"ब्लॅक अँड व्हाईट"
८० च्या दशकात भारतात जेव्हा टेलिव्हिजन आले तेव्हा ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते. तरी त्यांचं काय ते कौतुक होतं. तुम्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट बघत असलात तरी बघण्याची दृष्टी मात्र रंगीत होती. बातम्या देणारे निवेदक किंवा निवेदिका यांच्या कपड्यांचा रंग जरी दिसताना काळा पांढरा दिसत असला तरी बघणारे प्रेक्षकांच्या मनात मात्र ज्याचा त्याचा रंग असायचा. कोणाला तो लाल-पिवळा, जांभळा-निळा तर काळा दिसायचा. छायागीत बघताना वहिदाच्या मागे धावणारा देवानंद. त्याच्या हातभर शर्टावरचे चेक्स काळे पांढरे दिसले तरी देवानंद चाहत्यांना मात्र त्यात केशरी हिरवा तांबडा रंग दिसत होता. तर वहिदाच्या साडीवरची फुलं नारंगी आणि गुलबकक्षी रंगाची दिसायची. सांगण्याचे तात्पर्य असे की टीव्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट होते तरी बघणारे आपापल्या परीने त्यात रंग भरत होते आणि आनंद घेत होते.
अशाच एका ब्लॅक टीव्हीचा २१व्या शतकात बघण्याचा योग परवा मुंबईमध्ये बीकेसीच्या मैदानावर पुन्हा आला. माननीय पंतप्रधान मोदीजी आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मंचावर एकत्र बसले होते. "एक पांढरी दाढी आणि एक काळी दाढी एका फ्रेम मध्ये". बघायला गेलं तर ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच जणू. या ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही ची जादू समस्त मुंबईकरांनी आणि प्रसार माध्यमांमुळे महाराष्ट्राने त्या दिवशी अनुभवली.
दोघांनी जनतेला विविध रंगांची उधळण केली. मुंबईतील विविध मेट्रो लाईनच्या उद्घाटनात एक पिवळा आणि एक लाल रंग होताच. मोदीजीं नी मुंबईच्या विकासाला तिहेरी इंजिनची गरज असल्याची भूमिका अधोरेखित करताच, भाजपवासीयांना भगव्या-हिरवा पट्टा रंग दिसायला लागला आणि कमळाची आठवण आली. तर शिंदेजींनी मागील सरकारमधील विविध भ्रष्टाचार आणि अपूर्ण केलेली काम यांची यादी वाचून करडा रंग उलगडून दाखविला.
"स्वनिधी" सारखी अनोखी योजना अमलात आणून मोदीजींनी मुंबई ही अजून कशी रंगीबेरंगी होईल याची माहिती सांगितली. जर फेरीवाले, हातगाडीवाले, रस्त्यावरील छोटे दुकानदार ह्यांना अशा योजनेचा मुंबईत फायदा मिळाला तर नक्कीच विविध प्रांतातील रंग मुंबईत वाढत जातील. एक वेळ अशी येईल की या विविध रंगात मूळ मराठी भगवा रंग अत्यल्प प्रमाणात दिसू लागेल. असो. तशीही मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे इथं रुपयाच्या नोटेचे विविध रंगच महत्त्वाचे असतात आणि उपयोगाला येतात.
शिंदेजींच्या भाषणात अधून मधून डोकवणारा क्रांतीचा लाल रंग जणू कलानगर मध्ये होणाऱ्या सूर्यास्ताची आठवण करून देत होता. मोदीजी देशभर केलेल्या विकासाचा पाढा वाचतांना निळा पांढर्या रंगांची नक्षी श्रोत्यांच्या डोळ्यासमोर आली.
समोर बसलेला सागरासारखा अथांग जनसमुदाय आशेने या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीची भाषणातून होणारी इंद्रधनुष्य रंगांची उधळण आपल्या डोळ्यात आणि कानात साठवत होता.
आपल्या रोजमराच्या जिंदगीत ह्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीने खरंच किती रंग भरतील याची शाश्वती मात्र त्याला अजूनही होत नव्हती. ह्या टीव्हीची अँटिना कधी कोणत्या दिशेला हालेल आणि मग सिग्नल येईनासा झाला तर या अंधूक भीतीनेच तो आपापल्या घरी गेला.
-----------
- मिलिंद सहस्रबुद्धे
२९-०१-२०२३
सदाशिव पेठ पुणे ३०
ता.क.
मराठी-इंग्रजी-हिंदी भाषा संभाळून घ्या.
Comments
Post a Comment