Sunday, April 14, 2019

स्टार्टअपयोगेश तावातावाने बोलत होता "बाबा,  तुम्हाला काय कळतंय स्टार्टअप म्हणजे काय ते! तुम्ही कायमच डीटीपी करून दहा ते पाच सरकारी कार्यालयात घासलीत. कधी वेगळा विचारच केला नाहीत. एलआयसी पीएफ आणि एफडी  यात तुटपुंज्या व्याजावर पैसे साठवत बसलात. शेअर्स, म्युच्युअल फंड काय माहिती तुम्हाला.  तुमचे प्रभाकर काका बघा. व्हीआरस घेऊन त्यांनी बिझनेस चालू केला आज दोन फ्लॅट आहेत त्यांचे शहरांमध्ये. स्वतःचं असं काहीतरी करायचं असतं असं कधी वाटलंच नाही तुम्हाला. आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणजे काय कळणार तुम्हाला."
हयांना जोरात ठसका लागला होता डोळ्यातून पाणी वाहत होते तरीही हे काहीतरी बोलतच होते त्याला. योगेश ताटावरुन उठून गेला होता. आणि आमचे हे नुसतंच वाढलेल्या पानाकडे बघत बसले होते. मला मात्र मेलीला काहीच कळत नव्हतं. काय स्टार्टअप , कसलं स्टार्टअप, कुठे आहे कंपनी, काय एवढे भारी करते की योगेश त्यावरून हयांना येवढं बोलतोय. ते फक्त एवढेच म्हणाले की  स्टार्टअप वगैरे फालतू गोष्टीत काही पडू नको त्या एका चांगल्या कंपनीचा जॉबचा कॉल आला आहे तर लगेच जॉईन कर. एवढं महाभारत घडल्यावर त्या रात्री आमच्याकडची ताटांची उष्टी-खरकटी काढण्याची वेळच आली नाही.

मी मात्र रात्रभर विचार करत राहिले. झोपच उडाली होती माझी. स्टार्टअप स्टार्टअप एवढेच काय ते डोळ्यासमोर. काय आहे हे नक्की रात्रभर डोळ्याला डोळा नाही.

 दुसऱ्या दिवशी दुपारी योगिता कॉलेज वरून घरी आली.  योगिता थर्ड इयर सायन्सला माझी मुलगी.  जेवणं वगैरे झाली आणि कालच्या रात्री चा विषय आपोआपच निघाला. "योगिता, हे  स्टार्टअप म्हणजे काय गं? कोणती परदेशी मोठी कंपनी आहे का मोठी फॅक्टरी आहे." ती हसायलाच लागली "अगं आई, तु म्हणजे ना खरंच काही माहीत नसतं तुला. उगाच आपलं तो स्मार्टफोन घेऊन व्हाट्सअप येतं असं दाखवत असतेस सगळ्यांना.  स्टार्टअप म्हणजे स्वतः एखाद्या व्यवसाय एखादी नवीन कल्पना चालू करणे. कोणावरही अवलंबून न राहता स्वतंत्र आपल्याला त्यातलं नॉलेज आहे त्यासंदर्भात एखादी कंपनी चालु करणे. स्वतः चं काम चालू करणे कुणाचीही कुठेही नोकरी न करता. अगं सध्या आमच्या जनरेशनच्या बर्याच मुले मुलींमध्ये ही क्रेज आहे किंवा इन्स्पिरेशन आहे म्हण ना. आणि बरोबरच आहे कोण करणार ती दहा ते पाच ची गुलामी!  स्वतः स्वतःच्या पायावर उभे राहता येते.  म्हणूनच योगेश बाबांकडे मागच्या आठवड्यात एक लाख रुपये मागत होता. त्याला हे मात्र तुला सांगायचं नव्हतं."
तिच्याशी बोलता बोलता मी मात्र सत्तरच्या दशकात गेले.  माझी आई आठवली,  "मी शाळेत असताना बाबांची कंपनी बंद पडली आणि आईने मसाले आणि पापड विकण्याचा उद्योग सुरू केला. तसं पाहायला गेलं तर तिला तरी कुठे होता अनुभव पण परिस्थिती निर्माण केलेला तो तिचा स्टार्टअपच होता की. तेव्हा तिने कुठेही आणले सुरुवातीचे पैसे तर बाबांनी दिलेल्या घरखर्चातून स्वतःसाठी बाजूला ठेवलेल्या साखरेच्या डब्यातून.  त्याच मसाले आणि पापड विकण्याच्या उद्योगावर तिने आम्हा दोन्ही मुलांना मोठे केलं, शिक्षणं केली. अर्थात बाबांनी पण जशी त्यांना मदत जमेल तशी केलीच की.
 पुढे माझं लग्न झालं मी पुण्यात आले. एक खोली, छोटा दीर, सासू-सासरे धरून पाच जणं.  हयांची साधी नोकरी सरकारी.  एकाच्या पगारात पाच जणांचा संसार चालवायचा. हासुद्धा माझ्यासाठी एक स्टार्टअपच होता की. मला कुठे होता अनुभव आणि माझ्यात कुठे होतं स्किल. मी तर पहिल्यांदाच बायको, सून आणि वहिनी झाले होते. जे काही होतं ते आईचा संघर्ष जवळून पाहताना आलेले अनुभव, तिची शिकवण,  तिचं काटकसरीचा वागणं आणि आहे त्यात सुख मानणं एवढंच. पुढे दिराचे लग्न झालं त्याने दुसरं घर घेतलं.  इकडे आम्हाला योगेश झाला दोन वर्षांनी तु. परत आम्ही सहा जण त्या एका खोलीत. हयांनी मात्र नेटानी नोकरी केली आणि माझी मदत म्हणशील तर जश्या गरजा वाढल्या तश्या मी  शिकवण्या घ्यायला सुरवात केली. माझा हा दुसरा स्टार्टअप.
 पुढे सासरेबुवा गेल्यावर ती खोली विकून लोन वर हा आपण वन बीएचके फ्लॅट घेतला. लोन फेडणे, तुम्हा मुलांची शिक्षणं यात दिवस कसे गेले कळलेच नाहीत. योगेश ला इंजिनिअर करण्यासाठी ह्यांनी संध्याकाळी मित्राकडे एक्स्ट्रा काम करायला सुरुवात केली त्यांचा तो पहिला स्टार्टअपच होता की तसं पाहायला गेलं तर.
आज योगेश इंजिनिअर झालाय नोकरीसाठी धडपडतोय.  ही पिढी वेगवान आहे वेगात आहे. हयांना हयांचे स्टार्टअप लगेच सुरू करायचेत. पण आयुष्य योग्यवेळी  स्टार्टअपची संधी देतच. अनुभवाची गरज असते आणि तो मिळवणे फार कठीण असतं. तो असा लाख-दोन लाख गुंतून मिळत नाही.  नवीन जन्म देण्याच्या स्टार्टअप ला सुद्धा नऊ महिने द्यावेच लागतात. ते नऊ महिने देण्याची थांबण्याची तयारी हवी आज आम्ही आहोत उद्या कोण असेल तुमच्यासाठी स्वतः स्वतःचे आयुष्य संभाळायचे आणि स्वतः स्वतःची स्टार्टअप चालू करायचे बंद करायचे, पुन्हा सुरुवात करायची.

परिस्थितीने निर्माण केलेले स्टार्टअप कुठे अनुभव, इन्व्हेस्टमेंट या गोष्टी बघत होते. पण यशस्वी झालेच ना. आम्हाला तर संधी मिळते वगैरे काही गोष्टी माहीतच नव्हत्या. कारण संकट हिच संधी मानून आम्ही यशस्वी झालो.  या नवीन पिढीला संधी आहे आणि काही मागेपुढे झालं तर आम्ही आहोतच की. हयातून जरी तो धडपडला तरी शिकेलच ना.
लहानपणी सायकल नाही का शिकला तीन-चार वेळा गुडघे फोडून.  म्हणून आम्ही त्याला नवीन सायकल दिली नाही असं नाही तर दिलीच. तेव्हा सुद्धा दोन तीन हजार जास्तच वाटले होते की. मला वाटतं आम्ही त्याला संधी दिली पाहिजे. त्याच्यात जर का आत्मविश्वास असेल आणि त्याला वाटत असेल की आपण नक्की काहीतरी करू तर त्याला दोन पावलं मागे न ओढता उलट आपण दोन पावलं पुढे होऊन त्याला मदत केली पाहिजे. मी नक्की हयांच्याशी बोलते, बघते काय म्हणतात."

"ए, आई एकटीच एवढे सगळे बोललीस स्वतःच स्वतःशीची बोललीस का माझ्याशी. पण जे काय बोललीस ना भारी हा. काय तुमच्या स्टार्ट अपचा प्रवास उलगडलास.  खरंच मान गये भिडू."

" चल गं, काहीतरीच. पण थँक्यू योगिता मला तुझ्यामुळे स्टार्टअप काय ते कळाले आणि योगेशचं स्टार्टअप सुरू व्हावे म्हणून मीच चावी फिरते की नाही बघ"

संध्याकाळी योगेश घरी आला आणि बाबांच्या हातात एन्व्हलप दिले. नमस्कार केला. "बाबा, मी त्या प्रायव्हेट कंपनी मध्ये सोमवारपासून जॉईन होतोय. हे अपॉइंटमेंट लेटर."
हयांनी मंद हास्य करत चक्क ते लेटर फाडून टाकले आणि योगेशच्याच हातात एक नवीन एन्व्हलप दिले. मला तर मेलीला काय चाललंय कळेनाच. हिंदी पिक्चर सारखंच भासू लागलं जणू.

योगेशने एन्व्हलप उघडले तर त्यात एक लाखाचा चेक होता. ते पाहून त्याचे आणि ओघाने माझे, डोळे पाण्याने तुडुंब भरलेले. त्यानी बाबांना कडकडून मिठी मारली आणि नमस्कार केला. मी ह्यांच्याकडे बघतच राहिले. मला काय चाललय कळतच नाही हे चेहर्‍यावरचे भाव बघितल्यावर हे म्हणाले " वसुधे, दुपारी तू चावी फिरवण्याचे ठरवलेस ना ते सगळं मी दारामागून ऐकत होतो बरं. Thank you, खरंच आज तू माझे डोळे उघडलेस. ह्या निमित्ताने आपल्या जीवनातल्या शेवटच्या टप्प्यातल्या स्टार्टअप तू सुरू करण्याची संधी दिलीस once again Thank you"© मिलिंद सहस्त्रबुद्धे
१४/०४/२०१९

7 comments:

 1. खूप सुंदर लिहले आहेस, डोळ्यासमोर उभे राहिले..... म्हणजे तुझा start up उत्कृष्ट चालू झाला आहे 👍अभिनंदन आणि शुभेच्छा !

  ReplyDelete
  Replies
  1. आजचा (दिवसाचा) ' स्टार्ट '
   सुरेख 'Start up' झाला..👌👍

   Delete
 2. लगे रहो बुद्धे भाऊ. लहान असतानाच्या एक रूम खोलीची आठवण झाली.
  असेच लेख येऊदेत.

  ReplyDelete

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...