Skip to main content

सुचणं

 #सुचणं

सुचलेल्या प्रतिभेची प्रतिमा जर कागदावर योग्य प्रकारे उमटवता आली, तर त्याचं उत्तम साहित्य व्हायला वेळ लागत नाही...

काही सुचतच नाही सध्या? "खूप दिवस झाले, तुझा एखादा लेख article आलं नाही Facebook वर". असं कोणी म्हटलं ना की मनात येतं "काय सांगू?" खूप विचार, खूप विषय मनात येतात आणि चमकून जातात. तेवढ्यापुरतं काहीतरी सुचतं परंतु नंतर पुढे मात्र वाढत नाही.

एखादा विषय सुचणं किंवा खरं सांगू का? बसलोय आणि सुचतं असं काहीच नसतं. जसं घरातले दिवे गेलेत, आपण अंधारात मेणबत्ती लावून बसलोय. अचानक पापणी लवताक्षणी पटकन दिवे येतात. ज्या खोलीत बसलोय तिथली ट्यूब पटकन पेटते. तसंच होतं. कोणीतरी काहीतरी बोलत असतं, आपण काहीतरी ऐकत असतो, बघत असतो किंवा वाचत असतो. समोरची बोलणारी व्यक्ती काहीतरी बोलून जाते आणि पटकन आपली ट्यूब पेटते. तोवर डोक्यातले दिवे गेलेलेच असतात. त्या खोलीतली ट्युब पेटली की आपण लगेच बाहेर बघतो. आजूबाजूचे दिवे मग एकामागोमाग पेटतात. अगदी तसंच होतं पहिली ट्यूब पेटते, डोक्यात विषय किंवा विचार क्लिक होतो. मग इतर दिवे जसे  पाठोपाठ लागतात तसं त्या विषयाच्या अनुषंगाने फटाफट पानभर सुचतं. त्यानंतर मग साकारतो तो झगमगाट, लखलखाट एखाद्या जमून आलेल्या लेखाचा, कवितेचा, गाण्याचा किंवा कथेचा.

कधी काय सुचेल, कोठे सुचेल हे सांगता येत नाही. प्रतिभा ही लहान मुलासारखी असते. काय प्रश्न विचारून ते लहान मूल आपल्या निरुत्तर करेल हे जसं सांगता येत नाही अगदी तसेच ती तुमच्या मनात कुठल्या विषयावरून कोणता विचार प्रकट करेल आणि सुचायला सुरुवात होईल हे सांगणं कठीण.

प्रत्येकाला काही ना काही तरी सुचतच असतं.  गेलेल्या दिव्यानंतर प्रत्येकाची ट्यूब पेटतेच. परंतु आजूबाजूला दिवे पटापट लागतीलच हे सांगता येत नाही. म्हणून तर ज्यांचे पुढचे दिवेपण पटापट पेटतात, ते लेखक, कवी, गीतकार असं काहीतरी होतात.

## सुचलेल्या प्रतिभेची प्रतिमा जर कागदावर योग्य प्रकारे उमटवता आली, तर त्याचं उत्तम साहित्य व्हायला वेळ लागत नाही ##

खूप वाचन करणारे खूप चांगलं लिहितातच असं नाही. मात्र जे चांगलं लिहितात ते नक्कीच बर्‍यापैकी वाचन करतात.

अडचण अथवा संकट ही जशी नवनिर्मितीची जननी असते. तसंच, एखादा अनुभव, एखादी कटुता किंवा अति आनंद आणि मग त्या क्षणी होणारी मनाची दोलायमान स्थिती हे एखाद्या चांगल्या साहित्याचं उगमस्थान असतं.

लिहिणाऱ्याला वयाच्या कोणत्या टप्प्यावर सुचेल हे सांगणे फार कठीण.  मी डॉक्टर होणार,  इंजिनियर किंवा आर्किटेक्ट होणार असं म्हणता येतं.  परंतु ठरवून कोणाला लेखक , कवी किंवा साहित्यिक होता येत नाही. 

एखादी व्यक्ती लेखक अथवा कवी झाली की त्या व्यक्तीने मनात आणलं तरी विचारांचा धबधबा कागदावर उतरवायचा थांबवू शकत नाही. अर्थातच जोपर्यंत ती प्रतिभा जिवंत आहे. प्रतिभा ही कायम येणाऱ्या जाणाऱ्या दिव्यासारखी असते. कधीकधी दिवे थोड्या वेळापुरते जातात तर कधी कधी खूप वेळ. इतर कुठल्याही बाहेरच्या इन्व्हर्टर चा उपयोग होत नाही. 

सध्या माझ्याकडचे दिवे बरेच दिवस गेले होते. अचानक "काही सुचतच नाही सध्या?" हया एका वाक्यावर आज "सुचणं" हयावर एवढं बरंच काही लिहून झालं.  माझ्या मेंदूतील MSEB नी आज खूप दिवसांनी काम केलं आणि फटकन दिवे आले.  ट्यूबतर पेटली, बाकी झगमगाट, लखलखाट झालाय की नाही हे शेवटी तुम्ही वाचकच ठरवाल.

© मिलिंद सहस्रबुद्धे

तळटीप- नेहमीप्रमाणे लिहायला गेलो, पण *सुचलंच* नाही. 😀

Comments

Popular posts from this blog

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द...

दादा परत या..

  दादा परत या.. "मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही" असं तुमच्या कडक आवाजात ऐकताना पुन्हा पुन्हा तुमची उणीव भासते. तुमच्याकडून चुकून बोली भाषेतील शब्दांची उठाठेव कधीतरी झालीही असेल. परंतु संस्कृतीच्या मर्यादा मग त्या राजकीय असतील अथवा सामाजिक तुम्ही कधीही ओलांडल्या नाहीत. कोणा एखाद्यावर उगाच खालच्या भाषेत टीकाटिप्पणी केली नाहीत. तर कधी सत्तेच्या गुर्मीत कोणाची निंदा नालस्ती केल्याचं आठवत नाही. तुमचा बाज आणि दरारा वेगळाच होता आणि आहे. प्रशासनावरची पकड म्हणजे जणू बापाने रस्ता ओलांडताना मुलाचा धरलेला घट्ट हात. धरलेल्या त्या हातात काळजी ही असतेच पण तेवढाच धाक असतो. तशी तुमची प्रशासनावरची पकड आहे. आमच्या पुण्याच्या पालकमंत्री पदी असताना तुमचा आठवड्याला किंवा महिनाभरातील एखादा दौरा ठरलेलाच. हा दौरा म्हणजे साध्या शिपायापासून ते मुख्य आयुक्त पर्यंत एक भीती असायची. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यापासून ते अगदी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीसापर्यंत "दादा आज पुण्यात येणार" हे आधी दोन दिवसापासूनच चर्चेत असायचे. तुम्ही ज्या दिवशी येणार त्या दिवशी सकाळी सात ते रात्री दहापर...