Sunday, March 29, 2020

खिचडी..

नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो कुलूप उघडले. सैक टाकली आणि टीव्ही लावला, ऑस्ट्रेलिया- इंग्लंड क्रिकेट मैच चालू होती. पाटीवरचा निरोप वाचला "खिचडी केली आहे, गरम करून घ्या छान". संध्याकाळचे साधारण सात साडेसात वाजलेले, मनात म्हटलं छान आटपू आणि गरमागरम डाळ तांदूळ खिचडी दूध-तूप घालून, बाजूला लिंबाचं लोणचं टॉक्, जमलं तर एखादा पापड भाजू गैसवर...
मस्त फ्रेश झालो आणि ओट्यापाशी आलो. पातेल्याचे झाकण उघडलं आणि बघतो तर काय? च्यायला.. दूध खिचडीला विरजण लागलं ना.
खिचडी म्हणजे साबूदाण्याची खिचडी केली होती. फुल पोपट झाला. मग लक्षात आलं अरे हा! आज संकष्टी चतुर्थी होती ना... म्हणून सकाळचा उरलेल्या साबुदाणा बाईसाहेबांनी "तुम्हाला आवडते ना" या नावाखाली (सरकवलेला) शिजवलेला दिसतोय.

'छान' 'सुंदर' 'अय्या किती गोड' असे शब्द हिने वापरले ना! की का कुणास ठाऊक उगाच मनात शंका चुकचुकतेच. आत्ता ही तसचं झालं "गरम करून घ्या छान"

कसं आहे बघा, काही पदार्थ हे ज्या त्या वेळीच खाण्यात जी मजा आणि रंगत येते ना, ती इतर वेळी नाही. साबुदाणा खिचडी म्हणजे शनिवार, गुरुवार किंवा रविवार सकाळच. रविवारी बिन उपवास वाले स्पेशल. साधारण साडे आठ नऊची वेळ, तूप जिरे फोडणीचा खमंग वास, मिरची चा ठसका, परतलेल्या दाण्याचं कूट घालून मऊ लुसलुशीत शिजवलेला तो टपोरा पांढरा साबुदाणा. त्याला जो काही वास येतो ना त्या वासानेच जिभेची वासना निर्माण व्हायला लागते. जणू ती त्या खिचडीची वाटच बघू लागते

मस्त वाफावळलेली, माझ्या आईच्या भाषेत पहिल्या वाफेची.  ती लोभस थोडी ब्राऊन थोडीशी पांढरी खिचडी प्लेटमध्ये वाढली जाते. ती प्लेट सुद्धा टिपिकल साधारण हातात मावेल आणि तळहातापेक्षा थोडीशी मोठी. स्टीलची बरं का! उगाच microwave safe वाली नाही. त्यावर मग ताज खोवलेलं पांढरेशुभ्र नारळाचे खोबरे. ते कधी कधी मला शिसपेन्सिलीला टोक केल्यावर जे टोक यंत्रातून कातरकाम बाहेर येतं तसं दिसतं. म्हणजे दिसताना जरी पांढरेशुभ्र असलं तरी कुठे कुठे खोबऱ्याच्या पाठीच्या काळ्या विटकरी कडा दिसत असतात.
त्यावर जणू छम छम आवाजच करत येते अशी हिरवीगार कोथिंबीर. बारीक चिरलेली कोथिंबीर जेव्हा भुरभुरलेली असते, तेव्हा उगाच बालकवींची हिरवे हिरवे गार गालीचे कवितेची आठवण होते.  मिरची चे एखाद दोन कापलेले तुकडे खरंतर काढून टाकण्यासाठी च असतात पण ते पाहिजेतच कारण दिसले नाहीत तर गोडीळ तर नाही ना अशी शंका नको. साईडला अगदी बरोबर चतकोर काटेकोर कापलेली लिंबाची रसरशीत पिवळी धमक फोड. त्या फोडीत एक अर्धवट बी असलीच पाहिजे नाहीतर मग लिंबू पिळायच्या आधी झटकायची मजा कशी येणार. साईडला  छोटा चमचा स्टीलचाच.

अशी ही "खिचडी" नावाची अप्सरा सर्व बाजूंनी नटली की मग तो वाफा येणारा, जिभेला थोडा चटका बसणारा, किंचीत आंबट झालेला आणि अविस्मरणीय चवीचा पहिला घास तोंडात गेल्यावर जे काही स्वर्गसुख किंवा बहुतेक त्याहीपेक्षा वरचा आनंद मिळतो तो ज्याचा त्यालाच कळतो.

अगदी पहिल्या घासापासून ते शेवटच्या घासापर्यंत मउ लुसलुशीत साबुदाणा चावतांना,  अर्थातच तो कितपत पूर्ण चावला जातो माहित नाही पण जे काही चर्वण होते त्यातून पोटाचा अग्नी कमी आणि जिव्हेची क्षुधा शांत जास्त होते.

तशी ही खिचडी पित्तकारक असते असे म्हणतात. परंतु जेव्हा ही अप्सरा आपल्यापुढे नटून-थटून प्लेटमध्ये येते आणि मग घरच्या मंडळीं पैकी आजी, मावशी,काकू किंवा आपलीच आई असं कोणी म्हणतं "खा रे ...एका डिशनी काही होत नाही"  तेव्हा मात्र जे पित्त खवळते ते फक्त ती खिचडीच शांत करू शकते.

शेवटी ती "छान" साबुदाणा खिचडी मी मग माइक्रोवेव मधे गरम करून खाल्ली. बाहेर हॉल मधे येऊन क्रिकेट मैच बघत बसलो. अचानक मनात आलं...

क्रिकेटच्या वर्ल्ड कपची फायनल मैच लॉर्डस ग्राउंडवर बघण्यात जी मजा आहे ती कितीही लश ग्रीन केलेलं असलं तरी  कोलकत्याच्या इडन गार्डन वर नाही. तसंच काहीसं, सकाळी साडे आठ नऊ वाजता गरम खिचडी खाण्यात जी मजा आहे ती संध्याकाळी सात आठ वाजता खिचडी गरम करून खाण्यात नाही.

---© मिलिंद सहस्रबुद्धे (एकशुन्यशुन्यशुन्यबुध्दे)

No comments:

Post a Comment

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...