Skip to main content

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन 


पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे. 

प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरांचा जाणता राजा आणि कोळी नृत्य. 

मध्यभागी दोन्ही इमारतींना जोडणारा लोखंडी पूल. हा पूल कायम "दोन्ही बाजूतील अंतर जोडायचे असते" हे व्यवहारीक जीवनाचे रहस्य उलगडून सांगतो. असा पूल असलेली नूमवि ही भारतातील एकमेव शाळा असेल. शाळेत प्रवेश केल्यावरच भव्य-दिव्यता काय असते आणि वास्तु नियोजन याची प्रचिती येते. अशी आमची नुमवी आणि आम्ही नखशिखांत झालेलो नूमविय. 

शाळेचे प्रांगण इतकं मोठं होतं की आम्हाला पटांगणाची कधी गरज भासली नाही. संपूर्ण शाळा एकदा वरून खाली फिरुन आलं तरी सध्याच्या जमान्यातील 10000 steps पूर्ण होतील. वेगळ्या व्यायामाची गरजच नाही. 

शाळेत सहा इयत्ता, प्रत्येक इयत्तेच्या आठ तुकड्या, त्यात प्रत्येकी 60 विद्यार्थी म्हणजे एका इयत्तेत 500 विद्यार्थी. गंमत बघा मराठी माध्यमाची शाळा पण तुकड्या इंग्लिश मध्ये A पासून H पर्यंत.

पाचवीला प्रवेश घेऊन जूनमधे दाखल झालात की तुमची वर्णी एकदम दुसऱ्या मजल्यावर. पाचवीचे वर्ग एकदम वर. दुसरा मजला पाचवी आणि सहावी, पहीला मजला सातवी आणि आठवी तर नववी आणि दहावीला तळमजला. वर्गांची रचना देखील इतकी विचारपूर्वक की पाचवीतला विद्यार्थी शिक्षण घेत जेव्हा दहावी उत्तीर्ण होईल, तेव्हा त्याच्या जीवनात तो खालून वर गेलेला असेल. पण ज्ञान घेताना त्याला जगात बाहेर पडल्यावर तो जमिनीवर राहील. हे जमीनीवर राहण्याचं बाळकडू दुसऱ्या मजल्यावरून तळमजल्यापर्यंतच्या प्रवासात आपसूकच मिळालं होतं.

पाचवीतच आम्हाला दुसऱ्या मजल्याच्या कठड्यावरून पुढील पाच वर्षाचा सध्याच्या मॅनेजमेंट भाषेत सांगायचं तर Birds Eye View किंवा Helicopter View मिळायचा. अर्थात पाच-सहा वर्षाच्या असंख्य आठवणी पाच पानात मांडणं म्हणजे शोले सारखा साडे तीन तासांचा चित्रपट पंधरा मिनिटाच्या डॉक्युमेंट्रीमध्ये संपवण्यासारखा आहे. तरीही आमच्या १९९२ च्या काही आठवणी आणि विशेष मित्रांचा पसारा तुमच्यासमोर आज मांडतोय. मनाच्या कोपऱ्यात तुम्ही तो कायमचा पसरून ठेवा.

१९९२ ची बॅच म्हणजे १९८७ च्या जून महिन्यात शाळेच्या उजव्या बाजूच्या दुसऱ्या मजल्यावर प्रवेश केलेली पाचवीतली आम्ही मुलं. पहिला एन्काऊंटर फाटक सरांबरोबरचा. घार्या डोळ्यांचे फाटक सर, गणित शिकवताना एखाद्या तरबेज योद्धा सारखे आमच्यासारख्या गनिमाशी लढायचे. पुढे सहावी ते दहावीपर्यंत, अ.मा., अ.रा, मोत्यासारखं हस्ताक्षर असलेले परचुरे सर, भुगोलाचे उपासनी , तर चित्रकार केळकर आणि पुरंदरे. शिस्तीला कडक अश्या डांगे बाई आणि दाबके सर. इंग्लिच्या पानसे बाई तर मराठी आणि विविध विषयांच्या कुलकर्णी आडनावाच्या दोन-तीन बाई. संस्कृतचे मृदु स्वमावाचे दाते सर, हातावर बिनधास्त डस्टर मारणारे PTचे कदम आणि सुरसे सर. अशा विविध विभूतींकडून शिक्षणाचे आणि संस्काराचे धडे घेत १९९२ला दहावी उत्तीर्ण झालो. १९९२ ची बॅच म्हणजे स्कॉलर भिंगे-गानू-शहाची बॅच म्हणून प्रसिद्ध होती. गंमत अशी की ह्या पैकी कोणीच दहावीला बोर्डात आला नाही. बोर्डात आला तो एकमेव विद्यार्थी सध्याचा सदाशिव पेठेतील प्रसिद्ध डॉक्टर, डॉ रविभुषण गोडबोले. 

१९९२ पर्यंत वार्षिक स्नेहसंमेलनाचा (Gathering) जनरल सेक्रेटरी हा कायमच शेवटच्या एफ जी एच तुकडीतून एखादा टग्या निवडला जायचा. परंतु १९९२ ची बॅच या परंपरेला तडा देणारी ठरली. आमच्याच ए तुकडीतला अभिजीत गाडगीळ (छोटा गाडगीळ) त्यावर्षी जनरल सेक्रेटरी झाला. मग काय तो जल्लोष. आपोआपच कधी नव्हे ते संमेलनाच्या विविध उपक्रमात आमच्या वर्गाला नवचैतन्य निर्माण झाले होते. ते एक स्नेहसंमेलन आणि पावभाजी-गुलाबजाम अल्पोपहाराला दिलेलं ६वीतलं स्नेहसंमेलन आम्ही कधीच विसरणार नाही. १९९१ला नववीच्या सुट्टीत पळशीकर सर (आठवलं काय, आपला गोट्या) आम्हाला सिंहगडावर घेऊन गेले. तिथं गंमतशीर पध्दतीने त्या वयात वाटणारा नाजूक विषयावर व्याख्यान दिले. त्याकाळी लैंगिक शिक्षण देणारा द्रष्टा शिक्षक नुमवित होता याचा आम्हाला अजूनही अभिमान आहे. 

दहावी उत्तीर्ण झाल्यावर सर्वजण विविध दिशा, वाटा, विचारांना पांगले. पुढील शिक्षण पूर्ण करत स्वतःच्या भविष्याचा मार्ग ठरवत स्वतःचे घर संसार थाटण्यात गुंतले. परंतु मनात सतत ती नूमवि होतीच. कधीतरी कोणीतरी भेटला की आठवणी जागवल्या जात होत्या. कोणी देशात पसरले तर कोणी परदेशात बहरले. बघा! काय योगायोग आहे, १९९२ सालीच जागतिकीकरणाचे वारे भारतात वाहू लागले. पुढील शतक तंत्रज्ञानातील क्रांतीची नांदी असलेले ते वर्ष होते. याच तंत्रज्ञानाने पुढील २५ वर्षात अशी काही मुसंडी मारली की धीरूभाई अंबानींचे "कर लो दुनिया मुठ्ठी मे" हे वाक्य सत्यात उतरले. खरंच पूर्ण जग तुमच्या हातातील मुठभर आकाराच्या मोबाईल नावाच्या यंत्रात सामावले. आपण सर्वजण एकत्र आलो ते व्हाट्सअप आणि फेसबुक मुळे. मग सुरू झाली व्हाट्सअप नावाची नवीन शाळा. 

 १९९२ एबी व्हाट्सअप ग्रुप साधारण १२५ विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेला. आमचा हा ग्रुप विनोद, गुड मॉर्निंग पोस्ट, राजकारणावरची चर्चा अथवा रंगीबिरंगी फोटो ह्या अश्या पोस्ट पुरता मर्यादित राहिला नाही. शाळेतून मिळालेला "हाती घ्याल ते तडीस न्या" हा संस्कार आम्ही कायम जपला आहे. आम्ही दरवर्षी विविध सामाजिक आणि कौटुंबिक उपक्रम आयोजित करतो. मकर संक्रांतीला साजरा केला जाणारा शिक्षक भेट आणि सत्कार समारंभ. ज्या शाळेत आपण शिकलो, घडलो त्या शाळेतील सध्या शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्य, गणवेश आणि फी ह्यांची जबाबदारी आमचा ग्रुप दरवर्षी घेतो. वर्ग मित्रांच्या मुलांचे वाढदिवस, दिवाळी पहाट यांसारखे कार्यक्रम दरवर्षी एकत्रितपणे आयोजित करून सर्वांबरोबर त्याचा आनंद घेतला जातो. २०१९ मध्ये आलेल्या सांगली कोल्हापूर भागातील भीषण पुराच्या वेळेस तेथील पूरग्रस्त भागात जाऊन विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आमच्या ग्रुपने पोचवले. एकूण ५०० शालेय साहित्य आणि १८५ शालेय गणवेश दूर गावातील शाळांमध्ये जाऊन गरजू विद्यार्थ्यांना पोचवले. मागील दोन वर्षातील भीषण कोरोना काळात १०० हून अधिक रुग्णांसाठीचे करोना हॉस्पिटल आपलाच नुमविय डॉक्टर ऋतुपर्ण शिंदे यांच्या साह्याने उभारले. कोरोना रुग्णांना वेळोवेळी मदत केली.  

आम्ही दरवर्षी २५ डिसेंबरला न चुकता गेट-टुगेदर ला एकत्र येतो. मजा मस्ती करतो. मात्र तेव्हा दरवर्षी आधी मे महिन्यात रक्तदानासारखा उपक्रम राबवतो. गरजूंना आपल्याकडून रक्ताच्या शेकडो बाटल्या मदत म्हणून पोहचल्या असतील याची खात्री आम्ही केलेली असते.  

आमच्या या सर्व १२५ जणांच्या पटसंख्येला एकत्रित बांधणारा आणि जोडणारा आमचा ॲडमिन शैलेंद्र खरे ह्याचे कौतुक आणि अभिमान आहे. ह्या कार्यात यशस्वी हातभार लावणारे भास्कर देशमुख, आनंद पाटील, अमोल मांडके, सुजित ठिपसे आणि इतरांचे योगदान देखील नक्कीच मोलाचे आहे.

आज मागे वळून पाहिले तर खरंच आश्चर्य वाटेल अशी यशस्वी कामगिरी केलेले आमचे विविध क्षेत्रातले वर्गमित्र आहेत. मी सुरवातीला म्हणालो त्याप्रमाणे, ह्या सर्वांनी त्या शाळेतल्या पुलाची "माणसं जोडण्याची शिकवण" कायम जतन केली आहे. 

टायर मार्क नावाची लेह लडाख आणि आशिया खंडात स्वतःची ट्रॅव्हल कंपनी चालवणारा आमचा नितीन जोशी म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती महान ह्याचे उत्तम उदाहरण. गायन क्षेत्रात गंधर्व उपाधी प्राप्त केलेला सुप्रसिद्ध गायक अमोल निसळ, पुण्यातील औंध भागात स्वतःचे मोठे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल असलेला प्रथितयश डॉक्टर अमित काळे आमच्याच वर्गातील मधल्या बाकावरचे. स्वतःची १५० हून अधिक कर्मचारी असलेली इंजिनिअरिंग कंपनी चालवणारा आनंद कुलकर्णी असेल, तर जपानमध्ये स्वतःच्या ठसा उमटवणारे पद्मनाभन जोगळेकर आणि योगेश नरवणे आहेत. श्री श्री रविशंकर यांचा शिष्य अमित ठाणेदार आणि संपूर्ण भारतभर सायकल भ्रमणाची सवारी करणारा उत्कृष्ट खोखोपटू योगेश भट हा ही आमच्याच डब्यातला डबा खाणारा एकेकाळाचा वर्गमित्र. शनिवार पेठेतील प्रसिद्ध प्रिंटिंग प्रेस चालवणारा तीर्थराज जोशी.

सुहाना मसाले आणि चोरडिया ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वेसर्वा विशाल चोरडिया आमच्याच वर्गातला असल्याचं कौतुक आम्हाला आहे. टॉयलेट सेवा सारख्या ॲपच्या माध्यमातून सार्वजनिक शौचालय या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सामाजिक कार्य करणारा अमेरिकेतील अमोल भिंगे देखील आमचाच बरं का. 

नामवंत वकील सागर भिंरगे, प्रसिद्ध व्यावसायिक दर्शन किराड, हेमंत रायसोनी. मोठ्या हुद्द्यावर अधिकारी असलेले मंदार पुरंदरे, अभिजित गरुड. 

असे हे आणि इतरही काही १९९२ च्या बॅचचे अमिताभ बच्चन. ही मंडळी त्यांच्या क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात नक्कीच अमिताभ बच्चनजी प्रमाणे अव्वल स्थानावर कार्यरत आहेत. अहो तसं लिहायला गेलो तर संपूर्ण १२५ जण म्हणजे जणू बच्चनच. त्यामुळे तर म्हटलं ना लिहायला गेलो तर पाच पानं कमीच आहेत. असो ह्या लेखाच्या निमित्ताने आठवणींच्या बालभारतीची उजळणी झाली.

आम्ही सर्व नुमविय "एक दिवसाची शाळा" या उपक्रमा मार्फत एकत्र आलो. खूप आनंद झाला की एवढ्या वर्षांनी या सर्व वर्ग मित्रांबरोबर त्याच बाकावर त्याच वर्गात दप्तर घेऊन बसण्यातली मजा काही औरच. कदाचित प्रत्यक्ष अमिताभ बच्चनजी ह्यांची कधी भेट होईल अथवा न होईल परंतु आपल्या हक्काच्या ह्या अमिताभ बच्चन असलेल्या मित्रांना शाळेतील त्याच वर्गात भेटण्याचा आनंद म्हणजे दुग्ध शर्करा योग जुळून आला. 

 "आम्ही नुमविय" चे खुप आभार. तुमच्या पुढाकाराने ह्या अनोख्या उपक्रमात आम्हाला सहभागी होण्याचा मान मिळाला. मनापासून धन्यवाद. 

- मिलिंद सहस्रबुद्धे

१९९२ - १०वी A

नुमवि बाजीराव रोड पुणे ३०

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि