Saturday, January 29, 2022

अनिल अवचट - मी आणि बाबा

 मी आणि बाबा


खरंच असं जगता येईल का? हा एकमेव प्रश्न मनात घर करून राहिला. काल शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर सदर दिलेला फोटो open केला.

वाचून झाल्यावर नेहमीप्रमाणे अजून दोन चार ग्रुप वर "शास्त्र असतं ते" नियमाप्रमाणे Forward देखील केला.
इतका सोपं असू शकतं का जगणं? विचार करणं? असं सतत मनाला वाटत राहीलं. घरासमोरची काढलेली सुंदर रांगोळी, कौतुक करायला "अरे वा छान काढलीय" "आज 32 ठिपक्यांची का?" "रंग मस्त भरलेत" वगैरे म्हणणारं कोणीही नाही. परत कुणीतरी येणारा जाणारा चालतांना चुकून पुसून जाणार. तरीही कोणतीही चिडचिड, मनात खंत न बाळगता उद्या तशीच नवीन सुंदर रांगोळी काढायची. काय असेल ना!
अनिल अवचट (बाबा), त्यांनी जे मुलाखतीत म्हटलंय ते आत्मसात करणं खूप अवघड आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात म्हणाल तर Impossible आहे. स्वतःच्या आई कडून शिकलेली "आनंदी राहण्याची" गोष्ट कदाचित त्यांच्या रक्तात कायमची भिनून गेली असावी. "एखादी गोष्ट करताना जो आनंद मिळतो तोच आपला आनंद बाकी कोणी कौतुक केलं पाहिजे असं काही नाही" हे जीवनाचं मुल्य ठरवून बाबा कायम जगले. म्हणूनच अनिल सरांचं कधीही सोशल मीडिया वर असलेले एखाद्य अकाऊंट किंवा स्वतःची वेबसाईट अथवा ब्लॉग असल्याचं ऐकिवात वाचनात आलं नाही. त्यावरून प्रदर्शित केले जाणारे त्यांचे विचार वैगरे वैगरे.
विविध कला आणि कार्यकुशल असलेले त्यांचे हात आणि मन (विचार) यामुळे ते कायमच जमिनीवर जोडलेले आणि जमिनीवरच जगलेले राहिले.
आज मी जराशी जरी एखादी वेगळी गोष्ट केली की कधी एकदा ती सोशल मीडियावर पोस्ट करतोय हयाची घाई झालेली असते. त्यावर किती लाईक्स मिळत आहेत किती कॉमेंट येतात यावरून माझ्या आनंद आणि दुःखाचा Barometer वर खाली होत असतो. हे सगळं कॉमेंट्स आणि लाईक्स कधीकधी 'अब तक छप्पन' वाल्या नायक ची आठवण करून देतात. एन्काऊंटर नंबरच्या नादात तो नायक माणुसकीच्या सीमा तर ओलांडत नाही ना असे जसं आपल्याला वाटतं; अगदी तसंच लाईक आणि कमेंट च्या नादात ती गोष्ट करताना जो आनंद मिळाला होता तो तर आपण नंतर हरवून बसत नाही ना हा विचार मनाला सतत भेडसावतो. हे असे सकस विचार वाचल्यानंतर.
'जगाला तुम्ही ओरडून, ओढून-ताणून सांगण्यापेक्षा जगाने तुम्ही आहात हे सांगणं महत्त्वाचं'. अर्थातच सध्याच्या काळात हे वाक्य एखाद्याला सुविचार वाटू शकते.
मी एखादा लेख लिहितो, कविता लिहितो अजून काही स्फुटलेखन करतो त्यातून जो आनंद मिळतो तो मिळतोच. मनातील अस्वस्थता, स्वस्थता, कधी सुचलेला वेगळा विचार मांडतो. नक्कीच प्रोसेस मध्ये जे काय चालू असतं ते कुठे तरी एका बाजूला आनंद देत असतंच. परंतु दुसऱ्या बाजूला ( back of the mind) हे सगळे सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर काय होईल याचाही विचार असतोच. (अर्थात आत्ता सुद्धा ते चालू आहे हे मात्र खरं)
गिरीश कुबेर एकदा म्हणाले होते की मी एखादं पुस्तक, लेख लिहून प्रकाशित केला की मी सोडून देतो. त्याच्याकडे बघत नाही येणाऱ्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया वाचत नाही. कला किंवा कृती घडण्याला आणि घडवणार्याला महत्त्व असतं. त्या कलेचं-कृतीचं अस्तित्व हे त्या प्रोसेस मध्ये किती आनंद मिळाला हयावर अवलंबून असतं. ना की नंतर त्याचं काय झालं. तो आनंद जितका अधिक तितकी ती कला अथवा कृती सकारात्मकरीत्या जगासमोर येते.
अनिल सरांचे आयुष्य हे असंच विविध कृतीतून मिळणाऱ्या आनंदात गेले. डॉक्टरकीचा अभ्यासापासून ते मुक्तांगणचं अफाट कार्य. विविध विषयांवर पुस्तक लेखन आणि सतत चालणाऱ्या हाताने केलेली ओरेगामी. समाजातील विविध वर्गांच्या व्यथा जवळून बघितल्यामुळे बाबांच्या मनातील अस्वस्थता हातावाटे ओरिगामीतून प्रतीत झाली. मनात साठलेलं कारुण्य अथवा दुःख बासरी वाटे आनंद स्वरात बाहेर आलं.
ओतूर सारख्या छोट्या खेड्यातून 'पुणे' नावाच्या भल्या मोठ्या शहरात गाजावाजा न करता प्रस्थापित होतांना बाबांना हयाच प्रोसेस मधून मिळणाऱ्या आनंदाने आपलासा वाटणारा बाप माणूस म्हणून नावलौकिक मिळवून दिला.
मी स्वतः अनिल सरांना कधी प्रत्यक्ष भेटलो नाही. त्यांची बहुतांशी पुस्तक जरूर वाचली आहेत. कधीतरी कुठल्या कार्यक्रमात त्यांची भाषणं, विचार ऐकले आहेत. त्यांच्या त्या जाड भिंगाच्या चष्म्यातून कायम कुतूहल जागं असणारी नजर आणि मोठ्या दातांचा दर्शन घडवणारा तो हसरा चेहरा कायमच 'आनंद किती निरागस' असू शकतो हयाची जाणीव करून द्यायचा हे मात्र नक्की.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे एक मूर्तिमंत रूप म्हणजे मुक्तांगणचे "बाबा" अनिल अवचट सर. आयुष्य हे किती साधेपणाने जगता येतं हे अवचटांच्या मुलीं इतकं सविस्तर कोणीही सांगू शकणार नाही.
लोकसत्ताच्या त्यांच्यावरील अग्रलेखातील एक वाक्य त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवनाचं दर्शन घडवतं....
"डावे-उजवे 'मधले' असे विचारधारांच्या क्षेत्रातले प्रवाह तेव्हाही होते (अनिल सरांच्या उमेदीच्या काळात) पण विचारधारा ही जगाकडे पाहण्याची खिडकी आहे प्रत्यक्ष जग नाही हे कळण्याचे भान अवचटांना होतं"
नावाप्रमाणेच बाबा अनिल होते..वार्याची एखादी हलकी झुळूक देखील जो आनंद देऊन जाते. तसं बाबांचं होतं, विविध क्षेत्रातील त्यांचं साधं हलकं फुलकं अस्तित्व वेगळाच अनुभव देऊन जातं.
--मिलिंद सहस्रबुद्धे
२९/०१/२०२२
ता. क. - हा लेख म्हणजे अवचट सरांनी आनंदाची नवीन व्याख्या आम्हाला सोप्या समजेल अशा भाषेत सांगितल्याबद्दल ही त्यांना स्तुती सुमनांजली आहे.

No comments:

Post a Comment

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...