Sunday, March 17, 2019

"आहे मनोहर तरी"






काही बातम्या आज नाहीतर उद्या येणारच हे माहिती असतं. तरी ती बातमी ऐकण्याची मनस्थिती कधीच तयार होत नाही. ती बातमी आल्यावर सुद्धा नाही. अशीच काहीशी ब्रेकिंग न्यूज संध्याकाळी हार्ट ब्रेकिंग करून गेली. परिकर गेले. जाणारच होते, असाध्य रोगाशी झुंज देत होते. त्या रोगाशी झुंज बरेच जण देतात त्यात यशस्वी होतात पुन्हा झुंज देतात पुन्हा यशस्वी होतील याची खात्री मात्र नसते. तसेच काहीसे पर्रीकर यांच्या बाबतीत झालं.
 हा माणूसच वेगळ्या हाडांचा आणि धातूचा बनलेला होता. स्वतः मेटलर्जी मध्ये मास्टर्स असल्यामुळे विविध धातूंप्रमाणे हार्डनेस आणि स्टिफनेस या माणसाच्या रक्तातच होता.  लोखंडाच्या मेल्टिंग पॉइंट प्रमाणे तो त्या पॉइंटला पोहोचेपर्यंत शेवटपर्यंत लढत राहिला. काम करत राहिला, देशसेवा करत राहिला. समाज सुधारक म्हणून नाही तर एक राजकारणी मुख्यमंत्री म्हणून. फार अवघड आणि अजब रसायन होतं हे.

  देशभर लोकं पर्रीकरांना ओळखू लागले ते फक्त संरक्षण मंत्री झाल्यामुळे नाही. तसे बरेच संरक्षण मंत्री झालेत ज्यांना भारतीय जनता "चांगलीच ओळखून" आहे.  तर पर्रीकरांना ओळखू लागले ते एवढ्या उच्च पदावर जाऊनही साधी सोप्पी राहणी असल्यामुळे.  जॉर्ज फर्नांडिस यांच्यानंतर समाजवादी नसूनही एवढी साधी राहणी असणारा हा एकमेव नेता होता.

 त्यांच्याबद्दलच विविध प्रसंग, कथा (ज्या कधीच दंतहीन नव्हत्या आणि पेडही नव्हत्या) सोशल मीडियावर चर्चिल्या जाऊ लागल्या आणि परिकर देशभर पसरले. कधी विमानाच्या रांगेत, कधी विमानात साधे इकॉनोमी सीटवर, कुठे कॅन्टीनच्या रांगेत तर कधी बसने सर्वसामान्यांबरोबर प्रवास करत ते कायम लोकांमध्ये जमीनीवर राहिले. जामीनावर नाही. तरीही कुठेही "आप"ल्या वागणुकीच्या उदो उदो नाही आणि कधी चॅनलवर अथवा मुलाखतींमध्ये त्यावर चर्चा नाही.

 कायम हाफ मॅनिला (शर्ट नाही कारण मॅनिला खोचलेला नसतो) आणि ट्राऊझर. साध्या चपला बहुतेक गोवा कोल्हापूरच्या जवळ असल्यामुळे बहुतेक त्या कोल्हापुरी किंवा कोल्हापूरच्या अभ्यंकरांच्या टिपिकल असाव्यात. मुख्यमंत्री असल्यापासून संरक्षणमंत्री होते तेव्हा आणि परत मुख्यमंत्री झाल्यावर राहणी आणि विचारसरणीत कोणताही बदल झाला नाही. हा तसं स्टाईल म्हणाल तर त्यांचा तो मध्येच ब्रेक होणाऱ्या फ्रेमचा चष्मा तेवढाच काय तो. एवढे एक स्टाईलबाज पणा सोडला तर बाकी काहीच नाही.  कधी कधी वाटतं ही अशी माणसं, कुठल्या मातीतून यांची बीज अंकुर पावतात

 मुख्यमंत्री असताना स्कूटर वर फिरणे लोकांची लोकांसाठी लोकांकडून काम करून घेणे ही खरी लोकशाही त्यांनी गोव्यात रुजवली. सर्वधर्मीय असं हे गोवा राज्य, पण त्यांच्या कारकिर्दीत त्याला कधीही त्याला धार्मिक रंगाची जखम झाली नाही.  आंतरराष्ट्रीय स्तरावर तर भारतापेक्षाही आधी गोवा हे त्याच्या विविध साधक-बाधक आणि मादक विषयांमुळे प्रसिद्ध.  हया मुख्यमंत्र्याने त्याच्या कारकीर्दीत कधीही गोव्याला लक्ष्मणरेषा ओलांडू दिली नाही आणि बदनामीचा रावण गोव्याला कधी शिवलाच नाही. मनोहर हा कायम रामासारखा मध्य उभा होता म्हणूनच असेल कदाचित.

 संरक्षण मंत्री असताना त्यांनी घेतलेले अनेक धडाडीचे निर्णय OROP असेल किंवा बुलेटप्रूफ जॅकेट्स असेल किंवा सर्जिकल स्ट्राइक आज हळूहळू त्यांची किंमत आणि त्याचे महत्त्व भारतीयांना कळतंय. पहिला सर्जिकल स्ट्राइक ज्या संरक्षणमंत्र्यांच्या काळात झाला असा हा मनोहर पर्रीकर. साडेपाच सहा फूट उंचीचा आटोक्यात ठेवलेल्या मिशा आणि पुढे राहून नेतृत्व करण्याचे कौशल्य.

 अर्थातच भाजप पक्षासाठी ही सर्वात मोठी हानी आहे.  बुद्धिबळात चेकमेट करण्याच्या आधीच जेव्हा उभा, आडवा व तिरपा चालणारा वजीर उडतो तेव्हा काय परिस्थिती होते तशी परिस्थिती आज भारतीय जनता पार्टीची गोव्यात झाली आहे

 देशाची हानी म्हणाल तर ती नक्कीच आहे.  कारण आदर्श राजकारणी, समाजकारणी, मंत्री आणि नेता कसा असावा हे पुढच्या पिढीला कळणार नाही. अजून वीस पंचवीस वर्षे जगले असते तर पुढच्या पिढीला त्यांची कार्यशैली त्यांचे विचार आणि राहणी बघता आले असते.
असो.
गेल्या एक-दोन वर्षात असे दुर्दैवी धक्के आपल्याला बरेच मिळाले आहेत आधी अटलजी, मग जॉर्ज आणि आता पर्रीकर.
हा देश त्यातूनही सावरेल, पुन्हा कामाला लागेल, ट्रॅफिकजाम मध्ये अडकेल, मतदानाला जाईल. लोकशाहीचा उत्सव साजरा करेल आणि मग पुन्हा नव्या पर्रीकरांच्या शोधात सोशल मीडियावर सर्फिंग करेल

 सरतेशेवटी पर्रीकर सरांना श्रद्धांजली देताना एवढेच सांगावसं वाटतं
" सर, तुमचा हा प्रवास तुमचं हे व्यक्तिमत्त्व आमच्यासाठी 'आहे मनोहर तरी'.........
पण तुम्ही नसाल"



© मिलिंद सहस्रबुद्धे


९९22१८26३२
१७/०3/२०१९


Saturday, March 9, 2019

"ती" चा प्रवास






स्वतःच्या स्वतःला जन्म देते आणि पुन्हा पुन्हा नव्याने जन्म घेते. तर इतरांना जन्म देण्याची क्षमता असलेली ऐकमेव अशी ही स्री. जन्मापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास वेगवेगळ्या वळणांवर नवीन नवीन जन्म घेतो. जसा साप कात टाकून परत परत अमर राहतो अगदी तसाच. जन्माला येते मूल, मुलगी म्हणून इथून सुरू झालेला प्रवास बहीण, मैत्रीण पुढे बायको आणि मग आई-आजी अश्या नात्यात नव्याने जन्म घेतच जाते.  हा "ती"चा प्रवास प्रेम, संयम, काळजी अशा विविध डब्यांमधून होत असतो.  तीच्या या प्रवासाच्या रेल्वेला जसे अनेक डबे जोडलेले असतात तसे हे डबे आणि मग त्यात तिची विविध माणसं, नाती म्हणून जोडली जातात.
 निसर्ग तीला सोशिकता आणि जीवनातील जैविक आणि सामाजिक सत्य वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीच उलगडून दाखवतो. तिथून मग पुढची प्रत्येक वर्ष तिला हाच निसर्ग प्रगल्भ बनत जातो. हा असा एकमेव प्रवास आहे ज्यात "ती"च स्वतः ड्राइवर असते, पॅसेंजर असते सिग्नल सुद्धा "ती"च पाडते आणि डेस्टिनेशन्स् सुद्धा "ती"च ठरवते. तीची ही ताकद विलक्षण आहे आणि आपण त्याचा अनुभव विविध क्षेत्रात विविध वेळी घेतच असतो.

कित्येक शतकांपासून तीचा हा प्रवास चालूच आहे. पुरुष प्रजाती ही तिथंच थिजलेलीच आहे. ही प्रजाती जशी होती तशीच आहे, तिथेच आहे, घुटमळत. वर्चस्ववादी अहंकारी आणि संकुचित. याच्या अगदी उलट स्त्री प्रजाती, "ती"ने खूप मोठा अवघड प्रवास केला आहे, करत आहे आणि अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तीने या शतकांच्या प्रवासात खूप आमूलाग्र बदल घडवलाय स्वतःमध्ये. "She has crossed Thousands of Miles ahead of Him".  तीच्यातील सोशिकता, कणखरपणा, जिद्द,धाडस, चिकाटी आणि महत्त्वाचं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं कसब आणि क्षमता तिला इथवर घेऊन आली आहे.  पुढील शतक हे नक्की स्त्री वर्चस्ववादी असेल हयात माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही.

या यशस्वी प्रवासात तिला कोणाचीही साथ नव्हती स्त्रियांनी स्वतः पुढाकार घेऊन वेळोवेळी विविध क्षेत्रात आणि विविध प्रसंगात पुरुषी वर्चस्ववाद मोडून काढला आहे. आज मुलगी जन्माला येणे किंवा मुलगी असणं हे कौतुकाची आनंदाची पोचपावती ठरत आहे

इतका दुर्गम पण यशस्वी प्रवास करून सुद्धा अजूनही आपण रोज वर्तमानपत्रात एक नवीन निर्भया जन्माला आलेली बघतोय. ती चं शील हरण्याची भीती अजूनही संपली नाही आहे उलट ती अजूनच वाढत आहे. आता रावण तर सोडाच पण मी मी म्हणणारे राम देखील लक्ष्मण रेषा ओलांडताना दिसतात. रस्त्यावरच्या प्रत्येक स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन काही बदलत नाही. अजूनही वासना आणि सौंदर्य हयात फरक आम्हाला कळत नाही. अजूनही मैत्रीण, प्रेयसी आणि बायको या तिन्ही मधील बॉर्डरलाईन समजू शकलो नाही आपण. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तिचा टक्का वाढला आहे, ती चे महत्त्व वाढले आहे अवेअरनेस आला आहे  पण #me too सारखी प्रकरण जन्माला येतच आहेत.

 पाश्चात्य देशात ही समानतेची वागणूक नक्कीच दिसून येते याबाबतीत मात्र आपला देश त्यांना फॉलो करत नाही बाकी जमेल ते सगळं आम्ही फॉलो करतो. नॉर्वे-फिनलंड सारख्या देशात तर स्त्रिया कामावर बाहेर पडतात आणि पुरुष घर सांभाळतात. मनुष्य सोडून प्रत्येक बहुतांश प्रजातीत स्त्रीलाच महत्त्व दिले आहे सिंहीण हीच शिकार करते तर चिमणी, घार, कोकिळा असे पक्षी यांच्या नरांची नावच आपल्याला माहिती नसतात त्याप्रमाणे.

आज देशाच्या तीन सर्वोच्चपदी स्त्रिया ही पदे भूषवत आहेत. "सुमित्रा महाजन लोकसभा स्पीकर";  "सुषमा स्वराज विदेश मंत्रालय"; आणि "निर्मला सीतारमण संरक्षण मंत्री". काय योगायोग आहे बघा स्त्री मधला "स" ह्या तिघींच्याही नावात आहे. जणू 'सिं"हीणी च आहेत त्या. तरीही आपल्या देशातील संकुचित विचारसरणीचे लोक,  राजकीय पक्ष त्यांचा अभिमान न बाळगता खालच्या दर्जाचे राजकारणात धन्य मानत आहेत. जसं म्हणे राफेल प्रकरणात श्री नरेंद्र मोदींनी उत्तर द्यायला एका "स्त्री"ला पुढे केले अशा वल्गना करून ही लोक नक्कीच "ती"चा सतत अपमान करत आहेत. आणि आपली संकुचित मनोवृत्ती चव्हाट्यावर आणत आहेत.  एवढा मोठा निर्णय घेऊनही त्याचं खुल्या दिलाने कौतुक न करण्याची शूद्र पुरषी विचारसरणी अजूनही गेली नाही येथून.

सर्वात अजब विरोधाभास म्हणजे जो इतरांना, सर्व जगाला विचार स्वातंत्र्य, समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्यांचे डोस पाजतो,धडे देतो तो हा चौथा स्तंभ.  त्यात वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनेल हयांच्या मुख्य संपादक पदावर एखादी स्त्री असल्याचं ऐकिवात नाही किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. पण ह्यांना कोण विचारणार, विचारण्याचा MIC ह्यांच्याच कडे आहे ना.

पी टी उषा पासून ते मेरी कोम पर्यंत; सिंधुताई सपकाळ पासून ते मंदाताई आमटे पर्यंत; क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांपासून ते सुधा मूर्ती पर्यंत; डॉक्टर आनंदीबाई जोशी पासून ते सध्याच्या छोट्या गावातून येणाऱ्या डॉक्टर स्त्रीपर्यंत; देशाचा पहिला महिला पायलट पासून ते निर्मलाजी सीतारामन पर्यंत आणि इंदिरा गांधींपासून ते अँजेला मार्केल पर्यंत. अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर अग्रेसर आणि यशस्वी असलेल्या आणि आपल्या दैनंदिन जीवनात सकाळी चहा देण्यापासून ते रात्री भाजी भाकरी प्रेमाने खाऊ घालणार्या सर्व स्त्रियांना महिला दिनाच्या सप्ताहात मानाचा मुजरा, सलाम आणि हो "धन्यवाद".

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे त्रिवार सत्य आहे कारण "ती" असते "ती"चा त्याग असतो म्हणूनच "तो" कर्तुत्व सिद्ध करतो. परंतु यशस्वी स्त्रीमागे पुरुष असतो असं क्वचितच पाहायला मिळतं कारण
"ती"चा प्रवास हा अजुनही 'ती"चाच आहे.




---© मिलिंद सहस्त्रबुद्धे


हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...