Saturday, May 21, 2022

लुप्त - भाग २ "धार"

 लुप्त - "धार"

"काय गं आई? सगळ्या सुरी चाकू तसलेच. एकालाही धार नाही. साधा आंबा पण नीट चिरला जात नाहीये. बघ ना!"
"हो माहितीये मला! आजचा दिवस वापर तशीच. उद्या मी D-Mart ला जाणार आहे, तेव्हा चांगल्या दोन-तीन सुरी आणि तुम्हाला सारख्या लागतात त्या छोट्या-मोठ्या कात्र्यापण घेऊन येणार आहे. जरा धीर धरा आता! आणि माझ्या मागे मागे करू नकोस"
घराघरातून बऱ्याच वेळा नेहमी ऐकू येणारा हा संवाद. घरातील सुरी.. Sorry हं हल्ली त्याला Knife असे म्हणतात, जरा धार गेली की बदलून अथवा नवीन आणली जाते.
पूर्वी (म्हणजे साधारण १०-१५ वर्षा आधी) घरात एखादीच सुरी असायची. तीच सर्व गोष्टी कापायला, खरवडायला, उचकटायला आणि कधी कधी तर लिंबू कापल्यावर सरबत ढवळायला पण वापरली जायची. सध्या मात्र घरात वेगवेगळ्या Knife असतात. भाजी कापण्याची मोठी Knife, लोणी लावायची गुळगुळीत Knife, तर फळांसाठी मध्यम knife. अशा एक न दोन तर सोडाच पण चार-पाच असतात. त्या काळी जेव्हा घरात एकच सुरी असायची तेव्हा ती बाद झाली व त्याची धार कमी झाली तर D-Mart आणि Dunzo नव्हते. तेव्हा कमी झालेली धार पुन्हा धारदार करून देणारे "धारवाला" म्हणायचे ते यायचे. घरोघरी गल्लीबोळात फिरत असायचे. तेव्हा अश्या सुरी किंवा कात्रीला धार करून मिळायची. पाच रुपयांच्या पेन सारखं वापरून झालं की वस्तू फेकून देणे ही प्रवृत्तीच नव्हती.
असा एखादा धारवाला दुपारच्या वेळेत ओरडायचा " ऐ$$ धारवाला. धार लावणार. सुरी, चाकू, कैची,कोयता, विळी अन् कानसला धार लावणार..ऐ$$ धारवाला..!" अगदी बरोबर दुपारच्या चहाच्या वेळेला किंवा सकाळी १०-११ च्या सुमारास. व्यवसायाची गणितं त्यांचीही पक्की होती. कारण घरातील बाई नेमकी ह्याच वेळात साधारण थोडी निवांत असते. त्याच बरोबर तिला पुढच्या स्वयंपाकाला सुरी विळीची घाई असते.
धारवाला रस्त्यावर आला किंवा एखाद्या गल्लीत आला की नेहमीप्रमाणे घराघरातून बायका त्यांच्या सुरी, कात्री, विळी क्वचित कोयता असं घेऊन धारवाल्याकडे आणून द्यायच्या. मग त्या त्या घरातली मुलं गंमत बघत बसायची. आपल्या वस्तू धार लावून झाल्या की ताब्यात घ्यायच्या आणि आईला किंवा काकू वगैरेला हाका मारायची.
'धारवाला त्या चाकावर सुरी कात्री घासायचा आणि ह्या बायकांची पैशावरुन घासाघीस चालायची.'
साधारण शनिवार रविवारच्या सुट्टीत किंवा मे महिन्याच्या सुट्टीत ठरलेला कार्यक्रम असायचा. विविध हत्यारांना धार लावणारा हा धारवाला कायम कुतूहलाचा विषय होता.
आजकाल आपण सोशल मीडियातून बऱ्याच वेळा वाचतो की महिंद्रा उद्योगाचे व्यवस्थापक आनंद महिंद्रा हे विविध 'जुगाड' करणाऱ्यांना भेट म्हणून गाड्या किंवा इतर वस्तु देत असतात. एवढेच काय तर व्यवस्थापनशास्त्रात किंवा त्या विश्वात 'जुगाड' नावाचं एक इंग्रजी पुस्तक देखील प्रसिद्ध झालेला आहे.
पण खरं सांगू का? जेव्हा 'जुगाड' हा शब्द ऐकिवात नव्हता किंवा त्याचा अर्थही माहीत नव्हता तेव्हा आमच्या सारख्या पिढीने पहिल्यांदा पाहिलेलं जुगाड कोणतं असेल तर धारवाल्याची सायकल आणि त्यावर फिरणारं Grinding Wheel ( धार लावणारा दगडी चाक)
अतिशय सोप्य पद्धतीने आणि कमी खर्चात केलेला सायकलचा उपयोग. Paddle फिरवून मागच्या चाकाला मिळालेल्या गतीचा केलेला चपखल उपयोग. सायकलचं Paddle मारल्यानंतर मागचं चाक फिरतं, फिरणाऱ्या चाकाच्या वेगाचा उपयोग करून विकसित केलेलं हे धार लावण्याचं तंत्र.
पूर्वी सायकलला डबल स्टॅण्ड असायचा. जो मागच्या चाकाला लावलेला असायचा. अर्थात डबल स्टॅन्ड सायकलची प्रथा गेली आता. त्या स्टँडवर सायकल उभी राहिली की मागचं चाक फिरवल्यावर नुसता हवेत फिरायचं. अर्थात हयाचा उपयोग करून त्याकाळी कोणाच्या डोक्यात ही सुपीक कल्पना आली त्याचं कौतुक करायला महिंद्रा नव्हते.
मागच्या चाकातील तारांमध्ये (spokes) एक मोठी Pulley (चक्री/कप्पी) लावून, त्या चक्रीतून एक जाड वादी (belt) (जाड दोरी) फिरवून ती दोरी सायकलच्या Handle ला जोडणार्या पुढील दांड्यावर असलेल्या छोट्या Pulley (चक्री/कप्पी) ला अडकवलेली असते. सायकलची चेन जशी एकसंध असते तशी ही वादी ही एकसंध असते. छोट्या चक्रीच्या दुसऱ्या टोकाला धारदार जाड ग्राइंडिंग व्हील (दगडी चाक) जोडलेले असते.
धारवाला सायकल स्टँडवर लावून त्यावर बसतो. दोन्ही पेडल सायकल चालवावी तशी जोरजोरात चालवतो. मागचं चाक जोरात फिरायला लागतं. अर्थात सायकल स्टँडवर असल्यामुळे ती पुढे जात नाही. मागचं चाक जोरात फिरत असतं फिरलेल्या चाकाची गती चाकात लावलेल्या मोठ्या चक्री च्या वादीतून वरील दांड्यावर लावलेल्या छोट्या चक्रीत Transfer होते. मोठ्या Diameter (व्यासाच्या) चक्रीतून जेव्हा ही गती छोट्या Diameter चक्रीला मिळते तेव्हा वेग हा कित्येक पटींनी वाढतो. अर्थात हे तंत्र फिजिक्स किंवा मेकॅनिकल इंजिनिअर ला लगेच कळेल. यामुळे पुढील छोटी चक्री जोरात फिरते आणि त्या चक्रीला जोडलेले Grinding Wheel (दगडी चाक) देखील कित्येक पटीने वेगाने फिरते. धारवाला त्या दगडी चाकाच्या दोन्ही टोकावर सुरी चाकू कोयता विळी यांची पाती वर पासून खाली पर्यंत चांगली चार-पाच वेळा फिरवून देतो. दोन्ही बाजुंनी फिरवुन झाली की आपली सुरी किंवा कात्री जी काही चकचकीत होते ना त्याला तोड नाही.
लहानपणी ही गंमत बघतांना सर्वात भारी वाटायचं जेव्हा कात्री किंवा विळी त्या दगडी चाकावर घासली जायची तेव्हा हवेत लांब लांब स्पार्क उडायचे. त्या स्पार्कची एक वेगळीच गुढ भीती आणि ओढ असायची. स्पार्कला हात लावावा असं वाटायचं. भीत-भीत हात जवळ नेला की " ये पोऱ्या मागे हो! चटका बसेल ना!" असं धारवाला ओरडायचा. आजही जेव्हा मी रस्त्यावर धारवाला बघत होतो तेव्हा तो चटका मनाला हुरहुर लाऊन गेला. आणि मग तुमच्या समोर लुप्त होत चाललेल्या कलेचा किंवा कौशल्याचा दुसरा भाग सादर केला.
आजच्या हया D-Mart, Dunzo, Big Basket आणि Amazon च्या जमान्यात, १९ मिनिटात घरात येणारी वस्तू. मग मला सांगा? कोण कशाला थांबेल चार-पाच दिवस धारवाला येईपर्यंत घरातल्या सुऱ्या आणि कात्र्यांना धार लावायला. तसं पाहायला गेलं तर धारवाले सुद्धा आहेत तरी कुठे आता! अजून अशीच एक कला व कौशल्य हळूहळू लुप्त होत चाललेलं आहे.
मला आज भेटलेले हे श्री. यंदलकर, गेली ३५-४० वर्ष हा व्यवसाय करतात. सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत धारवाले म्हणून व्यवसाय करतात. गणेशजी दुपारनंतर एका नामवंत वकिलाकडे कार्यालयात कर्मचारी म्हणून काम करतात. कौतुकाची बाब म्हणजे ते लहानपणापासून हे धार लावण्याचं काम करत आहेत. सध्या या धारेतून तसा धंदा होत नाही, पैसेही फारसे मिळत नाहीत. तरीही ही कला हे कौशल्य जिवंत राहवं, पुढच्या पिढीला कळावं म्हणून ते आवर्जून आठवड्यातील काही दिवस पुणे शहरातील विविध भागात फिरून धार लावण्याचं काम करतात आणि "धारवाले काका" म्हणून प्रसिद्ध आहेत.
फोटो, व्हिडिओ काढून आणि माहिती घेऊन निघालो. काका म्हणाले "साहेब, प्रत्येक सुरी- कात्री मागे किती रुपये मिळतात हयापेक्षा धार लावण्याची आणि लावण्यासाठी वापरत असलेली आजोबांपासूनची ही सायकल चालती बोलती राहते आणि तिची धार लावण्याची कला जिवंत राहते हाच अनमोल मोबदला आहे"
खरंच ह्या शब्दांनी निघता निघता माझ्या विचारांनाही धार लावून गेले.
- मिलिंद सहस्रबुद्धे
२१-०५-२०२२
ता.क.
आणि हो..तुम्हाला जिभेची धार बघायची असेल तर, दुपारी १ ते ४ वेळेत पुण्यात पेठेतल्या कोणत्याही घरी जाऊन पत्ता विचारा..
हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...