"साय"कल
"तुम्ही कधी प्रेमात पडलात का?"
"तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का?
ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते.
"सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे.
सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत.
जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या राक्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते.
मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते.
आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन दांड्याच्या सायकलनेच होते. दोन्ही बाजूला पाय टाकून उभे राहायचं. उजवीकडचे Paddle उजव्या पायाच्या पावलाच्या वरच्या बाजूने बरोबर गुढघा मुडपेल एवढेच वर घ्यायचे. मग त्यावर जिवानिशी जोर देऊन पुढे जाताना डावा पाय वर घ्यायचा. असं साधारण पाच पन्नास वेळा केल्यावर जमतं पुढचं Paddle डाव्या पायाने मारायला.
अर्थातच हे सगळं आपले आपण करत आहोत असं वाटत असताना मागे सीटला किंवा कॅरीयरला धरलेले कोणाचे तरी हात आपल्याला जणू अदृश्यच असतात. आपण आपल्याच So Called Tricks मध्ये गुंतून गेलेलो असतो. ते हात आपल्या मागे आहेत हे तेव्हाच समजेत जेव्हा..."आता बास ना! आता शिक की लवकर. माझे हात भरून आले आणि पळून पळून पाय कंबर एक झाली" असे तार-सप्तकातील सुर कानी पडतात.
काही तास किंवा दिवसांमध्ये आपण सायकल शिकू लागतो. एक - दोन Paddles वरून आपली प्रगती दहा पंधरा Paddles एकदम मारण्यापर्यंत पोहचते. सीटला धरलेले मागचे हात हळू हळू सुटायला लागतात.
एक दिवस असा येतो की मागे धरलेला हात खरंच अदृश्य म्हणजे नाहीसा होतो. आपण त्या उतारावर स्वतःची स्वतः सायकल perfect balance करत चालवतो. जोमाने Paddles मारत खुप पुढे जाऊन थांबतो. मागे बघतो तर कोणीच नसते. शिकवणारे ते दोन हात लांबवर जिथे सुरवात केली तिथेच थांबलेले दिसतात. त्यांच्या डोळ्यातला आनंद एवढ्या लांबून सुध्दा आपल्यापर्यंत पोहचतो.
"आली रे आली! माझी मला आली" हा Ureka Moment चा हर्षोल्लास आपण जोरात ओरडुन सगळीकडे सांगतो...
जीवनातला पहिला आत्मविश्वास आपल्याला कोण मिळवून देत असेल तर ती म्हणजे "सायकल"
इकडे शिकवणाराची पण मग एक वेगळीच मिजास असते. "बघ म्हंटलं होता ना! चार दिवसात शिकवतो तुला सायकल" कॉलर ताठ. तसं पहिला तर आठ दहा दिवस झालेले असतात. असो.
मुलीला शिकवताना, कॅरिअरला धरलेला हात 'बाबांचा' असेल तर मागे पळताना धरलेला हात खुप उशिरा सुटतो. पुढे सायकल तिची ती चालवत गेलेली मुलगी बघताना डोळ्यात पाणी आलेलं असतं पण मनातून हात अजूनही घट्ट त्या कॅरीयरलाच धरलेला असतो. भौतिक विश्वात सुटला तरी भावनिक विश्वात कधीच सुटत नाही...
भाऊ-बहिणीला शिकवताना मात्र सगळं उलटं. "शिक ना लवकर" "आमच्या वेळी मी दोन दिवसात शिकलो होतो", "आता उद्या तुझी तुला याला हवी"..."मार पटापट Paddles" अश्या रोजच्या महाभारतात कशी बशी तोडकी मोडकी शिकवून हा कार्यक्रम पार पाडतो.
मित्र किंवा मैत्रीण शिकवत असेल तर मग शिकण्याची वेगळीच मजा असते. सुरवातीपासूनच बालवाडीतल्या मुलाला डायरेक्ट मॅट्रिकची अक्कल असल्यासारखीच सायकल शिकवली जाते. एकदम फायनल ट्रिक्स. दांड्याच्या मधून पाय कसा घालायचा, एक Paddle वर जास्त जोर देऊन सीटवर एकदम उडी कशी मारायची वगैरे. सगळ्यात शेवटचा गुरूमंत्र असतो तो म्हणजे हात सोडून बिनधास्त सायकल कशी चालवायची.
हे शेवटचं कौशल्य फक्त आणि फक्त मित्रच शिकवू शकतो. असे द्रोणाचार्य लाभले तर तुम्ही सायकल विद्येतले अर्जुन झालातच समजा.
अशी ही सायकल आयुष्याच्या प्रत्येक वळणावर येते आणि आठवणी ठेऊन जाते.
आपण स्वतः शिकत असल्यापासून ते किशोर वयात बहीण भावाला शिकवतांना. मित्र-मैत्रिणी बरोबर घरच्यांना इथंच जातोय सांगून लांब लांब फिरायला जातांना. कॉलेजमधे असताना "ती" च्या बरोबर सायकल हातात घेऊन बरेच अंतर चालत "गप्पा" मारत जाताना. सुखी संसारात लग्नानंतर आपल्या पाल्यांना-मुलांना शिकवतांना. वयाच्या ४०-४५ शी नंतर पोटाचा घेर कमी करतांना. अगदी शेवटच्या पायरीवर जमलंच तर मग नातवंडांना Tri Cycle किंवा Balanced Wheel असलेल्या सायकलवर फेरी मारून आणतांना...
सायकल आणि आयुष्यं ह्यांचं हे घट्ट नातं म्हणजे दुधात दडलेली "साय" च जणू.
उतू जाताना वर आलेल्या फेसापासून ते पार अगदी तुपाची बेरी होण्यापर्यंत.
© मिलिंद सहस्रबुद्धे
०३ जून २०२३
सदाशिव पेठ पुणे ३०
Comments
Post a Comment