरी नवीन बांधकाम सुरु झालयं असं कळाले. मुलाला समोरच्या बाजुला खेळायला सोडलं आणि मी त्या पत्र्यांच्या समोरच्या कठड्यावर बसलो. झरकन वीस पंचवीस वर्षे फ्लॅशबैक मध्येच गेलो.
ते दोन पांढरे खांब, झारीने किंवा बादलीने संपुर्ण ग्राउंडवर मारलेलं पाणी. इतकं मापात की माती ओलीतर झाली पाहिजे पण चिखल नाही. ती मस्त वास येणारी लाल काळी माती. साला काय भारी वाटायचं. स्वतः च्या हाताने पांढऱ्या फक्किनं मारलेली बॉंड्री. मग खाकी किंवा काळी हाफ चड्डी आणि बनियनवर दोन तीन तास अगदी अंधार पडे पर्यंत खेळायचो. शाळेत असताना आणि पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर पण रोज संध्याकाळी ग्राउंडवर हजेरी. घामाने चिंब ओला आणि खो खो म्हणत मारलेल्या डाईवज मुळे मातीने भरलेला तो बनियन. तोच भिजलेला बनियन पिळून पुन्हा घालायचा आणि खेळायचं. खेळून झाल्यावर बर्याचवेळ तिथेच पडीक, मारलेल्या गप्पा, टिंगलटवाळी, कॉंट्री काढून खाल्लेला वडापाव. काय काय नाही केलं इथं, काय विचारु नका.
बाजुलाच कबड्डी चालायची, आणि हो शेजारचे बास्केटबॉल चे ते दोन उंच पोल.
संध्याकाळी ही जागा मुलामुलींनी भरून जायची. त्यावेळी मोबाईल वेडी मुलं नव्हती, पण आमच्यातले काही बाईल (मुली) वेडे होते हे मात्र नक्की. बास्केटबॉल च्या ग्राउंडवर हाफ चड्डीत खेळणार्या मुली पाहून, आमचे काही खो खो पटू खो दिला की सरळ रेषेतच पळत डाएरेक्ट त्या बास्केटबॉल च्या पोल पाशीच पळायचे. मग जोशी सर असं काही ओरडायचे, फटके द्याचे. च्यायला काय मजा होती ती.
कित्येक राज्य स्तरीय ते आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू ह्याच ग्राउंडने घडविले. जे काही घडलो थोडंफार आटोक्यात बिघडलो ते ह्याच ग्राउंडमुळे.
त्यावेळी दणकून खेळल्यामुळे आज चाळीशी नंतरही पोट सुटलेलं नाही ना तब्येतीची तक्रार नाही. हे केवढं मोठं वरदान ह्या ग्राउंड नी दिलयं.
एकाच वेळेस शेकड्यांनी मुलं समोरच्या मोठ्या जागेवर क्रिकेट खेळत असायची. पण कधी चुकनही दुसऱ्या मैचचा बॉल तिसर्या नेच आडवलाय असं ऐकिवात नाही. अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळाच दिसायचा तशी एवढ्या सगळ्या आजुबाजुच्या मैचेस मधून आपल्याच मैचमधला कैच अचूक पकडायची कला असलेले "आम्ही सारे अर्जुनच".
"ए अमित, अहो काकू आम्या आहे का?" "अरे तो ग्राउंड वर गेलाय" हे संवाद तेव्हा घरोघरी ठरेलेले. शाळेच्या आधी आणि नंतर आम्ही सगळे ग्राउंड वरच पडीक. अगदी गोट्या, आट्यपाट्या, रुमालपाणी पासून ते खो खो, कबड्डी, फुटबॉल आणि "द क्रिकेट" पर्यंत सगळं इथंच शिकलो. इथं कधीच एकटं वाटायचं नाही. एकटं जरी अचानक आलो तरी कोणीतरी भेटायचंच.
त्या "रंग दे बसंती" मधील डिज्जे आमिर खान म्हणतो तसं " काके, मुझे ना..यही रहना है युनिव्हर्सिटी मै। क्यु की बाहर की दुनिया मै ये डिज्जे कहा खो जाएगा मालुम नहीं। और उसकी उधर कुछ व्हैलू नहीं।" अगदी तसंच त्यावेळी ग्राउंड हेच आमचं विश्व होतं आणि आम्ही तिथले डीज्जे. त्यातून ह्या विश्वात यायला भीती वाटायची.
खेळतांना खरचटलं, लागलं तर ती लाल काळी माती लावायची. अश्या कित्येक जखमा त्या मातीने बरं केल्यात. पण आज झालेली ही जखम कधीच भरून येणार नाही, कारण आता ते ग्राउंड पण नाही आणि ती माती पण.
आता ते ग्राउंडच नसणारे ह्या भावनेने डोळे भरून आले, पाणी थांबतच नव्हते. अशी कित्येक ग्राउंड आपण बांधकाम क्षेत्राला देणग्या म्हणून देत आहोत. आता अशी ही ग्राउंडस् हळूहळू कमीच होत जाणार. आमची मुलं, पुढची पीढी मग मोबाईलवरच खो खो कबड्डी वगैरे खेळणार. बातम्यामधे आपण बघतो, वाचतो की अमक्या तमक्या जागेवरचं पार्क चं, जिमखान्या चं किंवा मैदानाचं आरक्षण उठवलं. तिथं आता कार्यालय, रेसिडेन्शियल कॉंप्लेक्स होणार. आपल्याला पटकन काही वाटत नाही, पण काल मात्र मला बरंच काही वाटून गेलं. खरी जाणीव झाली, की त्या जागेवर खेळणार्या मुलांची काय अवस्था होत असेल. अगदी एकाच हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी ग्राउंड राहीली आहेत आता विविध शहरांमधे. पुढील दशकात ती पण बहुतेक शोधून सापडवावी लागतील. ती Artificial हिरवीगार नायलॉन ची गवतं टाकलेली ग्राउंड तुम्हाला जमीनीशी नातं जोडून देत नाहीत. आपल्या देशात कायमस्वरूपी ह्या विषयातले डेव्हलपमेंट नॉर्मस् फिक्स केले पाहिजेत, तरच मग जी काही उरली आहेत ती तरी संपणार नाहीत.
आपल्या सगळ्यांच असं एक मनात जपलेलं ग्राउंड असतं. कुणाचं शाळेचं, कुणाचं सोसायटीचं, गावाकडचं तर कुणाचं डोंगरावरचं. त्या ग्राउंडवर खेळलेल्या मैचेस जिंकलेल्या आणि हारलेल्यापण, शिकलेली सायकल, केलेल्या मारामाऱ्या आणि असं बरंच काही.
मग मला सतत अमेरिकेतली ती "ग्राउंड झीरो" वास्तु आठवली. तिथं त्यांनी ग्राउंड झीरो नावानी भव्य वास्तु बांधली आहे आणि इथं आपण प्रत्यक्षात शब्दशः "ग्राउंड झीरो" ही मोहीम राबवत आहोत........
© मिलिंद सहस्रबुद्धे

No comments:

Post a Comment

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...