Skip to main content

Adv OR Skip Ad ->>

 Adv OR Skip Ad ->>

दररोज सकाळी दारात पडणारं वर्तमानपत्र आणि ठरलेला तक्रार वजा संवाद "हल्ली ना, पेपरात जाहिरातीच जास्त आणि बातम्या कमी." संध्याकाळी ठरलेल्या वेळेत लागोपाठ चार सिरीयल बघणाऱ्या बायकासुद्धा जाहिराती आल्या की एक प्रकारे चिडतात. "काय बाई अर्धा तासाची सीरीअल आणि जाहीरातीच निम्म्यावेळ..मग चालणारच ह्या वर्ष वर्ष भर." एवढं सगळं असलं तरी आपण नियमितपणे वर्तमानपत्र घेत असतो, रोज पुन्हा नव्याने सीरीअल बघणं चालूच असतं. वर्षभराच्या सवलतीवर मिळते म्हणून अजूनपण एखादे वर्तमानपत्र आपण लावतो आणि लागोपाठ चार चार सिरीयल बघत असतो. मग हया जाहिरातींचं एवढा वाईट का वाटतं?
जाहिरात म्हटलं की मला मी आठवतं ते म्हणजे लहानपणी पेपर वाचायला लागलो की आई-बाबा ओरडायचे "काय रे! काय बघतोयस? त्या सिनेमा नाटकाच्या जाहिराती बघू नको सारख्या." त्याकाळीसुद्धा ठराविक पानांवर पानभर नाटक सिनेमाच्या भरगच्च जाहिराती असत. त्यात आपण किशोर वयात कोणत्या बघायचो हे तुम्हाला नक्की आठवत असणार.
आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणजे जाहिरात. कदाचित आपण आपली बरीचशी मतं हया जाहिरातींवर ठरवतो. कधी चुकतो तर कधी बरोबर ठरतो‌. पेपरातली छापील असेल, रस्त्यावर लावलेल्या फलकावरील, टेलिव्हिजनवर अथवा आता सोशल मिडीयावर केल्या जाणाऱ्या जाहिरातींचा भडीमार सहन करत आपण आपल्या आवडीनिवडी ठरवत असतो.
कित्येक वेळा हया जाहिरातीच आपल्याला एखादा प्रायोजित कार्यक्रमापेक्षा आवडायला लागतात. रोजच्या डेली सोप सिरीयलच्या दर पाच मिनिटांनी येणाऱ्या ब्रेक मध्ये कोणत्या जाहिराती येतील हे सुद्धा सर्वांना पाठ असते. घराघरातील लहान मुलं अगदी परवाचा आणि पाढे पाठ असावेत अश्या तोंडपाठ जाहिराती म्हणून दाखवतात. त्यावर कौतुकाची थापपण मिळते कधी कधी.
काही जाहिराती मात्र आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात राहतात. मग तो मर्फी रेडिओ बॉय असेल किंवा पार्ले जी चं बाळ. पेपरातील छापीलपेक्षा सुध्दा टीव्ही नवीन आला आणि घरोघरी पसरला तेव्हापासून Digjam Suitings चा दाढीवाला शेखर कपूर, Boost is the secret of my Energy म्हणणारा कपिल देव. कॅडबरीचा एक तुकडा डोळे मिटून तोंडात टाकून बाउंड्री वरून उडी मारून स्कर्ट उडवत मैदानात नाचणारी ते सौंदर्यवती, सौंदर्य साबून वाली निरमा गर्ल. विक्स की गोली लो खीच खिच दूर करो म्हणणारी छोटी मुलगी. Surf Excel खरीदनेमेही समझदारी है म्हणणारी तब्बसुम उर्फ ललिताजी. बुलंद भारत की बुलंद तसबीर मधला बजाज चेतकचं हैडल फिलवणारा छोटा शीख मुलगा. वाह उस्ताद वाह म्हणत ताज चहाचा आस्वाद घेणारे झाकीर उस्ताद असतील. Neighbours envy owners pride वाला तो शिंग असलेला ONIDA चा टकला माणूस. (खरं सांगू का त्याकाळी आपण एवढे इंग्रजाळलेले नसल्याने, त्या Neighbours envy owners pride चा अर्थ कळायचा नाही पण तो टकला आवडायचा), ये दिल मांगे मोअर पेप्सीवाला शाहरुख.....
अश्या अनेक आणि विविध जाहिरातींचा आपल्या मनावर एक कायमचा पगडा आणि परिणाम निर्माण झालेला आहे. आपण तीच वस्तू किंवा सुविधा वापरत असो वा नसो पण एखादी जाहिरात आपलीशी वाटते एवढं मात्र नक्की .
शेवटी जाहिरात म्हणजे काय तर तीन तासाच्या सिनेमात जे प्रदिर्घ दाखवून प्रेक्षकांच्या मनात बिंबवायचे आहे ते केवळ तीस सेकंदात तोच Effect आणि Impact निर्माण करणे. अतिशय कौशल्यपुर्ण आणि अवघड अशी हि कला आहे.
वर्तमानपत्रात या जाहिरातींची पानं ठरलेली असतात. दुसऱ्या आणि चौथ्या पानावर नोकरी, जागा, पर्यटन, सहली इत्यादी देणे-घेणे विषयांवर असतात. तर सात नंबरचं पान कायम नाटक सिनेमाला दिलेलं असतं. इतर पानांच्या खालच्या किंवा कोपऱ्यातल्या बाजूला विविध क्लासेस हॉटेल्स इत्यादींच्या जाहिराती. हल्ली पहिलं आणि मागचं अर्धपान हे एखाद्या वाहनाची एखाद्या घराच्या स्कीमची किंवा ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट च्या सेवेस वाहिलेलं. आपण किती नाही म्हणालो तरी आपण आपल्याच नकळत या जाहिराती चवीने वाचत आणि बघत असतो. अर्थात मनुष्यस्वभाव जे काही चकचकीत चमचमीत दिसेल तिकडे पहिले आकर्षित होतो. मग ते चकाकणारे पितांबरी चे पितळे का असेना.
जाहिरातीचा पहिला प्रयोग रोम मध्ये झाला होता. रोममधील दुकानदार त्यांच्या दुकानाची जाहिरात दाराबाहेर पाटी लावून करत असंत आणि अजूनही ती पद्धत चालूच आहे. मध्ययुगात तेराव्या शतकात लंडनमध्ये भिंतीवर एका दुकानदाराने तो विकत असलेल्या धार्मिक पुस्तक, मेणबत्त्या अत्तर हयांची जाहिरात चिटकवल्याची माहिती मिळते.
संशोधकांच्या मते सतराव्या शतकात वर्तमानपत्राचा उदय झाला तेव्हापासून साधारण जाहिरातींचा उगम झाला. त्यांची प्रसिद्धी वाढत गेली वर्तमानपत्र हे असे माध्यम होते की जे घराघरात पोहोचत होते आणि अजूनही ते तसेच आहे. १७१३ साली लंडन न्यूज पेपर मध्ये पहिल्यांदा जाहिरात स्वीकारण्यात आली आणि छापण्यात आली. पुढे १९२० च्या सुमारास रेडिओचा शोध लावल्यानंतर श्राव्य जाहिरातींचा जन्म झाला. छापील ते श्राव्य असा हा प्रवास सतराव्या ते एकोणिसाव्या शतकातला.
रेडिओच्या काळात बिनाका-सिबाका गीतमाला लोकांची पाठ होती. अमीन सायानी सारखे साहेबांचा आवाजाची कित्येक जण नक्कल करायचे त्याच वेळेस त्या गीतमालेत मधे मधे डोकावणाऱ्या श्राव्य जाहिराती सुद्धा जनमानसात शब्द आणि स्टाईल सकट तोंडपाठ होत्या.
१९५० ला टीव्हीच्या आगमनाने जाहिरात क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवली ती दृकश्राव्य जाहिरातींची. अर्थात भारतात ही क्रांती पोहोचायला जवळपास ८०चे दशक उजाडले. टिव्ही घराघरात पोहचला. सर्व कुटुंबासमवेत एकत्र टीव्ही बघणे हा एक दैनंदिन उपक्रम झाला. त्याचा फायदा जाहिरा क्षेत्राला होत गेला. भारतात टेलिव्हिजनवर पहिल्यांदा १९७६ साली ग्वालियर सुटिंगची जाहिरात प्रदर्शित झाली होती.
या क्षेत्रात अत्यल्प वर्षांमध्येच क्रांती घडत गेली सुरुवातीला मौखिक मग छापील मग श्राव्य आणि दृकश्राव्य स्वरूपातील विविध जाहिरातींचे रूप आपण अनुभवत आहोत. आता तर आपला मोबाईल फोन चालू केल्या केल्याच एखादी नको असलेली जाहिरात सुद्धा दिसते आणि ती जाहिराती आपल्याला नकोय ह्यासाठी गुगल ला रिक्वेस्ट टाकावे लागते.
Skip advt चा option आपल्याला टीव्ही किंवा वर्तमानपत्रात मिळत नाही.
हा Skip advt चा option त्याकाळी नसल्यामुळे. वेळ Skip करण्यासाठी आम्ही लहानपणी जाहिरात जाहिरात खेळायचो. म्हणजे काय तर टीव्हीवर अथवा रेडिओवर दोन कार्यक्रमांमध्ये अथवा सिनेमाच्या मध्यंतरात मध्ये येणाऱ्या सात-आठ जाहिराती. मग नंबर नुसार पहिली जाहिरात हयाची दुसरी त्याची तिसरी तिची असा क्रम लावलेला. खूप मजा यायची कारण उत्सुकता असायची कोणाला कोणती येणार ह्याची. कोणाला Cadbury, toothpaste, साबण तर बाईक. नाही तर कोणाला दंतमंजन सुद्धा यायचे. आपल्याला जी जाहिरात मिळाली त्यातली वस्तू सुद्धा आपलीच झाली आहे की आपण त्या वस्तूचे मालक आहोत अशाच आविर्भावात आम्ही खुश व्हायचो. त्यावेळी खुष होण्याची आभाळंसुध्दा ठेंगणी होती. लगेच हात पोचायचे.
जाहिरात क्षेत्र हे सर्वात मोठे व्यवसायिक क्षेत्र आहे. त्याची वार्षिक उलाढाल साठ हजार कोटी भारतीय रुपये इतकी आहे. त्यात काम करणारे आणि त्यावर अवलंबून असलेले साधारण शंभर करोड लोकांची रोजीरोटी चालते. मात्र त्याच्या इतकं सुप्रसिद्ध पण तितकच बदनाम क्षेत्र कोणतंच नाही. इथं जी मॉडेल अर्थात स्त्री किंवा पुरुष हे उदबत्ती अथवा चहाच्या जाहिरातीत दिसते तीच व्यक्ती काही काळाने एखाद्या अंतर्वस्त्राच्या किंवा व्हिस्कीच्या च्या जाहिरातीत दिसू शकते. हया क्षेत्रातील राजकारण आणि काही प्रमाणात चालणारे पडद्यामागचे चाळे हयांनी या क्षेत्राला थोडंफार बदनाम केलेलं आहे.
जाहिरातीमधील एक पंच लाइन (Tag Line) सुद्धा एखाद्या कंपनीच्या Product अथवा Service चा खप किंवा प्रसिद्धी बदलवून टाकते. नाना पाटेकरचा तो सुप्रसिद्ध डायलॉग इथं तंतोतंत फिट बसतो, "साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है". तसं पंचलाईन मधला एक चपखल अथवा चुकीचा शब्द ते Product स्वर्गात कि नरकात पोचवायला कारणीभूत ठरू शकतो. ही ताकद आहे जाहिरातीची. जाहिरात म्हणजे विष अमृताचा खेळ आहे. चुकली तर विष घेऊन खाली बसायचं परत अमृत वेळ येईपर्यंत.
असो. अर्थात आता सर्वत्र येणाऱ्या बातम्या हया जाहिराती सारख्याच झाल्या आहेत. मग त्या वर्तमानपत्रात असतील टिव्ही चैनल वर अथवा सोशल मीडियावर असतील. त्या बातमीत कधी राजकीय पक्षाची जाहिरात डोकावते तर कधी एखाद्या पक्षाची विचारधारा झळकते. कधी एखाद्या धर्म किंवा जातीचा केलेला उदोउदो तर काही वेळेस एखाद्या व्यक्तीची ठरवून केलेले बदनामी किंवा स्तुती.
मग मला प्रश्न असा पडतो की, पेपरात जाहिराती जास्त आणि बातम्या कमी असं आपण म्हणतो खरं पण आता पेपरात "सर्वच ठिकाणी फक्त जाहिरातच असते तुम्ही फक्त ती बातमी म्हणून वाचत असता इतकंच"
--मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ पुणे ३०


Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय मधेच उभे आ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी