Skip to main content

"वपुर्वाई"

"वपुर्वाई"
            काल व.पु. काळेंची पुण्यतिथी होती. तशी ती दरवर्षीच येते. मग आजच का लिहिलं? एवढ्या वर्षात का नाही लिहिलं? किंवा मग पुढच्या वर्षी पण लिहणार का? वगैरे प्रश्न कोणाला जर पडले असतील तर त्याची उत्तरं त्यांनी माझ्या सदाशिव पेठेतल्या घरी येऊन घ्यावीत.  वपुंच्या भाषेत सांगायचं तर "लोक काय म्हणतील? याची पर्वा करायची नाही. म्हणजे माणसाला सुख लागतं" तसंच आज सुचलं, आज लिहिलं आणि आज तुमच्या समोर मांडतोय बस इतकंच.

"गोली मार भेजे मे, भेजा शोर करता है.." हे सत्या मधलं गाणं मला नेहमी आठवतं. वपु समजायला आणि वाचायला हा भेजा कधीच कमी येत नाही. काळजात पोचणार असं हया माणसाचं लिखाण आहे म्हणून मग गोली मार भेजे मे असं म्हणून काळजातूनच ते वाचण्यात मजा आहे.

जीवनात, तारुण्यात वपु येणे (पुस्तकंरुपी) हे कोणत्याही व्यक्तीच्या भाग्यात असावं लागतं. ते मखमली गवतांवरचे फुलपाखरा सारखे, विविध फुलांवर उडण्याचे दिवस आणि सोबतीला वपुंचे एखादं पुस्तक. तुम्ही एकीकडे वाचत आहात आणि रोजचं उडणं चालू आहे.  अगदी कोणताही कथासंग्रह आणि त्यातली कथा घ्या, तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींच वपु सांगत आहेत असं वाटत राहतं. त्यांच्या प्रत्येक कथेतलं पात्रं जेव्हा वपुंचे विचार मांडतं ना, तेव्हा आपल्याला वाटतं 'अरे हयाला (हयांना) कसं काय कळलं असेल' की अगदी सेम असंच वाटलं होतं मला किंवा वाटतयं मला सध्या. फक्त इतक्या गहिर्या शब्दात मांडता येत नाही आलं नाही. मग वपुंची महती कळायला लागते की प्रत्येक भावना, येणारा प्रत्येक विचार हा गहीर्या शब्दात मांडून सुद्धा तो सोपा वाटतो. डायरेक्ट म्हणजे अगदी डायरेक्ट मनाला भिडतो. काळजात घर करतो अगदी घुसतो म्हणां ना.

वपु, खरंच आपल्या सगळ्यांचं सगळं जीवन जगले असतील की काय असं वाटत राहतं. आपल्याला तारुण्यात सापडलेले वपुं, मध्यम वयात सुद्धा आपलेसे वाटतात आणि मग कदाचित वार्धक्यात सुद्धा आठवणींच्या रुपात साठून राहतात. "आठवणी मुंग्यांच्या वारुळा प्रमाणे असतात. वारूळ पाहून आत मध्ये किती मुंग्या असतील याचा अंदाज घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचे तसंच आहे".. हे वपुंचेच वाक्य त्यांच्या लिखाणाला तंतोतंत लागू पडते. त्यांच्या कथासंग्रहाच्या पुस्तकांचे नुसते कव्हर पेज आणि बॅक पेज वाचून, आत काय आहे याचा अंदाज कधीच लावता येत नाही. परंतु एकदा का प्रस्तावने नंतरची चार पान वाचायला सुरुवात केली की जीवन रूपी वारुळातील अनुभव असंख्य चपखल वाक्यातून मुंग्या सारखे प्रगट होऊन जातात. आणि मग शेवटचं पान वाचल्यावरच पुस्तक खाली ठेवले जातं. खरोखरच किमयागार होता हा माणूस.

विविध विषयांना आपल्या हास्यविनोदच्या, तर भावनिक, तर कधी उत्कंठावर्धक कथांनी त्यांनी स्पर्श केला. ती प्रत्येक कथा, प्रत्येक कादंबरी, प्रत्येक कथा संग्रह अजरामर करून ठेवला.

वपुंची कथा म्हणजे दे धक्का. जसजसं तुम्ही वपुंच्या विविध कथा, कादंबऱ्या वाचायला लागता, तसतशा तुम्हाला ह्या धक्कातंत्राची सवय होत जाते. मग काय कथा वाचायला सुरुवात केल्यावर त्या सीआयडी मधील शिवाजी साटम सारखा सतत मनात येतं "कुछ तो गडबड हे दया". परंतु वपुंच वैशिष्ट्य असं की धक्का काय आहे किंवा काय असेल याचे फक्त आपल्याला अंदाज बांधता येतात. कारण धक्का आहे हे जरी माहिती असलं तरी कथेच्या शेवटी जो खरा धक्का बसतो तो कधीच मनात आलेला नसतो. हेच तर त्यांचे वैशिष्ट्य आणि मग त्या "कुछ तो गडबड है दया" वाल्याची म्हणजे स्वतःचीच दया येते.

मी मुद्दामच त्याच्या कथासंग्रहं, कादंबरी किंवा कथेचं नाव इथं घेण्याचे टाळतोय कारण मग उगाचच ती एक टिपिकल अनुक्रमाणिका असते तस होईल. मला वपुं बद्दल मांडायचे आहे, त्यांच्या कथासंग्रहाची यादी सादर करायची नाहीये.

मानवी भावनांची एवढी गुंतागुंत कशी काय समजली असेल बुवा या माणसाला. खरंच हा प्रश्न सतत अगदी सतत भेडसावत असतो. मानसशास्त्रातील विविध पुस्तके किंवा पीएचडीचे ग्रंथ सुध्दा फिके पडतील इतकं साधं, सरळ आणि समजायला, पचायला सोपं लिहून ठेवलंय ह्या माणासानं.

एखादवेळेस सध्याच्या पीढीने, अगदीच सगळ्या कथा वाचल्या नसतील तरी  एफबी आणि व्हाट्सअप वरचे फॉरवर्ड केलेले वपुंचे विचार  जरी वाचले तरी सतत वाटतं "काय माणूस आहे हा यार". त्याचं फक्त वपुर्झा  आणि आपण सारे अर्जुन ही दोन पुस्तकं जरी एखाद्याच्या वाचनात आली, तरी ती व्यक्ती आजन्म वपुं चा फॅन क्लब join करेल.

कथाकथन मराठीत जर कोणी  ग्लॅमरस केलं असेल तर ते म्हणजे व पु.  मुळात प्रत्येक कथाच ग्लॅमरस. त्यात त्यांचा तो मधाळ आणि थोडा लाघवी आवाज. कथेतील पात्र जर स्त्री असेल,तर नक्कीच आपल्या समोर प्रतिमा उभी राहील इतके तंतोतंत भावनाप्रधान वर्णन. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या भावनाप्रधान कथांमध्ये एखादा विनोदाचा शिडकावा असतांना सुद्धा आपल्याला कथेतील पात्राचं दुःख किंवा सल जाणवत राहणं ही त्यांच्या कथाकथनाची खासियत. अर्थातच जीवनातील विविध नाती, विविध भावना, विविध प्रसंग आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवून टाकण्याची ताकद त्यांच्या लिखाणात आणि भाषाशैलीत होती. व पु कदाचित पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अथवा लीडरशिप गुरू म्हणून ओळखले गेले नसतीलही. परंतु त्यांच्या कथाकथनाच्या कॅसेट सीडी ऐकल्यावर नक्कीच Emotional bank balance, Empathy, Emotional quotient यांसारखे हाय फंडा वर्ड्स सोपे होऊन कळायला लागतात.

स्त्रीप्रधान कथा हा तर वपुं चा हातखंडा. स्वतः पुरुष असूनही, स्त्रीमन एवढ्या जवळून, आतून आणि बाहेरून समजणारा आणि उलगडून दाखवणारा अजून पर्यंत कोणी लेखक मला तरी सापडला नाही. ते सुद्धा उगाच सामाजिक आशयाच्या समाजवादी कथा न लिहिता. दुसरी खासियत म्हणजे प्रेम आणि मैत्री. मैत्री ह्याया शब्दाची व्याख्या किंवा भावना त्यांनी पार्टनर या एका कादंबरीतून बदलूनच टाकली.
तर प्रेम हया भावनेला फुंकर कधी घालावी आणि फुंकणी कधी फुंकावी हे फक्त वपु च जाणे.  प्रेमाचे पदर हे तसे नाजूक आणि तलम. प्रत्येक पदर हळुवारपणे उलगडत, एका पदराचा दुसऱ्याला स्पर्श होऊ न देता सावरत आपल्यापुढे मांडताना वपुंनी कधीही त्या भावनेची मर्यादा ओलांडली नाही. त्याची निर्मळता, निर्गुणता कायम जपली.  त्यामुळे नेहमी वाटतं प्रेम मांडव तर वपुंनीच.
 बघा ना त्यांचंच एक वाक्य सादर करतो "प्रेम म्हणजे काय? याची व्याख्या काय...एकमेकांना जखडून ठेवणारं Pleasing Pain किंवा मग Painful Pleasure"..दोन वाक्यात सगळं काही सामावलं बघा.

बाकी मग त्यांच्या विविध कथांमधील अगदी टॅक्सीवाला पासून ते आप्पासाहेब देशमुखां सारखा उद्योजक पण जीवनाचं सार सांगून जातो.  चाळीत राहणाऱ्या पात्राला "त्याची वहिदा" भेटते किंवा पार्टनर सारखा सोबती आयुष्यभर कृष्णासारखा सखा बनून साथ देतो.

 वपुं चे वैयक्तिक वाचनाचं वेड तर विचारूच नका आणि त्या वाचनातून वाचकाला सकस साहित्य देण्याची कला ही कालातीतच आहे. ज्ञानेश्वरी किंवा गीतेतील अध्याय पासून ते पार अगदी रजनीश ओशो पर्यंत बहुआयामी विषयांवर त्यांनी लिहिलंय आणि त्यांचा प्रत्येक लेख प्रसिद्ध झालाय. वाचकांनी भरभरून वाचला आहे परत परत पुन्हा पुन्हा.

असे हे व. पु. काळे...
नावाप्रमाणे सदैव वाचकांच्या मनात आणि जीवनात "वसंत" फुलवणारा हा "पुरुषोत्तम" ..कधीही "का(ळे)ळाच्या" पडद्याआड जाणार नाही. कारण त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे आषाढात धो धो बरसणार्‍या पावसाच्या थेंबा प्रमाणे आहे, जमिनीवर पडल्यावर समुद्राला जरी मिळत असला तरी बाष्पीभवन होऊन परत परत बरसतच राहील.

मनापासून धन्यवाद व.पु.
तुम्ही हया शतकात जन्माला आलात. कदाचित आमची पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून आमच्या जीवनात तुम्ही पुस्तक रूपात येऊन आम्हाला "प्रकाशित" केलंत.

Love you sooo much..😊😊

© मिलिंद सहस्रबुद्धे
२७/०६/२०२०

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि