मोदी तुमसे बैर नहीं! लेकीन....
“What Got You Here Won't Get You There” ह्या जग विख्यात Marshall Goldsmith लेखकाच्या पुस्तकाचं उत्तम उदाहरण म्हणजे "नरेंद्र मोदी"
तसं आमचं मूळ गाव बारामती म्हणजे पणजोबा मूळचे बारामतीचे आणि वडिलांपासून आम्ही पुण्यात राहतोय. मी बारामती-कम-पुणेकर असल्यामुळे कुठल्याही नवीन ठिकाणी गेलो की दोन गोष्टी आवर्जून करतो. एक स्थानिक पदार्थांची खव्वयेगीरी (पुणेकर) आणि दुसरी म्हणजे तेथील स्थानिक राजकारणाची हेरगिरी.
२०१८ला मी सहकुटुंब राजस्थानात गेलो होतो. राजस्थानच्या निवडणुकांचा प्रचार चालू होता. तेव्हा स्थानिक रिक्षावाले, पानवाले, ठेलेवाले ह्या सगळ्यांकडून एकच वाक्य कायम ऐकायला मिळत होते "मोदी तुमसे बैर नहीं! लेकिन रानी तेरी खैर नहीं!". नंतर झालेही तसेच. भाजपने एवढा जोर लावूनही राजस्थानात अपयश आलेच आणि ह्याचे एकमेव उत्तर वरच्या स्लोगन मध्ये आहे.
२०१४च्या केंद्रातल्या दणदणीत यशानंतर पुढील काही निवडणुकांमध्ये पक्षानेही राज्या-राज्यात आपली गुढी सर्वत्र उभारली. २०१८नंतर मात्र चित्र फिसकटत गेलं. काय आणि का झालं हे ? हयाचा प्रामुख्याने सखोल विचार केला आणि 'चिंतन" केलं तर काही ठळक मुद्दे लक्षात येतील. सर्वसाधारणपणे २०१४च्या निवडणुकांमध्ये सर्वत्र लोकांनी मोदींना स्वीकारलं पण पक्षाला तशी मर्यादितच स्विकृती होती. पुढे प्रत्येक राज्यातील निवडणूक प्रचारात मोदींना दहा-बारा सभा फिरवून पक्षाने राज्य खेचून आणली होती. अर्थातच त्यानंतर ज्या राज्यात पक्ष बहुमताने निवडून आला, त्या त्या राज्यातील जनता मोदींच्या व्यक्तिमत्त्वाला भाळून पक्षाला मतदान करत गेली. त्यामागचे प्रमुख कारण असं होतं की, मोदी आहेत ना मग बास! जरी ते केंद्रात असतील तरी राज्यात त्यांचाच माणूस आहे. मग राज्यातील कारभार देखील तसाच मोदींसारखाच चालेल. २०१८ पर्यंत, निम्म्यापेक्षा जास्त भारत भगव्या रंगाचा करून, अखंड भारताचे स्वप्न व्हाट्सअपवर रंगवण्यात पक्षप्रमुख यशस्वी झाले होते.
वर्षं जशी पुढे सरकली तशी हळूहळू एक गोष्ट लक्षात यायला लागली. जसं वाटत होतं तसं होत नव्हतं. मोदी पंतप्रधान म्हणून एकदम उत्कृष्ट कारभार करत होते आणि अजूनही करत आहेत व करतीलच. परंतु राज्या-राज्यातील त्यांचा मुखवटा घातलेले शिलेदार मात्र अजूनही सर्वसमावेशक व्यवहार आणि कारभार करू शकत नव्हते. अंगात भिनलेली एकांगी विचारसरणी अधिकाधिक धारदार होत होती. ज्यामुळे सर्व सामान्य common man प्रश्नार्थक नजरेने बघू लागला.
जसं परीक्षेला देवाचा फोटो खिशात ठेवून पेपर द्यायला जातात तसं कोणती निवडणूक आली की, पक्षाचा प्रत्येक उमेदवार मोदींचा फोटो डोक्यावर घेऊन निवडणुका जिंकतात गेला. इतर पक्षांतील मोठमोठ्या वटवृक्षाच्या पारंब्या पक्षात सामील होत गेल्या.
अर्थातच पक्षाची अनैसर्गिक वाढ होत गेली आणि त्याच अनैसर्गिक वाढीला उतरती कळापण तितक्याच लवकर लागत गेली. बघा ना २०१८ ला भगवामय बनवलेले प्रदेश आज परत इतर विविध रंगांनी भरत चालले आहेत.लोकांचा राज्यातील स्थानिक पक्ष नेतृत्वावर विश्वास उडत चालला आहे. मग ते कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र. गोवा त्रीपुरापण डळमळीतच आहेत. गुजरातमध्ये देखील पक्षाची अवस्था तोलामासाच आहे. उत्तर प्रदेश सोडला तर तसं इतर राज्यात पक्षाला स्वतःचा संपूर्ण बहुमत सध्या तरी नाही. विविध राज्यांमधील प्रादेशिक पार्टी, केंद्रात असलेल्या मोदींकडे बघूनच पक्षाशी सलोखा ठेवून आहेत.
आज भारतभर तुम्ही फिरलात तर तुमच्या लक्षात येईल की रोष आहे लोकांचा तो स्थानिक पक्ष नेतृत्वावर, मोदींवर नाही. मग अगदी अन्नपुरवठा कायदा असो, CAA असो काश्मीर प्रश्न असो, बहुचर्चित नोटाबंदी किंवा Corona Lockdown असो. काहीही झालं तरी मोदींवर व्यक्तिगत टीका टिपणी कोणी करताना दिसत नाही. म्हणजे सर्वसामान्य नागरिक म्हणतोय हं मी. तसे मग लाल बावटेवाले आणि छोटे-मोठे युवराज रोज सकाळी उठल्यावर मोदींचं नामस्मरण करतात ते वेगळं. अर्थातच ते केलं तर त्याचं अस्तित्व राहील ह्याची त्यांना पक्की जाणीव आहे.
तळे राखी तो पाणी चाखी. म्हणून तलाव स्वतः च्या मालकीचा न समजता, स्वतः पाणी चाखत इतरांना ही योग्य पाणी पुरवठा होईल ह्याची काळजी मोदींनी विविध निर्णय घेतांना चाणक्य नीतीनी घेतली.
अगदी सध्याचं ताजं उदाहरण बघायला गेलात तर, गेले पन्नास दिवसापेक्षा जास्त चाललेल्या शेतकरी आंदोलन कितीही रौद्र रूप धारण करत असलं तरी आंदोलनकर्ते व त्यातले नेते मोदींवर बोलायला तयार नाहीत. शेतकरी असतील, कामगार असतील,अगदी टैक्स देतो देतो कडून रडणारा पिचलेला मध्यमवर्गीय नोकरदार असेल किंवा जीएसटीमुळे वैतागलेला (मोटाभाईवाला) व्यापारीवर्ग असेल. असे विविध स्तरांमध्ये आपण सद्यस्थितीवर चर्चा केली तर एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की प्रत्येकाला मोदींबद्दल मनातून प्रेम आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल काडीमात्र शंका नाही आणि तसेच त्यांच्यावर दृढ विश्वास आहे.
एवढं सगळं असूनही पक्षांचं घोडं का मागे पडतंय. तर मराठीत म्हणतात तसं घोडं गुणांनी दाणा खातं. घोडेस्वार किती सक्षम असला तरी मुळात सर्वसमावेशक विचार नसल्यामुळे आणि आपलीच एकांगी तत्त्व पुढे रेटून नेण्याचा नादात हे पक्षांचं घोडं विविध राज्यात मार खातंय. मागील सहा ते सात वर्षात मोदींनी भारताला जगभरात एक अव्वल स्थान निर्माण करून दिले. दहशतवाद वर कायमचा वचक निर्माण केलाय. पाकिस्तान आणि चीन ह्यांना अआटोक्यात आणलं. हे करत असतानाच आपण ज्या संघटनेच्या विचारांतून किंवा आपण ज्या ध्येयाने या स्थानावर पोचलोय आणि आपल्या लोकांना जे अभिप्रेत आहे ते देखील त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलं. काही मोठे निर्णय मोदींनी इतक्या निष्णात आणि चतुर पद्धतीने घेतलेत की डाव्या विचारसरणीचा मोदींवर किती राग असला तरी त्यांचे काही वाकडे करू शकत नाहीत.
अर्थातच हे सर्व सांगताना स्वतः पक्ष सर्वसामान्यांचे डे टू डे लाइफ मधले प्रश्न सोडवण्यात मात्र स्थानिक पातळीवर अपयशी होत आहे हे मात्र नक्की. प्रत्येक राज्यात एखादं मोदीसारखं नेतृत्व तयार करावा लागेल. ज्याला फक्त तद्दन राजकारणाचं नाही तर सर्व समाजाला एकत्र घेऊन समाजकारणाचं भान असायला हवं. अंगावरची विशिष्ट संस्कारांची झूल बाजूला काढून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल. त्याची कामं होतील ह्याची नुसती मोठ्या वल्गना न करता त्या दिशेनं योग्य पावलं उचलली गेली पाहिजेत.
मोदी वेळेप्रसंगी कृष्ण (रणभूमीवर) पण असतात आणि वेळ आली की राम (राज्यकारभार). एकाच युगात दोन्ही अवतार.
“What Got You Here Won't Get You There” ह्या जग विख्यात Marshall Goldsmith लेखकाच्या पुस्तकाचं उत्तम उदाहरण म्हणजे "नरेंद्र मोदी". गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदावर पोहचल्यानंतरचे मोदी.
मोदी है तो मुमकीन है!
ही tagline खरं तर पक्षासाठी आहे. ते आहेत म्हणूनच राज्या राज्यात पक्षासाठी सगळं मुमकीन आहे. नाही तर सगळं आलबेलच. कदाचित काहीजण म्हणतील की संघटनेतून वर आलेले असे अजूनही काही मोदी आहेत आमच्याकडे ( सध्या भावी मोदी म्हणून योगींची चला हवा येऊ द्या चालू आहेच). परंतु १३५ करोड जनतेत स्वयंघोषित कित्येक गान कोकीळा आहेत पण लता मंगेशकर एकमेव.
जेव्हा जेव्हा काही आंदोलन होतात, जेव्हा जेव्हा निवडणुका येतात, आरोप-प्रत्यारोप होतात तेव्हा एकच मनात विचार येतो. प्रत्येकाच्या मनात कायम २०१८ चीच स्लोगन कायम घुमते
"मोदी तुमसे बैर नही! लेकिन ------- खैर नही !
© मिलिंद सहस्रबुद्धे
२४-०१-२०२१
ता. क.
मी परत सांगतो मी भक्त नाही. सर्वसामान्य माणूस आहे, जे वाटतं ते लिहतो.
Comments
Post a Comment