Skip to main content

रोज़ रोज़ आँखों तले

रोज़ रोज़ आँखों तले...

 Happy Birthday गुलज़ार साहब


सुमधुर, मधाळ, रसरशीत, मदहोश, दर्दभरं अहो किती विशेषणं लावू कमीच पडतील. असे हे साधारण ऐंशीच्या दशकातील रोमँटिक गाणं. "रोज़ रोज़ आँखों तले"
पडद्यावर रुक्ष ठोकळा संजय दत्त, त्याच्या जोडीला मनमोहक आकर्षक सुंदर दिसणारी मंदाकिनी. मंदाकिनी म्हणलं की कायम 'राम तेरी गंगा मैली' एवढंच सगळ्यांना आठवतं. हया गाण्यात मात्र जी काय गोड आणि लोभस दिसलीय ना त्याला खरंच तोड नाही. तीच्या मन मोकळ्या वावरामुळे संजुबाबाचा "ऐ बावा"पणा झाकला गेलाय हे मात्र नक्की. सिनेमावरील चर्चेच्या भाषेत सांगायचं तर हे गाणं मंदाकिनीनं पडद्यावर खाल्लंय.
संपूर्ण गाणं कॅमेराच्या ब्लर (धुसर) तंत्रज्ञानाचा बॅकग्राउंड च्या स्वरूपात उपयोग करुन चित्रीत केलंय. साधारणतः संध्याकाळ ते रात्र याच्या मधल्या वेळच्या वातावरणात चित्रीत केलं गेलं आहे. त्यामुळे संध्याकाळचा तो प्रेमातला बेचैन, बेधुंद माहोल या गाण्याला अजूनच टवटवीत रोमँटिक करतो. गाणं संपतं तेव्हा पहाटेचा सुर्य उगवतांना दिसतो. दिग्दर्शक राज सिप्पीच्या कल्पना विस्ताराचं कौशल्य वाखाणण्याजोगे आहे.
"रोज़ रोज़ आँखों तले...लालाला...लालाला.."
"रोज़ रोज़ आँखों तले,
एक ही सपना चले
रात भर काजल जले,
आँख में जिस तरह"
ख़्वाब का दिया जले
आहाहा काय शब्दरचना आहे. "ख्वाब आणि सपना" ह्या दोन्ही समानार्थी शब्दांची एकत्रपणे एका कडव्यात परंतु वेगवेगळ्या अर्थांची केलेली गुंफण. हे म्हणजे सौभाग्यवतीच्या आंबाड्यावर सजलेली चाफा आणि चाफेकळी यांची सुबक वेणीच जणू.
निजल्यावर मिटलेल्या पापण्यांच्याखाली दोन चंद्रकोरसमान पणत्या तेवत आहेत. त्यामध्ये आठवणींरुपी काजळ जळतयं. हे काजळ तेल रात्रभर पापण्यांना तेवत ठेवतयं. हया आठवणी दुसऱ्या-तिसऱ्या नसून प्रियकराबरोबर बघितलेल्या स्वप्नांच्या आहेत. अर्थात हे सगळे जे चाललंय ते पण एक जणू साखर झोपेतलं पहाटे पडलेलं "ख्वाब" आहे.
आपण ह्या स्वप्नाच्या दुनियेत बाहेर पडतो ते पुढच्या कडव्यात. साहजिकच पुढच्या कडव्यात तर या गाण्याचे किंवा मी तर म्हणेन या सुंदर गझलेचे महान गझलकार गुलझार साहेबांनी कमालच केलीय.
तसं पाहिलं तर "गुलझार साहेबांच्या नावातच ग,झ,ल ही अक्षरं सामावली आहेत."
"जबसे तुम्हारी नाम की मिसरी
होंठ लगायी है
मीठा सा ग़म है, और मीठी सी तन्हाई है"
रोज़ रोज़ आँखों तले ...
हे कडवे ऐकल्यावर मला फक्त आणि फक्त व. पु. काळे यांच्या प्लेझर बॉक्स मधील एक वाक्य आठवले, " प्रेम म्हणजे काय? ह्याची केलेली व्याख्या, एकमेकांना जखडून ठेवणारं Pleasing Pain किंवा Painful Pleasure"
दोन महान साहित्यकार. एक लेखक तर एक कवी-गझलकार . विचारात किती साधर्म्य आहे बघा. भाषा जरी वेगळी असली तरी दोघांचा अर्थ एकच. प्रेम भावना सर्व भाषात आणि साहित्यात एक सारखीच प्रतिबिंबित होते. म्हणतात ना कलेला भाषा, धर्म, रंग, प्रदेश कसल्याही मर्यादा नसतात हे इथं पदोपदी जाणवतं.
ह्या कडव्यात ती म्हणतीय की तुझ्या नावाची मिसरी म्हणजे खडीसाखर ओठाला लावली तेव्हा एक हलकं आनंद देणारे दुःख आणि एक गोड पण हवीहवीशी वाटणारी ओढ ही जणू कायमची निर्माण झाली. ही गोड साखर कधीच विरघळून जाऊ नये आणि तीचा गोडवा असाच कायम राहील ना ही भीती तिला मनात कुठंतरी सतावतीय. ही हुरहुर म्हणजेच "मीठासा गम".
षोडश वर्षीय मुलीचं नवं प्रेम ते अगदी साठ वर्षीय स्त्रीलाही आपल्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीत घेऊन जाणारे हे बोल. पहिल्या प्रेमात तिला यत्र तत्र सर्वत्र प्रियकरच दिसत असतो. तिच्या मानसिक आणि शारीरिक हव्याहव्याशा वाटणाऱ्या सुखद वेदना, स्त्रीसुलभ भावना गुलझार साहेबांनी "मीठीसी तन्हाई" या दोन शब्दात मांडलेल्या आहेत.
गम आणि तन्हाई या दोन नकारात्मक शब्दांना प्रेमासारखा तरल विषयांशी जोडून इतका सकारात्मक विचार करायला भाग पाडणे म्हणजे गुलझारजींना Personality Development गुरूच म्हणायला पाहिजे.
आशाताईंच्या (आशा भोसले) बाबतीत आपण काय बोलावं. गाणं सुरू होतं त्यांच्या आवाजाने आणि संपतं देखील त्यांच्याच आवाजात. संपूर्ण गाणंभर त्यांच्या गळ्यातील अमृत स्वरांनी एक मुरलेला मादक गोडवा निर्माण केलाय .
"छोटी सी दिल की उलझन है
ये सुलझा दो तुम
जीना तो सीखा है मर के,
मरना सिखा दो तुम"
रोज़ रोज़ आँखों तले ...
आयुष्य ओवाळून टाकायचे म्हणजे काय असतं हे प्रेमातून किंवा प्रेमात पडल्यामुळे तर तू शिकवलं आहेसच. परंतु ती आता विचारते की प्रेमात सर्वस्व होऊन जगणं शिकवलंस तसं एकरूप होऊन अमर कसं व्हायचं ते पण मला अनुभवायचं आहे.
अंतरा पासून सुरुवात झालेला दोन कडव्यांचा असा हा आशाताईंचा सुमधुर आवाजातला केशरी हापूस आमरस तयार होतो. त्यात एक सुबक नक्षीदार चांदीचा चमचा सुरू मारतो. मग तो आमरस आपल्या ओठांपर्यंत येईस्तोवर जे काही आपल्या मनात येतं ना तेच इथे पण होतं. उत्कंठा आणि चलबिचल. अमित कुमारजींचा तो गोड भर्जरी आवाज चांदीच्या चमचा रूपाने आपली आम्र क्षुधा शांत करतो.
"रोज़ रोज़ आँखों तले...लालाला...लालाला.."
ह्या कडव्यात अमितजींनी जी जान ओतलीय ना काय सांगू. जरी त्यांनी गाण्यातलं हे पुढचं आणि शेवटचं एकच कडवं म्हंटलं असलं तरी, माझ्या मते अमितकुमार हयांचा कारकीर्दीतीलं हे सर्वोत्तम गाणं आहे.
"आँखों पर कुछ ऐसे तुमने ज़ुल्फ़ गिरा दी है
बेचारे से कुछ ख़्वाबोन की नींद उड़ा दी है"
रोज़ रोज़ आँखों तले ...
हया शेवटच्या कडव्यात मात्र गुलझार जी पक्के पुरुषी भावनेला हात घालतात. पुरुष खडबडून तेव्हाच जागा होतो, त्याची झोप उडते, जेव्हा पुरुषत्वाचा अहंकार स्त्री तिच्या सौंदर्याने हिरावून घेते. कदाचित म्हणूनच इथं तिच्या प्रेमात बेफान झालेला प्रियकर तिला लाडीक तक्रार करतोय. तुझ्या ह्या मादक केशसंभार सौंदर्याच्या सावलीत मी बैचैन इतका झालोय की पार माझ्या स्वप्नांचीही तू झोप उडवली आहेस. स्वप्नांची सुद्धा झोप उडू शकते हा विचारच तुम्हाला प्रेमाची महती काय असते हे एका कडव्यातून सांगून जातो. गुलझार जी हे एकमेव का आहेत ह्याची पुन्हा नव्याने प्रचीती होते.
अर्थातच आर डी बर्मनच्या भारतीय आणि पाश्चिमात्य वाद्यवृंदानी ह्या गाण्याला पंचम स्वरातील धृवतारा करुन ठेवलंय.
हे गाणं म्हणजे कसाटा आईस्क्रीम आहे
गुलझार - आर डी - आशा अमित.
गाण्याच्या शेवटी आशाताई पुन्हा कमी कमी होत जाणारा स्वर म्हणत असतात आपण मात्र अजूनच त्या गाण्यात शिरत जातो. आपण आत आत शिरत जाणं आणि गाणं हळूहळू बाहेर येत जाणं (संपत जाणं) हे जे आहे ना ते अनुभवण्यासाठी नक्की ऐका. मंदाकिनीसाठी पहा. युट्युब ची लिंक खाली दिलेली आहे.
सिनेमाचे नाव आहे "जीवा". १९८६ साल. कदाचित कोणी फारसा ऐकला नसेल, पाहिला तर नक्कीच नसेल. परंतु हया गाण्याने जीवाला कायमचं जिवंत ठेवलंय हे मात्र नक्की.
- मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ पुणे ३०
ता.क.
तुम्हाला सिनेविश्वातलं एक जनरल नॉलेज म्हणून सांगतो..
१. हे गाणं आधी किशोर कुमारजी म्हणणार होते. परंतु फिल्मचं बजेट कमी असल्याने त्यांच्या मुलाला म्हणजे अमितकुमारजींना हे गाणं मिळालं. अर्थातच त्यांनी ह्या संधीचं २४ कॅरेट सोनं केलं.
२. असंच कॅमेराच्या ब्लर (धुसर) तंत्रज्ञानाचा बॅकग्राउंड च्या स्वरूपात उपयोग करुन चित्रीत केलेलं संपूर्ण गाणं "आतिश" नावाच्या चित्रपटात देखील आहे, " काश तुम मुझसे एक बार कहो". तिथं पण आपला बावा संजूबाबा आहे तर जोडीला रविना टंडन आहे.

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि