"शुभमंगल"
"शुभ मन गिल" "शुभ मन गिल" "शुभ मन गिल" हे असं कच्चा पापड-पक्का पापड सारखं भराभरा म्हंटलं तर शुभमंगल, शुभमंगल म्हणल्यासारखंच वाटतं हो ना!
भारतीय क्रिकेट विश्वामध्ये सध्या शुभमंगलमय गोष्टी घडत आहेत. आपण सध्या लागोपाठ सामने जिंकतोय. मागच्या काही आठवड्यात विविध सामन्यांमध्ये शुभमन गिल ह्यानी तर कमालच केली आहे. आधी श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वन डे मध्ये शतकी धावांची खेळी. लगेचच न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वन डे मध्ये द्विशतकी धावांची खेळी. त्याची शंभरी ची भूक संपतच नाही. पुन्हा एकदा न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या वन डेमध्ये शतकी धावांची खेळी. काय म्हणावं ह्या मुलाला. तो कधी थोडा थोडा अर्जुन तेंडुलकर सारखा दिसतो. न्युझीलँड विरुद्ध 2019 मध्ये Hamilton येथे पदार्पण केलेल्या शुभमननी गेल्या चार वर्षात स्वतःच्या दमदार खेळाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. आयपीएल, कसोटी किंवा मग वन डे असेल. क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्ममध्ये त्याचा दमदार फॉर्म तो दाखवतो आहे. त्याच्या ह्या कामगिरीकडे पाहून आता तर त्याला पुढील टि ट्वेंटी टीम मध्ये सुद्धा घेण्यात आले आहे.
तसं पाहिलं तर आपल्याकडे क्रिकेट विश्वात कोणालाही प्रसिद्धी ही सहजासहजी मिळत नाही. एकतर सातत्याने खूप चांगले खेळावे लागते किंवा मग काहीतरी आऊट ऑफ द फिल्ड जाऊन आऊट ऑफ द बॉक्स करावे लागते. शुभमन ह्यानी या दोन्ही गोष्टी केल्या. तो आयपीएलमध्ये त्याचा उत्कृष्ट खेळ दाखवतच होता. परंतु जेव्हा शुभमनच नाव सारा तेंडुलकर बरोबर जोडले गेले तेव्हापासून या देव माशाला जणू गिलच फुटले. रातोरात तो प्रसिद्ध झाला. मग आपोआपच वेगाने पोहायला शिकला. क्रिकेटच्या देवाच्या घरातील ओटीवरच्या कठड्याला नुसतं टेकून काय उभा राहिला, त्याचा परफॉर्मन्स आणि त्याच्या खेळाची स्टाईलच बदलली गेली. कव्हर ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्ह सिक्स ही त्याची हुकमी अस्त्र झाली आहेत. अर्थात दोन्ही अस्त्र त्याला बहाल करणारे गुरुदेखील तसेच आहेत. तो जेव्हा Under 19 वर्ल्ड कप खेळला होता तेव्हा त्याला राहुल द्रविड नावाचा कव्हर ड्राईव्हचा द्रोणाचार्य लाभला. तर सरळ रेषेत बाण (बॉल) कसा मारायचा याचा मंत्र तर साक्षात त्याला क्रिकेटच्या इंद्रदेवाने कठड्याला नुसता टेकला म्हणून जणू बहाल केला आहे.
अशी ही दोन अस्त्र घेऊन तो जेव्हा मैदानावर खेळतो तेव्हा समोरच्या बॉलरची सिंघम स्टाईल धज्जिया उडवत असतो. सध्याचा शुभमन हा नॉनस्ट्रायकरला दिसणाऱ्या विराट कोहलीच्या सावलीत तयार होतो आहे. अप्रत्यक्षपणे विराट कोहली ची बॅटिंग बघत त्याच्यावर कोहलीची एक छाप पडत आहे. बॉलवर पहिल्या टप्प्यापासून ते शेवटपर्यंत खिळलेली नजर, त्याला प्रत्येक चेंडू सीमापार करण्याची नजाकत देते आहे. कन्सिस्टन्सी सारखा महत्त्वाचा गुण तो कोहलीच्या खेळाकडे बघत बघत शिकतोय. सध्या तर पुन्हा एकदा द्रविडाचार्यांसारखे कोच भारतीय क्रिकेट संघाला लाभले आहेत. ह्या सगळ्या "दुग्धवेलची शर्करायुक्त" योगायोगाचा फायदा शुभमनला प्रत्येक मॅच मध्ये होतो आहे.
भारतीय क्रिकेट विश्वातले भीष्माचार्य आणि जे सहजासहजी कोणाला भाव देत नाहीत किंवा कोणाची स्तुती करत नाही असे सुनील गावस्कर. त्यांनी तर त्याला न्युझीलँड च्या मॅच नंतर "SmoothMan Gill" सारखं टोपण नाव देऊन त्याचं बारसं केलं. प्रत्येक मॅचमध्ये स्वतःचा ठसा उमटवणारे योगदान हे शुभमनचं वैशिष्ट्य होत चालले आहे. शुभमनच्या रूपाने भारतीय क्रिकेटला नक्कीच सुनील, सचिन, विराट यांच्यासारख्या सप्तर्षित जाऊन बसणारा नवीन तारा मिळाला आहे. जगातील इतर देशातील क्रिकेट संघांना आमचे एवढेच सांगणं आहे की "शुभमंगल सावधान"
--------
Comments
Post a Comment