Skip to main content

खूब भालो दादा.......त्याची मुलगी मागच्या महिन्यात त्याला म्हणाली "बाबा, तु लॉर्डस वर तेव्हा जर्सी(टी शर्ट) काढून

त्याची मुलगी मागच्या महिन्यात त्याला म्हणाली "बाबा, तु लॉर्डस वर तेव्हा जर्सी(टी शर्ट) काढून फिरवलास ते मला काही आवडलं नाही", "इट्स नॉट इथिकल" वगैरे वगैरे. ह्या नवीन पिढीला काय कळणार त्या जर्सी काढून फिरवण्या मागची भावना. ती दिडशे वर्षे हेटाळलेली आणि तुंबलेली उपेक्षा. इंग्रजांना त्यांच्याच जमीनीवर हरवण्याचा आनंद आणि हो माजपण.
तो जिद्दीने ओढून आणलेला विजय, ती यशाची भावना.
बस्स आम्ही त्यादिवशी तुझे बेहद्द फैन झालो. जिंकलस भावा, तोडलस मित्रा अश्या शब्द प्रयोगांना चपखल बसेल अशी ती तुझी लॉर्डस वर ची प्रतिक्रिया.
अझरउद्दिन नंतर भारतीय क्रिकेट ला एक सातत्याने यश देणारा कैप्टन गवसतच नव्हता. बीसीसीआयचे ट्रायल एंड एरर पध्दत चालूच होती आणि एक दिवस तुझ्यात तो सूर गवसला. अर्थातच हा सूर 'निरागस' नक्कीच नव्हता तर तो 'खर्ज्यातला सा' होता. भारतीय क्रिकेट मधल्या त्या सुवर्ण काळातला तु एक हुकुमाचा एक्का होतास. तुझ्यातली नेतृत्व कसब हि खरंच काही औरच होती. रसगुल्ला सारखा थिबथिबीत गोडीळ नसून चमचमीत चटपटी बंगाली मछली होतास तू.
तुझ्या बाबतीत एक किस्सा नेहमी चर्चेला गेला तो म्हणजे, तू एक्सट्रा मधे असताना मैदानावर र्डींक्स पाणी नेण्यास नकार दिला होतास म्हणे. स्वाभाविकच आहे कोलकत्ता चा प्रिंस तु, तुझ्या बुटाची लेस बांधायला सुध्दा लहानपणापासून तुझ्या कडे माणसं असतील तर तू का बरं पाणक्या होशील.
करीअरच्या सुरवातीला ४-५ स्थानावर बैटींग ला येणे आणि मग एकदम "द सचिन" बरोबर ओपनिंग ला सुरवात केलीस. त्यावेळी तुम्ही दोघं जेव्हा बैटींग ला मैदानात उतरायचात तेव्हा सचिन मैदानाला नमस्कार करणार आणि तू तुझ्या स्टाईल ने डोळे मोठे करत मिचकावत मागे सुर्याकडे पहाणार हे ठरलेलच समीकरण. आमची उत्सुकता ओपनिंग कोण करणार ह्या कडे, कारण तुला तसे बाऊंन्सर बॉल नकोसे असायचे.
तुमची ती "लेफ्टी-राईटीची' जोडी म्हणजे "सुवासिनीच्या कपाळावरचं हळदी-कुंकू" च जणू. मग तुमच्या धुवाधार ओपनिंग पार्टनरशिपने आपली इनिंग "सौभाग्यवती" व्हायची.
इंप्रोव्हाजनचा तु बादशाह होतास. पहिल्या बारा पंधरा ओव्हर नंतर फिल्डर मैदानात पांगले की स्पीनर्स ला क्रीजच्या चार फुट पुढे येउन लॉंग ऑन लॉंग ऑफ ला मारलेले चौके छकडे अजूनही डोळ्यासमोर आहेत.
जेफ्री बॉयकॉटचा तु लाडका, त्यानेच तुझं प्रिंस ऑफ कोलकाता नाव ठेवून दुसरं बारसं केलं.
सचिन, सौरव, लक्ष्मण आणि द्रविड. अशोक स्तंभाप्रमाणे तुम्ही भारतीय क्रिकेटचे चार सिंह होतात त्या सुवर्णकाळात. चार जणांची चार दिशेला तोंडे जशी.. कारण प्रत्येकाची एक वेगळी शैली आणि प्रत्येकाचं वेगळं प्रभुत्व.
तुझं एग्रेशन, इंप्रोव्हाजेशन आणि नेतृत्व गुण इतरांपेक्षा "उजवे" होते जरी तु "डावा" असलास तरीही.
बाबू श्रीनाथ आणि मंगळ्या* प्रसाद सारख्या सो कॉल्ड फास्ट बौलर घेऊन मैचेस काढून देणं म्हणजे खायची गोष्ट नाही. (* मंगळ्या- कारण तो चौकोनी चेहऱ्याचा आणि उगाच परग्रहावरुन आल्या सारखा दिसायचा)
खरं एक वेगळंच नेतृत्व होतं तुझ्यात. त्या नेतृत्वाखाली सचिन पासून युवी पर्यंत आणि श्रीनाथ पासून ईरफान पर्यंत खेळाडू बहरले. कपिलदेव नंतर लाभलेलं हे दुसरं कणखर नेतृत्व.
खरंच, नावाप्रमाणे दादा होतास तू वागायला बोलायला आणि जणू नात्यानेपण वीरुचा, युवीचा, कैफचा, नेहराचा दादा. ह्या सगळ्यांना बोट धरुन क्रिकेट विश्वात प्रसिद्ध केलंस.
फील्डींग हे डिपार्टमेंट आपलं नाही हे नक्की उमजल्यामुळे तिथं उगाच ओढून ताणून प्रयत्न नाही केलेस कधी. प्रिंस ना बाबा तू. म्हणे ती नगमा सारखी सौंदर्यवती तुझ्या प्रेमात पडली पण ह्या *फील्डींग*ला काही पटवू शकला नाहीस.
तसा तू सध्याच्या विराट नंतर अथवा आधीचा मोस्ट कॉट्रोव्हरशल कैप्टन राहिला आहेस मैदानावर आणि मैदानाबाहेरपण. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्याच्याच भ, भा, भे च्या भाषेत उत्तर देण्याची धमक दाखवणारा एकमेव कैप्टन फक्त तूच.
तु येईस पर्यंत भारतीय क्रिकेटला फक्त अरबी समुद्रातच मोती असतात असे वाटायचे. पण तुझ्या येण्याने बंगालच्या उपसागरात फक्त मच्छि नाय तर मौल्यवान मोती देखील मिळतात हे समजले.
आहेसच तू अस्सल शुभ्र मोती भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण अलंकारांमधला.
©मिलिंद सहस्त्रबुद्धे
तळ टीप--
हा लेख "ज्याने मला क्रिकेट बघायला वाचायला आणि कॉमेंट्री मधून ऐकायला शिकवले त्या मित्र अर्चिस पाटणकरला" समर्पित.

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि