#चिंधी
चिंधीला जी आपुलकी असते,ती बॅंडेड पट्टीला असूच शकत नाही.
चिंधीला मायेची उब असते, तर बॅंडेड पट्टीला औषधांचा दर्प.
ही उब, ही माया "ती"च्या हाताची असते. लहानपणी आई, किशोर वयात बहीणाबाई, तरुणपणी प्रेयसी तर पुढे झालेली सहचारिणी आणि उतारवयात मुलगी.
आयुष्यात मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आप्तेष्ट-परिवार कधी बरोबर असतात तर कधी नसतात. कटु अनुभव, तर दुःखद प्रसंगी माणसाला खरी गरज असते ती कोणीतरी चिंधी बांधायची.
साधारणत: भेटतात ते सगळेच बॅंडेड पट्टी लावणारे असतात. अश्या वेळी अनुभव आणि सहकार्याची हळद लावून आधाराची चिंधी बांधाणारं कोणी असलं कि दु:ख हलकं तर होतंच आणि पुढे जाऊन त्या कटूतेची तीव्रता राहात नाही.
जखम बरी होईपर्यंत चिंधी चिकटून राहते, बॅंडेड पट्टी सारखी रोज बदलावी लागत नाही. एकदा का बरं झालं की ती आपण फेकून देतो.
जखम बोच ठेवून जाते पण चिंधीचा स्पर्श लाभला तर व्रण राहात नाहीत.
तिन्ही जगाचा स्वामी, नारायणाला सुध्दा भुतलावर येऊन चिंधीची माया अनुभवायची इच्छा झाली. म्हणून तर ते काव्य आहे "चिंधी बांधते द्रौपदी, हरीच्या (श्रीकृष्ण) बोटाला.."
- मिलिंद सहस्रबुद्धे
१७/१२/२०२१
तळटीप - "चिंधी" सापडायला "ठेच"च लागावी लागते.
Comments
Post a Comment