Wednesday, July 6, 2022

लग्न वाढदिवस

 दिनांक: ०६ /०७/२०२२

वेळ: दुपारी ४:०० (चहाची)

स्थळ: अर्थातच सदाशिव पेठ पुणे ३०


मी: "किती झाली गं?" माहिती असूनही मी मुद्दामूनच विचारलं. 

ती: "लग्नाला १९ आणि भेटून २१ वर्ष. म्हणजे बेडीत अडकून १९ आणि चोरी करून २१"


मी: "शिकलीस की बोलायला"

ती: "हो का. तू ऐकायला शिकलायस असं म्हण"

मी: "अर्थातच. आपला वाद एकतर्फीच असतो. संवाद म्हणशील तर तो बहुमुखी आहे"

ती: " तो कसा काय बुवा?"


मी: "आपल्या संवादात आधी आई-बाबा असायचे (अर्थात माझे) आणि आता दोन्ही मुलंही सामील असतात. म्हणून बहुमुखी "

ती: "हो. हे मात्र खरं आहे. सुरुवातीला आई-बाबांचा तुला आधार असायचा आणि आता मुलंही तुझीच बाजू घेतात. तुझं कायमच बरं आहे."


मी हसतो. 

मी: "मग! मी आहेच तसा सर्वांना हवाहवासा"

ती: "हो ना आई मात्र कायम नको. तुझी नाही हा तुझ्या मुलांची आई असं म्हणतेय मी. तुझ्या आईच्या बाबतीत मात्र असं होत नाही कधी"


मी: "अगं, आजच्या दिवशी एवढं काय वाटून घेतेस. मी आपली सहज चेष्टा करतोय तुझी"

ती: "बरोबर आहे! अंगाशी आलं की चेष्टा करतोय किंवा चेष्टा चालू आहे असं म्हटलं की झालं"


मी: "तुला खरंच वाटतं का? असं असेल म्हणून. तू नसशील तर काय होईल हे तुला पण माहितीय आणि आम्हाला सगळ्यांना तर नक्कीच.  अर्थात ही वरवरची चेष्टा मस्करी म्हणजे चॉकलेटच्या वरचे रॅपर आहे. तु आमचं  आपलं गोड चॉकलेट आहेस.  हे तुझ्यावरचं गोड प्रेम आहे."

ती: "वा छान. झाला का जागा तुझ्यातला साहित्यिक. अलंकारीक शब्द आणि उपमा देऊन वाक्य रचना करायची. मग समोरच्याचा राग विरघळतो. पण बच्चू मी म्हणजे तुझी आई नव्हे तुझ्या मुलांची आई आहे बरं!"


मी: "मला वाटलंच तुला असं काहीतरी वाटणार. खरंच ते गोड चॉकलेट म्हणजे ना तू आहेस. अजून योग्य सांगायचं तर Eclair किंवा Melody चॉकलेट. चघळत राहिलो की त्याचा गोडवा अजूनच वाढत जातो. बघ ना सुरुवातीला चॉकलेट तोंडात टाकल्यावर नीट चवच लागत नाही कळतच नाही गोड आहे का अगोड. चॉकलेटचा फ्लेवर समजत नाही. जस जसं चघळत जातो नि तसं त्या चॉकलेट रॅपरच्या आतल्या पांढऱ्या कागदाची चिकटलेली चव निघून जाते आणि मग चॉकलेटचा गोडवा लागायला लागतो मग असं वाटतं की चॉकलेट संपूच नाही. तसंच काहीसं आहे आपलं प्रेम संसार मुलं सगळंच."


ती: "चल काहीतरीच हो तुझं! तू काय बोलशील ना खरंच."


मी: "अगं तसं नाही.  शप्पथ गेली २१ वर्ष तू अशीच मुरत गेलीस माझ्या जीवनात. सुरुवातीला सगळंच नवीन. त्या रॅपरच्या आतल्या पांढऱ्या कागदासारखं. आपलं प्रेम नवीन प्रेयसी म्हणून तुझा गोडवा निराळा. लग्नानंतर आई-बाबा आणि आपण दोघं असा चौकोनी संसार. तो पण नवीन. मग त्या चॉकलेटचा एक वेगळाच फ्लेवर. तो गोडवा हळूहळू वाढत गेला. काही वेळा चिवट, चिकटपणा दाढेत अडकला पण अर्थातच सामंजस्याने तो काढत परत आपण  चॉकलेट चघळत गेलो." 

आम्ही दोघंही शांत एकमेकांकडे बघत होतो पण शुन्यात...


मी: "पुढे मुलं झाली आणि मग परत माझ्या मुलांची आई म्हणून नव्या चॉकलेटच्या रूपात आलीस. हा एक नवीनच फ्लेवर होता तुझा. आज जशी मुलं वाढत गेली आहेत तसतसं परत या फ्लेवरच्या चॉकलेटचा पण गोडवा वाढत चाललाय. अर्थातच पुढे अजून किती विविध चॉकलेटच्या रूपात, फ्लेवर्स मध्ये तुला अनुभवायला मिळणारे ह्याची उत्सुकता कायम मनात आहे"

पटकन भानावर येत..

ती: "तुझ्या अशाच बोलण्यावर आणि समजावून सांगण्यावर भाळले होते मी. लहान होते तशी पण आज मात्र तेव्हा केलेल्या धाडसाचं माझं मीच मनात रोज कौतुक करते"


मी: "मग, सांगतो काय आहेच माझा प्रभाव हवाहवासा."


मी: "एक सांगू का? प्रत्येक वेळेस तुझ्या नवीन रूपातलं नवीन फ्लेवरचे चॉकलेट खाण्यासाठी दुकानातल्या बरणीकडे निरागसपणे बघणारा तो लहान मुलगाच आहे मी अजूनही." 

तुझाच एकमेव निस्सीम चाहता

- मिलिंद 


तन्मया, आपल्या दोघांना

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा 

खुप प्रेम....

No comments:

Post a Comment

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...