Skip to main content

माझी भटकंती - सीतामाई दरा

 सीतामाई दरा

पुणेकरांची वीकएंड टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधली गोल्डन ट्रँगल ही ठरलेली ट्रीप. आता तुम्ही म्हणाल गोल्डन ट्रँगल म्हणजे तर अहो सिंहगड-पानशेत-खडकवासला. हा पुण्याचा हक्काचा गोल्डन ट्रँगल. एक गड-एक धरण-एक बॅकवॉटर्स तलाव असा त्रिकोणी मिलाफ असलेला गोल्डन ट्रँगल.
सध्या सगळीकडे "जरा हटके" स्टाईलला महत्त्व आलं आहे. प्रत्येक क्षेत्रात किंवा एखाद्या गोष्टीत, प्रवासात जरा वेगळी वाट चालून पाहू असं प्रत्येकालाच वाटतं. अर्थात हया वेगळ्या वाटेने गेलं की कधी काही हरवतं तर कधी नवीन काहीतरी सापडतं. नेहमीचे गुलमोहोर आणि बोगनवेलांनी भरलेले रस्ते सोडून वेगळ्या अवघड वाटेवर मग एखादा लाल रंगाचा चाफा दिसतो तर कधी रानटी पिवळी फुले दिसतात. एखादं डेरेदार झाड हिरवं भरलेलं असतं. आपल्याला त्यांची नावे माहिती नसतात पण छान वाटतं असा निसर्ग अनुभवायला.
ह्या गोल्डन ट्रँगल च्या प्रवासात सिंहगडच्या पायथ्याशी जरा डाव्या बाजूला वाकडी वाट केली की आपण डोणजे गावात पोहोचतो. तसं पाहायला गेलं तर हे छोटं खेडं आहे. सिंहगडच्या डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं. गेल्या काही वर्षात मात्र पुण्यातल्या लोकांचं फार्महाऊसचं आवडतं लोकेशन आणि वीकेंड डेस्टिनेशन झालं आहे. सध्या डोणजे गावच्या नागमोडी रस्त्यावर दुतर्फा एन ए प्लॉट आणि फार्म हाऊसची लागवड झालेली आपल्याला दिसते. तीस चाळीस वर्षांपूर्वी मात्र हा रस्ता नव्हता तर मुरमाची खडबडीत वाट होती आणि त्या वाटेच्या दुतर्फा साग वृक्षांची आणि आंब्याची लागवड दिसायची.
हयाच रस्त्याने पुढे चालत राहिलं की एका वळणावर "आपलं घर" नावाचा अनाथ आश्रम आणि त्याचा परिसर दिसतो. विजय फळणीकर आणि दाम्पत्याच्या जीवनातील कटू प्रसंगाने त्यांना एका सामाजिक वळणावर आणून सोडलं आणि त्यांनी अनाथ आश्रम स्थापन केला तो हा "आपलं घर". आपलं घराला वळसा घालून डावीकडे वळून डोंगरातून येणारा खळखळणारा ओढा पार करून आपण पुढे चालत आलो की दिसतो तो "योगीराज सिध्दनाथ वनाश्रम". प्रसिद्धीने जागतिक कीर्तीचा नसला तरी विविध देशातून योग आणि ध्यान धारणा साधनेचे 'भोक्ते' हया आश्रमात वर्णी लावतात. आश्रम कायमच हाउसफुल असतो.
इथूनच सुरुवात होते ती सीतामाई दराकडे जायची. दोन्ही बाजूला असलेली गर्द हिरवी सागाची उंच झाडं. छोटी छोटी वाटेच्या कडेला उगवलेली झुडपं आणि अधून मधून दिसणारं एखादं छोटं घर. उजव्या बाजूनी ऐकू येणारी ओढ्याची खळखळ आणि डाव्या बाजूला पसरलेला आडवा डोंगर. मान थोडी वर करून पाहिली की समोर अर्धगोलाकार दिसणारी टेकड्यांची रचना. उजव्या बाजूला सिंहगडच्या दिशेने जाणारा डोंगर. डोंगरात जरा बारकाईने लक्ष दिलं तर एखादं दुसरे वाहन जाताना दिसतं तोच हा सिंहगडचा घाट रस्ता. असं चालत असतानाच एकदम समोर लांब बघाल तर अगदी चित्रात काढतो तसे उजव्या आणि डाव्या बाजूला उतरत जाणारे डोंगरांचे कडे. त्यामध्ये निर्माण झालेली दरी सारखी दिसणारी V आकाराची घळ. घळीच्या मधून दूरवर दिसणारा सरळ आकाशात भिडणारा उंच डोंगर.
सप्टेंबरच्या सुमारास पाऊस दमल्यानंतर हा परिसर हिरव्या करड्या रंगाची पैठणी नेसून जणू तुम्हाला तिच्या लावणीला खुणावत असतो. या हिरव्या करड्या पैठणीच्या रानावनात एखादा सुंदर नक्षीदार मोर नाचताना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो.
माझ्या मित्राचं हयाच बाजूला फार्महाऊस असल्याकारणाने ही वेगळी वाट आम्हाला तुडवायचा योग आला. आमच्याबरोबर अर्थातच गावातल्या एका मामांनी सोबत केली आणि आम्हाला माहिती दिली. त्या समोरच्या घळीला सीतामाईचा दरा असे म्हणतात असे त्यांनीच सांगितले. वाटेत गुरं चरायला आलेल्या गुराखी कडून " मागच्या उन्हाळ्यात त्या तितं झुडपा मागं होतं. बराच वेळ बसलं होतं. आमच्या गाई चरत्यात न्हा वं इतं. शेवटी उठून वर डोंगरावर निघून गेलं." अशी बिबट्याची कहाणी ही ऐकायला मिळाली. गावाकडची माणसं "ते होतं", "जनावर होतं" अशा भाषेत का बोलतात हे मला अजूनही कळलं नाही. "बिबट्या होता" "साप होता" असं ते कधी म्हणतांना आपल्या ऐकिवात येणार नाही. असो अर्थात सिंहगड वनक्षेत्रात बिबट्यांची हातावर मोजण्याइतकी संख्या नक्कीच आहे त्यामुळे उन्हाळ्यात पाण्यासाठी बिबटे ओढ्यापर्यंत नक्कीच येत असणार.
चालत चालत एका छोट्या डोंगराला वळसा घालून आम्ही शेवटी पोहोचलो आमच्या ठरलेल्या ठिकाणी ते म्हणजे सीतामाईचा दरा.


एक झाड, झाडाखाली वेताच्या काठ्यांचं कुंपण आणि त्या कुंपणात असलेलं पाण्याचं कुंड. अर्थात पावसाळा असल्यामुळे ते काठोकाठ भरलेलं होतं. उन्हाळ्यात देखील एवढं पाणी असतं या कुंडात अशी जणू जगावेगळी माहिती आम्हाला मिळाली. साधारणतः महाराष्ट्रातील गड किल्ले आणि त्याच्या आजूबाजूची आणि किल्ल्यांवर असलेल्या कुंडांमधे बाराही महिने गोड पाणी मिळते ही खरंच महाराष्ट्राला मिळालेली नैसर्गिक देणगीच आहे.
तर कुंडाच्या शेजारी असलेली दगडी शंकराची पिंड. त्याच्या समोर असलेला कान तुटलेला दगडी नंदी. मागं शेंदूर फासलेला मारुती. सर्वात वेगळेपण म्हणजे शंकराच्या पिंडीच्या उजव्या बाजूला ठेवलेली दोन हात उंच असलेली दगडी शिळा. त्या शिळेवर कोरलेली प्राचीन अर्धवट लेणी. लेणीत एका स्त्रीचा अर्धवट तुटलेला हात दिसतो आणि त्या हातात कमंडलू. त्यावर लावलेलं हळद कुंकू गुलाल. समोरच मांडलेली खणा नारळाची ओटी. मामांनी आम्हाला सांगितलं की गावकरींच्या सांगण्यानुसार तो हात सीतामाईचा आहे. सीतामाई लंकेहून परत आयोध्येत आली. त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या अग्नी परीक्षेत प्रायश्चित्त म्हणून तिला वनवासात जावे लागले. तेव्हा या ठिकाणी ती वास्तव्यास होती. लव आणि कुश हया समवेत इथल्याच अरण्यात राहत होती. तिच्या दोन्ही हातात पाण्याचे दोन घडे अर्थात कमंडलू होते. वाल्मिकी ऋषींच्या सांगण्यावरून तिच्या हातून हे पाण्याचे घडे खाली पडले. एक उजव्या बाजूला पडला ज्यातून हे पाण्याचे कुंड तयार झालं. तर डाव्या बाजूला पडलेल्या घड्यातून सांडलेला पाण्यातून बारमाही वाहणारा ओढा तयार झाला. कथा ऐकताना आणि आजूबाजूच्या रानातल्या शांततेत गुढ वातावरण तयार झालं होतं. ते झाड, त्याखाली असलेल्या शंकर, कान तुटलेला नंदी, समोर ठेवलेला नारळ, बाजूचं कुंड, उजव्या बाजूला सीतामाईचा तुटलेला हात, तीच्यासमोर मांडलेली ओटी...सगळं बघत असतानाच अचानक झाडावर माकडाचा चित्कारण्याचा आवाज आला आणि आम्ही भानावर आलो. अचानक तिथे आलेल्या माकडाच्या आगमनाने माझ्या मनातील श्रध्दाळू भाव जागे झाले. सीतामाईचा दरा पाशी जणू हनुमानाचे दर्शन झाले. इतरांच्या नकळत हात जोडून माकडाला मी नमस्कार केला. गंमत आहे, माणसाचे मन हे ही जणू माकडच. कधी कुठल्या फांदीवर उडी मारेल सांगता येत नाही.
तिथूनच पुढे ओढ्याच्या पाण्यात हात पाय ओले केले. जणू शरयू नदीच्या पात्रात पापं धुतली गेली. थोडा वेळ विश्रांती घेऊन परत एकदा सीतामाई आणि शंकराचं दर्शन घेऊन आम्ही रानातल्या वाटेने घराकडे मार्गस्थ झालो.
आता तुम्ही म्हणाल कि हा सगळ्यात बघण्यासारखे काय आहे तर सीतामाईचा दराला जातानाची रानातली वाट आणि कुंडातील गार पाणी. तिथं गेल्यावर तिथल्या वातावरणातली शांतता. जंगलात दिसणारे विविध पक्षी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या सर्व प्रवासात जोडीला नसणारे Mobile Network. हे अनुभवायला सिंहगडला जाताना एक तासभर वाकडी वाट करून सीतामाईचा दरा बघायला हरकत नाही. तसंही काय हो, आपल्याला गोल्डन ट्रँगल हा नेहमीचा आहेच की.
- मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ पुणे ३०
ता. क. - ४ व्हीलर अथवा २ व्हीलर वनआश्रमापर्यंत व्यवस्थित जाते. पुढे मात्र चालत जाण्यातच मजा आहे.

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय मधेच उभे आ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी