Skip to main content

आठवणींचा कप्पा

 आठवणींचा कप्पा



दिवाळी - नरकचतुर्दशी पहिला दिवस
वातावरणात थंडीची चाहूल लागली असायची आणि हलक्या धुक्यात एक वेगळाच गंध पसरवून दिवाळी यायची.
"ह्या वर्षी रेनकोट कपाटात परत ठेवावे की नाही ह्याच विचारांच्या धुक्यात पुणेकर हरवून गेले आहेत."
आई आणि आजी हमखास आधी उठून, अभ्यंगस्नान, देवपूजा करून गोडधोड करत असायची. आपण कितीही लवकर उठलो तरी हया तयारच दिसायच्या, जणू आदल्या रात्री पासूनच असल्यासारख्या.
घराबाहेर पणत्या लावलेल्या असत. मोरी, शौचालय स्वच्छ धुउन त्यात पणत्या लावल्या जात. नरकासुराची नरकघाण स्वछ होउन सर्वत्र आरोग्य नांदो ही भावना.
"ही लाल विटकरी मातीची, आनंदाची, प्रेमाची, चैतन्याची पणती अजुनही घरोघरी तेवते आहे."
पहाटे आईच्या 'उठ रे आता' च्या हाकेने नाही तर धडाढधुढुम फटाक्यांनीच जाग यायची. लवकर पहाटे उठून पहिला फटका बौम्ब कोण फोडणार अशी चुरस असायची. मग काय पहाटे तीन साडेतीनला उठून पब्लिक एखादा सुतळी, लक्ष्मी फोडून परत झोपायचं. सकाळी एकमेकांकडे फराळ करत फिरतांना मीच कसा आधी तो फोडला ह्यावर चर्चा आणि धुव्वा.
अगदी सुर्योदय पुर्वी वगैरे नाही पण पहाटे पाच-साडेपाच वाजता जाग यायची. तेल-उटणं लावून, अभ्यंगस्नान करून सगळे तयार असायचे. मनसोक्त फटाके उडवायचे, ज्याला जे झेपतील(आर्थिक) तसे. म्हणजे कोणी लवंगी आख्खी माळ लावेल तर कोणी तीच माळ सुटी करून एक एक वाजवेल. फुलबाजी, भुईनळे, चक्र ह्यांची मात्र रेलचेल होती.
"गेल्या काही वर्षांत फटाके पर्यावरणवादी विचारांच्या पावसात भिजून गेलेत."
मोठी मंडळी नातेवाईकांना भेटून, फोन करून शुभेच्छा देत, चुरस तिथे पण होतीच.."काय मग किती वाजता उठलात आज?" हा प्रश्न आणि उत्तर मिळाल्यावर चेहऱ्यावरचे विविध भाव आणि चेष्टा ठरलेली.
"सध्या whatsapp वरच दिवाळी शुभेच्छांचे लाडू-करंज्या एकमेकांना भरवून आनंद मानला जातो. Facebook वर घरातल्या रांगोळी पासून ते लक्ष्मीपुजन आणि देवघरातील फोटो upload केल्यावर मिळणाऱ्या Likes च्या आशिर्वादाने मनं भरतात."
चिखलात मातीचा किल्ला करणे, खेळणी,चित्रे लावणे ह्यात दिवस कधीच संपून जायचा. आपला किल्ला आपली चित्रे शेजारच्या आळीतील, वाड्यातील, सोसायटी पेक्षा कशी भारी आहेत ह्याची स्पर्धा चार दिवस चालू असायची.
"किल्ले आता राजकीय स्पर्धांच्या तटबंदीत अडकलेले दिसतात. घरोघरी दरवर्षी माळ्यावरुन काढलेले किल्ल्याचे साचे सजवले जातात "
नाष्टा म्हणजे फराळंच. चिवडा, चकल्या, करंजी लाडू वगैरे. होटेल मध्ये जावून इडली सांबर अथवा पोहे-उपमा नव्हे.
घरच्या वडीलधारी मंडळीं बरोबर जवळपासच्या मंदिरात देवदर्शनाला जाणे. दिवाळी पहाटचे कार्यक्रम असे वेगळे काही नव्हते.
अशी समृद्ध सुरवात व्हायची दिवाळीची.
आता सर्वत्र समृध्दी आली आहे...
अजूनही त्या पहिल्या पहाटेची आपण सगळेच वर्षभर वाट बघतो. सुवासिक तेल-उटणं आणि मोती साबणाचा सुगंध मग वर्षभर मनात दरवळतो.
दर महिन्याला जरी कपडे विकत घेतले तरी दिवाळीच्या पहिल्या पहाटेला नवीन कपडे घालण्याचं सुख काही औरच. एरवी रोज जरी विविध चिवडा-लाडू, चकली स्टिक खात असलो तरी, दिवाळीत घरगुती फराळानी भरलेल्या ताटातील खोबर्याचा तुकडा असलेल्या चिवड्याची चव आईच्या हाताची जादु काय असते ह्याची अनुभुती देते.
काही बदल झाले, तर काही तसेच राहिले
काही माजी झाले, तर काही 5G झाले..
तरीही दिवाळीचा लखलखाट कायम आहे आणि राहील.
नव वर्षाचे तोरण बांधून दारी
लक्ष लक्ष दीप उजळत आली ।
सुखसमृद्धीची भरभराट होउनी
आनंदी समाधानी जावो हि दिवाळी ।
© मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ पुणे ३०
२४-१०-२०२२

Comments

Popular posts from this blog

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द...

दादा परत या..

  दादा परत या.. "मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही" असं तुमच्या कडक आवाजात ऐकताना पुन्हा पुन्हा तुमची उणीव भासते. तुमच्याकडून चुकून बोली भाषेतील शब्दांची उठाठेव कधीतरी झालीही असेल. परंतु संस्कृतीच्या मर्यादा मग त्या राजकीय असतील अथवा सामाजिक तुम्ही कधीही ओलांडल्या नाहीत. कोणा एखाद्यावर उगाच खालच्या भाषेत टीकाटिप्पणी केली नाहीत. तर कधी सत्तेच्या गुर्मीत कोणाची निंदा नालस्ती केल्याचं आठवत नाही. तुमचा बाज आणि दरारा वेगळाच होता आणि आहे. प्रशासनावरची पकड म्हणजे जणू बापाने रस्ता ओलांडताना मुलाचा धरलेला घट्ट हात. धरलेल्या त्या हातात काळजी ही असतेच पण तेवढाच धाक असतो. तशी तुमची प्रशासनावरची पकड आहे. आमच्या पुण्याच्या पालकमंत्री पदी असताना तुमचा आठवड्याला किंवा महिनाभरातील एखादा दौरा ठरलेलाच. हा दौरा म्हणजे साध्या शिपायापासून ते मुख्य आयुक्त पर्यंत एक भीती असायची. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यापासून ते अगदी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीसापर्यंत "दादा आज पुण्यात येणार" हे आधी दोन दिवसापासूनच चर्चेत असायचे. तुम्ही ज्या दिवशी येणार त्या दिवशी सकाळी सात ते रात्री दहापर...