Skip to main content

सेन्सेक्स

 सेन्सेक्स

विचारांचे Bull कधी Dominate करतात तर आचारांचे Bear सेन्सेक्स खाली पाडतात. हे वर खाली होण्यात जो जीवंतपणा आहे ना त्यामुळेच तर जगण्यात मजा आहे.

Sensex

गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य माणसाच्या ओठावर गुणगुणला जाणारा हा शब्द म्हणजे "सेन्सेक्स". रोजच्या दैनंदिन जीवनात तरुण वर्गापासून ते अगदी काठी टेकवत चालणार्या आजोबांपर्यंत एकदा तरी ज्याची आठवण काढतोच तो म्हणजे "सेन्सेक्स". "काय रे आज चढला का?" "का पडला?" ही दोन वाक्य प्रत्येकजण सध्या विचारतोच. तसं पाहिलं तर त्यावर काय रोजचे आयुष्य अवलंबून आहे तर अजिबात नाही. असं असून सुद्धा त्याचा एक चस्का लागला आहे सर्वांना.

मार्केट, म्युचल फंड, फंड मॅनेजर, डिविडंट, कैडल चार्ट यांसारखे न कळणारे शब्द संग्रह सुद्धा सगळेजण सध्या लीलया वापरू लागले आहेत. साध्या भाजीवाल्या पासून ते मुकेश अंबानी पर्यंत सगळेच. अर्थात 1992 साला नंतर आलेल्या Globalisation निर्णयाचे हे स्वागतार्ह दूरगामी परिणाम आहेत. नकळतच आज सेन्सेक्स, तुमच्या आमच्या आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय होऊन बसला आहे. असा हा सेन्सेक्स त्याच्याबद्दल एक उत्सुकता आहे एक अनाहूत अप्रूप देखील आहे.

आपल्या जीवनात देखील असे विविध सेन्सेक्स कार्यरत असतात. फरक इतकाच की त्यांना विशिष्ट वॉल स्ट्रीट किंवा दलाल स्ट्रीट नसतं. त्यांच्या चढ-उतारांचे आलेख नोंदवणारी कोणती संस्था नसते. हया सेन्सेक्स चे विक्रेते आपणच असतो, ब्रोकर आपणच असतो आणि ग्राहक पण आपणच.

आपल्या आयुष्यात विविध नात्यांचा एक सेन्सेक्स असतो. प्रत्येक नातं म्हणजे जणू घेतलेला किंवा लाभलेला एक शेअर आणि आपला स्वतःचा आयुष्याचा एक पोर्टफोलिओ. प्रत्येक नात्याचा एक भाव ठरवला जातो. अर्थातच "भाव" शब्द इथं भावना या स्वरूपात घ्या बर का. 

संबंध दृढ होत जातात अथवा कमी होत जातात तसा हा भाव कमी जास्त होत असतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर मुलांचा आई-वडिलांबरोबर असलेल्या नात्याचा सेन्सेक्स. लहानपणी हा 52 week high असतो आणि जसजसे वय वाढत जाते तसतसे पंचवीशीला हाच भाव जरा 52 week low झालेला असतो. आयुष्यभर ह्या नात्याचा सेन्सेक्स वरखाली असा होतच राहतोच. कालांतराने काहीजण तो मोडीत काढतात. पुढे जाऊन तो शेअरचज् Die Stock होउन जातो.  

आपल्या जीवनात देखील असंच आहे. आपल्याला मिळणारे मित्र-मैत्रिणी. भेटलेले विविध सहकारी, अचानक बागेत किंवा एखाद्या ट्रीपमध्ये झालेल्या ओळखी. एखाद्या कार्यक्रमानिमित्ताने जुळलेले ऋणानुबंध. अशा विविध अनुषंगाने आपल्या जीवनात विविध शेअर्सचा एक पोर्टफोलिओ तयार होतो. आपल्याच न कळत त्याचा एक विशिष्ट सेन्सेक्स कार्यरत असतो . हा सेन्सेक्स सुद्धा रोज कमी जास्त होत असतो. चांगल्या वाईट प्रसंगी हा सेन्सेक्स वर खाली होत राहतो. ह्यातले काही शेअर्स कधी 52 week high तर कधी 52 week low होत असतात. काही शेअर्स अचानक मधेच भेटून divident पण देतात. कधीतरी मध्येच काही कारणास्तव, अथवा काही कटूअनुभवामुळे आपण एखादा शेअर मोडीत पण काढतो. तर एखाद दोन शेअर आपल्या Portfolio मधे बरेच दिवस idle पडून असतात. अचानक एखाद्या प्रसंगाने तो एकदम वधारतो. त्या शेअरला आपण इतके दिवस जपून ठेवले याचा आपल्याला मनापासून आनंद होतो. एवढे दिवस जपून ठेवलेल्या शेअरनी आज आपल्याला नक्कीच मदत केली मग ते अडचणीचा काळ असेल किंवा आनंदाचा काळ असेल. 

एखादा शेअर असा असतो की जो अलगद भावनांनी जपलेला असतो. प्रत्येकाच्या जीवनात मार्केट कळायला लागल्या नंतर जणू घेतलेला पहीला शेअर. जीवनातील एखादा विशिष्ट काळात हयाचा भाव सर्वात उच्च असतो. त्यातून मिळालेला आनंद हा कालातीत असल्याने असा शेअर portfolio मध्ये पडून राहिला तरी त्याची किंमत ही आपण कधीच करत नाही. कारण तो आपल्यासाठी अनमोल मोतीच असतो. त्याला मोडीत काढण्याचे धैर्य आपल्याला कधीच होत नाही. आपण प्रेमात असतो कायमच त्याच्या.

जसे शेअर मार्केट सेन्सेक्स विविध अंतर्बाह्य घटनांनी वर-खाली होतं. Foriegn investment, तेलाचे दर, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, शेतीचे भाव अथवा एखादा नैसर्गिक आपत्ती तसंच काहीसं आपल्या नात्यांचा सेन्सेक्स. तो सुद्धा विविध घटनांनी, अनुभवांनी तसेच केलेल्या कष्टांमुळे अथवा मिळालेल्या यशामुळे आणि त्यावर आपण केलेल्या सखोल विचार म्हणजे शेअर च्या भाषेत सांगायचं तर फंडामेंटल चा केलेला अभ्यास यामुळे वरखाली होत असतो.

रोजचं जीवनही एक सेन्सेक्सच आहे. विचारांचे Bull कधी Dominate करतात तर आचारांचे Bear सेन्सेक्स खाली पाडतात. हे वर खाली होण्यात जो जीवंतपणा आहे ना त्यामुळेच तर जगण्यात मजा आहे. ह्रृदयाचा सेन्सेक्स ( ECG ) त्यामुळेच तर सतत नाडीची बेल वाजवत असतो. 

खरंच कोणी म्हणतं कि हे मार्केट हा सेन्सेक्स म्हणजे जुगार आहे...हो आहेच शेवटी जीवन पण एक मार्केट आहे आणि त्याचा सेन्सेक्स एक जुगार...

© मिलिंद सहस्रबुद्धे

११/०४/२०२१

Comments

Popular posts from this blog

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय म...
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ...

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...