Skip to main content

टॉनिक


टॉनिक

शैलाताई हॉलमध्ये निवांत बसल्या होत्या.  एकटक खिडकी कडे बघत.  तेवढ्यात बेल वाजली. "अगोबाई आता काय करावे, हया गुडघ्यांनी ऊत आणलाय मेला. काय मध्येच दुखायला लागतात"  थोड्या उठल्या आणि परत बसल्या. "नेहा.. जरा बघ, दार उघड. अमितच आला असेल वाजले साडेसात कारण."
अमितने बूट काढतानाच पहिला प्रश्न जरा अधिकारनंच विचारल्यासारखा "आई! काय गं बरी आहेस ना? गेली नव्हतीस ना संध्याकाळी चक्कर मारायला आणि मग त्या तुमच्या कट्ट्यावर?" 
"नाही रे बाबा नव्हते गेले कुठेही. विचार नेहाला हवंतर. ती तर पाचलाच आलीय आज." शैलाजाताईंची पुटपुट सुरु झाली "काय मेलं, मला गेले एक-दीड आठवडा घरी बसून ठेवला आहे. काय धाड भरलीय." असं म्हणत उठून कोचावर बसल्या आणि झी मराठी चालू केलं सिरीयलचा रतीब टाकायला.

किचनमध्ये चहा घेताना नेहा म्हणाली "अमित, काय रे बघ ना दोन आठवडे झाले आईंची तब्येत काही सुधारत नाही. डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे गोळ्या, औषध, सकाळचे स्पेसिफिक ब्रेकफास्ट घरगुती व्यायाम चालू आहे पण..."
"हो ना अगं,  काय झालंय कळतच नाही पहिल्यासारखी फ्रेश दिसत नाही बघ आई. थोडाफार बीपी आणि शुगर वाढली म्हणून दगदग नको आराम करा हा डॉक्टरांचा सल्ला आपण तंतोतंत पाळतोय. काही कळतच नाहीये मलापण. ठीक आहे बघू पुढच्या आठवड्यात चेक-अप ला डॉक्टरांनाच विचारु. बरं आज मी फक्त थोडासा भातच जेवेन. ऑफिसमधे आज एकाची evening snacks ची पार्टी होती."

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आज तीन आठवड्यांनी देशपांडे साहेब क्लाइंट टूर करुन परदेशातून ऑफिसला आलेले. नेहमीप्रमाणे अमितने जेवणानंतर त्यांना फोन केला आणि वेळ घेऊन त्यांच्या केबीन मध्ये गेला. देशपांडे साहेब म्हणजे अमितचे "मितवा" च जणू. 'मित्र तत्त्वज्ञ वाटाड्या अर्थात फ्रेंड फिलॉसॉफर गाईड'. अमित आठ वर्षापूर्वी कंपनीत सिनियर इंजिनिअर म्हणून जॉईन झाला तेव्हापासून आज डेप्युटी मॅनेजर पर्यंत देशपांड्यांच्या गाइडन्स शिवाय शक्यतो काहीच करत नाही. तसं पाहिलं तर दोघांची डिपार्टमेंट वेगळी काम वेगळे पण जे काही ट्युनिंग जमलंय ते सांगताच येणार नाही असं. 

"अरे अमित ये ना.  झालं का जेवण? आज काय खास? आईने काहीतरी नवीन पदार्थ दिला असेल नेहमीप्रमाणे. तुझ्या आईचा नवनवीन पदार्थ करण्यात हात कुणी धरू शकत नाही बघ. मला तिकडे फॉरेनला पण तुझ्या डब्याची आठवण यायची अधून-मधून."
"नाही सर काही खास नाही.  तुमची टूर कशी झाली आणि यावर्षी नेहमीप्रमाणे किती नवीन क्लायंटस वाढवलेत. एमडी साहेब as usual खुश असतील  तुमच्यावर"
"तसं काही नाही,  पण हो जर्मनीत दोन नवीन मोठ्या ऑर्डर मिळतील एवढं मात्र पक्कं करून आलोय."
"वाह भारीच की मग, आपला इयरली बोनस वाढणार तर " असं अमितनं म्हणल्यावर दोघेही जोरदार हसले.

"काय रे अमित,  थोडा डाऊन दिसतोयस हसतोयस जोरात पण काय काय झालंय. घरी काही प्रॉब्लेम."
"सर तुम्ही ना! माझ्यापेक्षा मला जास्त ओळखता. म्हणून तर आठवड्यातून दोनदा असं जरा तुम्हाला भेटलो काही गोष्टी शेअर केल्या, गप्पा मारल्या की जे काही फ्रेश वाटतं. आठवडाभर काम करायला हुरुप येतो भरारी येते.  अहो आईचा जरा थोडा असा प्रॉब्लेम झाला आहे. गुडघे दुखतायत, शुगर बीपी थोडं वर गेलंय. डॉक्टर म्हणाले तीन-चार आठवडे आराम करा. आमचीच आई, तिला काही घरी बसवत नाही. काही झालं तरी संध्याकाळचे फिरणे आणि रविवारी सकाळी भजनी मंडळ याला तिला जायचं असतं. शेवटी मी जरा ओरडून भांडून गेले दोन आठवडे सगळं बंद केलं तेव्हा जरा ती घरी आहे.
पण काय सांगू एवढं सगळं करून, नेहा तिचं सगळं व्यवस्थित आहार जेवण करतेय पण इंप्रुव्हमेंट नाही अजून तब्येतीत. उलट अजुनच तब्येत वीक होत चाललीय असं वाटतंय. काय कराव कळतच नाहीये"

देशपांडे सर हे ऐंकतांना केबिनच्या बाहेर बघत होते. बघत बघतच म्हणाले "अमित, मला सांग तो आपल्या परचेस मधला पाठक आणि डिसूजा लंच नंतर काय करतात रे. दोघं सिगरेट फुकायला बाहेर जातात बरोबर ना. तुला माहितीये पाठक कधीच ओढत नाही पण तरी तो डिसूजा बरोबर असतो आणि आपल्याला वाटतं की तो पण फुकाड्या आहे. तो त्याच्याबरोबर जातो कारण म्युचल फंड आणि शेअर्स मधला पाठक एक नंबर मास्टर आहे. डिसूझाला त्याच्याशी गप्पा मारत नवीन नॉलेज तो देतो, त्याचा त्याला गाइडन्स देतो .एक प्रकारे डिसूजा त्याच्याकडून फायनान्शिअल इन्वेस्टमेंटचे रोज डोस घेतो. आणि तो डोस देण्यात पाठकला जो काहीआनंद मिळतो तेवढ्यासाठी तो सिगरेटचा धूर अंगावर घेतो.
माझा पुतण्या वय वर्ष बत्तीस, दर गुरुवारी न चुकता संध्याकाळी दोन तास स्वामी समर्थांच्या मठात जातो तिथे जी मिळेल ती सेवा करतो पार अगदी झाडू मारण्यापासून ते आरती पर्यंत. मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत असिस्टंट मॅनेजर आहे पण हा नियम तो काही चुकत नाही. मला म्हणतो काका, एक वेगळाच आनंद मिळतो रोजच्या कामात एक पॉझिटिव्ह एनर्जी राहते.
आमच्या समोर नाईक काका, काका कसले पासष्ट वर्षांचे आजोबाच. नात आहे त्यांना आता तीन वर्षाची. दर मंगळवारी आणि रविवारी बॅडमिंटन खेळतात अजूनही.  मध्ये पार त्यांची अँजिओग्राफी झाली पण त्यांनी बॅडमिंटन सोडलं नाही. मला म्हणतात, काय आहे पांडे साहेब तिथे शटलला स्मैश मारतांना जो आनंद होतो ना तो बाकी कशातच नाही हो. सगळं टेन्शन्स, एकटेपणा, थोडीफार तब्येतीची कुरबूर त्या मारलेल्या आठ दहा स्मैशमध्ये पार निघून जाते. मित्रांची वाहवा मिळते ती तर सोने पे सुहागा. पांडे ती वाहवा मिळवण्यासाठी जातो आणि ती वाहवाच  मला आठवडाभर तरुण ठेवते"
"अमित तुला सांगतो,  हे प्रत्येक माणसाचे वेगवेगळे स्ट्रेसबस्टर असतात जे त्याच्या आजूबाजूच्या लोकांना कळतीलच असे नाही. कधी कधी त्या माणसालाही कळत नाहीत की हे आपले स्ट्रेसबस्टर आहेत.
हो हो बरोबर 'स्ट्रेसबस्टरच'. करेक्ट बोलतोय मी.  प्रत्येक वेळेस ध्यान, योगा, व्यायाम, पिक्चर चैन हेच स्ट्रेस रिलीज करतात असं नाही. उलट मी म्हणीन  हयापेक्षा हे जे मुळ स्ट्रेसबस्टर असतात ना तेच खरे आयुष्य सुसह्य करतात. प्रत्येक वेळेस दुःख किंवा प्रॉब्लेम सांगूनच मनमोकळ होतं असं नाही."
"कोणाला रोज टेकडीवर जायचं असतं,  कोणाला घरची काम करून घरचा अगदी कानाकोपऱ्यात रोज स्वच्छता करून   बरं वाटतं. कोणाला इतरांची काम करून घरचे ज्याला लष्कराच्या भाकऱ्या म्हणतात त्या भाजून एक आनंद मिळतो. कुणी वयाच्या चाळीशी नंतरही ट्रेकिंग किंवा सायकलींग चालू करतं. हास्य क्लबमध्ये ते हा हो हो असं करत टाळ्या वाजून त्यांचे स्ट्रेस रिलीज होतात की काय छे रे. अरे त्यानंतर तासभर फुकाच्या गप्पा ठोकतात ना त्यांनी खरं ती क्लब मंडळी मोकळी होतात त्या गप्पात त्यांचे स्ट्रेसबस्टर लपलेले असतात. हया सगळ्यातून जो आनंद मिळतो ना तो आनंद एक प्रकारचं relaxation असतं. आपण काहीतरी आहोत आणि आपण काहीतरी करू शकतो हा भाव म्हणजेच तणावमुक्ती कदाचित.
कुणी कुणी ऑफिस सुटल्यावर, लंच मध्ये बॉसला शिवाय घालत Gossiping करून मोकळे होतं तर कोणी कोणी एखाद्या फारशी माहिती नसलेले वाद्य शिकून तर कोणीही आपण राहतो त्या सोसायटीची काम फुकट करून. असं बरेच वेगवेगळे आनंद आहेत.
बऱ्याच वेळा ही स्ट्रेसबस्टर आजूबाजूच्या लोकांना नाहक करतोय असं वाटत असतं पण आत्मिक आनंद हा ज्याचा त्यालाच कळतो आणि माहीत असतो."

"आता तूच बघ ना. मी सुद्धा तुझा स्ट्रेसबस्टर आहे. तुला माझ्याशी बोलल्यावर वाटतं ते प्रकारे तुझं स्ट्रेसबस्टर चा आहे ना"

"अशीही प्रत्येक माणसाची वेगवेगळी स्ट्रेसबस्टरस ही टॉनिक आहेत की जी रोज किंवा वेळोवेळी त्यांनी घेतली की मल्टीविटामिन औषधांपेक्षाही जबरदस्त ताकद त्यांच्यात येते".

"कदाचित छंद आणि हे असे स्ट्रेसबस्टर यात आपण गल्लत करू शकतो. छंद आवड असते पॅशन असते पण स्ट्रेसबस्टर हा रोजच्या दैनंदिनीला उर्जा देणारा स्वतःच्याच भावरुपी अवकाशातला सूर्य असतो. तो कायम उगवेल याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. ह्या टॉनिकमुळेच माणसं त्यांच्या जीवनात आपापल्यापरीने यशस्वी आनंदी असतात. ही टॉनिकं ही ज्याची त्याची वेगळी असतात आणि महत्त्वाचं म्हणजे ज्याची त्यांनी शोधलेली असतात. समोरच्या माणसाला ती कळतीलच असं नाही कारण त्याचं स्वतःचा स्ट्रेसबस्टर टॉनिक अजूनच वेगळं असतं."

"अरे बापरे! तीन वाजले. तुझ्याशी गप्पांच्या नादात कसा वेळ गेला कळलंच नाही. साला, अम्या तू पण एक टॉनिकच आहेस की माझं. मला पण एकदम फ्रेश वाटतं तुझ्याशी बोलताना आणि काय काय नवीन सुचतं मला देव जाणे. बरं चल मी पळतो जरा, अकाउंटसला जाऊन मागच्या आठवड्यातल्या टूरचा हिशोब सबमिट करायचा आहे. नाहीतर परत नेहमीप्रमाणे ते कोकलायला नकोत, you know it very well" असं म्हणून देशपांडे नेहमीच्या स्टाईलने आख्खा department ला ऐकू जाईल असे जोरदार हसतात."आणि हो उद्या-परवा तुझ्या आईचं काय ते detail बोलू आणि मग वाटलं तर एखादा दुसरा डॉक्टर मी तुला सजेस्ट करतो चल जातो आता"

अमित परत आपल्या केबिनमध्ये आला पण स्ट्रेसबस्टर टॉनिकचा किडा त्याच्या डोक्यातून काही जायला तयार नव्हता. चार वाजता अचानक त्याने त्याच्या बॉसला फोन केला 'सर, माझ्या आईची तब्येत ठीक नाहीये. मी लगेच निघतोय." असं सांगून ऑफिसमधून लवकरच निघाला.

घरी पोचल्यावर दारातूनच "आई, चल लवकर आटप आपल्याला तुझ्या डॉक्‍टरांकडे जायचंय"
"अरे हो हो, पण appointment परवा आहे ना गुरुवारी"
" हो पण नको, आजच जाऊ चल आटप"
सध्या शैलजाताई जरा अमितला बिचकून होत्या. नेहमी घरात तोरा असतो तसा त्यांचा पण सध्या वातावरण थोडं वेगळं होत ना. भराभर आवरून होती ती साडी नीट करत तयार होऊन त्या लिफ्टपाशी आल्या. तशी नवीनच होती साडी मागच्याच वर्षी नेहाच्या मंगळागौरीचे उद्यापनाला घेतली होती.अमित आणि त्या एकत्रच खाली आल्या.

अमित चालतच निघाला पुढे. "अरे हे काय?  गाडी काढ ना! एवढ्या लांब काय आपण चालत जायचंय का? का तू उबर बोलवली आहेस."

"अगं नाही. चल तर तू" असं म्हणत त्याने चालतच आईला थोड्या अंतरावरच्या बागेजवळील तिच्या नेहमीच्या कट्ट्यावर आणलं. तिच्या सगळ्या मैत्रिणी होत्याच बसलेल्या गप्पा चेष्टामस्करी करत. शैलजाताईंना पाहून एकदम खूष झाल्या. दोघींनी तर उठून जोरदार स्वागत केलं. दामले काकू म्हणाल्या "बरं झालं बाई आलात, तुमच्या शिवाय सध्या कट्टा काही रंगत नव्हता हो...." "बरी आहे का तब्येत आणि गुडघे."  शैलजाताई पण खुश होऊन गप्पांमध्ये एकदम हरवून गेल्या. 
पलीकडे उभ्या असलेल्या अमितकडे पाहून त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांना उमजलं अमित  कोणत्या डॉक्टरकडे आपल्याला घेऊन आला आहे ते.

तर अलीकडे अमित काही अंतरावर उभा राहून शांतपणे बघत होता हे सगळं. आईच्या चेहऱ्यावरचा freshness पाहून त्याचे डोळे पाणावले होते पण आनंदाने. कारण त्याला आईचं खरं "टॉनिक" सापडलं होतं.

© मिलिंद सहस्रबुद्धे
१४/०९/२०१९
www.milindsahasrabudhe.com

Comments

  1. खूपच सुंदर गोष्ट, नव्हे तर या गोष्टीमध्ये मला खरा जिवंतपणा
    जाणवतोय
    नाना
    sbatalkar@gmail.com

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय मधेच उभे आ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी