Wednesday, February 13, 2019

आधुनिक काठी..............."बाळ जातो दुरदेशी मन गेले वेडावून आज सकाळपासून" ही कविता आमच्या लहानपणी आई

"बाळ जातो दुरदेशी मन गेले वेडावून आज सकाळपासून" ही कविता आमच्या लहानपणी आई म्हणायची तेव्हा गळा भरुन यायचा आणि दोन तीन वेळा औंढा गिळायचो. बाळं दुरदेशी असलेली आज माझ्या सारखी मंडळी प्रत्येक दुसर्या मध्यमवर्गीय घरात आहेत. आम्ही आई वडील इथंच स्वदेशी सोकॉल्ड आनंदात आहोत.
मुलं परदेशी जातांनाचे ते आनंद, अभिमान,काळजी हळूहळू 'पानगळतीसारखी सरु लागते आणि मग एकांतात राह्याण्याचा ग्रीष्म वयोमानानुसार चटका द्यायला सुरवात करतो.'
सध्या आधुनिक तंत्रज्ञान आणि सुखसोयी मुळे पुर्वी इतकी तोशीश करावी लागत नाही. घरकामाला पण बर्यापैकी पैशात माणसं मिळतात. या इंटरनेट च्या युगात तर अगदी जवळ बसून बोलतोय, पहातोय असा आभासी अनुभव निर्माण होतो. मुलांपासून आपण एकटे लांब राहतोय अश्या भावना मुखवट्यावर तरी उमटत नाहीत.
प्रत्यक्ष चेहर्याचे काय हो, तो चेहरा आपण कधी बघतो का? आयुष्यात मुखवट्यावर तर जगतो आपण, काय बरोबर ना.
मी प्रकाश आणि माझी बायको वासंती. आमची पहिली मुलगी मुग्धा पाच वर्षाची झाल्यावरच माझ्या आईची टकळी सुरु झाली. " प्रकाश, आता पुढची तयारी करा रे. घराला दिवा हवा, मुलगा हा आपल्या आडनावाला, घराण्याला पुढे नेणारा असतो, तो हवाच. तोच म्हातारपणाची काठी रे बाबा, जसा तु आहेस मला."
"तु आणि वासंती वाटलं तर डॉक्टर कडे जाउन या पण मुलासाठी प्रयत्न करा आता." "माझे डोळे मिटायच्या आत मला नातवांचं तोंड पाह्यचंय."
आईची हि वाक्य खटकायची आणि तीच्या भुमिकेतून पटायचीसुध्दा. तो काळच तसा होता. बहुतेक काहीप्रमाणात अजूनही तो तसाच असेल फक्त आता बंद दरवाज्यांमागे लपून बसला असेल. पुर्वी नातेवाईक, मित्रमंडळी खुले आम मुलगा, पेढा, दिवा वंशज अशी बिरुदावली लावून चेष्टा करत, सुप्त इच्छा प्रगट करायचे. आता मात्र तसे राहिले नाही, थोडा बदल दिसतो.
वासंती च्या घरच्यांकडून पण बरीच घे पाठ झाल्यावर, मग मात्र आम्ही थोड्याफार कबुलीने दुसरा चान्स घेतलाच. आम्हाला मुलगा "वेदांत" झाला. सगळी कडे आनंदी आनंद. तेव्हा मुग्धा (आमची मुलगी) आठ वर्षाची होती.
पुढे सुखदुःखात वर्षे सरली मुलं मोठी झाली. आठ वर्षाचे अंतर असल्यामुळे साहजिकच मुग्धाचं आधी लग्न झालं आणि ती बंगलोर ला सासरी गेली. वेदांतनी यशस्वी पणे इंजीनियरींग आणि एमबीए पुर्ण केलं. आणि तो नोकरीच्या निमित्ताने परदेशात जायला निघाला. त्यादिवशी मला माझ्या आईची आणि तीच्या त्या कवितेची खुप आठवण झाली. तीचं दिव्याचं, नातवांचं स्वप्न पुर्ण झालं होतं.
आमचे चिरंजीव परदेशात गेले, पोहचले आणि सेटल्ड पण झाले. आमच्या पण दोन तीन परदेशवारी झाल्या.
हळूहळू एकटं राहयची सवय मला आणि वासंतीला होत होती. पण तरीही मन आतून खातच होतं. वेदांत बरोबर असता, किमान इथंच रहात असता तर दररोज नाही तर गेला बाजार आठ पंधरा दिवसांनी दिसला असता भेटला असता. त्याचा आणि ईशाचा(त्याची बायको) संसार फुलतांना जवळून पाहिला असता. पण खंत मनात ठेवून मुखवटे धारण करत आधी फोन कॉल व्हिडीओ चाट आता व्हाट्सएपच्या चाट वैगेरे आम्ही करत होतो आणि अजूनही करतो.
साधारण चार वर्षापुर्वी वासंतीला कैन्सर डिटेक्ट झाला आणि आमचं आयुष्यच बदलून गेलं. ज्या दिवशी हे कळलं, त्या दिवशी आभाळ कोसळणं म्हणजे काय ह्याची प्रचीतीच आली. त्यादिवशी डॉक्टरांकडून घरी आलो, पण घर एकदम भकास वाटू लागलं. काय बोलणार, कोणाला सांगणार काय झालंय? दारांना, खिडक्यांना, भांड्यांना कि छताला कोणाला...काहीच कळेनासं झालं होतं.
त्यादिवशी मी त्या नटसम्राट मधील म्हातार्या सारखं न राहवून जोरात ओरडलो " कुणी मुलं देता का मुलं? आम्हाला संभाळणारी, आमचं ऐकणारी, आमच्याशी बोलणारी, आमच्यावर रागावणारी, बरं वेळ आलीच तर अगदी घराबाहेर काढणारी पण चालतील..पण कुणी, कुणी मुलं देता का मुलं?"
मुग्धा फोन केल्यावर दुसर्या दिवशी सकाळी हजर. तीने डॉक्टरांना भेटून सर्व माहिती घेतली आणि मग ट्रिटमेंट सुरु झाली.
तीची दोन मुलं अमित आणि सुमित एक ३रीत दुसरा ५वीत. पुढे आईच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी पहिले वर्ष मुग्धाने पुणे-बंगलोर महिन्यातून एकदोनदा येऊन जाऊन केले, पण पुढे पुढे तिला ते जमेनासं व्हायला लागल्यावर आमचे जावई केदारराव त्यांच्याशी बोलून ती आमच्याकडेच रहायला आली. मुलांच्या शाळादेखील तिने ट्रान्सफर करून घेतल्या.
वेदांतला कळल्यावर महिनाभरातच तो भारतात आला आठ-पंधरा दिवस इथे राहीला, इशापण आली होती. आमची काळजी सेवाशुश्रूषा केली आणि मग आमची परवानगी घेऊनच परत त्यांच्या परदेशात गेला. खर्चाची काळजी करू नका मी आहे हा खंबीर विश्वास मागे ठेवून गेला.
पहिल्या एक-दोन वर्षात दर चार-सहा महिन्यांनी वेदांत इथं भारतात येत होता आईची काळजी त्याला तिथं स्वस्थ बसून देत नव्हती. पण पुढे पुढे हळूहळू त्याचे येणं कमी झालं. त्याचे वाढलेला व्याप, प्रमोशनस, त्याचा संसार, त्याची वाढलेली कामं यामुळे त्याचे इथं येणं हळूहळू एकदम कमी झालं. ट्रीटमेंट च्या खर्चाचा खंबीर विश्वास मात्र त्यानी कायम ठेवला.
या चार वर्षात मात्र मुग्धा तिचा स्वतःचा संसार विसरलीच जणु. एखाद्या ब्युरोतल्या नर्स प्रमाणे तिने पूर्णपणे आईला वाहून घेतलं पूर्णपणे आईला सांभाळलं. आईची केमोथेरपी सीटींगस, औषधं, तिचा आहार , व्यायाम..सर्व काही मुग्धाच करत होती आणि अजूनही करते. अजून काय सांगू. बरं अमित सुमित चा अभ्यास, त्यांच्या शाळा, त्यांचे क्लासेस वगैरे आहेतच की. केदाररावां बरोबर वेळ देणं, त्यांचं काही दुखलंखुपलं किंवा त्यांना बंगलोर ला जाऊन काही काम असेल तर साथ देणं असं पण एकीकडे तिचं चालूच असतं. ती हे सगळे इतके लिलया आहे संभाळते की मला आश्चर्यच वाटते की हीच का ती आपली छोटी मुग्धा.
मला आठवतात ते दिवस, जेव्हा वेदांत झाल्यावर मुग्धा कडे काही वर्ष आमचं दुर्लक्ष झालं होतं. तेव्हा ती म्हणायची "बाबा, तुमचा आणि आईचा वेदुच जास्त लाडका आहे. पण बघा मी एक दिवस त्या उंदीर सिंहाच्या गोष्टीतल्या उंदरासारखी तुमच्या कामी येईन."
तिचे ते उंदीर असणं.. हे आज सिंहाच्या बरोबरीचा आहे. कारण वेदांतनी ट्रीटमेंटच्या खर्चाचा खंबीर विश्वास देऊन बाकीचे सगळेच हात नकळत झटकलेले आहेत. आम्हाला पण कधीकधी ते योग्यच वाटतं.आज आम्ही आहोत आणि उद्या नाही, त्याचं पूर्ण उमेदीचं आयुष्य, त्याचं करिअर, त्याचा संसार तिथे परदेशात त्याची वाट बघतोय. मग "आम्ही गळतीला लागलेल्या पानांनी कशाला त्याच्या जीवनाची जाळी करायची" असा कायम विचार आमच्या मनात येतो.
पण मग मुग्धा, तीचं काय? आज ती पण तीचं सगळं सोडुन आमच्यासाठी धावून आलीय, येतीय. मनापासून सर्व करतीय नकळत मुलगा असल्यासारखी आपली जबाबदारी पार पाडतीय ना..
माझ्या मनातली ही वादळं कधी संपतच नाहीत. समुद्राच्या भरती ओहटी सारखी दिवसातून एकदा येतातच. मुलगी म्हणजे परक्याचं धन, ती एकदा का सासरी गेली की त्यांचीच, तीच्या घरचं पाणी पण व्यर्ज...अश्या काळात वाढलेलो आम्ही. आज मात्र त्याच मुलीच्या खंबीर आधारावर आणि भक्कम खांद्यावर डोकं ठेवून आनंदाने जगत आहोत.
वासंतीच्या कॅन्सर 70 टक्के बरा झाला आहे आणि डॉक्टर म्हणताहेत पुढील एक वर्षात तो पूर्णपणे बरा होईल कदाचित.
ह्या पूर्ण मागच्या पाच वर्षात मी प्रामुख्याने अनुभवलेली आणि जाणवलेली गोष्ट म्हणजे "दिवा कितीही चांदीचा वा सोन्याचा असला तरी प्रकाश देते ती ज्योतच."
आज आई असती तर तिला मी अभिमानाने म्हणालो असतो "अगं म्हातारपणाची काठी बरोबर आहे, पण चुकून तिला तू पुल्लिंगी समजलीस, खरी काठी ही स्त्रीलिंगीच असते."
चिरंजीवी आहे जगती कन्या मानवाची.
---- मिलिंद सहस्त्रबुद्धे ©

No comments:

Post a Comment

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...