Saturday, May 30, 2020

T(ती)चा चहा

T(ती)चा चहा

      "रुपाली, आज असा काय झालायं गं चहा! नेहमीसारखा नाही झालाय. बघ काहीतरी कमी आहे, काय ते सांगता येत नाही". असं जेव्हा असतं ना 'काय ते सांगता येत नाही' ही चव ज्याची त्याची असते. तो किंवा ती कोणीही असेल ती ते नीट सांगू शकत नाही.

'चहा' आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक.  म्हणे चीनमध्ये त्याचा शोध लागला आणि साहेबांनी म्हणजे ब्रिटिशांनी त्याला भारतात आणला. तो हा चहा, चाय, टी आणि अशी बरीच काही नाव आहेत त्याला. 
या चहाची एक चव असते विविध प्रदेशात, विविध लोकांना, विविध वेळी आणि विविध ठिकाणी वेगवेगळी ती असते. कोणाला खूप गोड आवडतो तर कोणाला कडक स्ट्रॉंग लागतो.  कोणाला वेलची घातलेला तर कोणी मसाला घातलेला. कोणाला आलं (अद्रक) पाहिजेच चहात. कोणाला दुधाचा तर कोणी बिन दुधाचा. लेमन टी, ग्रीन टी, जास्मीन टी वगैरे वगैरे. अजून असे चहाचे बरेच प्रकार आहेत पण 'ज्याचा त्याचा चहा वेगळाच असतो'. आणि काही झालं तरी त्याला तोच चहा आवडतो.

 कोणाकडे पाहुणे म्हणून आपण गेलो की चहा दिला जातो. अगदी तो चहा पिऊन सुद्धा आपण त्यांचे आदरातिथ्य आणि ते कुटुंब कसे आहे ते ठरवत असतो. उदाहरणार्थ बघा हं... "काय बाई पांचट चहा दिला! नुसतं उकळलेले गोड पाणी".  किंवा मग आपण चहा पितो आणि "चहाचे कप काय सुंदर होते ना! ऐक ना आपल्याकडे पण असेच कप आणा ना". "इतका गोड चहा की काय विचारू नका. माणसं मात्र गोड नव्हती हो!" अशा अनेक कमेंट्स आपण एक कप चहावर त्या कुटुंबाच्या बाबतीत बोलत असतो पास करत असतो. सर्वात भारी म्हणजे "काय एवढं मोठं घर, पण साधा कपभर चहा पण विचारला नाही गं!" त्यावर ही कुरघोडी.

म्हणजे बघा ना चहा हा आपल्या दैनंदिन जीवनात पाणी, हवा, वीज ह्यां सारखाच महत्त्वाचा घटक होऊन बसलाय. अर्थात काही लोक चहा पीत नाहीत पण मी कधीच चहाला नाक मुरडणारी माणसं पाहिली नाहीत. एकवेळ मी चहा पीत नाही असं म्हणतील फारतर. तीच नाकं कॉफीला मात्र मुरडली जातात.  कॉफी ज्या लोकांना आवडते ती लोकं कडवट कॉफी आवडीने पितात. परंतु चहाप्रेमीला कडवट चहा अजिबात चालत नाही.

जसं लोकांना 'मी खूप चहा प्रेमी आहे' हे सांगायचा अभिमान असतो ना, तसा वयाच्या एका टप्प्यानंतर 'गेली काही वर्ष मी चहा सोडलाय' हे सांगण्यात पण एक अभिमान वाटतो. म्हणजे बघां ना चहा एक प्रकारे माणसाच्या अभिमानाची गोष्ट होऊन बसते.

पावसाळ्यातला चहा, हिवाळ्यातला चहा, अगदी उन्हाळ्यातला पण चहा अशी चहाची विविध ऋतूत वेगवेगळी रूप आहेत. भर पावसात तो प्रियकराच्या रुपात भेटतो,  हिवाळ्यात छान मऊ गोधडीच्या रूपात ऊब घेऊन येतो. उन्हाळ्यात म्हणाल तर, कष्ट करून थकलेल्या घामाने भिजलेल्या शरीराला एक नवचैतन्य देऊन जातो. असा हा चहा.

मित्रांबरोबर दोनात एक किंवा तिनात पाच ची काही मजाच वेगळी असते. तेव्हा सुद्धा हा चहा आपल्यातलं थोडंसं दुसऱ्याला शेअर करणारा वन बाय टू मित्र होऊन जातो. सिगरेट बरोबरची चहाची लव्हस्टोरी तर विचारायलाच नको. जी लोक एन्जॉय ती करतात त्यांना स्वतःच्या जीवनातील लव्हस्टोरीचा पण विसर पडून जातो. इतकी समरस होऊन जातात हे दोघं; प्रियकर चहा आणि प्रेयसी सिगरेट एकत्र येतात तेव्हा.

सणासुदीला नातेवाईकांची मैफल जमली आहे, दुपारची गोडधोड आग्रहाची जेवणं झाली आहेत. थोड्याफार झोपा होतायत. अशा वेळी मग गप्पांचा फड रंगतो आणि त्या फडात हा चहा जी ढोलकी वाजवतो नां! आहाहा क्या बात! मग चहाला वन्स मोर मिळतच राहतात. संध्याकाळ होईपर्यंत मग चार-पाच घुटका घुटका चहाच्या राउंड झालेल्या असतात सर्वजण पांगेपर्यंत.

समारंभा मधून चहापान, चहा सुपारी हा एक  औपचारीक कार्यक्रम असतो. तिथे हाच चहा अगदी मोजक्या स्वरूपात कप आणि बशी मध्ये गंभीर होऊन सिपसिप घेतला जातो.

"माझ्या हातचा चहा पिऊन बघाच!" असे म्हणणारं कोणीतरी प्रत्येक घरात एक जण सापडेलच. काय कॉन्फिडन्स निर्माण करतो ना एखाद्या साधातल्या साध्या माणसां मधेसुद्धा हा चहा. त्या प्रत्येकाला उगाच वाटत असतं आपण फार भारी चहा करतो. समोरचा पण मग तोंडदेखलं कधी खरं कधी खोटं "झ्याक झालाय चहा!" असं म्हणतोच. मग काय आमचा कॉन्फिडन्स डायरेक्ट एवरेस्ट वरच.

नवऱ्याचा हातचा चहा पिणे हा बायकांसाठी एक विलक्षण प्रेस्टिज ईश्यू असतो. "आमचे हे(अहो) कधी साधा चहापण करत नाहीत" या वाक्यात जो अवर्णनीय आनंद आहे ना, तो त्या बाईला नवऱ्याने पैठणी जरी आणून दिली तरी होत नाही. इतकं साधं गणित असतं पण पुरुष मंडळींना उमगतच नाही.

मुलीच्या लग्नाची बोलणी ठरवणारा हा चहा. तिच्या वैवाहिक जीवनात लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर सकाळी नवर्‍याला तिच्या हातची चव काय आहे हे सांगणारा हा चहा. संध्याकाळी दमून भागून घरी आल्यावर त्याला आनंद देणारा तिच्या हातचा चहा.
चहा पिऊ नकोस लहान आहेस असं मुलांना संस्कार देणारा, शिकवणारा हा चहा. सासू-सासर्‍यांना कप-बशी हातात नेऊन देणारा, तिचा आपुलकीचा हा चहा.
घरातल्या पै पाहुण्यांना तिचं आदरातिथ्य किती वाखाणण्याजोगं आहे, हे दाखवणारा हा चहा. घरची कामवालीला वाईस घोटभर देऊन माणसं जोडून ठेवणारा हा चहा.
आणि स्वतः हे सगळं घर सांभाळताना शेवटी घोटभर उरलेला पितांना, एक परीपूर्ण समाधान देणारा तिचा हा चहा.
असा हा चहा तिच्या अथपासून इथिपर्यंत सदैव साथ देणारा जवळचा मित्र आणि सखाच असतो जणू.

असा हा कपभर, गोड तपकिरी रंगाचा चहा. प्रत्येकाच्या जीवनात आनंदाच्या क्षणी आनंद द्विगुणित करतो. नैराश्याच्या वेळी पाठीवर हात फिरवून नवी उमेद देतो. यशाच्या शिखरावर असताना एक झिंग चढवतो. दु:खद प्रसंगी दोन घोट भेटून दुःख हलकं करतो. एकात दोन होऊन मग अनोळखी माणसं जोडतो. पदोपदी आपल्याला साथ देत, सुखदुःखात सहभागी होत, नकळत आपलासा होऊन राहतो.
असा हा तुमचा आमचा चहा...

चला तर मग, होऊन जाऊ दे, ह्या आपल्या चहासाठी एक चहा....

धन्यवाद
© मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ पुणे ३०

Monday, May 4, 2020

मकबूल फिदा खान....


मकबूल फिदा खान....

हॉलीवूड मधील डेंजील वॉशिंग्टन हे नाव असं आहे की, "एखादा इंग्लिश मूवी बघू, अरे डेंजील वॉशिंग्टन आहे का? चल भारी असेल मग". जरा तसंच हिंदी पिक्चरच्या वेळेस "इरफान आहे का? तर मग बघूच, चांगला असेल नक्की" असं वाटावं असा Born Actor.  ज्याच्या फक्त नावामुळे पिक्चर बघावा, त्या पिक्चर मध्ये आपल्याला काहीतरी बघायला मिळेल असं वाटावं.
वास्तववादी पिक्चर बघायची ज्यांना आवड आणि नशा आहे ना, त्यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीने काही हिरे नेहमीच राखून ठेवलेले आहेत. अर्धसत्य मधला घामाघूम होवून धावत पळणारा इन्स्पेक्टर ओमपुरी असेल, "मुंबई का किंग कौन? भिक्कू म्हात्रे" म्हणणारा मनोज वाजपेयी असेल, सरकार मधला के के मेनन असेल, नाहीतर मग "भाई.. सोडा बाॉटल की किंमत तब तक जबतक की वो बंद...जैसे ही बुच खुला...फुस्स..झाग बह जाता है...रह जाता है क्या...पानी" वाला आन मधला पठाणवाडीतला पठाण इरफान खान असेल. हया सर्वांचा एक वेगळाच वरचा क्लास आहे. म्हणजे दहावी फ असून सुद्धा हे सगळेजण बोर्डात आलेले आहेत.
हो बरोबर ओळखलंत..आज इरफान खान.
उत्तर प्रदेश मधील पठाणी कुटुंबात जन्मलेला एक साधा युपी का लौंढा. मला तो सापडला तो हासिल नावाच्या जिम्मी शेरगील नामक हिरोच्या पिक्चर मध्ये. विद्यार्थी राजकारणावर बेतलेला चित्रपट. त्यात इरफाननी व्हिलनची भूमिका केली होती. टिपिकल उत्तर प्रदेश मधला रणविजय सिंग नावाचा नेता.  यूपीच्या बॅकग्राऊंड वरून असलेल  हे पिक्चर. त्यामुळे इरफान साठी जणू  होम ग्राउंडच होतं. त्यानी त्याचा पुरेपूर फायदा उठवत त्या भूमिकेचं सोनं केलं. त्याला त्या वर्षीचं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. साधारण 2003-2004 साल असेल.
कायम पारोसा दिसणारा चेहरा, बटबटीत बाहेर आलेले डोळे, अगदी अर्धवट वाढलेली दाढी आणि बोलताना एकीकडे सतत लवंग किंवा काहीतरी खातोय असं वाटावं असा लूक.
तो कितीही मोठा सेलिब्रिटी झाला ना तरी या लुक मधून बाहेर येऊ शकला नाही, अगदी ऑस्कर समारंभातपण. पण हाच त्याचा लुक भल्याभल्यांना वेड करून गेलाय हे मात्र नक्की.
अभिनय ही तर जबरदस्त ताकदीची बाजू होतीच पण सगळ्यात उजवी आणि महत्त्वाची बाजू म्हणजे डायलॉग डिलिव्हरी. त्याचा प्रत्येक डायलॉग, डिलिव्हरी साठी कायम लक्षात राहील.  भूमिका फक्त चित्रपटापुरती नाही तर ती वास्तववादी आहे आणि खरंच कोणीतरी असा माणूस आहे, असं वागतोय असं वाटावं इतकी तो ती भूमिका आणि त्याचा अभिनय हुबेहूब करायचा. कित्येक वेळा आपण एखाद्या रस्त्यावर किंवा नाक्यावर एखाद्या टिपिकल पान खात चाललेला माणूस पाहिला ना की उगाच आठवतं च्यायला साला इरफान त्या अमुक पिक्चरमध्ये तमुक रोल हुबेहूब करून गेलाय. हेच तर त्याच्या यशाचं गमक होतं असं वाटतं.
अर्थातच एनएसडी मधील शिक्षण. हे शिक्षण काही औरच असतं. इथं तुम्हाला शबनम आणि चप्पल घालून जमिनीवरच सत्य अनुभवायला शिकवतात. एकदा का जमिनीला कान लावून शिकलात ना! की मग उंच उड्या मारायला आरामात जमतं. भीती वाटत नाही. जमिनीवर परत खाली येताना पडायची भीती नसते, कारण आधी कित्येक वेळा तिच्यावर पडून आणि आपटून झालेलं असतं.
हासिल पिक्चर नंतर, हया हिऱ्याला स्पर्श झाला तो गुलजार नामक वडाच्या सावलीत वाढणाऱ्या विशाल भारद्वाज ह्या जौहरी दिग्दर्शकाचा. मकबूल...बास मग अजून काय हवं होतं. आप, मै और बॅगपायपर सारखी बैठक जमून आली. आणि ती आल्यावर मैफल तो रंग लानी ही ती. सिर्फ रंग नहीं लायी तर पुरे दुनिया में छा गई.
इरफान खान हे नाव इंटरनॅशनल लेव्हलवर झळकू लागलं.  कसं असतं बघा, सर्वसाधारणपणे राहुल आणि सिमरन मागे असणारे सगळे चाहते, अचानक त्यांना इरफान आवडायला लागला. तोपर्यंत हा माणूस त्यांना कुठेच दिसला नाही. बिचारा 1988 च्या सलाम बॉंबे पासून ते मग मकबूल 2004 ला रिलीज होई पर्यंत विविध छोट्या-मोठ्या भूमिका यशस्वीपणे करत होता.  पण आपल्याकडे सामाजिक दृष्टीकोनाच्या काचा नेहमी अधूनमधून गाडीच्या वायपर सारख्या हलवून साफ कराव्या लागतात. मगच आपल्याला दिसतात ओम पुरी, नासिरउद्दीन शाह, गिरिष कर्नाड, मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि इरफान खान ...असे बरेच जण.
मकबूल पासून मात्र इरफानने मागे पाहीलेच नाही. आमच्या पब्लिक नी पण त्याला डोक्यावर घेतलं.  मग नॅशनल, इंटरनॅशनल विविध चित्रपटांमध्ये तो झळकू लागला.  शाहरुख बरोबर बिल्लू बार्बर, अमितजींबरोबर पिकू, अक्षय कुमार बरोबर आन असे बरेच कमर्शिअल सिनेमे तर केलेच. त्याच वेळेस लंचबॉक्स, पानसिंग तोमर, मदारी यांसारखे वास्तववादी पिक्चर करून तो कायम याद राहिला.
हॉलिवूड मध्ये Slumdog Millionaire, Jurrasic Park आणि त्याचा अतिशय गाजलेला Life of Pie. हया चित्रपटांमुळे तर तो अमेरिकेच्या चंदेरी दुनियेत नावाजला गेला. एक मात्र कायम दिसून आलेलं आहे की, ऑस्करच्या वारीत तुम्ही चंदेरी दुनियेत झळाळणारे स्टार असायलाच पाहिजे असं नाही आणि तिथं गुलछबू चेहऱ्यांची गरज नाही. तुम्ही जर हाडाचे नट असाल तर हॉलीवुड कायमच तुम्हाला त्याच्या साम्राज्यात सहभागी करून घेतो. ओम पुरी पासून ते इरफान खान पर्यंत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
पानसिंग तोमर हा माणूस पुढील कित्येक वर्षांनी इरफाननीच आपला आत्मचरित्र चित्रपट करावा म्हणूनच जन्माला आला होता की काय असं वाटावं, इतका जिवंतपणा त्या पिक्चर मध्ये इरफानने आणलेला आहे. "बिघड मैं बागी होते है साहीब, डकैत मिलते है पार्लमेंट मे!" हा त्याचा डायलॉग इतका जबरदस्त होता की देशाच्या राजकारणाचं कसं चंबळचे खोरे होत चाललंय याची जाणीव हा डायलॉग वेळोवेळी करून देत गेला.
असा हा आपला पानसिंग, कॅन्सरची रेस जिंकण्यासाठी त्याच तळमळीने धावला कधी जिंकला तर कधी हरला. पण  न डगमगता लढतच राहिला. मागच्या आठवड्यापासून शेवटची रेस होती आणि ती लालफित क्रॉस करण्यासाठी, जिंकण्यासाठी त्यांनी दाखवलेली जिद्द खरंच संस्मरणीय राहील. आयुष्याच्या शर्यतीत जरी ती लालफीत तो क्रॉस करू शकला नसला तरी लोकांच्या ह्रुदयात त्याच्या नावाचा लाल रंगाचा हार्ट शेप कायम ठेवून गेला.
शेवटी त्याच्याच एका D- Day  नावाच्या पिक्चरमधील डायलॉग आठवतो
"सिर्फ इन्सान गलत नही होते. वक्त भी कभी  गलत हो सकता है"

© मिलिंद सहस्रबुद्धे
०१/०५/२०२०

समुद्र...... प्रत्येकासाठी वेगळा असतो...

समुद्र...... प्रत्येकासाठी वेगळा असतो.

प्रेमींसाठी नभ-धरा मिलनाचा किनारा असतो..
शोध घेणा-यासाठी सागरतळ एक गूढ असतो..
बाल मनासाठी तो एक लाटांचा खेळ असतो..
तर एकांतात आपलासा वाटणारा मित्र असतो..

मलापण समुद्राचं हे अनाकलनीय आकर्षण नेहमीच विचार करायला लावणारं आहे.
हया विचारमंथनातूनच समुद्र आणि मानवी आयुष्याचं जे संलग्न नातं आहे ते सुचत गेलं आणि तेच मांडण्याचा मागील आठ दिवस प्रत्येक दिवशी माझ्या फेसबुक स्टोरीमध्ये प्रयत्न केला.
आज आठवड्याच्या आठवणी एकत्र गोळा करून तुमच्यासमोर मांडतोय. बघा आवडतायत का!!

© समुद्र......खोल
आत आत जात गेलं की वरवरचं वाटणारं काळं वाळूने गढुळलेलं पाणी स्वच्छ पारदर्शी होऊ लागतं. सागर तळाशी असलेला वाळूचा प्रत्येक कण स्पष्ट दिसू लागतो. आपण म्हणतो वाळू काळी आहे पण तळाशी तर ती कायम सफेद, पांढरी स्वच्छच असते.
मानवी मनासारखंच की, वरवरची वहात आलेली विचारांची वाळू जरी काळी गढूळलेली असली तरी अतंरगच्या तळाशी जन्म घेतांना उरलेली नाळ निरागसच असते..
जेवढं खोल जाऊ तेवढं हे निरामय निर्गुण विश्व उलगडायला लागतं.

© समुद्र.....अथांग
किनार्यावर उभं राहीलं ना की आपोआप समुद्राच्या आणि मनाच्या अथांगतेतची व्याप्ती कळते. क्षितिजावर दूर धुसर दिसणारं शिडाचं गलबत बघत राहीलं की हळूहळू अगदी स्पष्ट दिसायला लागतं. कदाचित मनानं आपण त्याच्या इतकं जवळ पोहचतो की त्याचं  टोकदार आकार, शिडावर फडफडणारं ते कापड, कच्चीपक्की ती नाविकाची खोली, बाहेर पडलेलला नांगर,सामान असं बरंच काही दिसू लागतं..
पलिकडच्या किनार्याचा पत्ता न लागू देणारा समुद्र हा मनासारखाच..अथांग....
दुसरं टोक कधीच दिसत नाही आणि मग ते शोधण्यासाठी विचारांच्या गलबतातून केलेला प्रवास... आयुष्य

© समुद्र......किनारा
समुद्रात भरती ओहोटीचे खेळ सुरु असतात. ह्या सगळ्यात स्तब्ध असतो तो किनारा. जसा
भरतीच्या उसळणाऱ्या बेधडक लाटा झेलतांना तो भावनिक ओलावा दाखवतो, तेवढाच तो तीच लाट जेव्हा ओहटीला मागे निघून जाते तेव्हा तो कणखरपणे स्थितप्रज्ञ असतो.
कोण्या चंद्राचं गुरुत्वाकर्षण पण त्याचं संगोपन करतो तो अभेद्य किनारा.
मनाचा कारक चंद्र असतो असं म्हणतात तर त्याच्या विचारांच्या गुरुत्वाकर्षणाची भरती ओहटी झेलतो तो किनारा...मेंदू

© समुद्र......वाळू
अनेक आकार, चित्र, नक्षी, अक्षरं सगळं काही काढता येतं हीच्यावर...केवढा मोठा तो कॅनव्हास..थकून जाईल एखादा..
मुठीत घट्ट पकडून हा कॅनव्हास कायमचा घरी न्यावा म्हंटलं तर..पकडलेल्या क्षणी निसटून जाणारी ही वाळू..
मानवी मनाचं ही असंच, एक विचार अनेक आकार, ऊकार,विकार निर्माण करतो. कॅनव्हास म्हणाल तर अनंत अनादी. ते सर्व साठवून ठेवावं म्हंटलं तर पुढच्याच क्षणी आलेला विचार मागचं सगळं पुसुन टाकतो...लाट आल्यावर जसं वाळूतलं चित्रकाम वाहून जातं...
वाळू आणि मन...पकडून ठेवता येत नाही...

© समुद्र.....लाट
विविध लाटा काही शांत, काही रेंगाळणाऱ्या, काही जोरात धडकून मगच शांत होणार्या, तर काही रौद्र रूपात खवळलेल्या...हे खेळ  किनार्यावरच चालतात फक्त. समुद्रात मध्य भागात खाली कायम नीस्सीम शांतताच असते..
आयुष्यात येणाऱ्या विविध किनार्यांवर विचारांच्या लाटांचा असाच आलेख खेळ चालू असतो. मात्र खोलवर मध्यभागी मनाच्या गाभाऱ्यात, संस्कारातून जपलेल्या मुल्यांची शांतता स्थैर्य देते.
लाटा आणि विचार हे क्षणभंगुरच..

© समुद्र......माड (नारळझाड)
उंच उंच ती माडाच्या झाडांची समुद्रा लगत एकामागोमाग असलेली रांग किती आखीव रेखीव. आकाशाला गवसणी घालणारा माड त्या भुसभुशीत वाळूत सुध्दा स्वत:ला घट्ट रोवून असतो. कीतीही मोठी वादळं आली तरी मोडत कधीच नाही. कदाचित त्याची उंची इतकी असते की समुद्रात येणारं वादळ लांबूनच दिसतं.
आयुष्यात यशाच्या आकाशाची गवसणी घालत एका ठराविक उंचीवर पोहचलं आणि जमीनीवर राहून आपल्या मातीशी स्वत:ला घट्ट रोवून घेतलं असेल तर मग भविष्यातील वादळाची चाहूल लागते आणि माडासारखं न मोडता खंब्बीरपणे उभं राहता येतं.

© समुद्र.......दीपगृह (lighthouse)
सफारी मधे होकायंत्रासारखी उपकरणं असुनही समुद्रात मध्यभागी असलेल्या दिपगृहाचं अनन्य महत्व तो दर्यावर्दी जाणून असतो.  दीपगृह जहाजाला योग्य ‌दिशा दाखवते पण तीथेच तो नांगर टाकत नाही.
आयुष्याच्या भवसागरात वेळोवेळी दिशादर्शक म्हणून मध्यभागी ठामपणे निश्चल ते उभे असते, परंतु तिथंच नांगर टाकून प्रवास थांबवता येत नाही....
अध्यात्म.... एक दीपगृहच

© समुद्र.......शंख शिंपले
शंख, काही अणुकुचीदार काही बोथट, काही ढब्बे तर काही बारीक निमूळते . आतला प्राणी किटक मधेच बाहेर येतो, परत लपतो.
शिंपले पण असेच काही कायमचे बंद काही उघडलेले, काही अर्धवट काही पुर्ण, काही सुबक गोल तर काही खडबडीत. काहींमध्ये सापडतो मोती मग कीती तो आनंद.
असे विविध शंख विविध शिंपले आपण आयुष्यभर गोळा करतो. काहींना बरोबर ठेवतो तर काहींना बाजूला ठेवतो. मोती असलेले शिंपले अलगद जपतो.
समुद्रावर गोळा केलेले शंख शिंपले...
जीवनात सापडलेली माणसं, नाती..

© समुद्र........खारं पाणी

अमर्याद साठा असूनही, वल्हवून थकलेल्या नाविकाची तो तहान भागवू शकत नाही.. ही तर समुद्राची शोकांतिका...
मनात जर कायम खारट विचारांची भरती ओहटी चालू असेल..तर पाण्यासारखी संप्पती असुनही काय उपयोग... कधीच कोणा श्रमिक गरजूच्या कामी येत नाही..
आयुष्याची शोकांतिका होते..

धन्यवाद
©मिलिंद सहस्रबुद्धे
२५/०४/२०२०

P.S. काही जणांनी fb story नंतर सगळं एकत्र वाचायला आवडेल अशी कल्पना सुचवली,त्यातूनच ही गोळाबेरीज मांडली आहे.
Thank you all.

जिंदादिल...

जिंदादिल...

टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल...

प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.

 ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी ऐकतोच. ब्राह्मण कुटुंबात जन्म घेऊन त्यांची जात ही कधीही त्यांच्या राजकारणात आणि समाजकारणात आडवी आली नाही. खरंतर महाराष्ट्रासारख्या "पुरोगामी" म्हणवून घेणाऱ्या राज्यात जात ही कशी उभी-आडवी, तिरपी येते हे आपण नेहमी बघतोच. तरीही प्रमोदजींना हयाचा कधीच स्पर्श झाला नाही हे विशेष.

शरद पवार साहेबांना नंतर जर कोणाला चांद्यापासून बांद्यापर्यंत उभा-आडवा महाराष्ट्र, प्रत्येक गाव-जिल्हा पातळीवर खडा न खडा माहिती असेल तर अजूनही एकच नाव प्रमोद महाजन. संपूर्ण महाराष्ट्र स्वयंसेवकाच्या भूमिकेतून पिंजून काढलेला एकमेव राष्ट्रीय स्तरावरचा नेता. आणि हो कधीही "महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत" अशी बातमी न येता.

असं म्हणतात की यश हे कष्टा व्यतिरिक्त, योग्य संधीला आणि योग्य वेळी तुम्ही उपस्थित असण्यावर अवलंबून असतं किंवा साधता येतं. मात्र अशी योग्य वेळ आणि योग्य संधी स्वत:च निर्माण करून सत्ता यशस्वी होण्याचं गमक कोणी साधलं असेल तर ते म्हणजे प्रमोदजी. राज्याच्या राजकारणात जास्त लुडबूड न करता योग्यवेळी देशपातळीवर स्वतःला "एस्टॅब्लिश" (हाच शब्द चपखल बसतो) करण्यात यशस्वी झालेला एकमेव महाराष्ट्रीय मराठी नेता. रथयात्रेच्या संधीचं त्यांनी रथावर शंख फुंकणाऱ्या हनुमानाच्या भूमिकेत प्रवेश करून स्वतःच्या कारकिर्दीचं सोन कसं करून घेतलं हे आपण सर्वजण जाणतोच.

मुळातच स्वतः शिक्षक आणि शिक्षकी घराण्याचा वारसा, त्यामुळे भाषेवर प्रभुत्व उत्तम,मग ती हिंदी असो व मराठी. प्रमोदजी मंचावर एकदा उभे राहिल्यावर, नुसता समोरचा जनसमुदाय, त्या ठिकाणाचं नाव , तिथल्या समस्या आणि त्यावरचे उपाय यावर कोणतीही पूर्वतयारी नसताना अस्खलित तासभर बोलू शकत होते. हे खरोखरच अतुलनीय आहे.

चेहऱ्यावर आणि बोलण्यात असलेला किंचित मिश्किलपणा हा कायमच समोरच्याला आपलंसं करायचा.  समोरचा मग स्वतःच्या पक्षातला असेल अथवा पक्षाबाहेरचा, त्याला कधी, काय हवय याची उत्तम जाण आणि ते उपलब्ध करून देण्यासाठी लागणारे "रिसोर्सेस" कायम हाताशी असल्यामुळे काँग्रेसच्या गांधी घराण्यापासून, समाजवादी जॉर्ज फर्नांडिस ते अगदी डाव्या विचारसरणीच्या ज्योती बासूंपर्यंत सर्व जण जणू बैठकीतलेच मित्र होते त्यांचे.
NDA सरकार मधील विविध पक्षांची गोळाबेरीज करून त्यांचा हवा तो लसावी काढण्यात जर कोणी यशस्वी झालं असेल तर ते म्हणजे प्रमोद महाजन.

अजूनही जेव्हा जेव्हा त्यांचा फोटो किंवा त्यांची बातमी लोकं बघतात, ऐकतात तेव्हा एक विचार नक्कीच मनाला स्पर्शून जातो. आज आत्ता प्रमोदजी असते तर करण-अर्जुन नक्कीच एकत्र असते. मग कोणी धृतराष्ट्र नसता, कोणी संजय नसता न कोणी शकुनी.

हायटेक, हाय प्रोफाईल नेता म्हणून कायम ओळखले गेले आणि त्याचं त्यांना कधीही वावगं वाटलं नाही. उलट ते अभिमानाने सांगायचे "जेव्हा इन्कमिंगला सुद्धा per minute 16 रुपये चार्ज होता तेव्हापासून मोबाईल वापरणारा मी पहिला आणि एकमेव राजकीय नेता आहे".  अजून एक गंमत म्हणजे त्यांनी त्यांच्या दिल्लीच्या बंगल्यात प्रत्येक खोलीत एक  intercome टेलिफोन ठेवला होता. आश्चर्याची बाब म्हणजे बाथरुममध्ये सुद्धा. त्यावर त्यांना एका मुलाखतीत विचारलं असता ते म्हणाले होते "मी राजकीय नेता आहे. समाजकारण हे माझं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळे मी लोकांच्या आणि समाजाच्यासाठी  24 तास उपलब्ध असलं पाहिजे. कोणी फोन केला तर, "साहेब आत्ताच आंघोळीला गेलेत" हे टिपिकल उत्तर पीए नी द्यायला नको".  असा हा दूरदृष्टी, rather out of the box विचार करणारा नेता होता.

त्यांच्या आयुष्यातील स्थित्यंतरे आणि त्यांचा दुर्दैवी अंत बघता अजून पर्यंत कोणी त्यांच्यावर चित्रपट कसा नाही काढला हे आश्‍चर्यच आहे. कारण 'एका पर्वाचा उदय आणि दुर्दैवी अस्त' हा प्लॉट कायमच चित्रपटकारांना आणि रसिकांना खुणावणारा असतो. तसंही सध्या बायोपीकचं पीक जोमातच आहे.

"मुंबई का किंग कौन" तसं "मोबाईलचा किंग कौन" असं म्हटलं तर एक म्हणजे सरकार मध्ये असलेले प्रमोदजी आणि व्यवसायात असलेले अंबानी.  जेव्हा हे दोन किंग एकत्र आले तेव्हा भारतात मोबाईल क्रांती घडणारच होती आणि ती आज आपण अनुभवतोय.

त्यांचा एक स्वभाव विशेष वाखाणण्याजोगा होता. त्यांच्यावर कित्येक वेळा टीका, आरोप, प्रत्यरोप झाले. पार रिलायन्स मधील भागीदारी पासून, त्याच्या शायनिंग इंडिया कॅंपेनमुळे पडलेले NDA सरकार असेल किंवा हितसंबंधाचे आरोप असतील. त्यांनी कायमच त्यांसगळ्यांकडे मिश्किल हसत 'उस मे क्या है! म्हणत स्वतःचं नाणं प्रत्येक क्षेत्रात खणखणीत वाजवलं आहे. आणि बघा ना हे सगळे आरोप किंवा त्यांच्यावर असलेले विविध शंका कुशंका हे जरी आपल्याला माहिती असलं तरी प्रमोद महाजन असं म्हटल्यावर मनात एक जो काही आदर किंवा 'अरे, काय जिंदादिल माणूस होता यार!' हा जो भाव निर्माण होतो ना त्यातच त्यांच्या प्रसिद्धीचे यश आहे.

हल्ली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणालाही भेटतात. पण त्याकाळी साधारण 90 च्या दशकात अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि विविध देशांचे राष्ट्राध्यक्षांना आपल्या दिल्लीच्या घरी बोलवून खास भारतीय आणि महाराष्ट्र  व्यंजनांचा आस्वाद देणारा हा एकमेव कलंदर नेता प्रमोद महाजन.

प्रमोदजी, मला तुमची ९४-९५ साली पुण्याच्या सारसबागेच्या इथली बाळासाहेब ठाकरेंबरोबर झालेली सभा बघितलेली अजूनही आठवतीय. आठवतीयं काय मनात कोरुन ठेवली गेलीय म्हणा ना..

तो शॉर्ट कुर्ता आणि पायजमा, पायात साध्या चपला, हात सारखा वर करून बोलण्याची स्टाईल, मध्येच एखादा मिश्किल विनोद, माइक विना सुद्धा किलोमीटर भर ऐकू जाईल असा खणखणीत आवाज, ओघवती बोलीभाषा आणि मुद्दा स्पष्टपणे पटवून द्यायची कला. खरंच कमाल, कमालच होतात तुम्ही....

प्रमोदजी तुम्हाला तुमच्या पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली

धन्यवाद
© मिलिंद सहस्त्रबुद्धे
०३/०५/२०२०

सदाशिव पेठ पुणे ३०

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...