Skip to main content

फाइल्स Reopened - Kashmir Files

 #latepostednow

फाइल्स Reopened

सिनेमाची सुरुवात त्याच्या क्लायमॅक्स पासूनच होते. ती सुरुवात होते तुमच्या आमच्या मनात.
सिनेमाचा शेवटचा सीन संपतो आणि अचानक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री अशी पाटी येते. खरं सांगायचं तर आधीच्या तीन तासात आपण कलम ३७० आणि काश्मीरमय होऊन जातो.
१९९०च्या काश्मीरमधील आपण जणू एखादा स्टींग ऑपरेशनचा कॅमेरा किंवा खोर्यातील पानझडी झालेलं सूरुचं झाड झालेलो असतो. एक एक प्रसंग पुढे पुढे सरकत असतात आणि साधारण पावणेतीन तास झाल्यावर अंगावर काटा आणणार्या एका प्रसंगानंतर अचानक ब्लॅक आऊट होतं. "फिल्म निर्माण विवेक अग्निहोत्री" अशी पाटी येते. अख्खं थिएटर भानावर येत. एकदम लक्षात येतं की
"अरेच्या आपण थिएटरच्या खुर्चीत बसलो आहोत". लाइट्स ऑन होतात. प्रेक्षक जागेवरच बसलेले दिसतात. काही मिनिटांनी एक एक जण उठत जातो. आपणही थिएटरच्या बाहेर पडतो. परंतु सिनेमाला इथूनच सुरुवात झालेली असते. तीन तास बघितलेला विविध पात्रांचा, प्रसंगांचा, ठिकाणांचा आणि वातावरणाचा एक मुक सिनेमा आपल्या प्रत्येकाचा मनात सुरू होतो.
तसं पाहिला गेलं तर १९९० साल म्हणजे फारसं लांब नाही. इतिहासात गणण्याजोगं तर अजिबातच नाही. एवढं सगळं भीषण चित्र आणि क्रुर घटना आपल्या देशाच्या एका मोठ्या राज्यात घडत होत्या. भारताच्याच नागरिकांवर भारतातच अत्याचार होत होते आणि ते सुद्धा स्वतंत्र भारतात. एका बुध्दी संपन्न आणि शांत संयमी समाजाच्या ह्या लोकांना उंदीर-घुशींना मारांवं आणि पळवून लावांवं अशा क्रूर पद्धतीने पळवून लावलं जात होतं.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गमजा मारणारा आणि राजकीय अभिनिवेश अभिमानाने बाळगणारा समाज ह्या सगळ्या अत्याचाराकडे जाणून बुजून कानाडोळा करत होता.
समाज आणि प्रसार माध्यमं नेहमीपेक्षा खालच्या पातळीवर जाऊन सोयीची भूमिका घेत होती. तेथे घडलेली प्रत्येक घटनाही तेवढीच बर्फासारखी थंड रक्त गोठविणारी ह़ोती. ते सर्व पाहिल्यावर गेली तीस वर्षे हया संवेदनशील विषयावर आपला देश, काश्मीरच्या बर्फासारखा थंड होता ह्याचं वाईट वाटतं.
सिनेमातील प्रत्येक प्रसंग मनात विचारांची आंदोलनं आणि काहूर निर्माण करतो. मध्यंतराच्या आधीचा प्रसंग तर तुम्हाला पॉपकार्न आणि पेप्सी आणण्यासाठी उठायचं असतं हेच विसरून टाकतो. आपण आणि आपल्या आजूबाजूचे मध्यंतर झाला तरी खुर्चीवरच खिळलेले असतात. मला खात्री आहे विविध थिएटर मधील पॉपकार्न आणि पेप्सी विक्रेते देखील मध्यांतरात वाट बघत असतील. कारण पब्लिक इतकं थिजून जातं की मध्यंतरला बाहेर येतच नाही आणि त्यांचा धंदाही होत नाही. हा सुद्धा एक अनुभव हा सिनेमा देऊन जातो.
वास्तविक पाहता माझ्या मते ह्या सिनेमाचे खरे दोन हिरो आहेत. पहिला अनुपम खेर आणि दुसरा चिन्मय मांडलेकर. सिनेमाच्या पहिल्या पाच मिनिटाच्या फ्रेमपासून ते अगदी शेवटच्या फ्रेम पर्यंत मनात ते दोघं सतत वावरतात आणि लक्षात राहतात. बिट्टा (चिन्मय) आणि पुष्कर (अनुपम).
अनुपम खेर एक स्वतः चतुरस्त्र आणि प्रतिभावान अभिनेता आहेत. त्यांच्याबद्दल लिहिणे म्हणजे कागदावर पुन्हा तीच शाई माझ्या Font मधे उतरवण्यासारखे आहे.
आझादीच्या गदारोळात, स्कूटर चालवत आणि महाशिवरात्रीच्या शंकराच्या गेटअपमध्ये खेर साहेबांच्या चेहऱ्यावरचे भीतीचे भाव तुम्हाला सुरवातीलाच पुढील कित्येक भयानक प्रसंगाची जाणीव करून देतात. मनावर झालेले खोल आघात स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेली बीभत्स (हा शब्द सुद्धा कमी पडावा) अशी क्रूरता त्यामुळे सतत एका भीतीच्या सावटाखाली वावरणारं पुष्करचं पात्र. Dementia झाल्यावर कश्मीरी भाषेतील "ये रे माझ्या बर्फा" हे गाणे गुणगुणताना त्यांचं झालेले लहान मुलासारखं रूप सुन्न करुन टाकतं.
चिन्मय मांडलेकर, मराठीतला आपला माणूस. प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता. सर्वसाधारण चेहरा, आवाज आणि तशीच शरीरयष्टी. परंतु अभिनय अन्यन साधारण आणि विलक्षण भेदक. मराठीत "लोकमान्य" सारख्या चित्रपटात प्रखर राष्ट्रप्रेम आणि जाज्वल्य देशाभिमान उत्तुंग साकारणारा चिन्मय इथे एकदमच विरुद्ध अशा एका आतंकवाद्यांच्या भूमिकेत जबरी भाव खाऊन जातो. काश्मीर फाईल्समध्ये बीट्टा नावाचा converted आतंकवादाच्या भूमिकेत त्यानी मेहनतीने तेवढीच क्रूरता आणि भीती जीवंत केलीय. त्याच्या सतत हातात असलेल्या रायफलनेच (तो जसा निर्दयपणे इतरांचे करतो) तसा त्याचा शिरच्छेद करावा असं थिएटर मधील प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात संपूर्ण तीन तास वाटत राहतं.
एकाच डोळ्याची पापणी बारीक लपकवत तो थंडरक्ताचा भीषण दहशतवाद संवादातून साकारतो. तेव्हा चिन्मय मांडलेकर मराठी रंगभूमीची ताकद काय आहे हे आपल्या अभिनयाने संपूर्ण जगाला दाखवून देतो. त्यानी पकडलेला कश्मीरी तर अर्धवट इंग्लिश भाषेचा लहेजा (बेअरींग) कौतुकास्पद. त्याच्या डोळ्यातील बीभत्स भीती आपल्याला आतून-बाहेरून हादरवून टाकते.
अर्थात पल्लवी जोशी, मिथुनदा आणि दर्शन कुमार सहीत इतर छोट्या मोठ्या कलाकारांनी देखील आपापल्या ‌चपखल अभिनयाने हा प्रवास जीवंत केलाय. विवेक अग्निहोत्रीचे धैर्य कौतुकास्पद आहेच. त्याच बरोबर कथेला मेलोड्रामाटिक न करता, त्या वेळची कश्मिरमधील परिस्थितीची प्रेक्षकांना स्वानुभुती दिली आहे.
एका प्रसंगात refugee camp मध्ये तत्कालीन गृहमंत्री दौरा करताना, एक महिला पुढे येऊन म्हणते "महाराष्ट्र मे बाळासाहेब ठाकरे ने कश्मीर बच्चों को शैक्षणिक संस्था मे कोटा दिया हैं." बाळासाहेबांचं नाव ऐकताच आपल्या मराठी माणसाच्या पोटात जे काय हालतं ना ते फक्त सिनेमा बघतांनाच अनुभवावं असं आहे. ह्या एका व अश्या अनेक हृदयस्पर्शी dailogue च्या अनुभवांसाठी हा सिनेमा जरूर बघावा.
बाळासाहेबांबद्दलचं हे वाक्य ऐकल्यावर आठवतं अरे हो की साधारण १९९४ नंतर महाराष्ट्रातील बहुतांश इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये वर्गात दोन चार तरी रैना, भट, पंडिता नावाचे तरुण-तरुणी दिसू लागले होते.
मनात सुरू झालेलल्या चित्रपटाचा प्रवास हा ज्याचा त्याचा होत रहातो. कुणाचा तीन-चार तासाचा होतो तर काही जणांचा दोन-तीन दिवसही संपतं नाही.
एक मात्र नक्की प्रत्येकाच्या मनात सुरू झालेला सिनेमा सरतेशेवटी एक निश्चय आवर्जून करतो. हयापुढे भारतातील कोणतेही राज्य अशाप्रकारे बळकावले जाऊन अमानुष हिंसाचाराच्या तोंडी जाणार नाही. तर पुढील तीस-चाळीस वर्षांनी अजून एखाद्या राज्याचा *फाइल्स* नावाने कुणी एखादा अग्निहोत्री सिनेमा काढणार नाही.
-- मिलिंद सहस्रबुद्धे
१७/०३/२०२२

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि