दादा परत या..
"मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही" असं तुमच्या कडक आवाजात ऐकताना पुन्हा पुन्हा तुमची उणीव भासते. तुमच्याकडून चुकून बोली भाषेतील शब्दांची उठाठेव कधीतरी झालीही असेल. परंतु संस्कृतीच्या मर्यादा मग त्या राजकीय असतील अथवा सामाजिक तुम्ही कधीही ओलांडल्या नाहीत. कोणा एखाद्यावर उगाच खालच्या भाषेत टीकाटिप्पणी केली नाहीत. तर कधी सत्तेच्या गुर्मीत कोणाची निंदा नालस्ती केल्याचं आठवत नाही. तुमचा बाज आणि दरारा वेगळाच होता आणि आहे. प्रशासनावरची पकड म्हणजे जणू बापाने रस्ता ओलांडताना मुलाचा धरलेला घट्ट हात. धरलेल्या त्या हातात काळजी ही असतेच पण तेवढाच धाक असतो. तशी तुमची प्रशासनावरची पकड आहे.
आमच्या पुण्याच्या पालकमंत्री पदी असताना तुमचा आठवड्याला किंवा महिनाभरातील एखादा दौरा ठरलेलाच. हा दौरा म्हणजे साध्या शिपायापासून ते मुख्य आयुक्त पर्यंत एक भीती असायची. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यापासून ते अगदी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीसापर्यंत "दादा आज पुण्यात येणार" हे आधी दोन दिवसापासूनच चर्चेत असायचे. तुम्ही ज्या दिवशी येणार त्या दिवशी सकाळी सात ते रात्री दहापर्यंत संपूर्ण शहर आणि परिसर तुम्ही पिंजून काढायचात. विविध प्रभागात काय चाललंय, काय कमी आहे किंवा काय "जास्त" झालंय याची चौकशी करायची आणि मग योग्य पद्धतीने नोंद तुमच्या मनात व्हायची. एखाद्या विभागाच्या नूतनीकरणाच्या उद्घाटन कार्यक्रमात "अरे बाबा! आमच्या रानातल्या घरातलं रंगकाम पण याच्यापेक्षा चांगलं आहे. त्या कंत्राटदाराला लगेच बोलाव आणि व्यवस्थित करून घे हे छताचं काम, काय कळालं का?" हे वाक्य वर करणी साधं वाटणारं, पण जेव्हा तुम्ही तुमच्या गावरान भाषेत सूचना वजा आदेश द्यायचात तेव्हा एका विभागाला दिलेला आदेश इतर विभागांना जणू वार्निंग मेमोच असायचा.
तसं पाहिलं तर पुण्यानी कधीच तुम्हाला म्हणजे तुमच्या पक्षाला खासदार दिला नाही. अर्थात तुमच्यातील आणि तुमच्या मित्र पक्षातील ती सामंजस्यातली तडजोड होती. परंतु तुम्ही खासदार "त्यांचा" म्हणून कधीही दुजाभाव केला नाहीत. तुमचे कमी अधिक आमदार अथवा नगरसेवक असले तरी पुण्याकडे तुम्ही कायमच प्रेमाने आणि जातीने लक्ष दिले आहे. पुण्यातील प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिलंय आणि सखोल जाऊन काय उपाय योजना करता येतील यावर भर दिला. महानगरपालिका, आजूबाजूच्या ग्रामपंचायती ते पुण्यातील पोलीस प्रशासन ह्या सगळ्यांवर तुमची कायमच बारीक नजर होती. तुमचा दरारा होता.
आता काय झाले सांगू का? सगळेच नुसतं पालकत्व घेतलेले नेते आहेत. नेते येतात, प्रदर्शन करतात, मोठमोठी भाषण ठोकतात. एखाद्या कार्यक्रमात भली मोठी आश्वासनंही देतात. आकड्यांचे खेळ मांडतात, आम्हीच तुमचे खरे कर्तेधर्ते, कैवारी हे ठासून सांगतात. सर्व काही होताना दिसतं पण म्हणतात ना 'दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं'. अगदी तसंच झाले बघा आमच्या पुण्यात.
रस्त्यावरची बेशिस्त ही आकाशाला गवसणी घालते आहे. तीच तुम्हाआम्हाला आव्हान देते की या आणि दम असेल तर मला शिस्त लावून दाखवा. उदाहरणच द्यायचे तर, पूर्वी ट्रिपल सीट जाणं म्हणजे जोखमीचं काम होतं. पुढच्या चौकात पोलीस असतील ह्या भीतीने त्यातला एक जण आधीच उतरून चालत पुढे जायचा. चौक ओलांडल्यानंतर परत बसायचा. ही थोडी का होईना भीती होती. कारण चौकाचौकात पोलीस होते, प्रशासनाची नजर होती. सिग्नल योग्य पद्धतीने चालू होते. आता काय ट्रिप्सी सर्रास जातात, सिग्नल मोडतात, नो एन्ट्रीचे बोर्ड फक्त लायसन्स घेतानाच पाठांतरासाठी लागतात. हे एक साधं उदाहरण झालं अशी कित्येक उदाहरण विविध प्रभागात आणि कार्यालयात तुम्हाला दिसून येतील.
आता शासक नाहीत तर नुसते आश्वासक राहिले आहेत.
चौकातले मोर्चे अथवा आंदोलन ह्यांना एक शिस्त होती. वेळ काळ होता. आता त्या मोर्चाचे राजकारण इतके झाले की शासकच मोर्चात सहभाग घेऊन धुडगूस घालतात. "विकास" या नावाखाली सर्व शहरभर चाललेली भकास काम आणि ती सुद्धा रेंगाळलेली आहेत. कारण नसताना वाढवलेले फुटपाथ आणि त्या फुटपाथवर वाढत चाललेली गर्दी मग ती पाणीपुरी वाल्याची असेल किंवा चुकीच्या लावलेल्या गाड्यांची असेल. सुशोभीकरणाच्या नावाखाली सुरू झालेले प्रकल्प स्थानिक मुलभूत प्रश्नांना बगल देत आहेत. रस्त्यावरचे फुटपाथ मोठे झालेत, मोठे रस्ते स्वच्छ झाले आहेत पण गल्लीबोळ त्यांचं काय? गल्लीबोळ कचरा आणि नसलेल्या कुंड्यांनी ओतप्रोत वाहताना दिसत आहेत. लोकं असं म्हणतात "भ्रष्टाचार कमी झाला" "भ्रष्टाचार कमी झाला", झालाही असेल, परंतु हे ऐकताना नकळत "शिष्टाचार" पण त्या वाक्यात वाहून गेलाय हे कोणालाच कळत नाहीये.
मतांचा जोगवा मागितला जायचा परंतु मतं मिळवण्यासाठी चुकीच्या गोष्टी आणि वर्तन कानामागे टाकणं आता जरा जास्तच झाले आहे. कोणतीही कारवाई करू नका हा आतून दिलेला आदेश शहर बकाल करायला आणि बेशिस्त करायला कारणीभूत ठरतोय.
हे सगळं का? तर आम्हाला इथे प्रस्थापित व्हायचे आहे.
पुणे शहराचा पूर्व-पश्चिम; उत्तर-दक्षिण तर सोडाच पण इतर आग्नेय वायव्य अशा आठही दिशांना झालेला विस्तार हा त्या जीवशास्त्रातील "अमिबा" प्राण्यासारखा भयानक आहे. ज्याच्या वाढीला कोणत्याही विशिष्ट आकार नसतो.
सो कॉल्ड "डेव्हलपमेंट" म्हणतो या नावाचा प्राणी इतका भयानक आहे की तो ढेकणासारखा आहे मारल्यानंतर रक्तातून परत प्रजात्पन करणारा.
आपला हा मतदारसंघ वाढवण्याच्या जोशात, नगरसेवक संख्या वाढवण्याच्या नादात आपण हे शहर बकालपणाला गहाण टाकतोय याकडे कोणी बघेल काय? बेडकी कितीही फुगली तरी बैल होत नाही. आपली सत्ता असावी, राहावी आणि वाढावी ही एकमेव भूक शहरातील सामान्य नागरिकांना रोज मारते आहे. नागरिक जिवंत आहेत पण 'हे रोजचं जगणं नको' असं काहीतरी झालंय.
असे हे सगळे विस्कळीत झालेले पुणे शहर बघून वाटतं एक दिवस हे शहर त्या लहानपणीच्या गोष्टीतल्या मुलाप्रमाणे "तू का नाही मला शिस्त लावलीस?" असं म्हणून आपल्याच आईच्या (म्हणजे नेत्याच्या) कानाचा चावा घेईल. परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.
असे एक ना दोन असे विविध प्रश्न आहेत. ह्यया प्रश्नांना काही प्रमाणात सोडवणारा म्हणून आम्ही तुमच्याकडे कायम बघत आलो आहोत.
नुसतं "दादा" असं नंबर प्लेटवर लावल्याने कोणी बुलेट चालवू शकत नाही. या पुणे शहराची बुलेट पेलायला आणि चालवायला "अस्सल दादाच" पाहिजे हे पदोपदी जाणवते.
तुम्ही काहीही करा, पहाटे लवकर उठा किंवा गुवाहाटीला भेटा पण दादा तुम्ही परत या पुण्याला तुमची गरज आहे.
दादा परत या.
- मिलिंद सहस्रबुद्धे
पुणे ३०
१०/०३/२०२३
Comments
Post a Comment