Skip to main content
पत्र प्रपंच.... उत्तरार्ध
वडिलांचे मुलाला आलेलं पत्र सादर करतोय..

                    ।।श्री गजानन।।
बोरीवली, मुंबई             १७/०७/२०१९

प्रिय चिरंजीव..

  बघ ना सुरुवात करतानाच आशीर्वाद चिरंजीव. मुलांच्या बाबतीत आई-वडिलांच्या विचारांची सुरुवातच अशी होते चिरायु चिरंजीव वगैरे. तुझे पत्र वाचतांना सतत आठवत होते ते 'आप्पा' माझे वडील, तुझे आजोबा. त्यांच्या पत्रांतपण असाच एक वैचारिक ओलावा असायचा. वाई सारख्या छोट्या गावातून मी मोठ्या शहरात आलो. शिक्षण पूर्ण केले, नोकरीला लागलो. परंतु या सर्व प्रवासात पत्र लिहिली ती फक्त ख्यालीखुशालीचीच. तीसुद्धा क्वचितच वर्षातून एकदा किंवा जास्तीत जास्त दोनदा खास माझ्या आईच्या प्रेमापोटी. आज तुझ्या पत्रामुळे बऱ्याच वर्षांनी तो योग परत जुळून आला. पेन हातात धरलं आणि मन पेनाच्या बॉलच्याटीप पासून ते रीफिलच्या शाई संपते तिथपर्यंत मागे गेलं.  विचार आला की इतकं काही आहे की शाई नक्कीच संपेल. अर्थात मी काही एवढे लिहिणार नाहीये काळजी करू नकोस. आता गेल्या काही वर्षात आमच्या बँकेत कॉम्प्युटर आल्यापासून तर लिहायची सवय पण मोडलेली आहे. ते कोर्टातले जज्ज जसं फाशीचा निर्णय दिल्यावर पेनाचं नीब मोडतात बहुतेक तसेच. कॉम्प्युटरचा वापर करण्याच्या निर्णयाने सर्वत्रच सर्वांच्या हातच्या पेनची नीब कायमचीच मोडली गेली.

सांगण्या-बोलण्यासारखं, साठलेलं, मुद्दाम साठवलेलं तर काही विसरून गेलेले पण तरीही ठरवलं तर परत नक्की आठवेल आणि सापडेल असं बरंच काही सामान या मनाच्या घरात आहे. कधीकधी मी व्यक्त झालो माझ्या रागातून, शिस्तीतून आणि  प्रेमातून. परंतु मुलांच्या बाबतीत बापाचं मन हे किती नाजूक असतं हे तुला आता समजत असेल. बऱ्याच वेळा बाप आपल्या मुलाला वाढवताना स्वतःचं प्रारूप म्हणून बघत असतो. आपण जिथे जिथे चुकलो तिथे त्यानं चुकू नये या एकमेव भावनेने त्याच्या मनात राग, प्रेम चीड उत्पन्न होत असते. परंतु बेटा हे सर्व तत्कालीन असतं, कारण बापाने मुलाचं ट्रस्टी व्हायचं असतं. त्यात एक वेगळी मजा, वेगळा आनंद असतो. मी तुझा बाप आहे म्हणून माझं 'मी'त्व सिद्ध करण्यात दुरावा निर्माण होतो. कारण माझं 'मी'त्व तुझ्यावर लादून मी तुझा 'मी' काढून घेण्यात काहीच अर्थ नाही. हा एकमेव विचार कायम मनात ठेवून मी तुझ्याशी आणि तुझ्या बहिणीशी म्हणजेच माझ्या मुलीशी वागलो, वागत राहिलो. तुम्हाला मी बाप अथवा वडील जरी वाटत असलो तरी मी कायम तुमचा ट्रस्टी  असल्यासारखाच राहिलो.

 पक्षी जसे पिल्लांना जोपर्यंत उडता येत नाही तोपर्यंत जवळ असतात जवळ करतात नंतर ती पिल्लं कुठे गेली कुठे जात आहेत काय करत आहेत त्यात पडत नाही. त्यांचा त्यांचा नवीन विणीचा हंगाम सुरू होतो. ते जसे ट्रस्टी असतात मुलं सज्ञान होईपर्यंत अगदी तसेच. तुम्हाला योग्य विचार, आचार आणि संस्कार देणे. योग्य मार्गदर्शन करणे. जिथे पाहिजे तिथे मदत करणे पैसा आणि वेळ हयांची.  जिथे चूक आहे ती चूक दाखवून देणे आणि सुधारण्याची संधी देणे पण चूक झाली म्हणून आरडाओरडा करून राहून तुला जमतच नाही म्हणत खच्चीकरण करण्यात काही अर्थ नाही. बघ ना ट्रस्टी असतात ना एखाद्या संस्थेचे अगदी तसेच. मला हा विचार व पु काळे यांच्या एका कथेतून सापडला आणि मग मी तो कायमच अमलात आणायचं ठरवलं आणि आणत आलो.  हयाचा अर्थ असा नाही की, मी तटस्थ, अलिप्त किंवा  तुमच्या बाबतीत निर्विकार होतो. आई एवढंच किंवा काकंणभर जास्तच प्रेम, काळजी, विचार होते तुमच्या बाबतीत कायम.  फक्त प्रदर्शन केल्याने ते जास्त होत नाहीत आणि कमी पण मग प्रदर्शनाने काय मिळतं तर तोच मी पणा म्हणून कधी दाखवलं नाही इतकंच.

तू अमेरिकेला जाताना मात्र खरंच बांध फुटला रे. तेव्हा माझा मीपणा माझा मुलगा दूर जातोय या विचाराने हमसाहुमशी रडलो तुझ्यापाशी. पण तेव्हा सुद्धा प्रकाशरावांनी म्हणजे तुझ्या आत्त्याच्या मिस्टरांनी खांद्यावर हात ठेवून म्हटलेले एक वाक्य कायम मनात कोरलं गेलं.  "विश्वासराव..अहो रडून इतकं भावनिक व्हायचं होतं तर मग मुलाला एवढं मोठं उच्चशिक्षित करायचं नव्हतंत. द्यायचं होतं त्याला आपल्या जनता बँकेत चिटकवून म्हणजे कायमचाच बरोबर राहिला असता." त्यांच्या ह्या एका वाक्याने मला परत जमिनीवर आणलं आणि खरंच त्या दिवसापासून ते आजतागायत एकदाही थेंब ओघळला नाही.

वय जसं वाढत जातं ना  तसा माणूस मेंदूने अनुभवांमुळे मोठा होत जातो पण मन हळूहळू बाल्यावस्थेतकडे जायला लागतं रिव्हर्स इंटिग्रेशन यालाच म्हणतात बहुतेक.

आठवण म्हणशील तर ऐक,  तू लहान असताना जेवण झाल्यावर माझ्यासारखं तांब्याने तोंड न लावता वरून पाणी प्यायचास आणि तुला हमखास ठसका लागायचा. मी तुला रागवायचो. पण खरं सांगू आताशा त्याच तांब्यातून वरून पाणी पिताना मला तोच 'तुझाच ठसका' लागतो प्रत्येक वेळेस. तसाच त्याच घोटाबरोबर गिळून टाकतो एवढेच.

आठवण येणं आणि आठवण होणं
फरक एका अक्षराचा.... पण भावना अनंत विचारांची असते रे.

 आठवणींचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा कारण प्रत्येकाचा चक्षु कॅमेरा वेगळा. तोच प्रसंग, तीच घटना. फक्त ती टिपण्याचा प्रत्येकाचा अँगल (दृष्टिकोन) वेगळा, प्रत्येकाची जागा (नातं) वेगळी. तो फोटो वेगवेगळा टिपला जातो आणि स्वतःचा आपापला आठवणींचा अल्बम बनवला जातो.

तू म्हणालास पत्रात तसं, पतंग उडवायला त्यावेळेस मी आलो होतो खरा पण तेव्हा जाणवलं की मांज्या बदललाय, पद्धत बदललीय. आपल्याला जिथे पेज खेळताना पतंग हपसावसा वाटतोय तिथं नवीन मुलांना ढिल देऊन पेज खेळण्यात मजा आहे. तेव्हाच ठरवलं यापुढे तुमच्या पतंगाची दोरी आपल्या हातात ठेवायची नाही, तर भरगच्च गुंडाळलेल्या मांजाची आरी आपण व्हायचं.

 मी कायम शोलेमधील जय सारखा होऊन तुझा मित्र म्हणून राहिलो तुझ्याशी.
तो जसा टॉस करण्याआधी प्रत्येक पॉझिटिव्ह किंवा योग्य गोष्टींसाठी हेड्स  म्हणायचा आणि विरुद्ध गोष्टींसाठी टेल्स. फक्त जयलाच माहिती होतं खिशातून काढणाऱ्या नाण्याच्या दोन्ही बाजूला हेड्सच आहे. कदाचित त्या शोले सारखंच शेवटी आज तुला म्हणजे माझ्या वीरूला कळालं की नाणं दोन्ही बाजूंनी सारखंच होतं.

 तुझं अमेरिकेला जाणं, तिथं राहणं, सेटल होणं हे सगळे विषय आता हळूहळू मागे पडलेत. आम्हाला जरी 14 वर्षानंतर लव आणि कुश यांच्याबरोबर परत आयोध्येला आलेला प्रभू श्रीराम प्यारा, लाडका असला तरी नवीन काळातील दरवर्षी ख्रिसमसला येणारा भेटवस्तू मौजमजा आणि आठवणी देऊन जाणारा सांताक्लॉज आम्ही मनापासून आनंदाने स्वीकारलाय.

तुझं पत्र वाचताना खूप भरून आले. त्यापूर्वीच्या पिक्चर मध्ये दाखवतात ना पत्रात ट्रान्सपरंट प्रतिमा तसा जणू मीच मला दिसत होतो. प्रत्येक बापाला जसा आपल्या चपला मुलाला होत आहेत याचा आनंद असतो ना तसाच एक अभिमान असतो जेव्हा आपला चष्मा पण आपल्या मुलाला व्हावा किंवा होतोय आणि त्याने आपल्या चष्म्यातून म्हणजे दृष्टिकोनातून जगाकडे पाहंवं. तसाच अभिमान आज मला तुझं पत्र परत परत वाचून झाला आहे.

 स्थलांतरतून प्रगती हा निसर्गनियम मी तेव्हाच स्वीकारला होता जेव्हा मी माझं गाव वाई सोडलं. भौगोलिक दृष्ट्या तेव्हा आणि आत्ता फारसा फरक नाहीये. तेव्हासुद्धा मी जेव्हा वाईला वर्षातून एकदा फार तर दोनदाच जात होतो कारण आर्थिक परिस्थिती तशीच होती. तेव्हा दळणवळणाच्या तुटपुंज्या साधनांमुळे घाट चढून मुंबईत पोहोचायला आप्पांना किंवा मला एक किंवा दीड दिवस लागतच होता. आतातर विश्वच खेड बनलंय. तु सुद्धा एक-दोन दिवसात कधीही भारतात येऊ शकतोसच की.

काही बदलत नाही रे माणसं बदलतात फक्त आणि त्यांच्या भूमिका. नव्या माणसांच्या नव्या भूमिका म्हणून नवीन अनुभव. अन्यथा इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते कुठे ना कुठे कधी ना कधी.  काळ तिथेच असतो. भूत-वर्तमान-भविष्य ही आपण त्याला लावलेली विशेषणे. कारण जगणारा मनुष्यप्राणी मर्त्य आहे. जीवन नव्याने जन्मते आणि नव्याने मरते म्हणून.

मला ट्रस्टी व्हायला आवडले आणि मला जमले कारण मला ते पटले होते. ट्रस्टी जसे त्या संस्थेच्या उन्नतीसाठी झटत असतात कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता. त्या संस्थेच्या प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन करत. बघ ना ट्रस्टी या शब्दातच विश्वास दडलेला आहे. मला पण वाटतं की तू पण तुझ्या मुलांचा ट्रस्टी होऊन बघ. तटस्थ राहण्यात पण एक मजा असते.

खरं सांगू का पत्र लिहिणं हा तसा कठीण विषय. मनातलं एवढे साठलेलं काही शब्दांत सांगायचं तसं अवघड असतं.कारण शब्दांना वळण तर असते पण भावना नसतात. वाचणाऱ्याच्या भावनाच त्या शब्दांना प्राप्त होतात लिहिणाऱ्याच्या नव्हे. मी आशा बाळगतो की हे पत्र वाचताना माझ्या भावनापण पोहचल्या असतील तुझ्या पर्यंत. असो.

आई नेहमीप्रमाणे मजेत आहे. तुम्हां सगळ्यांना अनेक आशीर्वाद.
लवकरच भेटू...

तुझे बाबा
अर्थातच ट्रस्टी..

©मिलिंद सहस्रबुद्धे
२५/०१/२०२०

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि