"बाप"
"बाप माणूस आहेस तू" असा कोणी म्हणतं ना! तेव्हा आपल्या अंगात एक उत्साह संचारतो. आतून एकदम भारी वाटतं.
"बाबा एक प्रॉब्लेम झालायं" हे सांगताना कितीही मोठी समस्या असली तरी काहीतरी मार्ग निघेल ही शाश्वती असते.
बाप हा शब्द कधी काही लोकांना अव्यवहारी, असंस्कृत वाटतो..वडील, बाबा, आप्पा किंवा मग डॅडी आणि पप्पा
हे सगळे शब्दप्रयोग वाचायला, ऐकायला नक्कीच चांगले वाटतात. परंतु बाप म्हटलं की नात्याची उंची हिमालयाचं शिखर गाठते.
जसं रस्त्यावरील भांडणात मनातला सगळा राग आणि भावना फक्त भड ×× ह्या एका शब्दात समोरच्या पर्यंत पोचतात अगदी तसं.
तुम्ही कधी एखाद्या मोठ्या झाडाच्या बुंध्याला मिठी मारली तर तुम्ही तुमच्या बापाला मिठी मारल्याचा भास होतो. एवढा आवका असतो त्या बुंध्यात संपूर्ण झाडाला भक्कमपणे धरून ठेवण्याचा.
बाप हा पाण्यातल्या माश्याप्रमाणे पाण्यातल्या पाण्यात कधी रडतो ते कळतच नाही. त्याचे डोळे मात्र कायम आपल्याला आधार आणि आत्मविश्वास देत असतात. जणू तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे.
संकटात पाय रोवून आपल्या पाठिशी उभा बाप असतो.
हाती घेतलेल्या कार्यात विश्वासाने हातात हात देणारा बाप असतो.
मुलांच्या कर्तृत्वाची झालंर आनंदाने पांघरणारा बाप असतो.
तो जेव्हा स्वतः बाप असतो तेव्हा त्याच्यापुढे कोणीच बाप नसतो.
© मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ पुणे ३०
Comments
Post a Comment