Sunday, October 27, 2019

युरोप एक नशा..

माधुरी, मधुबाला जश्या इव्हीनींग पार्टीला सुंदर दिसतात आणि सकाळी उठल्यावर ब्रश न करता हातांचे आळोखेपिळोखे देत जांभई साठी उघडलेल्या आ..मध्येसुध्दा अगदी तेवढ्याच लाजवाब दिसतात,असंच काहीसं सौंदर्य युरोपमध्ये आहे.

सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जॉय मुखर्जी आणि शम्मी कपूरने दाखवलेल्या युरोप पेक्षा नव्वदच्या दशकानंतर यश चोप्रांनी दाखवलेला सिलसिला पासून ते पार अगदी दिल तो पागल हे मधला युरोप हा फारच वेगळा होता.  सत्तर-ऐंशीच्या दशकात पहिलेला युरोप बर्‍यापैकी ब्लॅक अँड व्हाईट आणि इस्टमन कलरचा होता. तर यश चोप्रांनी दाखवलेला हा Digital रंगीबेरंगी आणि Countrysideचा होता त्यामुळे आपण त्याच्या जास्त प्रेमात पडत गेलो.

 युरोपमध्ये विमानात उतरल्यापासून एक जो वेगळ्याच प्रकारचा गंध,वास येतो. जणू काही आपण त्या गंधाच्या प्रेमात पडतो. मग जेव्हा वेगवेगळ्या रस्त्यांवर,  डोंगरांवर आणि आजूबाजूच्या नैसर्गिक सौंदर्यात युरोप दिसायला लागतो तेव्हा तर आपले भानच हरपून जाते.

 कितीहीवेळा त्याच जर्मनीमध्ये, त्याच लंडनमध्ये किंवा त्याच फ्रान्समध्ये आपण गेलो तरी प्रत्येक वेळेस युरोपमध्ये आपल्याला काहीतरी नवीन नवीन सापडतेच. मग कधी ती टुमदार घरे असतील तर कधीही ते मंद दिव्याचे पिवळे प्रकाश.

युरोपमध्ये कधीही तुम्हीला भपकन अंगावर येणारा पांढरा एलईडी बल्ब किंवा पांढरी ट्यूब असं दिसणार नाही. कारण युरोप हा मुळातच रोमँटिक असल्यामुळे त्याला मंद प्रकाशातच राहणं रुजतं.  त्याला पिवळ्या मंद प्रकाशात पाहणं एक वेगळा बाज एक वेगळा आनंद आहे. रात्रीच्या वेळेस देखील एखाद्याच्या घरी  किंवा एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही जाता तिथं एक शांत मंद पिवळा प्रकाश असतो. तुम्ही आपोआप रोमँटिक होऊन जाता.  ती नशा, रोमान्स तुम्हाला  तुम्ही एकटे असता दुकटे असा की फॅमिली असा, तो बेधुंद करतोच.

 युरोपियन खाद्यपदार्थ तसे खूप वैविध्यपूर्ण आहेतच असे नाही परंतु युरोपमधील वेगवेगळ्या छोट्या छोट्या देशांची स्वतःची Cuisine आहेत.  युरोपमधल्या कुठल्याही देशात ग्रीक,  लेबनीज, टर्किश, इटालियन रेस्टॉरंट तुम्हाला हमखास सापडतील. परंतु इतर देशांची अशी काही स्वतःची वैविध्यपूर्ण खाद्य पदार्थांची रेंज तुम्हाला युरोपमध्ये सापडणार नाही.  उलट युरोपमध्ये तुम्हाला जगभरातून आलेले विविध प्रकारचे अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवलेले Cuisine चाखायला मिळतात.

  Tour and Travelsच्या Europe ट्रीप मध्ये कव्हर केला जातो खरा पण इंग्लंड हा देश तसा युरोपीयन नाही. युरोप हा इंग्लंड पासून कायम चार हांत लांबच आहे आणि ते आपण सध्या Brexit च्या माध्यमातून बघतोच आहोत.

 युरोपचे सौंदर्य हे वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सदैव चिरतरुण आणि नवतरुण दिसणार आहे. त्यामुळे या युरोपच्या प्रेमात अगदी पार सतरा अठरा वर्षाच्या तरुण-तरुणी पासून ते अगदी सध्या युरोप टूर ट्रॅव्हल्स करणार्या ज्येष्ठ नागरिक पर्यंत सगळेच आहेत. प्रत्येकजण  "Please परत एकदातरी जाऊना"  असं म्हणतोच.

 जर्मनी,फ्रान्स,ऑस्ट्रिया, नेदरलँड, स्वित्झर्लंड हे दुसऱ्या महायुद्धामुळे जगभरात नावाजलेले Central European देश. वरच्या बाजूला नॉर्वे- फिनलंड-स्वीडन-डेन्मार्क हे Nordic European जंगलमय आणि तुरळक लोकवस्तीचे देश. तर खालच्या बाजूस ग्रीस, इटली त्यांच्या हजारो वर्षांच्या इतिहास आणि सध्या Refugee च्या बातम्यांनी प्रकाशात आलेले South European देश.

 संपूर्ण युरोप मध्ये फिरताना विविध चर्च एक वैशिष्ट्यपूर्ण दिसतात. प्रत्येक देशातील चर्चची सर्वसाधारण ठेवणं जरी सारखी दिसत असली, आतील येशू आणि क्रॉस जरी सारखा असला  तरी प्रत्येकाच्या पद्धती थोड्याफार फरकाने वेगळ्या आहेत.  इटलीमधील चर्च आणि फिनलंडमध्ये चर्च यांच्या पद्धती वेगळ्या आहेत. तरीपण त्यांचे सौंदर्य आहे ते कायम डोळ्यात भरण्यासारखे. जसं जर्मनीमधील Klone शहरातील सर्वात उंच आणि भव्य चर्च पाहताना जाणवतं की वास्तुशास्त्रज्ञाची काय कमाल असू शकते आणि भव्यदिव्यतेचा आवाका किती मोठा असू शकतो.

तिन्ही ऋतूत तेवढाच सुंदर मनमोहक मनाला भुरळ पाडणारा असा हा युरोप. थंडीत Winter गोठवणारा पांढऱ्या शुभ्र बर्फ असेल Summer उन्हाळ्याच्या त्या अल्हाददायक उन्हात असेल आणि Fall म्हणजे पानझडीत उतरणीला लागलेल्या मौसमात असेल कधीही बघा तो चिकनाच दिसतो. खरं पाहायला गेलं तर पानझडी म्हणजे पानं झडायला लागलेले असतात तरी आपल्याकडे मराठीत म्हणतात तसं पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा तसा या युरोप सौंदर्य कायम सदाबहार चिरतरुण आणि हिरवं असतं हे सौंदर्य डोळ्यात साठवून म्हणजे एक स्वप्नपूर्तीच असते.

 आपल्या लहानपणी स्वप्नातील आणि चित्रातील भासतील अशी खरी खरी आखीवरेखीव घरं. अगदी पट्टीने मोजून आखलेल्या सारखं अंगण त्यातून जाणारे पांढरेशुभ्र रस्ते घराची कुंपण. खेड्यांकडे दिसणारी हिरवळ.  ती हिरवळ ब्राईट पण आहे पण फ्लोरोसंट नाही डार्क पण आहे पण शेवाळी नाही अशी काहीतरी वेगळीच. खरं पहायला गेलं तर प्रेमाचा रंग गुलाबी असतो पण युरोपमध्ये गेल्यावर या हिरव्या हिरवळीच्याच आपण प्रेमात पडतो. सर्वत्र असलेली उंच सुरुची आणि ओकची झाडं आणि त्यावर बहरलेली शिस्तबद्ध पानं. साधारणता शहराच्या मध्ये अशी झाडं कमी आढळतात कारण शहराच्या मध्यभागात केनडाच्या झेंड्यावर चित्र असलेली आणि हिंदी पिक्चर मुळे फेमस झालेली त्रिशुळी आकाराची ती मोठ्या पानांची झाडं सर्वत्र दिसतात.

 सिटी सेंटर म्हणजे युरोपमधील शहराचा मध्यभाग. हा प्रत्येक देशात प्रत्येक शहरात तुम्ही गेलात तर सर्वसाधारणपणे साम्य आढळते.  एक मोठे चर्च, चर्च च्या आजूबाजूला प्रचंड मोठे पटांगण म्हणजे ते मातीचं नसतं तर त्यावर खवल्या मांजरच्या पाठीवर असलेल्या खवल्यांसारखे पादचारी मार्ग, किंवा एक भाग असतो. तो फक्त वाकिंग साठी ठेवलेला असतो आणि त्याच्यावरनं अधून मधूनच चार चाकी वाहने जातात किंवा मनमोहक दुहेरी ट्राम जातात. त्या वॉकिंग प्लाझा मध्ये ट्राम्स जाताना बघणे किंवा क्रॉस करणे याच्यात धुंदी आहे ती फक्त युरोप आणि युरोप मध्ये मिळते.
 इथे प्रत्येक रस्ता अगदी छोट्या गल्लीपासून ते मोठ्या हायवे पर्यंतचा हा जणू एखाद्या मोठ्या वॉटर टँकरच्या पाण्याचा फोर्सने धुतल्यासारखा स्वच्छ कधीही आणि कुठेही.
 पुण्याच्या भोरी आळी, तुळशीबाग अगदी कर्वेनगर म्हणजे कमिन्स कॉलेज ची मागची बाजू बरं का, यांसारखे अरुंद आणि छोटे छोटे रस्ते आणि गल्ल्या असून देखील तुम्हाला कधीही तिथं ट्रॅफिक जाम झालेलंं दिसणार नाही. येथील ट्रॅफिक चालणाऱ्यांना नियमांप्रमाणे बांधेसूद असते. हे सगळं बघून आपल्याला असं वाटतं की काय लोक आहेत आणि काय त्यांचं राहणीमान आहे.

 तसा अमेरिका हा देश देखील बघण्यासारखा आहे भव्यदिव्य आहे पण अमेरिकेचा इतिहास हा अगदी तत्कालीन आणि तुटपुंजे असल्यामुळे संपूर्ण अमेरिकेत जर का तुम्ही फिरलात तर तुमच्या एक लक्षात येतं की एक साधारण पश्चिम आणि पूर्व या भागातली मोठी शहरे बघितली की जडून तशीच्यातशी साचेबद्ध शहर आणि साचेबद्ध रस्ते हे संपूर्ण अमेरिकेत आहेत त्यामुळे अमेरिकेला परत पाहावं असं काही विशेष नाही.

 युरोपला कित्येक शेकडो वर्षांचा इतिहास आहे . इतिहास जपून ठेवणं हे फक्त आणि फक्त युरोपियन लोकांकडून शिकावं. मुळात म्हणजे हा इतिहास इथल्या युरोपियन लोकांनी नुसताच आठवणींचे पिंपळपान वहीत न जपता तो जागोजागी जपून ठेवला आहे. जिथे जिथे हा इतिहास सापडला तिथं त्याची संग्रहालय करून त्यांनी तो जपून ठेवला. सर्वात विशेष म्हणजे तो इतिहास इतका सुयोग्य स्थितीत मांडलेला आहे की आपण त्यात जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी जातो तेव्हा तेव्हा त्यात रमून जातो. महत्त्वाचं म्हणजे त्या प्रत्येक जपलेल्या वस्तूला, वास्तूला आणि विचारांना त्याची माहिती तिथे दिलेली असते आणि ती सुद्धा सर्व भाषांमधून.
एक छोटेसे उदाहरण सांगतो जर्मनीमधील म्युनिक शहराच्या मधोमध एक मोठे चर्च आहे आणि त्या चर्चा वरच्या बाजूला येशू ख्रिस्ताचा क्रॉस आहे तर खाली भुयारात त्या प्रांतातील म्हणजे बव्हेरीया  राज्याच्या विविध राजे राण्या युवराज युवराज्ञी यांची कॉफीन जपलेली आहेत. त्याचं तीन युरो तिकीट असलेलं संग्रहालय देखील आहे. या संग्रहालयात पहिल्या राजापासून शेवटच्या राजापर्यंत कॉफिन तर आहेतच पण अगदी त्याकाळी लवकर मरण पावलेल्या एक वर्षाच्या युवराजाचे देखील कॉफीन त्यांनी ठेवलेले आहे. 
कौतुक का नाही करायचे कारण नुसते इतिहासाचा राजकारण करण्यापेक्षा त्याचा समाजकारण करण्यासाठी काय फायदा होईल याचा विचार युरोपियन लोकांनी जास्त केलेला दिसतो. तो इतिहास पुढच्या पिढीपर्यंत खोलवर कसा रुजेल याच्या साठी केलेले प्रयत्न बघून आपण पुन्हा पुन्हा त्यांना सलामच करतो.
इतिहासाला कायम किंमत असते आणि त्याबद्दल प्रत्येक पिढीतील एक आपुलकी असते तो इतिहास कसा का असेना युरोपचा इतिहास तसा पाहिला गेला तर खाचखळगे यांचा आणि आवडी-नावडीचा आहे पण तरीही तो पाहण्यात तो अनुभवण्यात एक वेगळीच मजा आहे एक वेगळाच आनंद आहे. बघा ना मोबाईल टॅबलेट लॅपटॉप यापेक्षाही आपल्याला तार यंत्र रेडिओ जुना मोठा टीव्ही जास्त जवळचा वाटतो आणि परत परत ते वापरावं असं वाटतच राहतं जरी आता नामशेष होत असलं तरी. तसंच काहीसं या इतिहासाचा आहे आणि म्हणूनच युरोप हा इतर खंडांपेक्षा वेगळा आणि उजवा ठरतो

 युरोपियन माणूस आणि युरोपातले सगळे देश हे साधारण एखाद्या पुणेरी पेठेतल्या संस्थेसारखे आहेत. जसे या संस्थेत प्रत्येक जण एकत्र असतात पण तुटक आणि तुसडे. आम्हीच कसे श्रेष्ठ जरी एका छत्राखाली असलो तरी हे सदैव दाखवणारे.

 युरोपात बहुतांश देशात, तुमचे कॉलेज जीवन संपल्यानंतर एक वर्ष मिल्ट्री सर्विस करणे म्हणजे देशाला देणे ही पद्धत आहे. तुम्ही जेव्हा येथील लोकांमध्ये वावरता लोकांबरोबर काम करता लोकांमध्ये उठता बसता तेव्हा जाणवतं की शिस्त आणि काटेकोरपणे नियमांचं पालन हे त्यांच्या रक्तातच भिनलेला आहे.  साधं सांगायचं तर हे लोक कधीही जेवताना अन्न वाया घालवत नाहीत. जेवायला म्हणून घेतलंलं ते सगळं म्हणजे सगळं अगदी शेवटच्या शीतापर्यंत सर्व संपवतात. कोणत्याही गोष्टीसाठी त्यांचे No Wastage  तत्व पद्धत दिसून येतं कदाचित त्या मिलिटरी ट्रेनिंग चा परिणाम असावा.

 Finland सारख्या देशात, सरकारच तेथील नागरिकांची एवढी काळजी घेतं की तिथं मिळणारं अन्नधान्य, खाद्यपदार्थ आणि औषध ही ठराविक निकष आणि नियमानुसारच बनवण्याची आयात करण्याची आणि त्यांची विक्रीची परवानगी आहे. तेथील लोक गमतीने म्हणतात की सरकार आम्हाला आजारी पडूच देत नाही त्यामुळे आमच्याकडे जनरल फिजिशियन डॉक्टर होण्यात काही फायदाच नाही.
जर्मनीमधील ऑक्सबर्ग खेडं जगभर होकायंत्र पुरवतं. होकायंत्र सारखा अतिशय कठीण शोध या छोट्याशा खेड्यात लागला आणि अजूनही याच खेड्यातून सर्व जगाला जुन्या-नवीन सर्व तंत्रज्ञानाची होकायंत्र पुरवले जातात. अशीच काहीशी वैशिष्ट विविध देशांची युरोपमध्ये आहेत. जसं ऑस्ट्रेयाला त्यांच्या डॅन्यूब नदीच्या पाण्याचा खूप अभिमान आहे. जर्मनीला वाहन उद्योग आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा गर्व आहे. फ्रान्सला त्यांच्या म्युझियम बद्दल प्रेम आहे तर नेदरलँड ला त्यांच्या कालव्यांचा आणि सायकल प्रवासाचं कौतुकआहे. स्वित्झर्लंड त्यांच्या बर्फाच्छादित उंच ठिकाणी वसलेले टुमदार गावांसाठी प्रसिद्ध आहे. ग्रीसला त्याच्या हजारो वर्ष जुन्या इतिहासाचा स्वाभिमान आहे.

  युरोपमधल्या प्रत्येक देशात फिरताना एक जाणवतं की निसर्गाने भरभरून दिलंय, युरोपनी भरभरून घेतलंय आणि युरोप इतर जगाला ते भरभरून देतोय. कारण निसर्गाने आतापर्यंत दिलेल्या विविध देणग्या प्रत्येक देशात त्या त्या देशांनी जपल्या आहेत असं नाही पण युरोपला दिलेलं हे सौंदर्य युरोपियन लोकांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. युरोपच्या प्रत्येक देशात एक समान धागा आहे एक समान तत्त्व आहे ते म्हणजे स्वतःच्या देशाचा स्वाभिमान आणि आम्हीच युरोपमध्ये सर्वश्रेष्ठ आहोत हा त्याच्याही पुढे जाणारा जाज्वल्य अभिमान.

 नव्वदच्या दशकातले आमच्यासारखे सगळेच यश चोप्राच्या युरोप प्रदर्शनाच्या सिनेमामुळे प्रेमात पडले आणि कित्येकांनी तर मग डीडीएलजे मधला राहुल युरोपमध्ये परत परत जाऊन जगला अनुभवला.

 युरोपला तुम्ही परत परत गेलात तरी मन काही भरत नाही जसं एखाद्या गोष्टीची व्यसन असतं किंवा एखाद्या गोष्टीची नशा असते तसंच काहीसं.

धकधक करने लगा लागलं की माधुरीसाठी आणि आईऐ मेहरबा  ऐकल्यावर मधुबालासाठी आपण परत परत ते गाणं बघतोच, तसं युरोप देखील प्रत्येक वेळेस नवनवीन सापडतोच.

कारण युरोप ही एक नशा आहे..न संपणारी नशा.

©मिलिंद सहस्त्रबुद्धे
२७/१०/२०१९
पुणे ३०

Friday, October 11, 2019

सत्ते पे सत्ता (सत्त्यातर)

अमिताबच्चन..जी
सहस्त्रचंद्र दर्शनाच्या दिशेने वाटचालीसाठी शुभेच्छा...

जीवनातील पहिली दोन सोडली तर तब्बल पाच दशकं आपल्या अस्तित्वानं संपूर्ण भारताला आणि जगाला सुध्दा मंत्रमुग्ध करणारं व्यक्तीमत्व. तुमच्यावर लेख पुस्तक आणि बरंच काही लिहलं गेलयं, अजुनही लिहलं जातयं.  मोठ्या मोठ्या नामांकित व्यक्ती पासून ते अगदी कोपर्यावरचा बुट पॉलिशवालासुद्धा (त्याला पण तुम्ही स्वाभिमानीपणाची ओळ देउन अजरामर केलंत म्हणून)  लिहू शकतो. इतके आम्ही एकशे तीस करोड भारतीय अमिताबच्चनमय आहोत. म्हणूनच मीपण मांडतोय आज.

चाळीशी, पन्नाशी-साठीतले तर नक्कीच बच्चन बच्चन करतील पण अजूनही कौन बनेगा करोडपती बघतांना, तुमचं अस्तित्व इतकं भारावून टाकणारं आहे की अवघं पन्नास-साठ महीने वयाची पोरं टोरं पण बच्चन बच्चन करतात..काय ही जादू.. हे बघितल्यावर पटतं.."रीश्ते मे तो आप सब के बाप होते है...नाम है शहेनशहा"

अभिनेत्याच्या जीवनातील प्रत्येक चढ उतार आम्ही तुमच्याकडे पहात पहातच अनुभवलेत. जे एखाद्या सामान्य व्यक्तीच्या सुद्धा आयुष्यात येतात. अचानक झालेला मोठा अपघात, वैवाहिक जीवनातील गैरसमज, व्यवसाय क्षेत्रातील अपयश ते पार सिनेमा क्षेत्रात सर्वोच यश. तुम्ही वेगळे का असा प्रश्न पडला की तात्काळ उत्तर सापडते. ते म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला "साब, मै आज भी फेके हुए पैसे नहीं उठाता"वाला तो विजयच दिसला कायम.

तुम्हाला पडद्यावर बघतांना प्रत्येकजण तो प्रसंग स्वतः जगतोय की काय इतका समरस होऊन जातो अजूनही. मग अगदी भावनिक, कौटुंबिक, दे मार मारामारी किंवा प्रणय असेल तुम्ही साकारलेल्या प्रत्येक पात्रात तुम्ही इतकी जान आणलीत की आम्हाला कधीच वाटलं नाही "हं..नौटंकी है साला'

आज ग्यारा दशकं झालीत तुम्हाला, तरीही आम्ही रोज सकाळी जलसा वर तुडुंब गर्दी करतो आणि पुन्हा पुन्हा तेच वाक्य जगतो "ग्यारा मुलको की पुलीस डॉन के पिछे है, लेकीन डॉन को पकडना मुश्किल......"

तुम्ही वयाच्या विविध टप्प्यावर व्यवसायीक ते समांतर सिनेमा केलात. अनुभवी ते नवतरुण दिग्दर्शकां बरोबर काम केलंत. सामाजिक परंपरेला छेद देणार्या भुमिका केल्यात, आणि साठी नतर वयाला साजेशा. हाच आदर्श ठेवून आता सर्वच नट मंडळी ते follow करतांना दिसतात. मग तुम्ही म्हणालात ते काय चूक "हम जहां खडे होते है, लाईन वहीसे शुरु होती है।"

नवरा बायको नात्यातील उंच सखलपणा तुम्ही अगदी सहजपणे आम्हाला दाखवून दिलात. पत्नी बद्दलचा अभिमान कसा असावा हे आपण उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर पडद्यावर गाऊन पण दाखवलंत "जिस की बीबि .....उसका भी बडा नाम है..।"

राजीव गांधी पासून , मुलायमसिंग ते आता नरेंद्र मोदीं पर्यंत तुम्हाला जेव्हा जेव्हा ह्या सर्वांनी भारतासाठी केलेलं समाजकारण राजकारण योग्य वाटलं तेव्हा तेव्हा समर्थन केलंत आणि आपला सहभाग नोंदवला. अश्या वेळेस आपल्यावर कधी कधी टोकाची टिका टिप्पणी झाली. तरीही तुम्ही दाखवून दिलंत "मुझे जो सही लगता है वो मै करता हुं. फिर वो चाहे भगवान के खिलाफ हो, कानून के खिलाफ हो या पुरे सिस्टीम के खिलाफ"

लिहीत बसलो तर कदाचित  मराठीच काय पण सर्वच भाषांमधील शब्द कमी पडतील. कारण तुम्हीच आम्हाला "और बंगाली मै कहते है..." म्हणत प्रेमाच्या अनेक भाषा शिकवल्यात. तुमच्या सारखा बहुभाषिक जगभरात शोधून सापडणार नाही. तुमच्या वाणीचा स्पर्श ज्या ज्या भाषेला झाला ती भाषा Global झाली.

जीवनाच्या प्रत्येक विषयावर, अनुभवांवर, प्रसंगांवर आपण आपल्या कारकिर्दीत केलेला स्पर्श आम्हाला सदैव दिशादर्शक ठरतो. आम्हा सर्वांसाठी तुम्ही समुद्राच्या मध्यात ठामपणे उभे असलेले लाइट हाऊस आहात.

असं म्हणतात की, काही ऋणांमधून कधीच बाहेर पडू नये कारण मग ते ऋणानुबंध लोप पावतात. तसे हे तुमचे कालातीत ऋणानुबंध आहेत आणि आम्ही भाग्यवान.

इतरांना तुमचा अभिमान असतो पण क्षमस्व, मला माझाच अभिमान आहे कारण मी तुमचा एक जबरदस्त चाहता आहे.

© मिलिंद सहस्रबुद्धे
११/१०/२०१९

ता. क. -  हा फोटो टाकला कारण अमिताबच्चन म्हणलं ना की साला हाच डोळ्यासमोर येतो 🙏..

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...