रस्ता..
घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा...
सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.
परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.
बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे.
पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.
"अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय मधेच उभे आहात,जस्ट वाचले. हॉर्न दाबला होता ना मी? काय माहीत? इतकं काय काय विषय चालू आहेत ना.
"हं हॅलो..बोल !"...."हो हो तुझ्या वॉर्डरोबच्या खालच्या कप्प्यात ठेवली आहेत. जरा नीट मागं पुढं बघ, सापडतील" ......"नाही आज मला उशीर नाही होणार Mostly. आल्यावर करुन देईन."...."आहे लक्षात. ऑफिस मधूनच लंच ब्रेक मध्ये करते मी फोन त्यांना."..." हो गं अजिबात काळजी नको करु मी आहे ना!"...."इइइ! thank u काय आता उगाच"...."बरं बरं बास आता, गाडीवर आहे कट कर बाय बाय.."
ह्या नवीन Air Pod (ear phones) मुळे खुप छान झालंय. फोनवर बोलता येतं एकिकडे आणि mailnly त्या वायरची झंझट नाही.
हल्ली हे गेटवरचं चेकींग म्हणजे ना अजून वाढीव दोन मिनिटे. आज पार्किंगला मिळाली बाई जागा वाह क्या बात है.
हे काय १० मि. लवकर पोहचलीय मी आज..आई शप्पथ काय भारी वाटतयं.
कशी आले एवढी काहीच आठवत नाही. घरातून खाली उतरले कधी, गाडी स्टार्ट केली कधी. हेल्मेट कधी घातलं. रस्त्यावरुन चालवत आले कशी, आजूबाजूला काय काय दिसलं काहीच आठवत नाही. ते वाटेत एक आजोबा फक्त आठवतायत.
बाप रे, रोजचा रस्ता इतका अंगवळणी पडलाय ना. आता त्याची माझी खास मैत्रीच झालीय जणू. तोच आपोआप रोज मला ऑफिसला घेऊन येतो आणि सोडतो पण पुन्हा घरी.
Artificial Intelligence AI-AI म्हणतात ते ह्या पेक्षा वेगळं काय. माझा रस्ता हा सुध्दा एक AI च आहे की माझ्यासाठी. न बोलणारा, अद्रुश्य गुगल मॅपच जणू.
मी मनात, माझ्या वागण्यात, माझ्या वेळेत चुकते बर्याच वेळा. पण कधीही चुकत नाही तो हा माझा रोजचा रस्ता.
- मिलिंद सहस्रबुद्धे
२४/११/२०२१
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete