"आहे मनोहर तरी"
काही बातम्या आज नाहीतर उद्या येणारच हे माहिती असतं. तरी ती बातमी ऐकण्याची मनस्थिती कधीच तयार होत नाही. ती बातमी आल्यावर सुद्धा नाही. अशीच काहीशी ब्रेकिंग न्यूज संध्याकाळी हार्ट ब्रेकिंग करून गेली. परिकर गेले. जाणारच होते, असाध्य रोगाशी झुंज देत होते. त्या रोगाशी झुंज बरेच जण देतात त्यात यशस्वी होतात पुन्हा झुंज देतात पुन्हा यशस्वी होतील याची खात्री मात्र नसते. तसेच काहीसे पर्रीकर यांच्या बाबतीत झालं.
हा माणूसच वेगळ्या हाडांचा आणि धातूचा बनलेला होता. स्वतः मेटलर्जी मध्ये मास्टर्स असल्यामुळे विविध धातूंप्रमाणे हार्डनेस आणि स्टिफनेस या माणसाच्या रक्तातच होता. लोखंडाच्या मेल्टिंग पॉइंट प्रमाणे तो त्या पॉइंटला पोहोचेपर्यंत शेवटपर्यंत लढत राहिला. काम करत राहिला, देशसेवा करत राहिला. समाज सुधारक म्हणून नाही तर एक राजकारणी मुख्यमंत्री म्हणून. फार अवघड आणि अजब रसायन होतं हे.काही बातम्या आज नाहीतर उद्या येणारच हे माहिती असतं. तरी ती बातमी ऐकण्याची मनस्थिती कधीच तयार होत नाही. ती बातमी आल्यावर सुद्धा नाही. अशीच काहीशी ब्रेकिंग न्यूज संध्याकाळी हार्ट ब्रेकिंग करून गेली. परिकर गेले. जाणारच होते, असाध्य रोगाशी झुंज देत होते. त्या रोगाशी झुंज बरेच जण देतात त्यात यशस्वी होतात पुन्हा झुंज देतात पुन्हा यशस्वी होतील याची खात्री मात्र नसते. तसेच काहीसे पर्रीकर यांच्या बाबतीत झालं.
देशभर लोकं पर्रीकरांना ओळखू लागले ते फक्त संरक्षण मंत्री झाल्यामुळे नाही. तसे बरेच संरक्षण मंत्री झालेत ज्यांना भारतीय जनता "चांगलीच ओळखून" आहे. तर पर्रीकरांना ओळखू लागले ते एवढ्या उच्च पदावर जाऊनही साधी सोप्पी राहणी असल्यामुळे. जॉर्ज फर्नांडिस यांच्यानंतर समाजवादी नसूनही एवढी साधी राहणी असणारा हा एकमेव नेता होता.
त्यांच्याबद्दलच विविध प्रसंग, कथा (ज्या कधीच दंतहीन नव्हत्या आणि पेडही नव्हत्या) सोशल मीडियावर चर्चिल्या जाऊ लागल्या आणि परिकर देशभर पसरले. कधी विमानाच्या रांगेत, कधी विमानात साधे इकॉनोमी सीटवर, कुठे कॅन्टीनच्या रांगेत तर कधी बसने सर्वसामान्यांबरोबर प्रवास करत ते कायम लोकांमध्ये जमीनीवर राहिले. जामीनावर नाही. तरीही कुठेही "आप"ल्या वागणुकीच्या उदो उदो नाही आणि कधी चॅनलवर अथवा मुलाखतींमध्ये त्यावर चर्चा नाही.
कायम हाफ मॅनिला (शर्ट नाही कारण मॅनिला खोचलेला नसतो) आणि ट्राऊझर. साध्या चपला बहुतेक गोवा कोल्हापूरच्या जवळ असल्यामुळे बहुतेक त्या कोल्हापुरी किंवा कोल्हापूरच्या अभ्यंकरांच्या टिपिकल असाव्यात. मुख्यमंत्री असल्यापासून संरक्षणमंत्री होते तेव्हा आणि परत मुख्यमंत्री झाल्यावर राहणी आणि विचारसरणीत कोणताही बदल झाला नाही. हा तसं स्टाईल म्हणाल तर त्यांचा तो मध्येच ब्रेक होणाऱ्या फ्रेमचा चष्मा तेवढाच काय तो. एवढे एक स्टाईलबाज पणा सोडला तर बाकी काहीच नाही. कधी कधी वाटतं ही अशी माणसं, कुठल्या मातीतून यांची बीज अंकुर पावतात
मुख्यमंत्री असताना स्कूटर वर फिरणे लोकांची लोकांसाठी लोकांकडून काम करून घेणे ही खरी लोकशाही त्यांनी गोव्यात रुजवली. सर्वधर्मीय असं हे गोवा राज्य, पण त्यांच्या कारकिर्दीत त्याला कधीही त्याला धार्मिक रंगाची जखम झाली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर तर भारतापेक्षाही आधी गोवा हे त्याच्या विविध साधक-बाधक आणि मादक विषयांमुळे प्रसिद्ध. हया मुख्यमंत्र्याने त्याच्या कारकीर्दीत कधीही गोव्याला लक्ष्मणरेषा ओलांडू दिली नाही आणि बदनामीचा रावण गोव्याला कधी शिवलाच नाही. मनोहर हा कायम रामासारखा मध्य उभा होता म्हणूनच असेल कदाचित.
संरक्षण मंत्री असताना त्यांनी घेतलेले अनेक धडाडीचे निर्णय OROP असेल किंवा बुलेटप्रूफ जॅकेट्स असेल किंवा सर्जिकल स्ट्राइक आज हळूहळू त्यांची किंमत आणि त्याचे महत्त्व भारतीयांना कळतंय. पहिला सर्जिकल स्ट्राइक ज्या संरक्षणमंत्र्यांच्या काळात झाला असा हा मनोहर पर्रीकर. साडेपाच सहा फूट उंचीचा आटोक्यात ठेवलेल्या मिशा आणि पुढे राहून नेतृत्व करण्याचे कौशल्य.
अर्थातच भाजप पक्षासाठी ही सर्वात मोठी हानी आहे. बुद्धिबळात चेकमेट करण्याच्या आधीच जेव्हा उभा, आडवा व तिरपा चालणारा वजीर उडतो तेव्हा काय परिस्थिती होते तशी परिस्थिती आज भारतीय जनता पार्टीची गोव्यात झाली आहे
देशाची हानी म्हणाल तर ती नक्कीच आहे. कारण आदर्श राजकारणी, समाजकारणी, मंत्री आणि नेता कसा असावा हे पुढच्या पिढीला कळणार नाही. अजून वीस पंचवीस वर्षे जगले असते तर पुढच्या पिढीला त्यांची कार्यशैली त्यांचे विचार आणि राहणी बघता आले असते.
असो.
गेल्या एक-दोन वर्षात असे दुर्दैवी धक्के आपल्याला बरेच मिळाले आहेत आधी अटलजी, मग जॉर्ज आणि आता पर्रीकर.
हा देश त्यातूनही सावरेल, पुन्हा कामाला लागेल, ट्रॅफिकजाम मध्ये अडकेल, मतदानाला जाईल. लोकशाहीचा उत्सव साजरा करेल आणि मग पुन्हा नव्या पर्रीकरांच्या शोधात सोशल मीडियावर सर्फिंग करेल
सरतेशेवटी पर्रीकर सरांना श्रद्धांजली देताना एवढेच सांगावसं वाटतं
" सर, तुमचा हा प्रवास तुमचं हे व्यक्तिमत्त्व आमच्यासाठी 'आहे मनोहर तरी'.........
पण तुम्ही नसाल"
© मिलिंद सहस्रबुद्धे
९९22१८26३२
१७/०3/२०१९
Thanks ..
ReplyDelete