Wednesday, September 8, 2021

रोहित मुंबईकर ; शर्मा दिल्लीवाले

 "रोहित मुंबईकर ; शर्मा दिल्लीवाले"

"ठेविले अनंते तैसेची रहावे|| चित्ती असू द्यावे समाधान||" या रामदास स्वामींच्या श्लोकाचा अर्थ, क्रिकेट जगतात कोण तंतोतंत अवलंबत असेल तर तो रोहित शर्मा. मैदानात किंवा मैदानाबाहेर आणि वैयक्तिक जीवनात सुद्धा एकंदरीत त्याच्या चेहऱ्यावरून आणि देहबोलीवरून तो कायम अशाच वृत्तीचा असेल असे वाटते. फारशी कुठल्या गोष्टीची चिंता, इर्षा न करता Casual  कसं राहावं तर रोहित शर्मा सारखा.  कॅप्टन केलं तर जिंकायचंच आणि नुसताच फलंदाज म्हणून घेतलं तर तडाखेबाज फलंदाजी करायची. 

रोहितला मैदानावर मॅच चालू असताना कधीही अति प्रतिक्रिया देतांना किंवा प्रतिक्रियात्मक देहबोली मध्ये  बघितलेला फारसं आठवत नाही. फलंदाजी करताना सुद्धा एखादा सुरेख शॉट अगदी casual करून टाकण्याचं कसब त्याच्यात आहे. कडक कव्हर ड्राईव्ह मारणं, लेगला पुल मारणं हा सर्वसामान्य फलंदाजांसाठी कौतुकाचा विषय असतो. इतरांसाठी महत प्रयास करून मारल्यासारखं किंवा ठरवून मारल्यासारखं वाटतं. ते सगळे शॉट रोहित इतके सहज म्हणून मारुन जातो की त्या शॉटची किंमतच राहत नाही.  Shot मारल्यानंतर कोणतेही विजयाची भावना नाही.  तर उलट त्याच्या चेहऱ्यावर "चल मारला बे एक" असा त्याचा नागपुरी खाक्या दिसून येतो.  त्याचा हाच Casualness ही त्याची शैली आहे. 

बहुतांश प्रमाणात तंत्रशुद्ध खेळ आणि हाच Casualness  व्हिवियन रिचर्डस मध्ये होता. अर्थात रोहित हा रिचर्डस सारखा भेदक बेदरकार आक्रमक नाही. परंतु रोहितचा दरारा व त्याची भीती ही कायम मैदानावरील 11 खेळाडूंवर सतत असते जोपर्यंत तो मैदानावर असतो. 

रोहित शर्मा नेहमी मला एका संगमा मधून निर्माण झालेला प्रॉडक्ट आहे असं वाटतं. सचिन आणि सेहवाग यांच्या ओपनिंग जोडी च्या कारकिर्दीच्या संगमातून निर्माण झालेलं एक प्रॉडक्ट.  अर्थात त्याच्या नावात पण तो संगम दिसून येतोच.  

रोहित  typical महाराष्ट्रीय नावाप्रमाणे मुंबईकर आहे. सचिन सारखाच लयबद्ध फलंदाजी करतो, तो प्रत्येक शॉट सहज सोपा करून टाकतो. सध्याच्या भल्याभल्या फलंदाजांच्या नावावरचे विक्रम मोडून टाकण्याची ताकद, कौशल्य आणि तंत्र त्याच्याकडे आहे.  अर्थातच एवढं सगळं असून तो त्या कॅटेगरी मधला मुलगा आहे जिथे आई-बाबा किंवा नातेवाईक त्या मुलाला म्हणतात ना " ह्यानी ना! मनावर घेऊन अभ्यास केला तर बोर्डात पहिला येईल इतकी बुद्धिमत्ता आहे पण लक्षच नसते ह्याचं "  तसं काहीसं आहे रोहितचं. त्याची Casualness जीवनशैलीच त्याला कधी कधी त्रासदायक ठरते.

प्रत्येक फटक्यात इतकी लयबद्धता आणि सहजता असते. शॉट मारल्यानंतर सचिन सारखीच चेहऱ्यावर शांतता. फार काही पराक्रम गाजवला अशी कोणतीच भावना नाही. अर्थात कॅप्टन्सी करताना सुद्धा गोलंदाज जास्त धावा देत असेल किंवा एखादा झेल सुटला किंवा misfield झालं तरी तो कोणताही आरडाओरडा करत नाही.

सर्वसाधारण मुंबईकर क्रिकेटपटूंचा हातखंडा असतो तो म्हणजे ड्राईव्ह. त्यावर रोहितचं कौशल्य आहे. मग तो स्ट्रेट ड्राईव्ह असेल किंवा कव्हर ड्राईव्ह. Improvise होऊन पुढे येऊन किंवा जागेवरून  जेव्हा तो सहजतेने सिक्स मारतो तेव्हा रनला पळायची गरज नाही आणि Ball स्टॅन्ड मध्ये जाणार आहे ह्याची त्याला आणि प्रेक्षकांना दोघांनाही खात्री असते. 

त्यानी मारलेले भले भले shot easy go वाटतात. ही मला आवडणारी त्याची खासियत.

मुंबईकर क्रिकेटपटूंना जन्मजात जो फिटनेस असेल तोच कायम.  बाकी वेगळा काही फिटनेस किंवा तब्येत यांच्याशी त्यांचा काही घेणंदेणं नसतं फारसं. अगदी तसाच रोहित पण आहे थोडं पोट सुटलेलं आणि अंगावर मांस चढलेली शरीरयष्टी. परंतु याचा त्याच्या फलंदाजीवर यत्किंचितही परिणाम होत नाही. कारण त्याला Skill & Technique matters हे वाक्य पक्क माहिती आहे.  रोहितने मारलेला शॉट हा एखाद्या प्रेयसीने चेहऱ्यावर अलगद फिरवलेला हाता सारखा वाटतो. जी भावना शब्दात मांडता येणारच नाही. 

फॉर्ममध्ये यायला थोडा वेळ लागतो पण एकदा का हिटमॅन फॉर्म मध्ये आला की मग विचारता कामा नाही.  समोर फास्ट बॉलर असो अथवा स्पिनर  काही फरक पडत नाही. फक्त दिसत असतो समोरच्या स्टॅन्ड आणि बाउंड्री लाइन्स. 

असा हा रोहित, नावाने मुंबईकर आहे तर त्याच्या आडनावा प्रमाणे म्हणजे शर्मा दिल्लीकर आहे.  म्हणजे आपल्या वीरेंद्र सेहवाग सारखा. इथं तो मुंबईकर असल्यासारखं स्वतःच्या स्कोर बोर्ड ची काळजी करत नाही. आधी ५० नंतर १०० अशी टारगेट घेऊन खेळत नाही.  पराठा आणि लस्सी समोर आल्यावर जसा अस्सल दिल्लीकर किती पराठे खाल्ले आणि किती टंपास लस्सी प्यायला ह्याला कधीच किंमत देत नाही. उलट लसीचा तो पटियाला पेग कसा एका दमात संपवला आणि प्याज का पराठा कसा दोन घासात खाल्ला याचाच अभिमान त्याला जास्त वाटत असतो.  अगदी तसंच रोहित पण किती रन केले यापेक्षा उत्तुंग चौकार आणि षटकार किती मारले यातच रमतो.  

तो पन्नास-साठच  करेल पण असे करेल कि ती Innings  बघितल्यावर प्रेक्षकांना आता पुढची मॅच घरी जाऊन बघू असं वाटलं पाहिजे. इतके विलोभनीय आणि मनसोक्त आनंद देणारी ती फलंदाजी असते.

आजच्या Oval Test मध्ये सुद्धा त्यानी SIX मारुन भारताबाहेरचं पहिलं शतक फटकावले. आजच्या विजयात त्याची प्रमुख भुमिका होती. 

तसेही म्हणतातच ना मुंबईकर डोक्याने (तंत्र शैलीने) खेळतो, तर दिल्लीकर जिगरबाजपणे खेळतो. तसंच हे  जॉइंट व्हेंचर प्रॉडक्ट भारतीय क्रिकेटला मिळाले आहे 

"रोहित मुंबईकर" "शर्मा दिल्लीवाले"

© मिलिंद सहस्रबुद्धे

०६/०९/२०२१

तळटीप:- काही इंग्रजी शब्द वापरले आहेत. मीपण जरा रोहित style मोजून मापून पण बिनधास्त लिहिले आहे.

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...