Wednesday, February 13, 2019

पुण्यात "दिक्षित Diet".......सकाळी सकाळी पक्या गैरज वर आला. नेहमीप्रमाणे माठातलं ग्लासभर पाणी घेतलं आणि तोंडातल्या माव्याची

सकाळी सकाळी पक्या गैरज वर आला. नेहमीप्रमाणे माठातलं ग्लासभर पाणी घेतलं आणि तोंडातल्या माव्याची यथेच्छ चुळ भरली दुकानासमोर. एकदम जोरात सुरुच झाला.. "धक धक करने लगा। ओ मोरा जियारा डरने लगा । संज्या, अन्या छोड ना तू दीक्षित की माधुरी बोल ना..."
अरे पक्या काय बे हे नवीन खुळ..
विक्या तु वाचलं का..भावा पुण्यात माधुरी उभी रहणार २०१९ ला...
च्यायला विकी हे म्हणजे दुधात रम घालून प्यायलेल्या त्या घाणेकर पेग सारखं रे... एकदम कडडेक...
परत कोणी विचारलं तर मानेला झटका दिला आणि म्हटलं "उस्मे क्या है" कि झालं.
मला आत्ताच कसं कसं होतं लेका. ती प्रचारासाठी पुण्यात सभा घेणार. प्रभात फेऱ्या सांज फेऱ्या दुपार फेऱ्या मारणार वेगवेगळ्या प्रचारफेऱ्या मारणार. साला जिची एक झलक मिळावी यासाठी आपण कित्येक मुंबई ट्रिप मारल्या. ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर तीच्या पिक्चरच्या गप्पांवर वील्सची पाकिटं संपवली. गुडलकच्या त्या कासिमशेटच्या चहाच्या उधार्या केल्या आणि जिंदगीभर झुरलो ती. ती माधुरी साक्षात आपल्याच शहरात आपल्याला जवळून दिसणार.
मानलं भावा आपण ह्या दाढीवाल्या जोडीला. काय खेळी केलीय.. चित भी मेरी पट भी मेरी.
आता हया मॅडम उभा राहिल्यावर खुद्द विरोधी पक्षाचा उमेदवार पण माधुरी म्हणलं की स्वतः तिलाच मतदान करणार मग कार्यकर्त्यांचा काय घेऊन बसलाय.
नदी किनारा मेट्रो कामामुळे जो गचाळ झाला आहे तो एकदम नवतरुण आणि नवीन पालवी फुटल्यासारखा तिच्या सभेने भरुन जाणार. बहुतेक आत्तापर्यंतच्या पुण्यातल्या सभांचे सर्व रेकॉर्ड मोडणार आहाहा...
तसंही आपल्या देशात माणूस आणि कामं बघून कोण मतदान करतो. तसं असतं तर कित्येक जण कायम कार्यकर्तेच राहिले असते. मागच्या वेळी नाही का त्या ओम नमामिच्या सुनामी लाटेमध्ये कित्येक लोकांनी आंघोळ करून घेतली.
तीच नक्की निवडून येणार बघ तु.
आपला चीची गोविंदा जर (श्री)रामाला मुंबईमध्ये धारातीर्थी करू शकतो तर..ही तर साक्षात अप्सरा "मेनका" तिच्यापुढे भलेभले "विश्वामित्र" गळून पडतील. आणि तसंही तिच्याजवळ स्वतःचे हक्काचे "श्रीराम" आहेतच आशीर्वाद द्यायला.
अजून एक बरं का होइल ती आली तर, शहरातल्या विविध फ्लेक्सवर तिचे सुंदर फोटो फ्लेक्सवर पुढील पाच वर्षे झळकतील आणि आपल्याला रोज नव्याने बघायला मिळतील. अधून मधून आपल्या रोजच्या पुणे वर्तमान पेपरमधे तिच्या बातम्या, येथील विविध उद्घाटनं, संमेलनं, जाहीर कार्यक्रम यानिमित्ताने तिला सारखं पुण्यात बघायला मिळेल.
नाही तरीही नेहमीच्या "तर तराट" चेहर्यापेक्षा ही अस्सल साजुक वाइन बरी नाही का?
परत दीक्षित असल्यामुळे पुणेरी पुणेकरांची मान दोन इंच अजुन वर जाईल. एक ते चार ऐवजी बारा ते पाच दुकान बंद ठेवतील हे पुणेकर.
त्या जगन्नाथ दिक्षिताचं नाही पण हे दीक्षित डायट्स पुण्याच्या पुणेकरांना नक्कीच वेड लागेल बघ.
हा आता काही लोकांना थोडा त्रास होईल आत्तापासूनच. मिसळवाले बापट यांना दीक्षित डायटनं आपला व्यवसाय बंद पडणार की काय ही भीती सतावायला लागलीय. तर तिकडे कार्तिकातल्या "काकड" आरत्या मध्ये भाकरी वरचे लोणी नाहीसं झालं म्हणे. आणि हो डेक्कनवर विविध हॉटेल्स रेस्टॉरंट्स बंद पडणार की काय यामुळे मालक चिंतेत आहेत, की आपलं दुकान चालू राहणार की पुढच्या खेपेला बंद पडणार.
गावठाणात मात्र "घड्याळावर" विविध "हातांनी" जोरदार गजर लावायला सुरुवात केली म्हणे. त्यातले तर प्रत्येक जण शाहरुख होण्याचा तयारीत आहेत. कारण हरणार हे नक्की. पण मग "हारकर भी जितने वाले को बाजीगर कहते है" हा डायलॉग म्हणायला मोकळे.
हाहाहा...जाम खुष आहे बघ आज मी. आज बबनला म्हणाव कटींगच्या ऐवजी दोन कडक कॉफी.. आणि हो..आज की कॉफी अपनी तरफसे बिडू.....
कॉफी पितांना विक्या म्हणाला..."पक्या
शेवटी आपल्याला काय फरक पडतो रे भाड्या. सिंहासन मधल्या त्या डायलॉग सारखे दाभाडे आले काय किंवा शिंदे आपली हजामत का सुटणारे. आपल्या जीवनात काही फरक पडणार आहे का"
"तसंच दीक्षित आले काय किंवा आणखी कोणी, पीएमटी थोडीच सुधारणा रे, ना हे ट्राफिक कमी होणार आहे आणि पाण्याचा प्रश्न सुटणार आहे का ? रस्ते चांगले होणार आहेत का, की फुटपाथ मोकळा श्वास घेणार आहेत...सर्व जैसे थे च राहील.."
"तेव्हा ह्या दिक्षीत डाएटनी पुण्याचा डाएबेटीस काही बरा होणार नाही लेका..."
-----मिलिंद सहस्रबुद्धे ©

1 comment:

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...