Saturday, December 14, 2019

पत्रास कारण की...
आज पत्र लिहितोय. कदाचित शाळा-कॉलेज सोडल्यानंतर पत्र आणि पत्रलेखन विसरलो होतो. इंटरनेट ई-मेल Facebook, Facetime, व्हाट्सअप यांच्या भाऊगर्दीत एकमेकांशी बोलणं होतं पण संवाद होतोच असं नाही. मला अजूनही आठवतंय लहानपणी पोस्टकार्ड किंवा इनलैड  लेटरची आपल्याकडे मामा मावशी आत्या यांची पत्र यायची. ती वाचली जायची नंतर कित्येक दिवस ती जपून ठेवलेली असायची. मग कधी जुन्या कपाटाच्या खाली जेव्हा केर काढले जायचे तेव्हा ती पत्र भसकन बाहेर यायची मागे मागे टाकलेली. आपल्या आवडीची पत्र मग परत परत वाचली जायची. आजी किंवा आई वाचायची. कधी चांगल्या-वाईट कटू प्रसंग आठवून रडायची मग तिला पाहून मलापण उगाच रडू यायचं. खरं सांगू का गंमत होती त्यात, नातं जपणं म्हणजे काय हे मला त्या पत्रांनी नकळत शिकवलं. हल्लीच्या व्हाट्सअप Clear चॅट सारखं नव्हे.  मला नेहमीच महाराष्ट्र टाइम्सची टॅगलाईन "पत्र नव्हे मित्र"  समर्पक वाटते. खरंच ते पत्र जिवाभावाचा मित्र होता जणू. त्याच्यापाशी दोन्ही बाजूंची माणसं अतिशय मोकळेपणाने व्यक्त होत होती आणि तो मित्र म्हणजे पत्र हा इतका बेमालूम पणे त्यां दोन बाजूंना, जीवांना कायम जोडून ठेवत होता. त्या जीवश्च  मित्राच्या आठवणी ठेवून आणि आठवण कायम राहावी म्हणून आजचा हा खास पत्र प्रपंच तुमच्या माझ्यासाठी...

                    ।।श्री।।
Seattle.                     16.06.2019

तीर्थरूप बाबा,
साष्टांग नमस्कार, विनंती विशेष
पत्रास कारण की....

आज आमचा फादर्स डे लॉंग वीकेंड..
आज बहुतेक पहिल्यांदाच पत्र लिहतोय तुम्हाला, कधी वेळच नाही आली. खरंतर तुम्ही कधी ती येऊन दिली नाहीत.  लहानपणापासून नेहमी आईचे पत्र हरवलेच शिकलो. बाबांचं का नसतं माहित नाही. कदाचित आईच्या पत्राला जे Melodramatic Glamour आहे ते बाबांच्या पत्राला नसावं. अब्राहम लिंकनी सुध्दा मुलाला पत्र लिहिले. प्रथितयश मुलांनी कधी बापाला लिहिलेले पत्र प्रसिद्ध झाल्याचे ऐकिवात नाही. आपल्याकडे प्रत्येक नात्याचा एक सण आहे पण बाप आणि मुलगा हे नाते व्यक्त होण्यासाठी असा कुठला सणच नाही.

 वीस वर्ष झाली मला इथे अमेरिकेत येऊन आणि स्वतः बाप होउन दहा. आज का तर माहीत नाही, पण लिहावे वाटले. ह्या दहा वर्षात तुमची पदोपदी आठवण आली आधीच्या दहापेक्षा जरा जास्तच. खरचं सोपं नसतं हो. तुम्ही जरी अभ्यास घेत नव्हता, फार क्वचित शाळेत सोडत होतात, आमच्या दैनंदिनी मधे तुमची तशी फारच जुजबी लुडबुड होती. तरीपण तुम्ही मनाने सदैव आमच्या बरोबर होतात. आणि हे सगळं जसं वय वाढत गेलं तसं कळत गेलं. दहावी नंतर   मी डीप्लोमा करण्यासाठी मागे होतो, तुम्ही मात्र मी कॉलेज लाइफ एन्जॉय करावे म्हणून अकरावी सायन्स ला अडमिशन घेउन दिलीत...आणि मग एका पाठोपाठ पार एम एस होईपर्यंत न बोलता, दाखवतात सगळ्या अरेंजमेंटस् करत गेलात.
अद्रुश्य प्रेम, काळजी, आधार नेहमीच माणूस जवळपास नसला की प्रकर्षाने जाणवते. कदाचित त्यालाच आपण आठवण म्हणतो.
कॉलेज जीवनातील माझ्या नाना करामती तुम्ही संभाळून घेतल्यात. प्रसंगी रागवलात, अबोला धरलात पण कधीही दुरावा निर्माण होऊ दिला नाहीत. आज बाप झाल्यावर कळतय कीती अवघड आहे हे सगळं. परंतु इथंही तुमचाच  आदर्श, अद्रुश्यपणे पाठीशी उभा आहे.

मी त्या अशिषच्या नादी लागून डिप्लोमा करणार होतो आपला या विषयावर खूप वाद झाला तुम्हाला वाटत होते एवढी घाई काय डिप्लोमा करून जॉब करायची. आपला खूप संघर्ष झाला. हा तसं पाहिलं तर मला कळायला लागल्यापासून आपल्या संघर्षाच्या छोट्यामोठ्या ठिणग्या उडत राहिल्या आणि अजुनही चालूच असतो. पण एक सांगू  त्या ठिणगीतून जे अंगार फुलले ना माझ्या जीवनात त्याचमुळे बहुतेक मी प्रतिथयश व्यक्ती म्हणून घडलो. आईने लहानपणापासून शिस्त लावून घडवले असेल हे नक्की पण तुम्ही न बोलता सुद्धा खूप मोठा संस्कार दिलात "न बिघडण्याचा" त्याचा मी उत्तरदायी कसा होऊ हे सांगा ना.

 मी अमेरिकेला जाताना एअरपोर्टवर जवळ घेऊन हमसाहुमशी रडलात जीवनात माझ्यासमोर बहुतेक पहिल्यांदाच. तो क्षण अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. एवढा कणखर आणि संयमी असणारा माणूस डोळ्यातून वाहतांना पाहिल्यावर माझा पण बांध फुटलाच की तेव्हा. तिथे सुद्धा नकळत संस्कार दिलात. बापाला मुलगा हा मुलगी इतकाच प्यारा असतो फक्त तो सासरी जात नाही म्हणून जगाला कळत नाही.

स्वतः वडील बाप झाल्यावर समजतंय मुलांना सांभाळणे घडवणे आणि महत्त्वाचं म्हणजे शिस्त लावणे हे फार तारेवरची कसरत आहे. महत्त्वाचं म्हणजे बाप म्हणून संस्कार देताना आई सारखं मायेनी आणि भावनांनी भरून जाता येत नाही. सुधीर भट यांच्या गझल सारखं "गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा" सारखी किमया साधावी लागते. ती तुम्ही आणि तुमच्या समकालीन वडिलांनी बऱ्याच प्रमाणात साधली.ा आमच्या पिढीला आणि तीसुद्धा इथे येऊन एकदम विरुद्ध संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर साधायला अजूनच कस लागतोय.

 मला आठवतंय मी सातवीत असताना तुम्ही एकदाच पतंग उडवायला आलात काय माहीत पण तुम्हाला मला शिकवायची खुमखुमी आली होती. बहुतेक तुम्हाला तुमचं वाई गाव आठवला असावं. परंतु त्याच वेळेस दुर्दैवाने माझ्या बोटाला माझ्या कापला आणि टाके पडले तुमची त्यावेळच्या अवस्था तुमची घालमेल आणि तुम्हाला झालेली अपराध्यासारखे भावना अजून डोळ्यासमोर ताजी आहे. त्या बोटातून घळाघळा येणारं रक्त जसं ताजं होतं तशीच ती आठवण पण. नंतर त्या प्रसंगानंतर तुम्ही परत कधीच कुठेही आला नाहीत आणि आमच्यात पडला नाहीत. काय झाले हे तुम्हालाच ठाऊक. कदाचित अजूनही तो दिवस तुमच्या मनाच्या कॅलेंडरवर कायमचा नोंदला गेला असावा.

आज इथलं माझा यश, दररोजची आमची दैनंदिनी, सुखवस्तू जीवन जगताना तुमची अन आईची पदोपदी आठवण येत असते. तुम्ही या सगळ्याचा भाग असावा आमच्यात रमावं आणि आमच्यात राहावं असं कायम वाटतं.  मनात ही बोच कायम आहे. जणू माझ्या दात अडकलेला हा कण "मी कितीही वेळा  तुम्हाला इकडे बोलूवन"  जीभेनी काढण्याचा प्रयत्न केला तरी तो जात नाही आणि कधी जाणार नाही हे मला पक्कं माहितीय. तो तसाच राहणार टोचत जन्मभर.

कुणी नसणं हयाच्यापेक्षा, कुणीतरी आहे आणि असूनही जवळ नसण्याचं दुःख जिव्हारी असतं. जखमेच्या वेदना होऊन ती बरी झाल्यावर तिच्या मागे राहिलेला व्रण जास्त सलतो अगदी तसंच.

 मी परत भारतात यावं, का यावं आणि काय येऊ नये. इथं आणि तिथे यावर आपण शेकडो वेळा चर्चा वाद-संवाद झालेत. कधी तुम्ही तर कधी मी वरचढ. कधी तुम्ही तर कधी मी, नाही तुम्हीच कायम दोन-चार पावलं मागे गेलेला आहात.अजुनही माझ्या मनात घुसमट चालूच असते कारण ती न संपणारी आहे. बहुतेक ती आता कायमचीच.

मनाच्या कोपऱ्यात तो डोंबाराचा खेळ चालूच असतो सतत. आपल्या घट्ट विश्वासाने विणलेल्या नात्याच्या जाड दोरीवर जबाबदारी आणि जिव्हाळा (भावना) ह्यांची दोन टोकं असलेली काठी घेऊन कसरत सुरु असते.  दोन्ही बाजुंचा तोल संभाळत पुढं पुढं जाणं कठिणच तरीही त्याची सवय व्हायला लागते. आपल्याला हे नक्की जमेल असा विश्वास सतत ठेवून प्रयत्न चालू असतात. कित्येक वेळा मध्यापर्यंत आलं की वाटतं जमतयं आपल्याला पण मग तोच आत्मविश्वास एका बाजूला जास्त तोल जायला कारणीभूत ठरतो. पुन्हा नव्याने सुरवात तोल पुन्हा दुसर्या बाजूला झुकतो. हा खेळ सुरु असतो ना तेव्हा सतत ते बुगुबुगु ढोलकं वाजत असतं मनात त्यालाच कदाचित घुसमट म्हणतात.

 आपण जसं एखाद्या दुकानात किंवा एखाद्याच्या घरी किंवा एखाद्या वेगळ्या वास्तूत गेल्यावर तिथे आपली ज्या देवावर श्रद्धा आहे, आपला ज्या गुरुं वर विश्वास आहे त्याची तसबीर लावलेली बघून जे काही क्षणभर वाटतं आधार जाणवतो ना अगदी तस्सेच. ते जसं शब्दात सांगता येणार नाही ना अगदी तसंच, तुमचं तिथं असंणं हा पण एक मोठा आधार आहे. आठवड्यातून तुमच्याशी एकदा व्हिडिओ चॅट करणं हा एकार्थाने दर गुरुवारी स्वामींचे देवळात जाऊन आल्या सारखेच आहे असं वाटत राहतं.

खरं सांगतो बाबा ही अजूनही इथं दररोज जेवताना पहिला घास तुमच्या आठवणीने अडकतोच. भारतातून परत येताना तुम्हाला टाटा बाय-बाय करताना कायम अनाहूत भीती वाटते की पुढच्या ट्रीप ला येईन तेव्हा पण तुम्ही असेच बायबाय करायला भेटला ना!

एवढा सगळा अव्यक्तातून व्यक्त झाल्यावर, ख्रिसमस vacations ची खुप वाट पहातोय...ह्या वेळेस स्वतः बाप झाल्यावर जो मी पोक्त झालोय ना, त्यानंतर कडकडून भेटायचंय तुम्हाला.

आईला नमस्कार सांगा. इकडे आम्ही सगळे मजेत आहोत.

तुमचा लाडका...
चिंरजीव

तळटीप..
पत्र भारतात पोहोचलयं..
बाबांचं मुलाला पत्र लवकरंच...

©मिलिंद सहस्रबुद्धे
१४/१२/२०१९

No comments:

Post a Comment

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...