Skip to main content

गुंतवणूक

 गुंतवणूक

सध्याच्या घडीला सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे गुंतवणूक.
सीन वन...
आमच्या सोसायटीतील शेजारच्या C विंगमधील साठे आजोबा रिटायर होऊन साधारण १२-१५ वर्ष झाली असतील. मोठ्या सहकारी क्षेत्रातील खात्यात बऱ्यापैकी मोठ्या पदावर होते. चांगले पेन्शन पदरात पाडून रिटायर झाले. दर महिन्याला पेन्शन बँकेत जमा होतं आणि मग साधारण पाच-सहा महिन्यांनी चांगली रक्कम अकाउंट वर जमा झाली की सुरू होते चलबिचल. आजोबांचं हे असं गुंतवणुकीचं विचार चक्र वर्षातून किमान दोनदा तीनदा तरी होतंच.
एकाच बँकेत सगळे पैसे नकोत. म्हणून मग पेन्शनची सरकारी, व्याजदर काहीश्याच टक्क्यांनी जास्त म्हणून एक सहकारी. तर दैनंदिन व्यवहार Ease of Banking सोप्पे जावेत म्हणून एक प्रायव्हेट, अश्या किमान तीन बँका. एकाच खात्यावर नकोत, म्हणून पेन्शन व्यतिरिक्त एक सेव्हींग खातं. ही एवढी सगळी खाती संभाळता सांभाळता मन वेगळ्याच विचारांनी खातं ते वेगळंच.
बँकेत काय सध्या व्याज मिळतंय? मग शेजारी राहणारा राहुल त्यांना सांगतो की आजोबा तुम्ही म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करा. कट्ट्यावरचे देशपांडे सारखे म्हणतात की सोन्यात गुंतवणूक चांगली. असा विषय निघाला की मेहता नेहमी म्हणतो पाच सहा मोठ्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे. कोणाचा तरी फोन येतो की आजोबा LIC एकदम सेफ आहे, तर कोणी म्हणतं एखाद्या रियल इस्टेटमध्ये टाका. अजून काय काय सल्ले येतच असतात पण "मना जोगी" गुंतवणूक काही कुठे होत नाही.
साठे आजोबा असंच एक दिवस त्यांची गुंतवणुकीची फाईल चाळत होते. जुन्या केलेल्या एफडी सर्टिफिकेट्स, पोस्टाचं पासबुक, किसान विकास पत्र वगैरे.
त्यांच्या मनात सहज विचार चमकून गेला.
"काय आहे ना ३०-४० वर्षांपूर्वी पोस्ट, बॅंका, एलआयसी हे सर्व जणू कुबेर होते. RD FD वर तेव्हा असे काही गब्बर Interest Rates होते. तेव्हा असं वाटायचं की आपल्याकडे पाच-दहा लाख पाहिजे होते रे! मस्त पैकी बँकेत ठेवून नुसतं व्याजावर बसून खाल्लं असतं. आज बघा असं झालंय की मस पंचवीस तीस लाख आहेत पण आज बँकांचे आणि इतर पोस्ट व्याजदर काश्मीरच्या थंडीत जसा पारा शून्याच्या जवळ जातो तसे झाले आहेत. नुसतं व्याजावर तेव्हा पण बसून खाता आलं नाही आणि आता एवढे मुद्दल असूनही निवांत बसून खाता येत नाही."
कट, सीन टू...
आजोबांच्याच शेजारी राहणारा राहुल आणि त्याच्या सारखे चाळीशीतील तरुणाईची व्यथा थोड्याफार प्रमाणात अशीच बरं का!
शिक्षणानंतर पहिली काही वर्ष लग्न, नवीन घर, उत्साहाने घेतलेली चार चाकी. घराचे आणि गाडीचे हप्ते भरण्यात उमेदीची १२-१५ वर्षे गेली. त्यामुळे तेव्हा थोडं थोडं जमा करून Investment करू (नवी पिढी म्हणून गुंतवणूक नाही Investment) तर ते जमलं नाही. म्युचल फंडाच्या एसआयपी किंवा शेअर्स मध्ये फारसं काही करता आले नाही. आता वयाच्या मधल्या टप्प्यावर घराचे, गाडीचे हप्ते फेडले आहेत. दुसरी कोणतीही कर्जाची टांगती तलवार डोक्यावर नाही. अर्थिक सबलता आल्यामुळे मानसिक ताणतणाव नाही. पैसा बऱ्यापैकी हातात आहे आणि Investment करण्याची इच्छा आहे. पण Interest Rate सर्वत्र असे आहेत की बँक आणि पोस्ट Safe आहेत पण ह्यांच्यात Investement करण्यात Interest च राहिला नाही. अशावेळेस म्युचल फंड सारखे मार्ग नक्कीच आकर्षित करतात. त्या वाटांवर रंगीबेरंगी दुकान आहेत प्रलोभन आहेत परंतु आपण नेमकं जेव्हा त्या वाटेवर चालताना खड्ड्यात पडू तेव्हा कोणी उचलायला येईल याची शाश्वती नाही. कारण Mutual Funds are subjected to Market Risks. कोणीच गॅरंटी देत नाही. ही Investment म्हणजे सिनेमा सारखी आहे. एखादा फंड किंवा शेअर, सिनेमा सारखा कधी ब्लॉक बस्टर होईल हे सांगता येत नाही आणि मी मी म्हणणारे कधी गाळात जातील कळणार ही नाही. अर्थातच चित्रपट पंडित uncertain असले तरी फायनान्स पंडित नक्कीच माहिती पूर्ण अभ्यास करून योग्य सल्ला देऊ शकतात. परंतु "म्युचल फंड जोखीम के आधीन है" हा डिस्क्लेमर काही ते पुसू शकत नाहीत. अक्षय कुमारच्या गरम मसाला सिनेमांमध्ये एक डायलॉग आहे जो ह्या शेअर मार्केट मधील गुंतवणुकीला तंतोतंत लागू होतो. "जो लडकी हमे चाहीये उसे हम नही चाहिये (जो शेअर अथवा म्युचल फंड चांगले रिटर्न्स देतोय तो घ्यायची आपली कुवत नाही किंवा आपल्याला नेमकं कळत नाही) और हम जिस लडकी को चाहिये वो कैसे चाहिये (म्हणजे जिथे आपण गुंतवणूक करू तिथं रिटर्न्स मिळतीलच याची शाश्वती नाही, किंवा बर्याच वेळा मिळतच नाहीत)"
म्हणूनच लेखाच्या सुरुवातीला म्हटले होते त्याप्रमाणे नात्यांच्या गुंतागुंती पेक्षा अधिक गुंतागुंतीचा प्रश्न सध्या आर्थिक गुंतवणूक हा आहे.
"कारण प्रत्येक वेळेस काळ आणि वेळ एकमेकांना ओव्हरटेक करत आहेत.
जेव्हा वेळ चांगली होती, तेव्हाचा काळ बरोबर नव्हता आणि आता जेव्हा काळ बदलला आहे तेव्हा वेळ बरोबर नाही."
© मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ पुणे ३०
०९/११/२०२२
ता. क.
सध्याच्या आभासी जगात कोणतीच गुंतवणूक शाश्वत नाही, ना नात्यांची ना पैशाची.




Comments

Popular posts from this blog

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द...

दादा परत या..

  दादा परत या.. "मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही" असं तुमच्या कडक आवाजात ऐकताना पुन्हा पुन्हा तुमची उणीव भासते. तुमच्याकडून चुकून बोली भाषेतील शब्दांची उठाठेव कधीतरी झालीही असेल. परंतु संस्कृतीच्या मर्यादा मग त्या राजकीय असतील अथवा सामाजिक तुम्ही कधीही ओलांडल्या नाहीत. कोणा एखाद्यावर उगाच खालच्या भाषेत टीकाटिप्पणी केली नाहीत. तर कधी सत्तेच्या गुर्मीत कोणाची निंदा नालस्ती केल्याचं आठवत नाही. तुमचा बाज आणि दरारा वेगळाच होता आणि आहे. प्रशासनावरची पकड म्हणजे जणू बापाने रस्ता ओलांडताना मुलाचा धरलेला घट्ट हात. धरलेल्या त्या हातात काळजी ही असतेच पण तेवढाच धाक असतो. तशी तुमची प्रशासनावरची पकड आहे. आमच्या पुण्याच्या पालकमंत्री पदी असताना तुमचा आठवड्याला किंवा महिनाभरातील एखादा दौरा ठरलेलाच. हा दौरा म्हणजे साध्या शिपायापासून ते मुख्य आयुक्त पर्यंत एक भीती असायची. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यापासून ते अगदी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीसापर्यंत "दादा आज पुण्यात येणार" हे आधी दोन दिवसापासूनच चर्चेत असायचे. तुम्ही ज्या दिवशी येणार त्या दिवशी सकाळी सात ते रात्री दहापर...