Sunday, July 17, 2022

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो

"कितने आदमी थे" "सरदार दो" 

शोले सिनेमातला डायलॉग.

 २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प्रसिद्धही झाला.  गुजरातच्या दो आदमी (जय आणि विरु) नी भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. पक्षाच्या स्वप्नातलं आणि ध्येयातलं एक उद्दिष्ट त्यांनी साध्य केलं होतं. निर्विवाद बहुमत मिळवून देऊन देशात प्रथमच पक्षाची एक हाती सत्ता आणली. 

 १९४७ साली ब्रिटिश भारत सोडून गेले परंतु घराणेशाहीचा (शाप) वारसा मागे ठेवून गेले. जसं ब्रिटनमध्ये अजुनही राणीचंच राज्य आहे तसं भारतात मागील ७५ वर्षात मोजकी १०-१२ वर्ष सोडली तर एकाच घराणेशाहीच्या (आडनावाच्या) अंमलाखाली चालणारं सरकार होतं. ह्या गुलामगिरीला सलग दोन टर्म बहुमतात निवडून येत छेद दिला तो ह्या "दो आदमींनी". 


२०१४ नंतर देशभरात राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये देखील "सरदार दो" डायलॉगचं प्रत्यंतर येत आहे. दोघांनी पाऊण भारत कमळमय केला. मागील आठ वर्षांत  घराणेशाहीची सत्ता देशातूनच नव्हे तर राज्याराज्यातून उलथवायला सुरुवात केलीय.  अर्थात प्रत्येक ठिकाणी गब्बर वेगळा आणि दोन्ही हात वर करुन भेदरलेला डोळे मोठे केलेला कालिया वेगळा. जय-वीरु मात्र तेच. काही ठिकाणी रोज सकाळी फुशारक्या मारणारे सुरमा भोपाली देखील आहेत. 


एकेकाळी पक्षाचे फक्त दो खासदार संसदेत निवडून आले होते. तेव्हा मदमस्त सत्ताधाऱ्यांनी  "दो सांसद क्या बिघाडेंगे हमारा?" म्हणत हसले होते. त्या दो मधल्या एकाने त्यांना करारा जवाब दिला होता " आमच्या पक्षाचे दोघंच पुरेसे आहेत तुमची अहंकारी धनानंदाची सत्ता उलथवायला". कदाचित त्वेषाने उपरोधाने बोललेल्या ह्या त्यांच्या शब्दांत इतकी ताकद होती की तेव्हाच कुठंतरी चाणक्य आणि चंद्रगुप्त उदयाला येत होते. 


चला.. प्रस्तावना खुप झाली आता मुख्य विषय  "हम दो हमारे दो" सुरू करुया.


भारतीय जनता पक्ष हा Multi Level Marketing म्हणजे MLM तत्वावर चालणारा पक्ष आहे. "राष्ट्र प्रथम" हा विचार हे ह्या MLM चं Product आहे. ह्यातूनच पक्ष १ चे ३ पुढे ३ चे ९ अशी साखळी जोडत भारतभर पसरला. २०१४ नंतर विशिष्ट दों समाजांपुरता मर्यादित न राहता, बेरजेचे समाजकारण करत विविध जाती-समाज धर्मामध्ये वाढत गेला. २०१४ ची मुख्य निवडणूक जिंकल्यावर पुढच्या वर्षभरात  भाजपनी दोन महत्त्वाची राज्य काबीज केली. 

एक आर्थिक दृष्ट्या बलाढ्य महाराष्ट्र तर दुसरं भौगोलिकदृष्ट्या मोठं असलेलं उत्तर प्रदेश. 


महाराष्ट्रातील तोपर्यंतच्या पुरोगामी राजकीय इतिहासाला छेद देत मुख्यमंत्री केला. देवेंद्र फडणवीस.

उत्तर प्रदेशात जिथं जाती धर्माच्या सामाजिक व्यवस्थेवर यश अपयश अवलंबून असते, तिथं धक्का तंत्राचा वापर करत ठाकूर समाजातील एक संन्यासी दिला. योगी आदित्यनाथ


फडणवीस बुद्धी चातुर्य, संयम आणि सर्ववर्ग समावेशक ह्या गुणांनी महाराष्ट्रतील चाणक्य म्हणून नावारूपाला आले आहेतच.

योगी आदित्यनाथांकडे प्रसंगी कठोर निर्णय घेणारे, न बोलून काम करणारे, धर्म अभिमानी आणि समाज कंटकांना जश्यास तसे उत्तर देणारे धर्मवीर म्हणून बघितले जाऊ लागले आहे.


२०१४ ते २०१९ या पाच वर्षात फडणवीस मुख्यमंत्री पदावर असताना वन मॅन आर्मी सारखे लढत होते. स्वपक्षीय राजकारण तर विरोधकांच्या मोर्च्याच्या कारवाया. हा मुख्यमंत्री पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू नये म्हणून स्वकीय आणि विरोधकांनी कित्येक वेळा देव देवी पाण्यात ठेवले. इतिहासातील आपली नोंद पुसली जाऊ नये या भीतीने जातीपातीचे द्वंद लावणारे शकुनी बागेतल्या झाडामागून फासे टाकत होते. परंतु या सर्वांना "एक अकेला" फडणवीस पुरून उरला. त्यांचं एकमेव बलस्थान होतं ते म्हणजे स्वच्छ चारित्र्य. त्यांच्या विविध कल्पक योजनांमुळे विरोधक तर गार पडतच होते परंतु ज्यांना सख्ख्या भावाप्रमाणे वागणूक देऊन सत्तेत भागीदार केले ते पण हळूहळू इर्षेने विरोधक व्हायला सुरू झाले. त्याचाच परिणाम २०१९ चे निवडणुकीत आपण सर्वांनी पाहिला. पुढील अडीच वर्षात लोण्याचा गोळा ही पंचतंत्रातील कथा प्रत्यक्षात अनुभवली.

अर्थातच सत्ता गेली म्हणून स्वस्थ बसणारे किंवा हार मानणारे फडणवीस नव्हते. कारण त्यांना जन्माला घालणारे जे दो आदमी होते त्यांनी २००२ ते २०१४ मध्ये दाखवून दिले होते की चाणक्य नीतीची, कष्टाची आणि संयमाची ताकद काय असते. २०१९ नंतरच्या अडीच वर्षात फडणवीसांनी आपल्या कर्तुत्वाने बिहार सारखे महत्त्वाचे राज्य तर गोव्यासारखे काँग्रेसी परंपरेचे राज्य भाजपला एक हाती मिळवून दिले. २०२२ मध्ये हॅट्रिकचे क्लीन बोल्ड करत संपूर्ण संघ गार करून घरी पाठवला. 


ज्यांना पन्नास वर्षे राजकारण करून सुद्धा जमलं नाही ते फडणवीस नावाच्या पन्नास वर्षाच्या तरुणांनी 'करून दाखवलं'. एक जाणकार राजा पासून ते दुसरा स्वयंघोषित राजा आणि त्यांच्या सल्लागाराला लागोपाठ राज्यसभा, विधान परिषद, आणि बंड अशी तिहेरी धोबी पछाड दिली. हे कमी की काय म्हणून मुख्यमंत्रीपण घोषित करुन चीतपट केलं. 

वेळेप्रसंगी अडीच पावले मागे जाऊन मोठा चेकमेट करण्याची ताकद असलेला लंबी रेस का घोडा म्हणजेच देवेंद्र फडणवीस.


मठाधिपती ब्रम्हचारी. धर्मासाठी आयुष्य ओवाळून टाकणारा. ठाकूर समाजात जन्माला येऊनही लहान वयातच आपलं जीवन मठाला समर्पित केलेला संन्यासी योगी आदित्यनाथ. 

दिल्लीतल्या दोघांनी तयार केलेला हा दुसरा. 

भगवी वस्त्रे, कायमस्वरूपी मुंडे, कानात गळ्यात रुद्राक्ष माळा घालणारा मुख्यमंत्री. सेक्युलर भारताच्या चित्राला तडा जाणारं व्यक्तीमत्व. उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या सर्वोच्पदी. जिथं विविध धर्मातील जनतेचा पगडा आणि प्रभाव आहे तीथं हा कट्टर धर्मवीर.

सुरवातींच्या महिन्यात तथाकथित सेक्युलर वाद्यांकडून टिका आणि हेटाळणी करण्यात आली. विशिष्ट समुदायाला भयभीत करण्यासाठी आदित्यनाथांच्या धर्मनिष्ठतेचे दाखले देण्यात आले. हा भगवा योगी सरकार आणि प्रशासन काय चालवणार म्हणत त्यांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न चिन्ह उभं करण्यात आले. परंतु मागील ५-६ वर्षात योगींनी उत्तर प्रदेशला ज्या उंचीवर नेऊन ठेवलयं ते कदाचित प्रदेशात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नसेल. जी बोटं त्यांच्यावर आरोप करत होती तीच बोटं तोंडात घालण्याची पाळी आली आहे. आपल्या कर्त्याच्या  पावलांवर पाऊल ठेवत न बोलून धडाकेबाज निर्णय घेत प्रदेशातील लोकांची मने जिंकली आहेत. कट्टर धर्मवीराला शोभतील असे निर्णय घेत माफिया राज संपुष्टात आणले आहे. पर्यटन आणि औद्योगिकीकरणाला चालना देत रोजगाराच्या संधी निर्माण करत आहेत. अर्थातच विकास कसा भकास होईल ह्याचा  विरोधक धार्मिक सलोखा बिघडवून प्रयत्न करत आहेत. तरीही दुसऱ्या टर्मला देखील बहुमताने निवडून येत आदित्यनाथांनी आपली बुलडोझर बाबाची प्रतिमा कायम राखली आहे. 


२०१४ ला निर्माण झालेल्या त्या "दो आदमीं" मध्ये २०२२ला त्यांनीच घडविलेल्या अजून "दो आदमींचा" उदय झालाय. हे नव्याने उदयास आलेले 'दो आदमी' भारतीय राजकारण आणि समाजकारणातील आधीच्या दोंचे मानसपुत्र तर आहेतच, परंतु पुढील वीस वर्ष त्यांचा वारसा चालवण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे का हे काळच ठरवेल. 


मागील 'दोन' दशकांत, संसदेतील 'दोन' खासदारांतून उभारी घेणारा हा पक्ष, पुढील 'दोन' दशकांत "हम दो हमारे दो" च्या जोडी साखळीने भारतावर राज्य करेल ह्यावर पक्षातील कोणाचेही 'दो' मत असणार नाही हे नक्की.

 

- मिलिंद सहस्रबुद्धे

पुणे ३०

१७/०७/२०२२


ता.क. 

योगायोग असा की आज हा लेख पूर्ण केला तेव्हा महाराष्ट्रात देखील अजूनही दोघांचंच मंत्रीमंडळ आहे.

No comments:

Post a Comment

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...