Skip to main content

Present Value (PV) of चारमिनार

 "Present Value (PV) of चारमिनार"

हैदराबादच्या पाण्यात आणि तिथल्या हवेत काही निराळी रसायन असावीत. ह्या हैदराबादनी आपल्या देशाला असे "पी व्ही" दिले की ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात एक अमुलाग्र बदल घडून आणला. एक होते Father of Indian Economic Reforms म्हणजे "पी व्ही नरसिंहराव".
पी व्ही नरसिंहराव हे १९९१ -९६ या पाच वर्षात भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होते. काँग्रेसच्या सर्वसाधारण परंपरेला छेद देत प्रथमच एक बिगर गांधी-नेहरू पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द उदयास आली. अर्थातच ती खणखणीत वाखाणण्याजोगी होती. १९९१ साली पीव्हींनी ऐतिहासिक आणि क्रांतिकारक अर्थसंकल्प मांडला. ह्या अर्थसंकल्पाचे जनक होते डॉक्टर मनमोहन सिंग परंतु त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले ते पी व्ही नरसिंहराव. या अर्थसंकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे GATT करार. ( General Agreement on Tariffs and Trade) भारताच्या वाटचालीत नवीन आर्थिक पर्व त्या क्षणी सुरू झाले. ज्याचे वर्णन खाजगीकरण किंवा जागतिकीकरण असे कायम करण्यात आले. परंतु ह्यास आपण उदारीकरण असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. आज सर्वजण, विशेषतः नवीन पिढी जो Globalisation हा घासून गुळगुळीत झालेला शब्द वापरतो, तो शब्द जेव्हा भारतीयांच्या ध्यानी-मनी नव्हता तेव्हा पीव्हींनी एक धाडसी निर्णय घेतला होता. तो म्हणजे GATT करारावर केलेली स्वाक्षरी. अर्थातच या एका अर्थसंकल्पामुळे मागील तीस वर्षात भारतात जो अमुलाग्र बदल घडलेला आहे याचं संपूर्ण श्रेय पी व्ही नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनाच जाते. आज संपूर्ण जग हे भारतातल्या सर्वसामान्य माणसाच्या दारात सेवेला उभे आहे ते ह्याच अर्थसंकल्पामुळे. मागील 30 वर्षातील पिढीने जागतिक शिक्षणाची फळ चाखली, देश-विदेशी नोकरी करून आपला ठसा उमटवला. तेथील सुखसोयी असलेली जीवनशैली उपभोगली किंवा उपभोगत आहेत ते हृया GATT करारामुळे आणि अर्थसंकल्पामुळे. भारतातील गरीबीचा दर कमी होऊन दरडोई उत्पन्नात भरघोस वाढ झाली. नवमध्यम वर्ग उदयास आला. आपल्या देशातील विविध उद्योगांना देखील या करारामुळे Globalise होण्याचा फायदा झालेला आहे.
आपल्यापैकी फार कमी जणांना हे माहिती असेल की एक १९९१ च्या ह्या अर्थसंकल्पामुळे भारत एका मोठ्या जागतिक दिवाळखोरीपासून वाचला होता. अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या आपल्या सर्वांसाठी हा अर्थसंकल्प इतिहासातील सुवर्णपान आहे. हे झाले नसते तर कदाचित आपल्या देशाची परिस्थिती आफ्रिकेतील देश किंवा शेजारील देशांसारखी झाली असती.
१९९१ च्या वेळेस जो विरोधी पक्ष या GATT कराराच्या विरोधात संसदेत बाकं वाजवत होता आज तो सत्तेत आहे. उपहासाची बाब ही अशी की तोच पक्ष ह्या उदारीकरणाचा सर्वात जास्त विविध प्रकारे फायदा करुन घेऊन उद्दातीकरण करतांना दिसतो आहे. असो.
पीव्हींची कारकीर्द ही सर्वार्थाने विविध पारंपारिक आणि चुकीच्या चालू असलेल्या गोष्टींना छेद देणारी ठरली. १९८० सालापासून चालू झालेले लायसन्स राज मोडून काढण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. एक कट्टर काँग्रेसवासी असून देखील सातत्याने घराणेशाहीचा विरोध करणारे पीव्हीं हे एकमेव काँग्रेसजन असतील.
पारंपारिक वेशभूषा आणि भारतातील बहुसंख्य भाषांचे ज्ञान असणारा हा असा एकमेव पंतप्रधान भारताला लाभला होता. डॉक्टर अब्दुल कलामांनी त्यांच्या बाबतीत काढलेले गौरव उद्गार असे होते की "राजकीय व्यवस्थेपेक्षा राष्ट्र मोठे आहे असे मानणारा देशभक्त राजकारणी म्हणजे पी व्ही नरसिंहराव". अजून एक कौतुकास्पद कामगिरी म्हणजे त्यांनी अल्पमतात असलेलं सरकार यशस्वीरित्या पाच वर्षे चालवलं. आजच्या पिढीला याची जाणीव होऊ शकते की अल्पमतात सरकार चालवणं हे किती अवघड असू शकतं.
आज जी घराघरात पोहोचलेली कॉम्प्युटर आणि मोबाईल वरून शेअर मार्केटचे ट्रेडिंग करणारी व्यवस्था आहे त्याचे जनक देखील नरसिंहरावच आहेत.
१९९४ मध्ये नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची संगणक-आधारित व्यापार प्रणालीची (computer based trading system) सुरुवात ही पीव्हींच्या कारकिर्दीतलीच. अर्थात पी व्ही नरसिंहराव आपल्यात आता नाहीत. तरीही भारताच्या इतिहासात आर्थिक क्रांती घडविणारे पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव कायम घेतले जाईल.
दुसरी पीव्ही जिला Sister of Indian Sports Reforms म्हणता येईल अशी "पी व्ही सिंधू". भारतीय खेळात क्रिकेट सोडून इतर खेळांचे महत्त्व आणि त्यांच्या बद्दलचे प्रेम वाढवण्यात जिच्या कारकिर्दीचे खूप महत्त्वाचे योगदान आहे अशी पी व्ही सिंधू.
विशेष म्हणजे १९९५ साली हैदराबादचे एक पीव्हीं दिल्लीत राज्य करत होते आणि तिथे आपला ठसा उमटवत होते. तेव्हाच त्याच हैदराबाद मध्ये दुसऱ्या पीव्हीचा म्हणजेच पी व्ही सिंधू चा जन्म झाला होता. जणू पुढील क्रांतींची ही नांदी होती.
नुकत्याच झालेल्या Bermingham Commonwealth Games मध्ये सिंधू आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी जागतिक स्तरावर Badminton स्पर्धेत यशाचा ठसा मतदानाच्या शाईसारखा उमटवला आहे. जो की कदाचित इतक्या लवकर कुठला देश पुसेल असे वाटत नाही.
Badminton World Singles जिंकल्यावर जनगणमन सुरू झालं तेव्हा भारतीयांच्या उर भरून आला आणि पी व्ही सिंधूच्या कोचचे सुद्धा डोळे तेव्हा कोर्टवर भरून आले असतील.
संकल्प सातत्य आणि सिद्धी याचे उत्तम उदाहरण म्हणजे पी व्ही सिंधू.
2018 Common Wealth Gold
2019 World Champions Gold
2022 Common Wealth Gold
सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण बॅडमिंटन संघाने ह्या वर्षी तर वैयक्तिक आणि सांघिक पदकांची रास भारत देशाला अर्पण केली आहे.
भारतातील सुप्रसिद्ध क्रिकेटच्या Monopoly ला यशस्वीरित्या छेद देत ह्या पीव्हीनी बॅडमिंटन बद्दल तसेच इतर खेळांबद्दल भारतीय लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला. हा विश्वास निर्माण करताना तिने तिच्या विविध दुखापतींवर मात करत प्रत्येक जागतिक स्पर्धेमध्ये सातत्याने यश मिळवून दाखवले. त्यानंतर भारतीय पाल्य आणि पालक या दोघांमध्ये इतर विविध खेळांची आवड आणि जागरूकता निर्माण झाली आहे. त्याच जागरूकतेची प्रचिती आपल्याला गेल्या काही वर्षात जागतिक स्तरावर भारताला मिळणाऱ्या विविध खेळांमधील यशामध्ये आणि पदकांमध्ये दिसून येत आहे.
बॅडमिंटन हा तसा वैयक्तिक खेळ आहे. सांघिक खेळ म्हणजे क्रिकेट, फुटबॉल किंवा हॉकी, अशा खेळात एखाद्या खेळाडूचे व्यक्तीगत गुणदोष लपून जातात. परंतु बॅडमिंटन,टेबल टेनिस आणि चेस अश्या वैयक्तिक खेळांमध्ये No excuses. Either Hit or Miss. Your action and the result is always Binary. Either 1 or 0 (zero). No fractions allowed.
महत्त्वाचे म्हणजे खेळताना सगळे निर्णय आपले आपण घ्यायचे. होणाऱ्या परिणामांची जबाबदारीपण आपणच घ्यायची. हे म्हणजे त्या उक्तीप्रमाणे झाले तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अशावेळी खरंच पी व्ही सिंधूची सातत्याने निर्विवाद कामगिरी कौतुकास्पद वाटते.
बॅडमिंटन मध्ये नुसतं ताकद किंवा चपळ शरीर असते असून चालत नाही. समोरच्याच्या मनातलं ओळखणं हे फार महत्त्वाचा गुण असतो. तिथं तुम्ही एक चाणाक्ष Salesman असणं गरजेचं असतं. रवी शास्त्री कॉमेंट्री करताना म्हणतो तसं you should know your customer. तो काय विकत घेईल हे ओळखायचं आणि तेच त्याला द्यायचं. आपल्याकडे ते नसलं तरी आपण त्याला तेच विकतोय असं दाखवून चपळाईने एखादा Smash किंवा Volley मारून पॉईंट मिळवण्यात सिंधू पटाईत आहे. पी व्ही सिंधू कडे ही बॅडमिंटनच्या पॉईंट्सची Salesmanship वरच्या दर्जाची आहे. अगदी देशांतर्गत सामन्यांपासून ते जागतिक खेळातल्या अंतिम सामन्यांमध्ये वेळोवेळी तिने दर्जा दाखवून दिला आहे.
काही विजयानंतर शैम्पैनचे फवारे आणि विजयाचे उन्माद नसतात. जेव्हा पी व्ही सिंधू हातातलं गोल्ड मेडल घेऊन कॅमेरासमोर बोलते तेव्हा एक साधं गोड हास्य आणि धन्यवाद एवढेच दिसतं.
तेव्हा मनात एक विचार कायम येतो की,
"प्रत्येक खेळातल्या विजयात अर्थकारण लपलेलं नसतं.
काही ठिकाणी असतं आणि दिसतं ते निव्वळ देशप्रेम."
- मिलिंद सहस्रबुद्धे
पुणे ३०


Comments

Popular posts from this blog

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय मधेच उभे आ
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी